ती हरवली आहे

मध्य मुंबईत जिथे संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला, सभा गाजवल्या गेल्या तिथेच आज मराठी भाषा वाचवण्यासाठी देखावा उभारला जात आहे, ही विसंगती दुःखद आहे. २००० वर्षांचा इतिहास असलेली मराठी केवळ मध्य मुंबईतूनच नाही, तर बृहन्मुंबईतूनच हरवत चालली आहे. मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर या वर्तमानाची मांडणी अधिकच टोकदार वाटते.
ती हरवली आहे
Published on

कलारंग

रोहित गुरव

मध्य मुंबईत जिथे संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला, सभा गाजवल्या गेल्या तिथेच आज मराठी भाषा वाचवण्यासाठी देखावा उभारला जात आहे, ही विसंगती दुःखद आहे. २००० वर्षांचा इतिहास असलेली मराठी केवळ मध्य मुंबईतूनच नाही, तर बृहन्मुंबईतूनच हरवत चालली आहे. मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर या वर्तमानाची मांडणी अधिकच टोकदार वाटते.

तिचा इतिहास मोठा. पार दोन हजार वर्षांचा. तिच्यासाठी संतांपासून साहित्यिकांपर्यंत अनेकांनी आपली लेखणी झिजवली. म्हणून तर ती 'अभिजात' ठरली. पण आज ती हरवली आहे. तिच्या स्वतःच्या घरातून हरवली आहे.

पण हरवलेल्या तिला शोधायला तर हवं. तिला शोधण्याचं आमंत्रणच भोईवाड्याचा विघ्नहर्ता देतोय. 'ती हरवली आहे... शोधायला नक्की या' असे बॅनर परळ, भोईवाडा, नायगाव या मध्य मुंबई भागात लागले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष वेधत आहेत. ते पाहून कोण हरवली आहे? कुठे शोधायचं? हे प्रश्न पडतात आणि आपली पावलं आपसूक मंडपाकडे वळतात.

मंडपात शिरताच मिट्ट काळोख आपलं स्वागत करतो. त्या काळोखात आपण स्थिरावत असतानाच मराठी स्वाभिमान काळवंडणारे संवाद कानी पडू लागतात.

इथल्या मातीत पोट भरणारे अमराठी लोक "नहीं बोलूंगा मराठी" असं मुजोरीने सांगत असतात. "किसी में दम हैं तो हमें महाराष्ट्र से निकाल के दिखाईये" असं त्वेषाने किंचाळत ऐकवतात. मग अमराठींच्या मुंबईतील आगमनाविषयीचं निवेदन येतं. लोकलमधली चौथी सीट अगत्याने दिल्यावर संपूर्ण सीटच व्यापण्याचा दाखला देऊन त्यांनी मुंबई कशी व्यापली, हा प्रवास कथन केला जातो. हे निवेदन ऐकत असताना परप्रांतीय महामुंबईत हातपाय पसरत असताना आकसत जाणारा मराठी माणूस आणि तरीही 'चालतंय ना चालू दे' ही त्याची निवांत भूमिका डोळ्यांसमोर जशीच्या तशी तरळत राहते. एका अंगाने या सोशिकतेचा राग येतो, तर दुसरीकडे कीव वाटते. हो, मराठी असेच असतात, असं आपलं आपल्यालाच वाटू लागतं.

मराठी भाषा अलीकडच्या राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनली. दुखावलेलं मराठी मन कधी नव्हे ते एकवटलं. इथल्या मातीतल्या मनामनांतील ही खंत, ही अढी ओळखून हाच धागा पकडत परळ भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात भोईवाड्याचा विघ्नहर्ता या मंडळाने 'ती हरवली आहे' असं सांगत हा देखावा सादर केला आहे. मंडपापासून दोन-तीन किलोमीटर दूरपर्यंत, नाक्यानाक्यावर बॅनरबाजी करत 'तिला' शोधायला या, असं सांगत मराठी भाविकांना मंडपापर्यंत खेचून आणलं जात आहे. अर्थात हे अगदी दोन मराठींनी अजाणतेपणी एकमेकांसोबत अमराठी (हिंदी, इंग्रजी) बोलण्याइतकं विचित्र आहे. कारण मुंबईत, भर मध्य मुंबईत मराठी भाषा टिकवण्यासाठी देखावा उभारावा लागतो, हीच खरी शोकांतिका आहे.

इथला हा जनस्वभाव दाखवल्यानंतर, भाषेचं दुखणं स्पष्ट केल्यानंतर निवेदन पुढे सरकतं. 'कोण होती ती?' हे सांगताना तिचा इतिहास, तिचं श्रेष्ठपण अधोरेखित केलं जातं. तब्बल दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्री प्राकृत या मायमराठीचा जन्म झाला. 'माझ्या मराठीची बोलू कौतुके...' म्हणत ज्ञानेश्वरांनी १३व्या शतकातच मराठीची महती लिहून ठेवली आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, सोपानदेव, निवृत्तीनाथ, जनाबाई, मुक्ताबाई या संत-महंतांनी आपल्या साहित्यातून मराठीचा विस्तार केला. त्यांनी मराठी भाषेत ओव्या, अभंग, श्लोक, चरण.. यांची रचना करून तत्कालीन समाजाला ज्ञानामृत पाजलं. हे होत असताना आपसूकच मराठी जनांवर मराठीचे संस्कार होत होते.

वसाहत काळात स्वातंत्र्य लढ्याची चूड देशभर पेटली असली तरी त्याचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत भाषा म्हणून मराठीनेच वादळ उठवलं होतं. बहुजन लोकं शिकली तरच आपल्या गुलामीविरोधात बोलतील हे ओळखून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या जोडप्याने मुलींसाठी पहिली एत्तद्देशीय शाळा काढली. स्वातंत्र्य चळवळीत लोकांची एकजूट व्हावी, यासाठीच टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. विनायक दामोदर सावरकर, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, चाफेकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉ. डांगे यांनी इथल्या मनामनांत मराठी भाषा रुजवली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक बाबा आमटे, गाडगे महाराज यांनी ती आपापल्या परीने बिंबवली. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही रत्ने मराठीनेच दिली. मराठीचं संचित हे असं व्यापक आहे.

१०६ हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिल्यानंतरच अखंड महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. इतिहासाचा हा मणी मुंबईतील सध्याच्या वर्तमान माळेत आज उपरा ठरू लागला आहे. मुंबईतील सार्वजनिक जीवनात आज मराठी माणसंही हिंदीच बोलतात. मग प्रवास असो किंवा खरेदी, सारे व्यवहार हिंदीतच केले जातात. आपल्या पाल्याला इंग्लिश शिकवण्याचा अट्टाहास आज मराठी शाळा बंद पाडतो आहे. अनेक सोसायट्यांमध्ये मराठी लोकांना घर नाकारलं जात आहे. निवेदनातून येणारं हे वास्तव प्रेक्षकांना डोळे उघडायला प्रवृत्त करत आहे.

एकीकडे हे निवेदन सुरू असताना रंगीबेरंगी लाइट्सचा प्रकाशझोत त्या-त्या दृश्यावर पाडत संवादाला जिवंत केलं जातं. सोबतचं पार्श्वसंगीत त्या विषयाची खोली आणखीच गडद करतं.

ध्वजपताका फडकवणारे वैष्णव पंथ, ओव्या, अभंग गाणाऱ्या संतांची मांदियाळी, फारसी, अरबी भाषा लादणाऱ्या मोगलांपुढे मराठीचा अभिमान घेऊन उभे ठाकलेले शिवराय, मरणासन्न झालेल्या मराठी शाळा, जाज्वल्य लोकमान्य टिळक यांच्यासह मराठीसाठी जगलेली थोर मंडळी इथे मंचावर मराठीच्या वैभवाची साक्ष देत उभी आहेत. माळेचे मणी एकामागोमाग एक गुंफावे तसे या निवेदनातून मराठी भाषेचा इतिहास मागचा-पुढचा आधार घेत मिनिटागणिक पुढे सरकतो.

संतगणांचे संस्कार, स्वराज्याचा लढा, स्वातंत्र्यपूर्व काळ हे सुरू असताना सकल महाराष्ट्रात (त्यात मुंबईसुद्धा) भाषा म्हणून मराठीच जगली. काल-परवापर्यंतची मराठी असा एकेक कालखंड आणि थोरांची भूमिका हे कालातीत (टाइमलेस) अजरामर कप्पे या देखाव्यात ठळकपणे उलगडले आहेत.

हा देखावा पाहिल्यावर मुंबईतून हरवलेली 'ती' शोधण्याची निकड जाणवते. हा दृकश्राव्य देखावा आपल्याला 'तिचं नेमकं काय झालं आहे?' या प्रश्नाच्या दारात आणून सोडतो. पुढे काय करावं आणि काय करू नये, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. मुंबईत मराठी हवी का नको? 'भोईवाड्याचा विघ्नकर्ता' प्रश्न उपस्थित करतो आणि तो सोबत घेऊनच आपण मंडपाबाहेर पडतो.

मराठीचे कटू वास्तव मांडण्याचा प्रयत्न
गणरायाच्या आगमनाला पारंपरिक वेशातील चिमुरडी मुलं मुंबईतील मराठीपण (मराठी भाषा आणि मराठी माणूस) जपण्याचे संदेश लिहिलेली हातातली पाटी उंचावत होती. तेव्हापासूनच आमच्या या थीमला सुरुवात झाली, असं या देखाव्याचा कला दिग्दर्शक हर्षवर्धन रमेश जाधव सांगतो. पेशाने शिक्षक असलेला आणि प्रोग्राम प्रोडक्शन क्षेत्रात मुक्तपणे काम करणारा हर्षवर्धन गेला संपूर्ण महिना हा देखावा उभारण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहे. आपल्या घरातच, आपल्या शहरातच मराठी भाषा आणि मराठी माणसाला डावलले जाणं, हे न पटणारं आहे. गणेशोत्सव हा मराठी माणसाला एकत्र आणणारा सण आहे. त्या माध्यमातून विद्यमान समाजचित्रण अर्थात मराठीचे कटू वास्तव मांडण्याचा प्रयत्न केल्याचं तो हिरिरीने सांगतो.

guravrohit 1987@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in