द व्ह्यूफाइंडर - असेही एक प्रेमपत्र

निसर्गाच्या विविधांगांचं निरीक्षण म्हणजे आपलं आत्मिक ज्ञान अधिकाधिक सखोल करत नेणं. पूर्णत्वाकडे वाटचाल करणं. छायाचित्रांच्या माध्यमातून वन्यजगताचं दस्तावेजीकरण करणाऱ्या ‘द व्ह्यूफाइंडर’ या पुस्तकातून ही अशी पूर्णत्वाकडे वाटचाल होते. या पुस्तकातील संकेत रेड्डी यांचं प्रत्येक छायाचित्र म्हणजे जणू प्रेमपत्रच आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित व्हावेत, यासाठी.
द व्ह्यूफाइंडर - असेही एक प्रेमपत्र
Published on

नोंदी

कमलेश संते

निसर्गाच्या विविधांगांचं निरीक्षण म्हणजे आपलं आत्मिक ज्ञान अधिकाधिक सखोल करत नेणं. पूर्णत्वाकडे वाटचाल करणं. छायाचित्रांच्या माध्यमातून वन्यजगताचं दस्तावेजीकरण करणाऱ्या ‘द व्ह्यूफाइंडर’ या पुस्तकातून ही अशी पूर्णत्वाकडे वाटचाल होते. या पुस्तकातील संकेत रेड्डी यांचं प्रत्येक छायाचित्र म्हणजे जणू प्रेमपत्रच आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित व्हावेत, यासाठी.

पहाटेची सुवर्णवेळ...हळूहळू उगवतीची प्रभा पसरतेय आसमंतावर, त्यात एकटंच चाललेलं एक हरिण...जणू पहाटेच्या त्या पिवळसर प्रकाशात हरवलेलं..

बेडकासारखा बेडूक खरा..पण त्याच्याकडे नेमकेपणाने पाहणारे डोळे जर कॅमेऱ्याच्या लेन्समागे असतील तर बेडकाच्या डोळ्यातही विश्व सामावलेलं दिसतं..

आपले इवलेसे पंख अलगद पसरून विहरत रानाच्या हिरवाईचं गाणं गाणारा पक्षी...हा क्षण नेमका टिपायचा तर तो तितक्याच हळुवारपणे आणि त्याचवेळी तितक्याच चपळाईने पकडायला हवा..

बापमाया कशी असते? तर डोक्यावर पंख पसरणारी, ऊन-वाऱ्यापासून आपल्या पिल्लाला जपणारी...मग तो इवलासा पक्षी असला म्हणून काय झालं? त्याच्या त्या इवल्याशा पंखात बापमायेचं बळ असतंच...

निसर्ग म्हणजे अशा अनेक अनमोल क्षणांचं भांडार आहे. फक्त ते पाहण्याची नजर हवी आणि समोर दिसतोय तो क्षण त्याच क्षणी बंदिस्त करण्याची नजाकत हवी. तरच निसर्गातल्या या भांडाराची फोटोंमधून उधळण करता येते. संकेत रेड्डी यांच्या ‘द व्ह्यूफाइंडर’ या देखण्या इंग्रजी पुस्तकातील छायाचित्रांमधून नेमकं हेच होतं. हिरवाईतले अनेक अद्भुत क्षण आपल्यासमोर जिवंत होतात. बंगळुरू येथील संकेत रेड्डी हे प्रख्यात भारतीय वाइल्डलाइफ फोटोग्राफर आहेत. ते केवळ फोटो काढत नाहीत, तर आपल्या फोटोंमधून वाइल्डलाइफ डॉक्युमेंटेशन करतात. गेले १७ वर्षांहून अधिक काळ ते आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वन्य जगताचं हे दस्तावेजीकरण करत आहेत. वनसंगोपन, वन्यप्राणी संरक्षण हे त्यांचं ध्येय आहे.

‘द व्ह्यूफाइंडर’ या संकेत रेड्डी यांच्या पुस्तकात वन्यजीवनाची १५० हून अधिक छायाचित्र असून त्यांचं नऊ प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. आपल्या फोटोंमधून निसर्गाचं सौंदर्य उलगडतानाच निसर्गाचं संवर्धन करणं किती महत्त्वाचं आहे, हेही ते अधोरेखित करतात. त्यांनी आपल्या छायाचित्रांचं जे वर्गीकरण केलं आहे ते वेगवेगळ्या विषयांशी निगडित असून ते भावनांचं वर्गीकरण करतं. शेड‌्स ऑफ अ पर्सोना (व्यक्तिमत्त्वाच्या छटा), द माइट ऑफ लव्ह (प्रेमाची ताकद), द टेल्स ऑफ फिअरलेसनेस (निर्भयतेच्या गुजगोष्टी), सॉन्ग्ज ऑफ ब्युटी (सौंदर्यसूक्त), द लँग्वेज ऑफ ऑरा (वलयाची भाषा), द पॉवर ऑफ प्रिझर्व्हरन्स (शक्ती द्दढतेची), द विंग्ज ऑफ कलर (रंग पंखांचे), द ब्रिथ ऑफ फ्रिडम (मुक्ततेचा श्वास), अ ड्रॉप ऑफ जॉय (मजेचा थेंब) अशी समर्पक नावं प्रत्येक विभागाला देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्तन, त्यांचं सहजीवन, पर्यावरणाचं संतुलन राखण्यामधील त्यांचं योगदान या आधारे प्रत्येक विभागातील फोटोंची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक बाबींच्या ज्ञानाशिवायही एखाद्याला या पुस्तकाचा आस्वाद सहजतेने घेता येतो. निसर्गाची सफर करता येते. केवळ छायाचित्रकारांसाठीच नाही, तर निसर्गप्रेमींसाठीही हे पुस्तक महत्त्वाचं आहे.

“या पुस्तकातील प्रत्येक छायाचित्र म्हणजे जंगलाला लिहिलेलं एक प्रेमपत्रंच आहे”, असं जेव्हा प्रसिद्ध अभिनेता आणि पर्यावरणवादी आर. माधवन या पुस्तकाला लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत म्हणतात तेव्हा ती शाबासकीची थाप हे प्रेमपत्र वाचणाऱ्या प्रत्येकालाच भावते. आर. माधवन लिहितात, “हे पुस्तक संकेत रेड्डी यांनी अतिशय काळजीपूर्वक विणलं आहे. संकेतचा कॅमेरा केवळ फोटोफ्रेम कॅप्चर करत नाही, तर वेगवेगळ्या प्रजातींमध्ये आणि मानवी मनांमध्ये असलेले क्षणिक आणि तरीही कधीही न संपणारे असे शाश्वत क्षण नोंदवतो.”

निसर्ग आणि मानवी जगणं या दोन्हीत रमणारे संकेत आपल्या कामाविषयी बोलताना सांगतात, “बहुतेक वन्यजीवनावर आधारित कॉफी टेबल बुक्स ही केवळ वाघ, हत्ती आणि तशाच मोठ्या प्रजातींवरच केंद्रित असतात. त्यामुळे अनेक प्राणी दुर्लक्षित राहिले आहेत. मी जगभर प्रवास केला आणि त्यातून जे शिकलो ते या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. मी माझ्या अभ्यासातून फोटोग्राफीचं ज्ञान मिळवलं आहे. मी आणि माझे सहकारी छायाचित्रांचा अभ्यास करून लाइटिंग किंवा क्लॅरिटीबद्दल चर्चा करत असू.”

जंगल आणि तेथील प्राणीजीवनाचा आढावा घेताना संकेत सांगतात की, “माणसाचा निसर्गाशी तुटलेला संबंध पुन्हा एकदा जोडणं हा या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे. जेव्हा मी जंगलात जातो आणि प्राण्यांचे निरीक्षण करतो तेव्हा त्यांचं वर्तन आणि तेथील परिस्थिती याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. पशुपक्ष्यांचे वर्तन हे अनेकदा मानवी वर्तनाशी मिळतंजुळतं असतं, हे मी पाहिलेलं आहे. म्हणूनच या पुस्तकाची रचना करताना मी एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारला आहे.” आपलं म्हणणं अधिक स्पष्ट करताना संकेत एक उदाहरण देतात आणि सांगतात, “मी एकदा पेंग्विनचं भांडण पाहत होतो. ते आपल्या प्रतिद्वंद्वीवर आपल्या डोक्याने प्रहार करत होते. पण काहीवेळाने खेळकर वृत्तीने त्यांनी आपलं भांडण मिटवलं. माणसांच्या बाबतीतही असंच घडलं किंवा माणूसही असाच वागला तर किती बरं होईला ना! जगातील सर्व भांडणं मैत्रीपूर्ण पद्धतीनं सहज सुटू शकतील.”

या पुस्तकात निसर्ग आपल्याला विविधांगाने भेटतो, दिसतो. प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, किटक, सरपटणारे प्राणी, पाण्यातील वनस्पती जीवन, याचबरोबर सूर्योदय-सूर्यास्त, संधीप्रकाशात दिसणाऱ्या झाडांच्या समूहांचे एकेक लेअर्स आणि त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणारे विविध प्राणी-पक्षी..फोटोतील छोटे-मोठे तपशील वाचकांचं लक्ष वेधून घेतात. या पुस्तकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची मांडणी अत्यंत आकर्षक आहे. लेआऊट आणि डिझाईन, कागदाचा उंची पोत, लक्षवेधी रंगसंगती हे सगळं काही उच्च दर्जाचं आहे. फोटोंमधील प्रकाशछाया, रंगछटा आणि निसर्गातील हालचालींचं अचूक चित्रण हे अत्यंत प्रभावी आहे.

छायाचित्रांइतकाच शब्दांचा वापरही मार्मिक असून प्रत्येक छायाचित्राच्या खाली दिलेली माहिती वाचकाला त्या क्षणात गुंतवून ठेवते. पहिल्याच विभागाचे नाव आहे, शेड‌्स ऑफ ए पर्सोना. म्हणजेच प्रत्येक प्राण्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या छटा. व्यक्तिमत्त्वाची ही अशी छटा छायाचित्रकार आपल्याला पानभर असलेल्या बेडकाच्या डोळ्यांमधून दाखवतो. माणसासारखी शिटी मारणाऱ्या पक्ष्याला संकेत ‘नॉटी स्कूलबॉय’ म्हणतात, तर आपल्या पाडसाला शिकवणारी मादी हरीण या छायाचित्रात ‘होली मदर’ या नावाने अवतरते, तर रेड पांडा ‘मास्टर शिफू’ म्हणून आपल्या समोर येतो. आकर्षक शीर्षकांच्या बरोबरीनेच प्रत्येक छायाचित्रात त्या त्या प्रजातीची थोडक्यात माहिती दिली आहे.

या पुस्तकाचं आणखी महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे प्रत्येक पानावरील फोटोग्राफिक सिम्बॉल्स. त्यात प्राणी-वनस्पतीचं नाव, स्थान, तारीख दिलेली आहे. शिवाय कॅमेरा, लेन्स अशी तांत्रिक माहितीही सोप्या चिन्हांमध्ये दिली आहे. त्यामुळे कोणालाही ती सहज समजू शकते. या पुस्तकाची निर्मिती ‘अ फायरॲन्ट स्टुडिओज्’ची आहे.

‘द व्ह्यूफाइंडर’ हे पुस्तक वाचकाला पुन्हा एकदा निसर्गाशी जोडलं जाण्याचं आवाहन करतं. हे पुस्तक आपल्याला निसर्गाच्या हिरवाईत घेऊन जातं. केवळ नजरेनेच नाही, तर मनानेही. म्हणूनच हे पुस्तक पाहताना तुकोबांच्या ओळी कानात रुंजी घालतात,

वृक्षवल्ली आम्हां सोयरे...वनचरे..

पक्षी ही सुस्वरें आळविती...

आणि एकेक पान उलगडत आपण पुढे जात राहतो.

fpjkamlesh@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in