

रसास्वाद
राजीव जोशी
काळ आणि माणूस हा दिलीप पाटील यांचा एकविसाव्या शतकात बदललेल्या समाजाचे चिंतन असणारा लेख-संग्रह आहे. काळ बदलला आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अधिकच बदलत चालला आहे हे सर्वांना मान्य आहे. या बदलांच्या प्रक्रियेत माणूस आणि पर्यायाने समाजात, कुटुंबात, आई-वडील, भाऊ- बहिण, मित्र-मैत्रीण शेजारी-पाजारी अशा विविध नात्यात सुध्दा अमुलाग्र बदल झालेले आहेत, वर्तमानाची परिभाषा बदलत चाललेली आहे. एकमेकांकडे बघण्याची दृष्टी अमुलाग्र बदललेली आहे. खरं तर या बदलांविषयी आपण सर्व जण एकमेकांत तळमळीने बोलत असतो. दिलीप पाटील हे केवळ बोलून थांबलेले नाहीत तर त्यांनी त्यांच्या चिंतनातून काळाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लेख संग्रहात त्यांचे चिंतन पाच भागात समाविष्ट असून. बदलाची चाहूल (भूमिका आणि स्वरूप), नात्यांची बदलती व्याख्या, तंत्रज्ञान आणि माणूस, समाज, संस्कृती आणि मूल्ये, अंतर्मुखतेकडे वाटचाल असून समारोपात काळ जिंकतो की माणूस असा प्रश्न उपस्थित करून लेखक एक आशावाद व्यक्त करतो.
हे लेखन चिंतनगर्भ असून बोलबच्चन लोकांसाठी आरसा आहे, त्यांना आपल्या आतल्या वैचारिक स्वरूपाबद्दल अंतर्मुख करायला लावणारे आहे. दिलीप पाटील यांनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत अनुभवातून, निरीक्षणातून या बदलांचा जो धांडोळा घेतलाय ते स्वैर चिंतन नाही तर त्यासाठी महाभारत रामायणापासून ज्ञानेश्वर, तुकाराम, महाभारत यांचा आणि प्रचलित विविध कवितांचा आधार घेतलेला आहे. बाप-मुलगा, आई-मुलगा, मित्र आदि नात्यांमध्ये आलेला, येत चाललेला दुरावा, घराघरात आणि घरांमध्ये हरवत चाललेला संवाद हा दिलीप पाटील यांचा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. नात्यांविषयीचे त्यांचे चिंतन खूप सखोल, सहज आणि चपखल आहे. एका ठिकाणी ते म्हणतात की, “पूर्वी कुटुंब म्हणजे एकत्र जगणं असायचं; आज कुटुंब म्हणजे एकत्र राहणं झालं आहे”. किती खरंय हे. प्रत्येक नात्यातलं समान सूत्र म्हणजे एकमेकांबद्दल वाढत चाललेल्या अपेक्षा. दिलीप पाटील म्हणतात की, “नातं तुटत नाही अपेक्षांमुळे, ते तुटतं अपेक्षा पूर्ण न झाल्याच्या वेदनेमुळे.” सूक्ष्म निरीक्षण हा दिलीप पाटील यांचा मला विशेष वाटतो. विश्वास कमवायला लागतो असं पूर्वी म्हटलं जायचं, या ठिकाणी लेखक म्हणतो की विश्वास निर्माण करण्यासाठीसुद्धा त्याची आधी पायाभरणी करावी लागते. आपण पाहतो की समाजात, छोट्या-मोठ्या गावा-शहरात काय, शिक्षित आणि अशिक्षितात काय, जगण्याच्या अशाश्वतातून व्यक्तिगत स्वार्थ बोकाळत चाललेला आहे; त्याहीपेक्षा स्वार्थ साधण्यासाठीच्या विकृती वाढत चाललेल्या आहेत. इंग्रजीत एम्टी माईन्ड डेविल माईन्ड म्हणतात. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक महागड्या सुखसोयीची साधने सहजरित्या उपलब्ध झालेली आहेत. त्या मिळवण्यासाठी हत्या आणि नैराश्यातून आत्महत्येपर्यंत तरुण पिढी जशी चाललीय त्याच बरोबर प्रसिद्धीच्या हव्यासापायी नैतिकता आणि चरित्र ही मूल्येसुद्धा आपण विसरत चाललेलो आहोत.
घरं असून घरपण हरवलेला हा काळ आहे हे दिलीप पाटील अधोरेखित करतात. लेखक म्हणतो, भिंती उंच झाल्या, दरवाजेही सुंदर झालेत मनाचे दरवाजे मात्र हळू हळू बंद होत चाललेत. घराला घरपण परत मिळवता येईल का? लेखक आशावादी आहे आणि त्याचे निरीक्षण सर्वांना मान्य आहे. आई वडिलांबद्दल आदर, सन्मान आपण विसरत चाललेलो आहोत. आई जेव्हा मुलाला म्हणते किती लवकर मोठा झालास यात कौतुक असते, भविष्याची काळजीसुद्धा असते. लेखक म्हणतो, शब्द नाहीत मोठे,भावना असतात खोल, ज्यांनी आयुष्य घडवलं त्यांना हवी असते ओल. मैत्रीच्या नात्याबद्दल लेखक मनस्वी आहे. या नात्यात येत चाललेल्या सवंगपणामुळे आणि अशा आदर्श अनुभवांमुळे मी त्याच्याशी कनेक्ट होऊ शकली नाही कारण मैत्रीमुळे वाढत चाललेली व्यसनाधीनता, चरित्रहीनता समाजाला पोखरत जात आहे. प्रेमाबद्दल दिलीप पाटील खूप नजाकतीत व्यक्त झाले आहेत. ते सर्व वाचतांना, बॅक ऑफ द माईंड, कविवर्य शंकर वैद्यांची कविता आठवत राहिली, “तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवीत होतीस, माळ गुंफीत होतीस, फुले ओवता ओवता सगळा दोरा केशरी होत गेला.. तुझ्या माझ्या संबंधात मला एवढंच सांगायचं आहे.” कोणत्याही ललित लेखनाचे वैशिष्ट्य हे आहे की, तुमच्या मनात सुद्धा तरंग उठावे.
दिलीप पाटील यांनी नात्याच्या चिंतनाचा मोठा पट आपल्यासमोर मांडलेला आहे आणि त्यात आपण कुठेतरी असणं हे लेखकाचे यश असते, आज आपण गावातून शहरात आलो त्यामुळे गाव हरवून बसलो. मात्र गाव तरी कुठे आपला राहिलाय तो पर्यायाने शहर बनत गेलाय, माणसं आहेत, आपुलकी राहिलेली नाही. सण परंपरा केवळ उत्सव बनलेला आहे. दिलीप पाटील यांच्या चिंतनाची खोली ही त्यांची राहिली नाही तर ती त्यांनी आपल्या समोर धरलेली असल्याने आपल्या सर्वांना आपलीच वाटणारी आहे. त्यांचा आशावाद हा माणसाचा आशावाद आहे. काळ जिंकणार की माणूस या प्रश्नाचे उत्तर दिलीप पाटील यांनी दिलेले आहेच पण त्याचे खरे उत्तर तुमच्या आमच्या मनातल्या आरश्यात दिसणार आहे. प्रत्येकाला आपलं वाटावं असं हे चिंतन आहे घराघरात वाचलं जावं. लेखक म्हणतो, “आपण आपल्या काळाला काय देतो, जर आपण त्याला फक्त धावपळ दिली तर ती आपल्याला थकवा देईल, पण जर आपण त्याला अर्थ दिला (आपल्या सकारात्मक कर्माने, आचार विचाराने, नैतिकतेने) तर तो आपल्याला अमरत्व देईल.
पूर्वीच्या काळात, पु.ग. सहस्त्रबुद्धे, यदुनाथ थत्ते, लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर अशी विचार करायला लावणारी माणसं होती. अशा चिंतनाचा अभाव असणाऱ्या काळात काळात दिलीप पाटील यांनी समकाळाचे केलेले चिंतन खूप महत्वाचे आणि एकमेकांना जोडणारे आहे.
काळ आणि माणूस बदलत्या समाजाचे चिंतन
लेखक : दिलीप पाटील
मूल्य : रुपये २५० मात्र