

कथा
ईशान पुणेकर
लहान भावंडांच्या निरागस गोंधळातून उलगडणारी ही एक गोड-हसरी गोष्ट.
माझा छोटा भाऊ येडतांग आहे. हा शब्द मी बाबांचा ढापलाय. येडतांग म्हणजे वेडा. डेंजर वेडा! मी त्याला ढिंगटांग-येडतांग असं म्हणते. तो काय करेल याचा नेम नसतो. तो आता आहे तीन वर्षांचा. माझं त्याच्याशी जमत नाही आणि जमतंसुद्धा. खरं तर जमत नाही हेच खरं. पण मग जमतं कसं? त्याचीच ही गोष्ट आहे.
त्याला रात्री आई झोपवते. शेजारी मीही असते. मला गोष्ट ऐकायला आवडतं. आता तुम्ही कशी ही गोष्ट वाचत आहात तसं. पण मला झोपून गोष्ट ऐकायला जास्त आवडतं, तर ह्याची शंभर नाटकं असतात. ममा, झोप येत नाही, ममा, तहान लागली. एक ना दोन, अनेक. आईलाही उठायचा कंटाळा असतो बरं. मग तो आईला म्हणतो कसा, ‘अहो मंजूताई, जरा पाणी द्या ना. बाळाला तहान लागलीये.’ ही ना बाबांची नक्कल. मग मंजूबाईंना जाम हसू येतं. त्यांना मुलावर प्रेम येतं त्याचे लाड करावेसे वाटतात. मग त्या मुलाला पाणी मिळतं. पण कसं? तर ते आणायचं कामही मलाच करावं लागतं.
बरं अजून एक गंमत- मी मंजूताईंना आईच म्हणते. आई आहे ना ती माझी. पण हा शहाणा, शहाणा की येडतांग? अं? येडतांगच! तो तिला ममा म्हणतो. शी! मला नाही आवडत असं म्हणायला. आई म्हणल्यावर कसलं भारी वाटतं. पण हे ममा प्रकरण काय? तर शेजारचा ठोंब्या त्याच्या आईला ममा म्हणतो.
हाच तर प्रॉब्लेम आहे. त्याने त्या ठोंब्याचा ममा हा शब्दच नाही, तर त्याचा सगळा ठोंबेपणाही घेतलेला आहे. म्हणजे ठोंब्याला ओरडण्याची सवय आहे. बरं आरडाओरडा कशासाठी? तर कशासाठीही. मग काय हादेखील तेच शिकलाय. त्याचं एक आवडतं ओरडणं आहे. आईच्या नावाने ओरडत फिरायचं- ममा ममा!
मग काय? ममा म्हणजे एक नंबरची ठमा! लगेच त्याला म्हणणार, ‘ओ ले लाजा, काय जालं?’ किती तो बिनकामाचा लाडिकपणा!
सगळं असं आहे. पण मागच्या आठवड्यात एक गंमत झाली. आम्ही चूनो मॉलमध्ये गेलो होतो. चूनो म्हणजे सिलेक्ट-निवडा. बाबा त्याला चुना मॉल म्हणतात. आईकडे बघून. का? ते मला माहिती नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल. आम्ही तिथे गेलो. बापरे! काय प्रचंड मोठा मॉल आहे तो. कित्ती दुकानं. कित्ती वस्तू. कित्ती खेळणी अन् कित्ती माणसं. अर्थात आमच्यासारखी छोटी मंडळीसुद्धा. एका विंडोमध्ये छान छान फ्रॉक लावले होते. गुलाबी, पांढरे जणू पऱ्यांचे! जाम आवडले मला. ते बघण्यात मी आईपेक्षा जास्त गुंगले. मी घातल्यावर ते फ्रॉक काय भारी दिसले असते! आणि मी परी दिसले असते!
पण पुढे झालं असं, माझं लक्ष होतं फ्रॉकमध्ये, तेव्हा फिरता फिरता आई गेली हरवून. या आयांना शॉपिंग म्हणजे वेडच लागतं. आता या येडतांगवर लक्ष ठेवायचं काम तिचं आहे खरं तर; पण ते कामही मलाच करावं लागतं.
आता आई हरवलीय हे येडतांगला कळलं. तसा त्याने माझा हात सोडला. तो तिला शोधायला पळाला. माझ्या लक्षात येण्यापूर्वी पठ्ठ्या गायब! आता आई गेली कुणीकडे. येडतांग गेला कुणीकडे आणि मी बसले फ्रॉक बघत. जेव्हा माझ्या ते लक्षात आलं, तेव्हा माझे तर डोळेच मोठे झाले. आईचे डोळे मोठे होतात ना ते आले माझ्या डोळ्यांसमोर.
आणि मी काही परी नाही ना!... तो फ्रॉक घालून मी परी दिसले असते; पण खरी झाले नसते. नाही का? नाहीतर मी जादूची छडी फिरवली असती आणि क्षणात येडतांग माझ्या हातात आला असता. कळलं आता तुम्हाला? पण मी जाम घाबरले. आई ओरडणार म्हणून आणि येडतांग हरवला म्हणूनही…
माझं प्रेम आहे त्याच्यावर! ... येडतांग ढिंगटांग असला, तरी छोटा भाऊ आहे तो माझा आणि तो सापडला नाही तर? अरे बापरे! कल्पनासुद्धा नको.
पण मला तो सापडला. कसा? तर तो ओरडायला लागला होता- ममा ममा! आणि त्यामुळे तो मला सापडला. पण आई नाहीच सापडली. आमच्यापेक्षा शॉपिंग महत्त्वाचं मंजूताईंना! तो जोरजोरात रडायला लागला. ओरडायला लागला. मी त्याला समजावत होते, पण नाही. तो ममा ममा ओरडत, वेड्यासारखा इकडे तिकडे पळायला लागला. मी त्याच्यामागे. तो शिरला एका मोठ्या दुकानात. अर्थात मीही.
दुकानातला एक स्मार्ट दादा शूटिंग करू लागला. त्याने येडतांगच्या रडक्या, डोळ्यांतून पाणी येणाऱ्या चेहऱ्यासमोर मोबाईल धरला. रडणारा-ओरडणारा येडतांग. जो ममा ममा म्हणून ओरडतोय. समोर मोबाईल बघून तर त्याचा आवाज आणखीच वाढला- ममा ममा!
तेवढ्यात आई आम्हाला शोधत तिथे आली. तिला पाहताच येडतांग तिला चिकटला आणि त्याचं ते पालुपद चालूच- ममाचं. आधी तो रडत होता आणि मग तो हसू लागला आणि त्याचं ‘ममा’ चालूच होतं. त्या दादाने सगळं शूटिंग केलं होतं.
आणि गंमत! त्या शूटिंग करणाऱ्या दादाने ते रील व्हायरल केलं. ममा-ममा म्हणून ओरडणाऱ्या मुलाचं. काय म्हणताय? अहो, जाहिरात त्यांच्या स्टोअरची. त्या स्टोअरचं नावच होतं मुळी- ममा’ज स्टोअर! लगेच येडतांग फेमस झाला. आई आल्यावर तो हसू लागला होता. आधी रडणारा मुलगा ममाच्या कुशीत गेल्यावर हसू लागला. असं त्या दादाचं ते रिल होतं तर. त्यावर त्या दादाने कॅप्शनही दिलं होतं - ममाकडे मिळतो आनंद आणि ममा स्टोअरमध्येही! अर्थात त्या दादाने आईची आधी परवानगी घेतली होती.
मग त्या दादाने बक्षीस म्हणून येडतांगला चक्क पाच हजार रुपयांचं एक गिफ्ट कूपन दिलं. मग काय? आईने ते कूपन लगेच वापरलं ममा’ज स्टोअरमध्ये. त्या स्टोअरमध्ये फक्त लहान मुलांचे कपडे मिळतात. सगळ्याच प्रकारचे. छान छान, मस्त, रंगीबेरंगी! परीसारखे फ्रॉकसुद्धा. म्हणून ममा’ज स्टोअर. मुलांसाठी हवे तसे कपडे मिळणारं ठिकाण. आयांना कपडे शोधत बसण्याची भानगड नाही.
आईने त्याच्यासाठी एक झब्बा-धोती सेट घेतला. सोनेरी रंगाचा. असला गोड! आणि मलाही एक फ्रॉक. तो शुभ्र परीसारखा फ्रॉक. वॉव! आता या येडतांगच्या भानगडीमुळे मला तो फ्रॉक मिळाला. आता मी ढिंगटांग म्हणत नाही येडतांगला. तो तर आमचा शहाणा बाळ आहे चांगला.
छोटी भावंडं छान असतात. प्रेमळ अन् लकी! समझ्या?
ज्येष्ठ साहित्यिक
Bip499@hotmail.com