
बालमैफल
सुरेश वांदिले
सगळी टोळी आनंदात होती. कारण अनेक महिन्यांपासून ठरवलेलं स्वप्न साकार होणार होतं. ताडोबाच्या जंगलात जाऊन वाघोबांचं दर्शन घ्यायचं, असं अनेक दिवसांपासून टोळीतल्या प्रत्येकाच्या घरी ठरत होतं. या टोळीमध्ये रवी, शशी, मीना, तेजोमयी आणि रंगनाथ होते.
ताडोबाच्या जंगलामध्ये वाघोबाचं दर्शन करण्याच्या पहाटे, दुपारी आणि रात्री अशा तीन वेळा असतात. रात्रीच्या दर्शन-सफारीला फार कमी लोकांना परवानगी दिली जाते. ही परवानगी ऑनलाइन पद्धतीनं दिली जाते. रवीच्या बाबांकडे ऑनलाइन बुकिंगचं काम सोपवण्यात आलं. पहाटे आणि दुपारी दोनच्या सफारीचं बुकिंग झालं. मात्र रात्रीच्या सफारीचं बुकिंग होऊ शकलं नाही.
सकाळी सहा वाजताची पहिली सफारी असल्याने रवीचे आईबाबा इतरांसोबतच आदल्या रात्री ताडोबा जवळच्या अंधारी अभयारण्याच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामास थांबले. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजताच सगळी मंडळी तयार झाली. बरोबर सहा वाजता सफारीच्या गाडीमध्ये गाईडसोबत बसून मंडळी ताडोबाच्या जंगलात शिरली.
अद्याप सूर्य उगवायचा होता. थंडगार वारा सुटला होता. झाडाच्या पानांची सळसळ सुरू होती. गाडी जशी पुढे जाऊ लागली, तसे काही प्राण्यांचे आवाज ऐकायला येऊ लागले. काही पक्ष्यांचं गुंजन सुरू झालं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानावर पडायला लागताच मुलं कान टवकारून ऐकू लागली. मोठ्या मंडळींना पक्ष्यांच्या या किलबिलाटात फारसा रस दिसला नाही. सर्व वडीलधारी मंडळी वाघ कधी दिसणार या चर्चेतच गुंग होती. रस्त्यात माकडांचा कळप आला तेव्हा गाडी थांबली.
“माकडांना काय बघायचं”, रवीची आई म्हणाली.
“इथे वेळ दवडला तर वाघोबाचं दर्शन घडायचं नाही.” तेजोमयीचे बाबाही म्हणाले. यावर गाईड तरी काय बोलणार?
मुलांचं लक्ष मात्र माकडांकडेच होतं. मोठ्या माकडांसमवेत खूप छोटी माकडंही होती. त्यांची दंगामस्ती चालली होती. झाडाच्या फांद्यांवर ती कधी सरळ तर कधी उलटी लटकायची. एकमेकांचा पाठलाग करायची. एकमेकांवर दात विचकटायची. झाडाच्या फांद्यांना लटकून झुलायची. लहानग्यांच्या खेळाकडे मोठी माकडं शांतपणे आणि कौतुकानं बघत होती. हे सारं बघण्यात सर्व छोटी कंपनी रंगून गेली होती. पण कुणाच्याही आईबाबांनी गाईडला फार काळ तिथे राहू दिलं नाही. त्यामुळे मुलांचा हिरमोड झाला.
गाडी पुढे निघाली. काही क्षणानंतर हरणांची टोळी रस्त्यावर बागडताना दिसली. हरणांना सगळ्यांनी प्राणी संग्रहालयात बघितलं होतं. पण प्रत्यक्ष जंगलात बघण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. हरणाची कांती आणि त्यावरचे ठिपके मनमोहक होते. एव्हाना उन्ह आलं होतं. त्यामुळे त्यांची कांती चमचम करायला लागली. यातच एखादा सुवर्णमृग दडलेला असावा असं रवीला वाटलं. त्याने तसं शशीला सांगितलं. शशीने आईबाबांना विचारलं. पण शशीच्या आईबाबांना या हरणांच्या कळपात जराही रस दिसला नाही. मीनाचे बाबा तर गाईडला म्हणाले सुद्धा, “अरे, हरणं बघायला आम्ही थोडंच इथे आलो आहोत. वाघ दिसला तरच खरी सफारी.”
गाईड यावर काहीच बोलला नाही. फक्त हलकंसं हसला.
गाडी पुढे जात असताना गाईडनं मध्येच गाडी थांबवली. सर्वांचं लक्ष एका झाडाकडं वेधलं, त्या झाडाच्या फांद्यांवर ५० पेक्षा जास्त पोपट बसले होते. जणू काही पोपटांची शाळाच भरली होती. झाडाच्या फांद्यांवर झुलणारी लाल चोच आणि हिरवेकंच रंगाचे पोपट बघून छोटी मंडळी हरखून गेली. “आपण यांना पेरू देऊ या का?”, तिने गाईडकाकांना विचारलं. पण जंगलात गाडीच्या खाली उतरायचं नसतं, असं काकांनी सांगितलं. त्यामुळे मीना हिरमुसली. गाईडकाका म्हणाले, जंगलातल्या या पक्ष्यांना काही द्यायची गरज नसते. त्यांना भूक लागली की, ते बरोबर त्यांना आवडणाऱ्या फळांच्या झाडांकडे जातात आणि मजेत खातात.
इतक्यात काहीतरी सळसळ झाली. त्यामुळे पोपटांची ती रांग उडाली. पन्नास पोपट एकत्रच पहिल्यांदाच मुलांनी बघितले होते. धनुष्यबाणासारखा आकार करत उडणारे ते पोपट बघून मुलांनी टाळ्या वाजवल्या.
वडिलधाऱ्या मंडळींना यातही फार रस दिसला नाही. रवीचे बाबा पुन्हा एकदा गाईडला म्हणाले, “अरे, हे काय दाखवत बसलास, वाघ दाखव ना.”
गाईडने गाडी पुढे काढली. पाच मिनिटांनंतर गाडी एके ठिकाणी थांबली. रस्त्याच्या एका बाजूला चारपाच बारशिंगे उभे होते. राखाडी रंगाचे ते बारशिंगे बघून मुलांचा आनंद द्विगुणित झाला. गाईडने आता गाडी हळूहळू पुढे न्यायला सुरुवात केली. कारण त्याच्या मते आणखी काही बारशिंगे त्यांना दिसू शकले असते. त्याचे म्हणणे खरे ठरले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आठ-दहा छोटे-मोठे बारशिंगे गवत चरत होते. त्यांचं काही गाडीकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे मुलांना जवळून बारशिंग्यांना बघता आलं. बारशिंग्यावर हल्ला करण्याआधी वाघही विचार करतो, अशी माहिती गाईडकाकाने मुलांना दिली.
गाडी अशीच हळूहळू समोर जात असताना एके ठिकाणी दोन रानगवे दिसले. धिप्पाड असे रानगवे, मुलं आणि मोठी माणसं पहिल्यांदाच बघत होती. गाडीचा आवाज ऐकून त्या रानगव्यांनी गाडीकडे बघितलं. एक नजर टाकून ते पुन्हा आपल्याच तोऱ्यात गवत चरू लागले. गव्याच्या मानेवर तीक्ष्ण व टोकदार शिंग होती. वाघही या गव्यांच्या वाटेला जात नाही, असं गाईडने सांगितलं. वाघ जर जंगलाचा राजा असेल तर, हे गवे सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात राजासारखेच वावरतात. स्वत:हून कुणाच्या वाटेला जात नाही. मात्र कुणी यांच्या वाटेला गेलं तर मग त्याची खैर नसते, अशी माहिती गाईड देत असतानाच तेजोमयीची आई त्याला म्हणाली, “अरे बाबा, वाघोबा कधी दिसणार?” मुलांना सर्व प्राणी-पक्ष्यांमध्ये आनंद मिळत होता, तर मोठ्यांचं मात्र वाघोबा कधी दिसणार? असंच चाललं होतं.
शेवटी गाईड तेजोमयीच्या आईला म्हणाला, “अहो ताई, वाघोबा जसा या जंगलाचा राजा, तसा स्वत:च्या मनाचाही राजा आहे. त्याला वाटेल तेव्हाच तो आपल्याला दर्शन देईल.”
“म्हणजे काय, वाघ दिसणारच नाही का?” सीमाच्या बाबांनी वैतागत विचारलं. त्यावर गाईड म्हणाला, “असं मी म्हणालो नाही साहेब. वाघ जिथं जिथं येऊ शकतो, त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला नेतच आहे. कधी ना कधी तो या ठिकाणी आलेला आहे. पण आज तो आतापर्यंत का आला नाही, हे मी कसं सांगणार?”
गाडी पुढे निघाली. गाडी हळूहळू जात होती. एके ठिकाणी दोन मोर आणि तीन-चार लांडोरी असा थवा उभा होता. मुलांनी मोरपीस बघितलं होतं, पण मोरांना ते पहिल्यांदाच बघत होते. मोरांना बघून सर्व मुलं हरखून गेली. एकटक त्यांच्याकडे बघत राहिली. अचानक एका मोराने पिसारा फुलवला. तो पिसारा, पंखा हलवतो तसा हलवू लागला. ते दृश्य अतिशय मनोहारी होतं. पिसारा हलवता-हलवता तो मोर मागे पुढे करत होता. त्यामुळे तो जणू काही नाचत आहे असं वाटतं होतं. ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच...’ ही कवितेची ओळ रवीला आठवली. “हे आंब्यांचं वन आहे का हो?” असं त्याने गाईडला विचारलं. त्यावर गाईड म्हणाला, “या ठिकाणी आंबा, साग, वेळू अशी वेगवेगळी झाडं आहेत. मोर फक्त आंब्याच्याच वनात नाचतो, असं नाही. तो इथे रस्त्यावर येऊनही नाचू शकतो. जंगलात वाघ दिसणं हे आपल्या हाती नसतं, तसं मोराचं नाचणं हे सुद्धा आपल्या हाती नसतं. आजचा दिवस चांगला म्हणून हा पिसारा फुलवलेला मोर आपल्याला दिसला.”
मोर आणि त्याच्या पिसाऱ्याचा मनमुराद आनंद मुलांनी घेतला. आईबाबांनी मोर बघताना वाघाची आठवण काढली नाही. पण मोराच्या पिसाऱ्याऐवजी वाघ कधी दिसेल, याचीच चिंता ते करत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं. “वाघाला, काय एवढं आइस्क्रीम लागलेलं असतं का रे, आपल्या आईबाबांचं काहीच कळत नाही बुवा. दिसला तर दिसला, नाही तर गेला उडत...” रवी सीमाच्या कानाजवळ जाऊन पुटपुटला. तिला हसू आलं. गाईडलाही ते ऐकू गेलं असावं, तोही हसला.
गाडी पुढे जात असतानाच वाटेत दोन कोल्हे रस्ता पार करताना दिसले. पंचतंत्रातला धूर्त कोल्हा इंग्रजी कुत्र्यासारखा दिसत होता. त्याची नजर भेदक होती. त्याची ठेवण बुटकीशी होती. काही क्षण गाडीसमोर थांबून ते दोन्ही कोल्हे झुडपात गुडूप झाले.
गाईडने गाडी पुढे तीन-चार पाणवठ्यांवर नेली. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी वाघ येतो. ही वाघाचं दर्शन घडणारी हक्काची जागा. पण अशा तीन-चार ठिकाणी दहा-वीस मिनिटे थांबूनही वाघोबा काही आले नाहीत.
गाडी पुढे निघाली. दुसऱ्या बाजूने इतर पर्यटकांना घेऊन गाडी परतीला निघाली होती. यांच्या गाडीजवळ ती गाडी थांबली. गाडीतली सर्व मंडळी आंनदी दिसत होती. कारण त्यांना एका पाणवठ्यावर वाघ दिसला होता. सर्व प्रवासी खूश होते.
“तरी आम्ही म्हणत होतो की वेळ दवडू नका. मोर काय, हरीण काय, नंतर कधीही बघता येतील. पण वाघोबा दिसणार नाही.” रवीचे बाबा वैतागून म्हणाले. इतर आईबाबांनीही त्यास सहमती दर्शवली. सकाळच्या सफारीची वेळ संपत आली होती. त्यामुळे गाईडने गाडी परतीच्या प्रवासाला घेतली.
पोपट, मोर, वानर, गवा, हरीण, बारशिंगे, मगर, बगळे असे पशूपक्षी दिसल्याने मुलं आनंदात होती, तर वाघ दिसला नाही म्हणून आई-बाबा मंडळी दु:खीकष्टी झाली होती. हे हिरमुसलेपण घेऊन सर्वजण हॉटेलमध्ये परतले. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन मंडळी दुपारच्या सफारीला निघाली.
सकाळच्यापेक्षा दुपारचं जंगल वेगळं भासू लागलं. सूर्य मावळतीला लागला होता. त्यामुळे उन्हाची किरणं आता कमी प्रमाणात येत होती. थंडगार वारा अंगाला बोचू लागला. सकाळी दिसणारी झाडं आता थोडीशी गूढ वाटायला लागली. झाडाचं सळसळणंही थांबलं होतं. वेगळीच निरव शांतता सर्वत्र भरून राहिली होती.
सकाळच्यापेक्षा दुसऱ्या मार्गाने गाईड गाडी नेत होता. त्यामुळे वेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं-वेली बघायला मिळत होत्या. काही वेली तर अंगावर कोसळतात की काय इतक्या खाली आल्या होत्या. त्या वेलींमुळे अंगावर ओरखडे उमटू नयेत म्हणून वेली आल्या की खालीच वाकावं लागायचं. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघण्याची मुलांची ही पहिलीच वेळ. त्यामुळे जंगलातील अस्ताव्यस्त पसरलेली झाडं बघून मुलांना आनंद होत होता. वाटेत येणाऱ्या पाणथळ्यावर गाडी थांबायची. वाघोबा येण्याची वाट बघितली जायची. पण तीन-चार पाणवठे होऊनही वाघोबा काही दिसले नाही. गाडी परतीला लागली, पण वाघ काही दिसलाच नाही. आईबाबा मंडळी जाम निराश झाली. मुलं मात्र खूश होती. वाघ नाही तर नाही, इतर प्राणी-पक्षी-चित्रविचित्र झाडं-झुडपं बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
हॉटेलमध्ये मंडळी जेव्हा परतली, तेव्हा आईबाबांचे चेहरे मात्र पडलेले होते. वाघोबांनी त्यांना निराश केलं होतं.
टक टक टक
रवी आणि त्याचे आईबाबा ज्या खोलीत झोपले होते, त्या खोलीच्या दारावर कुणीतरी टक टक करत होतं.
“क क कोण..?” रवीचे बाबा घाबरून उठले.
“मी वाघोबा..”
“क क काय..?” बाबा आणखीनच घाबरले.
“मघाशी मी तुम्हाला भेटलो नाही ना, म्हणून मग आता स्वत: आलोय दर्शन द्यायला.. मघाशी तर सारखे वाघोबा-वाघोबा करत होता ना. आता का घाबरता?” वाघोबा म्हणाला.
“त त त प म्हणजे भीती वाटते..” बाबा कसंबसं बोलले.
“अरे घाबरुटल्या...जरा जंगलाचा आनंद घ्यायला शिकाना...वाघ म्हणजेच काही जंगल नाही. जरा पोरांकडून शिका. कशी मजेत जंगल बघत होती. बघता बघता दंगली होती. आनंदून गेली होती. जरा मुलांसारखा आनंद घ्या. वाघ दिसला नाही म्हणून मुलं काही रडत बसली नाहीत तुमच्यासारखी.. चल, आता दार उघड. मी आत येतो” वाघोबा म्हणाला.
“न न नाही नाही, वाचवा वाचवा...” असं बाबा खूप जोरात ओरडले आणि गादीवरुन खाली पडले. त्यांच्या आरडाओरडीमुळे सगळे धावत आले. रवीच्या बाबांना दरदरून घाम फुटला होता.
बाबांनी मग, स्वप्नात आलेल्या वाघोबाची गोष्ट सगळ्यांना सांगितली. ती ऐकून सर्व मुलं हसली. आईबाबांना त्यांची चूक उमगली. वाघोबाच्या नादात, जंगल सफारीचा खरा आनंद घालवून बसल्याचं त्या सर्वांच्याच लक्षात आलं.
ज्येष्ठ बालसाहित्यिक