जिभेचा प्रताप!

परवा पान खात असताना, मालकीणबाईंची जीभ चावली गेल्याने त्या जोरात ओरडल्या. बाजूलाच असलेली मार्गारेट मावशी आणि बिळात दडलेला रॉबिन्सन मामा चांगलाच दचकला.
जिभेचा प्रताप!
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

परवा पान खात असताना, मालकीणबाईंची जीभ चावली गेल्याने त्या जोरात ओरडल्या. बाजूलाच असलेली मार्गारेट मावशी आणि बिळात दडलेला रॉबिन्सन मामा चांगलाच दचकला.

“काय झालं हो?,” असं मावशीला विचारावं वाटलं. पण मरू दे, आपल्याला काय? नाहीतरी, ही खाष्ट बाई सारखी खार खाऊन असते, हे आठवून मावशीने तोंड दुसरीकडे केलं.

“मार्गे, इकडेतिकडे काय बघतेस, माझी जीभ जोरात चावली गेलीय नि तू बसलीस ढिम्म!”

“जीभ चावणार त्या स्वत: आणि ओरडणार माझ्यावर. वा रे वा! चांगलाच न्याय म्हणायचा.” मावशी मनात म्हणाली. मालकीणबाईंकडे अनिच्छेने तोंड वळवून आपल्याला किती दु:ख झालंय, हे भाव चेहऱ्यावर आणले. तोपर्यंत, जीभ चावल्यामुळे मालकीणबाईंना होणाऱ्या वेदना थोड्या कमी झाल्या असाव्यात. मावशीला बाजूला ढकलून त्या तरातरा झोपायच्या खोलीत निघून गेल्या. दरवाजा बंद करण्याचा आवाज आला. आता पुढचे दोन-तीन तास निवांत असल्याचे, लक्षात येताच मामा बिळातून बाहेर आला.

मालकीणबाईंनी ढकलल्यामुळे मावशीला चांगलाच राग आला होता. त्यांना खाऊ की गिळू असं तिला झालं होतं. पण पाय आपटून वैताग व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही, हे लक्षात येताच, मावशी हताश झाली. तेवढ्यात तिचं लक्ष मामाकडे गेलं. तिच्या जिभेला पाणी सुटून आशाळभूत नजरेनं ती मामाकडे बघू लागली. ही आपल्यावर कधीही उडी मारू शकते, हे लक्षात आल्याने मामा किचनमध्ये पळाला. रेफ्रिजरेटवर ठेवलेल्या चिजवर त्याने उडी घेतली. काही तुकडे तोंडात घेऊन तो मावशीकडे आला. त्याने ते तुकडे तिच्यासमोर टाकले. आयतंच चिज समोर आलेलं बघून मावशी त्याच्यावर तुटून पडली. मालकीणबाईंवरचा तिचा रागही कमी झाला. आपल्यासाठी चिज आणणाऱ्या मामाकडे ती प्रेमाने बघू लागली. त्याच्याजवळ जाऊन त्याला जिभेने चाटू लागली.

मामालाही बरं वाटलं.

“मावशे, तुला इतका राग येण्याचं कारण काय?”

“अरे, मालकीणबाईंची जीभ.”

“तुटली की काय?”

“जीभ चावली त्यांनी स्वत: नि राग माझ्यावर काढत होत्या.”

“या जिभेला हा आगावूपणा करायला सांगितला कुणी? या जिभेला छाटूनच काढायला हवं.”

“कुणाच्या? तुझ्या, माझ्या की मालकीणबाईंच्या?” मावशीने डोळे वटारून विचारलं.

“सगळ्यांच्या जिभा अशाच आगावू असतात कां?”

“कुणास ठाऊक?”

“मग, ठाऊक करून घेना. तुला काय अशक्य.” मामाने मावशीला लोणी लावलं. आपल्या कौतुकाने खूश होत मावशी म्हणाली, “चल, तुला मी घेऊनच जाते, या जिभेच्या जगात.”

“म्हणजे काय?” मामाने जरा घाबरतच विचारलं. त्याला पुढे काही बोलू न देता, मावशीने, “इट्री फिट्री मिट्री, रॉबिची किट्री, मेंदूत एन्ट्री, ऱ्हूँम हृिम फुट!” असा मंत्र त्याच्यावर टाकला. मामा मुंगीपेक्षाही लहान झाला. मावशीने त्याला उचलून आपल्या कानात टाकून मेंदूकडे ढकलले. मामा मेंदूत पोहचताच, मावशी डोळे मिटून माहितीच्या महाजालात विहार करू लागली. प्राणी, पक्षी, किटकांच्या जिभांचा शोध घेऊ लागली.

६० सेंमी लांबीची जीभ बाहेर काढून, एक प्राणी शेकडो मुंग्यावर ताव मारत असल्याचं तिला दिसलं. तिने जवळून बघितलं तर तो अँट-इटर प्राणी निघाला. त्याला बाय करून मावशी पुढे निघाली, वाटेत तिला जिराफराव भेटले. ते झाडाच्या टोकावरची कोवळी पानं मजेत फस्त करत होते. मावशीने बारकाईने बघितलं, तर त्याची जिभ निळी असल्याचं दिसलं. आपल्या खाण्याकडे चोरून बघणाऱ्या मार्गारेटचा जिराफाला राग आला. त्याने तिला मारण्यासाठी लाथ उचलली, तोच त्याच्या पुढ्यात वाघोबा येऊन ठाकला. गर्जना करून जिराफाला म्हणाला, “खबरदार, माझ्या मावशीला काही केलंस तर.” वाघोबाच्या गर्जनेने घाबरून जिराफाने तिथून पलायन केलं.

घाबरलेल्या मावशीने वाघोबाकडे बघितलं. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याचा जबडा उघडा होता. त्याची जीभ तीक्ष्ण असल्याची नोंद मावशीने त्या अवस्थेतही केली. मावशीला पाठीवर बसवून वाघोबा त्याच्या गुहेकडे निघाला. वाटेत सिंह महाराज आराम करत होते. त्यांच्याजवळून वाघोबा जात असतानाच त्यांनी जांभई दिली. त्यांच्या तोंडातील जिभेकडे मावशीचं लक्ष गेलं, ती जीभ काचपेपरसारखी खडबडीत असल्याचं तिला दिसलं.

वाघोबा पुढे निघाले. ते चालत असताना एक नागोबाही त्यांच्यासोबतच पुढेपुढे सरपटत होता. गंमत वाटून मावशी त्याच्याकडे बघू लागली. तो नागोबा पुढे जाताना आपली दुतोंडी जीभ सारखा इकडे-तिकडे वळवत होता. असं का बरं करत असेल हा नागोबा?”, ती पुटपुटली. वाघोबाने ते ऐकलं. त्याने नागोबास थांबवलं. मावशीच्या मनात काय चाललंय हेही सांगितलं. “अहो वाघोबा, माझी जीभ माझ्यासासाठी होकायंत्रासारखं काम करते. म्हणजे, मी जिभेच्या मदतीने सभोवताल ओळखून बरोबर माझ्या घराच्या दिशेने जातो. शत्रूला चकवतो.”

“वा..वा..” मावशीने टाळी वाजूवन नागोबास दाद दिली. तो त्याच्या वाटेने निघून गेला. वाघोबा त्याच्या गुहेच्या दिशेने निघाला. एके ठिकाणी बरीच वटवाघळं झाडाला लटकलेली दिसली.

“वाघोबा, यांना म्हणे दिवसा दिसत नाही. पण रात्री ते मजेत वनात फिरतात. अशी कोणती जादू आहे त्यांच्याकडे?”

“मावशे, जादू कसली ग, या वटवाघळांची जीभच त्यांना आसपासच्या वातावरणाविषयी सजग करते.” वाघोबाने माहिती दिली.

वाटेत ओकापी नावाचा प्राणी भेटला. त्याने जीभ बाहेर काढून वाघोबांना अभिवादन केलं. त्याची जीभ काळी असल्याची नोंद मावशीने केली. पुढे एक हमिंगबर्ड एका झाडावरील फुलाच्या तळातून, लांब अशा जिभेने मध चोखत असल्याचं मावशीच्या लक्षात आलं.

तहान लागल्याने वाटेतील तलावाजवळ वाघोबा थांबले. पाण्याजवळ जाऊन जिभेने पाणी पिऊ लागले. तोच एक प्राणी पाण्यातून सुर्रकन आला नि वाघोबांवर पाणी उडवून गेला. त्या प्राण्याने वाघोबाजवळ येऊन त्यांचा गालगुच्चा घेतला. वाघोबा काहीतरी त्याला सांगणार तोच, त्या प्राण्याला पाण्यात चाहूल लागली. त्याने आपले तोंड उघडले. मावशी अवाक् झाली. त्याची जीभ काटेरी होती. त्या जिभेने त्या प्राण्याने पाण्यातील मासोळी झरदिशी पकडून तोंडात टाकली.

“हा माझा मित्र पेंग्विन, हा असाच शिकार करतो.” वाघोबानं सांगितलं नि पेंग्विनचा निरोप घेऊन ते पुढे निघाले. वाटेत त्यांना सॅलॅमँडर भेटला. वाघोबाला भिऊन तो जीभ बाहेर काढून पळू लागला. ती जीभ त्याच्या लांबीपेक्षा मोठी असल्याचं बघून मावशीचे डोळे विस्फारले. काही वेळाने वाघोबा गुहेजवळ पोहचला. त्याने आपल्या मुलांची मावशीसोबत ओळखी करून दिली. खानपान झाल्यावर वाघोबाचा निरोप घेऊन मावशी पुढे निघाली.

मावशीच्या मेंदूत गेलेल्या मामाला आता कंटाळा येऊ लागला. त्याची चुळबुळ वाढली. ते मावशीच्या लक्षात येताच तिने त्याला बाहेर काढलं नि त्याच्यावर मंत्र टाकून त्याला पूर्ववत केलं.

“काय मामू, कसा वाटला तुला हा जिभेचा प्रवास?”

“मावशे, वेड लागायचीच पाळी आली बघ.”

“माम्या, सगळ्या प्राण्यांची जीभ म्हणजे एक चमत्कार आहे. केवळ खाण्यासाठी आणि चव ओळखण्यासाठी काही जिभेचा उपयोग होत नाही. इतरही कामांसाठी होतो. सरीसृप आणि उभयचर प्राणी जिभेचा उपयोग भक्ष्य मिळवण्यासाठी करतात. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जिभेत असणाऱ्या केराटिन रसायनामुळे त्यांची जीभ टणक बनते. त्याचा उपयोग अन्नाला मागे ढकलण्यासाठी केला जातो. काही प्राणी अन्नावर प्रक्रिया करतात. शिकार करण्यासाठी मदत करतात. काही प्राणी इतर प्राण्यांची जिभही आवडीने खातात.”

“ओह माय गॉड!”

“खरंच देवाजीचा हा चमत्कार म्हणायचा नाही का? सगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये असलेल्या जिभेनेच त्यांना टिकवून ठेवलंय असं म्हटलं तर वावगं ठरायचं नाही.”

“मालकीणबाईंना सुद्धा का?”

“मग? त्यांना त्यांच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतात. त्यामुळेच आपल्या दोघांच्याही जिभेला वेगवेगळ्या चवीचा आस्वाद घेता येतो.”

‘मालकीणबाईंच्या जिभेचा विजय असो’, असा जयघोष मामाला करावा वाटला. पण हे जरा जास्तच होईल, असं लक्षात येताच त्याने जिभेला लगाम घातला.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in