चिमुकले जीव, प्रचंड कारनामे

आपल्या आजूबाजूला सतत वावरणाऱ्या चिमुकल्या मुंग्या केवळ अन्नाचे कण उचलत नाहीत, तर त्या एक शिस्तबद्ध, उद्योगी आणि आश्चर्यकारक अशी स्वतंत्र दुनिया उभी करतात. चला, या अजब निसर्गातील मुंग्यांच्या अनोख्या जगात डोकावूया.
चिमुकले जीव, प्रचंड कारनामे
Photo : Freepik
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

आपल्या आजूबाजूला सतत वावरणाऱ्या चिमुकल्या मुंग्या केवळ अन्नाचे कण उचलत नाहीत, तर त्या एक शिस्तबद्ध, उद्योगी आणि आश्चर्यकारक अशी स्वतंत्र दुनिया उभी करतात. चला, या अजब निसर्गातील मुंग्यांच्या अनोख्या जगात डोकावूया.

अनेक प्रकारच्या जीवांनी मिळून बनलेला निसर्ग अफाट आहे यातले काही जीव हे आपल्या म्हणजे माणसांच्या जगापासून जरा दूरच राहातात. पण काही काही मात्र अगदी आपल्या घरातही हक्काने वावरताना पाहायला मिळतात. रानात, शेतात, कुरणांमध्ये, माळरानावर आणि आपल्या घरात, इमारतीत अगदी स्वयंपाकघरातही बिनधास्तपणे फिरणारे चिमुकले जीव म्हणजे ‘मुंग्या’. आता मुंग्या म्हटल्यावर त्या फक्त गोड पदार्थांना येतात किंवा शेंगदाणे, शेव, चकली अशा चटकदार खाऊचा माग काढतात असंच आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात या मुंग्यांची दुनिया अतिशय अनोखी आहे. चला आज त्याच दुनियेत एक फेरफटका मारूया.

मुंग्या या प्राणी सृष्टीतल्या किटकांच्या गटात येतात. किटकांमध्ये मुंग्या या सर्वात जास्त विश्वव्यापी, सगळ्यांच्या अधिक परिचयाच्या किटक आहेत असं म्हणता येईल. सर्वसाधारण किटकांप्रमाणेच मुंग्यांनाही सहा पाय असतात आणि त्यांच्या शरीराची विभागणी मस्तक, धड, पोट अशा तीन भागात झालेली असते. किटकांच्या जगातील हायमेनॉप्टेरा ऑर्डरमध्ये माशा, वास्प, सॉफ्लाइज यांच्याच बरोबर मुग्यांचा समावेश होतो. फॉरमिसिडी हे मुंग्यांचे कुळ. सामुदायिक जीवन हेच या कुळाचे वैशिष्ट्य, त्यामुळे मुंग्या आपल्याला नेहमी समुदायाने, समुहानेच पाहायला मिळतात. मुंग्याच्या वारुळात कधी कधी पंधरापेक्षा अधिक प्रकार आढळून येतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही मुंग्यांच्या वसाहतीमध्ये सैनिक म्हणजे रक्षक मुंग्या, कामगार मुंग्या, पंख असलेल्या नर मुंग्या आणि पुढील पिढीला जन्म देणारी राणी मुंगी हे प्रकार नक्कीच पाहायला मिळतात. आपण नेहमी इकडे तिकडे फिरणाऱ्या ज्या मुंग्या बघतो त्या सगळ्या कष्टकरी मुंग्या असतात. वारुळातील पिल्लांसाठी अन्न गोळा करायचे आणि त्यांना भरवायचे काम त्या करत असतात. जगभरात अंटार्क्टिका खंडाचा अपवाद वगळता मुंग्या सर्वत्र आढळतात ग्रीनलँड,आइसलँड,हवाई बेटे अशा बेटांवर स्थानिक मुंग्यांच्या प्रजाती नव्हत्या पण मानवी वस्तीबरोबर तिकडेही मुंग्या पोहोचल्या. प्रामुख्याने ओम्निव्होरस म्हणजे मिश्र आहारी असलेल्या मुंग्या निसर्गात भक्षक म्हणून जशी भुमिका निभावतात त्याच प्रमाणे मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन साफ सफाई देखिल करतात.आजतागायात जगभरात मुंग्यांच्या १३,८०० पेक्षा जास्त प्रकार नोंदण्यात आल्या आहेत आणि दरवर्षी त्यात भर पडत असते.

जगभरात नोंदवण्यात आलेल्या मुंग्यांच्या २२ सब फॅमिलींपैकी दहा सब फॅमिलीज भारतात वेगवेगळ्या राज्यात आढळतात. आतापर्यंत भारतातील मुंग्यांच्या ८२७ जातींची नोंद झालेली आहे आणि त्यात दरवर्षी भर पडत आहे. हिमालयाच्या परिसरात सुमारे २०२ प्रकारच्या मुंग्या आढळतात आणि त्यातील ४५% एन्डेमिक म्हणजे फक्त त्याच परिसरात सापडणाऱ्या आहेत.तर पश्चिम घाटात म्हणजे आपल्या सह्याद्रिच्या डोंगररांगेत चारशे पेक्षा अधिक प्रकारच्या मुंग्या आढळतात. २०२१ साली भारतातील केरळ आणि तामिळनाडू राज्यात मुंग्याच्या दोन नव्या जाती शोधण्यात संशोधकांना यश आले आहे.

आपल्यासाठी मुंग्या म्हणजे फक्त धान्याचे दाणे नाहीतर अन्नाचे कण पळवणारे किटक, प्रत्यक्षात या मुंग्या फारच उद्योगी असतात.या मुंग्या माणसांप्रमाणेच शेती करतात, गुरं पाळतात, विणकाम करतात आणि स्वतःसाठी सुंदर, आकर्षक, टिकाऊ घरेही बांधतात. मुंग्यांमधील विणकर मुंग्या म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या रानात आढळणाऱ्या ‘ओंबिल’ किंवा कडकडून चावणाऱ्या काडमुंग्या. यांचे इंग्रजी नावच ‘विव्हर ॲंट असेच आहे. या मुंग्या झाडाची पाने एकाला एक जोडून मोठा चेंडू तयार करतात आणि त्यात आपले घर थाटतात. गंमत म्हणजे झाडाची पाने शिवण्यासाठी या मुंग्या आपल्या लार्वा म्हणजे अळी अवस्थेतील पिल्लांच्या पोटातून निघणारा रेशमासारखा दोरा वापरतात. घरटे करताना मोठ्या मुंग्या आधी पानाची सुरनळी करुन दोन टोके जवळ आणतात,मग काही मुंग्या अळी अवस्थेतील पिल्लांना तोंडात धरुन ही पानाची टोके जोडण्यासाठी पिल्लांच्या पोटावर दाब देऊन धागा बाहेर काढतात आणि पाने शिवतात.

मुंग्यांच्या विश्वातील सर्वात उद्योगी मुंग्या म्हणजे ‘लीफ कटर ॲन्ट्स’. रानावनात भटकून शिकार करणारा आणि फळं-कंदमूळं गोळा करणारा माणूस शेती करायला शिकला तो दहा हजार वर्षांपूर्वी.मात्र चिमुकल्या मुंग्यांनी शेतीचं तंत्र आत्मसात केलं ते तब्बल पन्नास लाख वर्षांपूर्वी.‘लीफ कटर ॲन्ट्स’ या मुंग्याच्या जमातीतल्या शेतकरी मुंग्या आहेत.या प्रामुख्याने अमेरिका खंडात पाहायला मिळतात. शिस्तबध्दरितीने एखाद्य झाडावर चढाई करुन,त्या झाडाच्या पानाचे तुकडे तोडून ते आपल्या डोक्यावर मिरवत वारुळाकडे नेताना दिसतात.आधी मुंग्या हे पानांचे तुकडे वारुळाचा अंतर्भाग सजवण्यासाठी वापरतात असा समज होता पण पुढे अधीक संशोधनानंतर लक्षात आले की वारुळात हे पानांचे तुकडे वेगवेगळ्या कप्प्यात साठवले जातात आणि त्यावर एका विशिष्ट फंगस म्हणजे बुरशीची लागवड केली जाते.ही लागवड केलेली बुरुशी या मुंग्यांच्या लार्वांचे म्हणजे पिल्लांचे अन्न असते.वारुळातील मोठ्या मुंग्या बुरशीच्या लागवडीसाठी आणलेल्या पानांवर गुजराण करतात. ही शेती करण्यासाठी या मुंग्या जे पानाचे तुकडे उचलून आणतात ते त्यांच्या वजनाच्या सत्तरपट असतात.मुंग्याचा हा विक्रम माणसालाही मोडता येणार नाही.

माणसाच्याही आधी शेती करायला शिकलेल्या मुंग्या माणसांप्रमाणेच गुरे पाळतानाही पाहायला मिळतात.मात्र त्यांची गुरे म्हणजे ‘ॲफिड्स’ अर्थात मावा किडे.हे मावा किडे वनस्पतींचा रस शोषून जगतात. त्यांच्या शरीरात या रसाचे रुपांतर गोडसर द्रावामध्ये होते.मुंग्या या मावा किड्यांच्या पोटाला आपल्या ॲन्टेनाने गुदगुल्या करुन हा गोड रस मिळवतात आणि त्या बदल्यात या मावा किड्यांचे रक्षण करतात.पौष्टीक मधुरस मिळवण्यासाठी झाडांचे रक्षण करणाऱ्या मुंग्याही आहेत.मेक्सिकोमध्ये अकेशियाची एक जात आहे,या झाडातून गोड रस पाझरतो.तो मिळवण्यासाठी एका जातीच्या मुंग्या या झाडाच्या टपोऱ्या काट्यांना भोक पाडून त्यातच ठाण मांडतात. जर पाने कातरणाऱ्या मुंग्यांनी या झाडाकडे आपला मोर्चा वळवलाच तर या मुंग्या त्यांना पिटाळून लावतात आणि त्या बदल्यात झाडातून पाझरणारा मधुरस हक्काने खातात. निसर्गात वेगवेगळ्या फुलांमधून मध गोळा करुन तो साठवण्यासाठी पोळे तयार करणाऱ्या मधमाशा आहेत तशाच मध मुंग्याही आहेत. मेक्सिकोत आढळणाऱ्या या मधमुंग्या माश्यांप्रमाणे मेण बनवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना पोळे तयार करता येत नाही. या अडचणीवर त्यांनी एक भन्नाट उपाय शोधला आहे.त्या बाहेरुन मध गोळा करुन आणतात आणि आपल्याच वारुळातील काही मुंग्याना भरवायला सुरवात करतात. सतत मध भरवल्यामुळे हळू हळू त्या मुंग्यांचे रुपांतर मधाच्या बुधल्यात होते. मग या मध भरलेल्या मुंग्या स्वतःला वारुळाच्या छताला टांगून घेतात. हिवाळ्यात या मधाच्या जिवंत बुधल्यांवर सगळ्या वारुळाचा गुजारा होतो.

मुंग्याच्या अनोख्या दुनियेची ही झलक पाहिल्यावर कळलं ना चिमुकल्या मुंग्या किती महान आहेत ते ? निसर्गाच्या दरबारात असे अनेक जीव आहेत,ज्यांच्या विषयी जाणून घेतल्यावर आपण फक्त ‘अजबच आहे ’इतकंच म्हणू शकतो !

logo
marathi.freepressjournal.in