घुगऱ्याचे दाने दोन, तुह्या जलमाची साथ

अलिकडे मुलांच्या आहारात डबाबंद, पॅकेटबंद अशा प्रोसेस्ड फूडचं प्रमाण वाढलं आहे. पण परंपरेकडे थोडं वळून पाहिलं तर लहान मुलांच्या अन्नाची एक वेगळी वहिवाट आपल्याला दिसते. मऊ गुरगुट्या भात ते केळ्याचं शिकरण, दूध-बत्तासे, साखरेच्या शेंगा, शिकरण अशा वेगवेगळ्या पदार्थांचे उल्लेख आपल्याला लोकवाड्मयात आढ‌ळतात.
घुगऱ्याचे दाने दोन, तुह्या जलमाची साथ
Published on

लोकवाङ्मयातली खाद्यसंस्कृती

डॉ. मुकुंद कुळे

अलिकडे मुलांच्या आहारात डबाबंद, पॅकेटबंद अशा प्रोसेस्ड फूडचं प्रमाण वाढलं आहे. पण परंपरेकडे थोडं वळून पाहिलं तर लहान मुलांच्या अन्नाची एक वेगळी वहिवाट आपल्याला दिसते. मऊ गुरगुट्या भात ते केळ्याचं शिकरण, दूध-बत्तासे, साखरेच्या शेंगा, शिकरण अशा वेगवेगळ्या पदार्थांचे उल्लेख आपल्याला लोकवाड्मयात आढ‌ळतात.

जून महिना उजाडला आणि शाळा सुरू झाल्या की आता केवळ शहरातल्याच नाही, तर ग्रामीण भागातल्या आयांना देखील प्रश्न पडतो, मुलांना रोज डब्यात काय द्यायचं? पूर्वी सरसकट चपाती-भाजीच दिली जायची डब्यात नि मुलंही मधल्या सुट्टीत आपला डबा प्रेमानं खायची. पण आताच्या मुलांना रोज-रोज चपाती-भाजी खायचा कंटाळा येतो. मग कधी पराठा, कधी ठेपले, कधी डोसा, तर कधी मॅगी नुडल्स... असंही काय काय देतात आया मुलांच्या डब्यात. सोबत अडीअडचणीला कुरकुरे, वेफर्स, नॅचो, बिस्किटं असंही काय काय असतं. पूर्वी एकूणच परिस्थिती बिकट होती. त्यामुळे मुलांचे फाजील लाड नसायचे. क्वचित कुणाची मधली सुट्टी तर उपाशीपोटीही जायची. पण आता काळ बदललाय. सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक स्तर कुणाचा काहीही असो, प्रत्येक आई आपल्या मुलाला डब्यात तोच खाऊ द्यायचा प्रयत्न करते, जो इतर मुलांच्या डब्यात असेल.

आता खाण्या-पिण्याच्या बाबतीत शहर-खेडी यांतलं अंतर मिटत चाललंय. जे शहरांत मिळतं तेच आता सहज गावांतही मिळतं. वडा-पावपासून ते अगदी चायनीजपर्यंत. मग मुलांनाही डब्यातला खाऊ म्हणून तेच हवं असतं. पण यामुळे आमचा गावोगावचा मुलांचा पारंपरिक खाऊ मागे पडला. अर्थात तो काही मुलांसाठी मुद्दाम केला जायचा असं नाही, परंतु जे घरात उपलब्ध असेल तेच अगदी सहज रांधून मुलांच्या तोंडी लागेल असं बघितलं जायचं. मग ते घरातच केले जाणारे नानातऱ्हेचे लाडू असतील, वड्या असतील, चिवडा असेल किंवा दुधात भिजवलेले पोहे असतील... म्हणूनच तर मग लोकवाङ्मयात क्वचित कधी लहान मुलांच्या खाण्याचे-खाऊचे दाखलेही आपल्याला सापडतात. अर्थात याची सुरुवात होते ती लहानपणी मुलाला भरवण्यापासूनच-

“एक घास काऊचा, एक घास चिऊचा

एक घास आमच्या लाडक्या मनीमाऊचा

मनीमाऊ खाते काय भाताबरोबर ताजी साय

गोड माझी छकुली दूध-भात संपून जाय...”

लोकवाङ्मयात लहान मुलांच्या खाण्याचे-खाऊचे जे संदर्भ येतात त्यात दूध आणि त्याबरोबर खायच्या पदार्थांचे उल्लेख भरपूर येतात. पूर्वीच्या काळी घरोघर गुरं असायची. त्यामुळे घरात दूधदुभतं असायचंच. मग साहजिकच त्या दूधदुभत्याचं प्रतिबिंब लोकवाङ्मयात पडलेलं दिसतं. आता ही दोन उदाहरणं बघा-

“माझिया अंगणात सांडली दूध-फेणी

जेवली हिरकणी चिंगू ताई..”

“ये ग ये ग गाई, तू खा ग तुझा कोंडा

बाळाला दूध-मांडा देईन मी...”

म्हणजे साधा दूध-भात नाही, तर या लोकगीतांमधली आई आपल्या मुलांना दूध-फेणी आणि दूध-मांडा खाऊ घालतेय. खरंतर फेण्या काय किंवा मांडा काय, दोन्ही पदार्थ करायचे तर त्यांचा कोण घाट घालावा लागतोय. पण आयांना आपल्या मुलांच्या खाण्या-पिण्याचं जरा जास्तच कौतुक असतं. मग त्यासाठी त्यांची कितीही कष्ट उपसायची तयारी असते. तेव्हा आपल्या मुलांनी चांगलंचुंगलं खावं म्हणून कोण्या आयांनी दूध-फेण्या किंवा दूध-मांडे केले असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही.

एवढंच कशाला एखादी मायबाई तर आपल्या लाडक्याला भूक लागली म्हणून थेट दुधातच बत्तासा भिजत घालते. पण तो बत्तासा दुधात भिजेपर्यंत बिच्चारं तिचं लेकरू झोपी जातं नि मग गहिवरली आई म्हणते कशी-

“लाडका ग लेक, भूक म्हणून निजला

आतासा दुधामध्ये त्याचा बत्तासा भिजला..”

खाऊ म्हणून दूध आणि बत्तासा यांचं एकत्र येणं कुणाला आश्चर्याचं वाटेल कदाचित. कारण बत्तासा म्हणजे शेवटी साखरेच्या पाकापासूनच केलेला पदार्थ. म्हणजे तो दुधात भिजत टाकला की एकप्रकारे दूधसाखरच तयार होणार. मात्र दूधसाखरेत जेवढी पौष्टिकता नाही, तेवढी ती दूध-बत्ताशात असते. दुधातील प्रथिने-कॅल्शियम आणि बत्ताशांमधील साखर एकत्र आल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसंच पचन क्रियादेखील सुधारते. बहुधा त्यामुळेच पूर्वीच्या काळी लहान-मोठ्या मुलांना दूध-बत्तासा खाऊ घातला जात असेल. त्यातही खेळून आलेल्या मुलांना गावाकडे दूध-बत्तासा खाऊ घालत. कारण खेळल्यामुळे त्यांच्या शरीरातील प्रथिनं कमी झालेली असायची. साखरेचं प्रमाण कमी झालेलं असायचं. मग ऊर्जेचा पक्का उपाय म्हणजे - दूधबत्तासा!

पण लोकवाङ्मयात दूधदुभत्याचं जरा जास्तच कौतुक केलेलंही आढळतं किंवा ज्यांनी या ओव्या-गाणी रचली असतील त्या समृद्ध घरातील आयाबाया असतील. म्हणूनच लोकवाङ्मयात दूधदुभत्याच्या पदार्थांचे उल्लेख जागोजागी सापडतात. आता हेच बघा ना-

“दुधा-तुपाचं खाणार, नको वाढू गुळवणी

माझ्या ग बाळाची सुरत केळ्यावानी”

“लाडकी एवढी लेक मला मागती मलई

पितळेच्या वाटीला लावा चांदीची कलई..”

“मामी बोलती मामायाला, बाळ भाच्याला काय न्यावं

दूध पेढ्याची त्याला सवं...”

अर्थात दूधदुभत्याशिवायच्या पदार्थांचे लोकवाङ्मयात उल्लेखच नाहीत, असं नाही. उलट कधी कधी तर गमतीचे उल्लेखही आढळतात. म्हणजे कोकणातलं एक प्रसिद्ध गमतीशीर बालगीत आहे -

“ये ग गाई गोठ्यामदी

बाळाला दुधू दे वाटीमदी

बाळाची वाटी मांजर चाटी

त्याच्या पाठीत घातली काठी

मांजर गेलं रागाने

त्याला खाल्लं वाघाने..”

म्हणजे मुलाला भरवताना गाण्यातून त्याला असं काहीतरी चित्तचक्षुचमत्कारिक ऐकवायचं की त्याला कुतूहल वाटेल आणि तो अधिक जेवेल.

एकूणच लोकवाङ्मयात मुलांच्या खाण्यासंबंधीची गाणी आहेतच आणि त्यात वैविध्यही खूप आहे. म्हणजे एखादं तालेवाराच्या घरचं लेकरू असेल तर त्याच्या जेवणाचा थाट बघा -

“पाच पक्वान्नांचं ताट, वर साखरेच्या शेंगा

जेवण जेवयीतो बाळ तान्हा शिरीरंगा...”

आता ताटात आधीच पाच पक्वान्न असताना वर साखरेच्या शेंगा म्हणजे जरा अतिच झालं. तरीही या बाळासाठी रांधलेल्या साखरेच्या शेंगा म्हणजे काय? तर खवलेला नारळ आणि साखरेच्या चवाच्या तळलेल्या करंज्या. या करंज्या गुलमोहर किंवा तत्सम झाडांना लटकणाऱ्या शेंगांसारख्या दिसत असल्यामुळे त्यांना शेंगा म्हटलं जातं. तसंच साखरेपेक्षाही नारळ-गुळाच्या चवाच्या शेंगा जास्त छान लागतात. परंतु या गाण्यातील बाळराजाला कदाचित साखरेच्या शेंगा आवडत असतील.

आपल्या आजोळची म्हणजेच मामाच्या गावाची ओढ तर प्रत्येक मुलाला असते. याचं कारण म्हणजे मामाच्या गावी होणारं कोडकौतुक. या कोडकौतुकात भाच्याचं जेवणही सामील असतं. म्हणून तर मग आधीच जेवणात आमरस असतानाही खास भाच्यासाठी म्हणून आमरसाबरोबर शिकरणाचाही घाट घातला जातो आणि मग भाच्याची मिजास आणखीच वाढते -

“आंब्याचा आमरस वर केळ्याचं शिकरण

मामाच्या पंगतीला, भाचा जेवतो नखऱ्यानं..”

अर्थात हा सगळा खेळीमेळीचा आणि प्रेमाचाच मामला असतो. म्हणून तर आधीच एक पक्वान्न रांधलेलं असतानाही भाच्यावरील प्रेमापोटी मामाच्या घरी दुसरं पक्वान्न रांधलं जातं.

एरव्ही खरंतर मुलांसाठी घरी नेहमीचंच जेवण केलं जात असे. म्हणजे मूल तीन-चार वर्षांचं झालं की त्याला, जे मोठी माणसं खातात तेच वाढलं जातं. परंतु ते दोनेक वर्षांचं होईपर्यंत त्याच्यासाठी खास गुरगुट्या भात किंवा कणेर रांधली जाते. गुरगुट्या भात म्हणजे तांदूळ एकदम मऊ होईपर्यंत शिजवले जातात आणि नंतर किंचित मीठ आणि तूप टाकून छान कालवून तो भात मुलाला भरवला जातो. म्हणजे बाळाला भात चावता आला नाही तरी चालतो. तर कणेर म्हणजे तांदूळ भिजवून, वाळवून, किंचित भाजून, मग त्याची रव्यासारखी बारीक कणी काढली जाते आणि ती पातळसर शिजवली जाते. तांदूळ भाजून घेतलेले असल्यामुळे ही कणेर मुलांना अगदी सहज पचते. अलीकडे तांदळाबरोबरच मुगाची डाळही घेतली जाते. जेणेकरून ही कणेर अधिक पौष्टिक होते. या कणेरीचाही उल्लेख कधी तरी लोकवाङ्मयात येतो-

“तांदळाच्या कण्या शिजवल्या मऊमऊ

राजस बाळा ये रे, तूप-भात जेऊ..”

गुरगुट्या भात काय, कणेर काय किंवा गुळ टाकून केलेली रव्याची पातळ खीर काय हे सारं बाळासाठी आवश्यकच असतं. पण त्याही आधी बाळाला अत्यावश्यक असतं ते मायबाईचं दूध. बाळंतपणानंतर सुरुवातीच्या महिन्यांत त्या दुधावरच तर बाळाचा पिंड पोसला जातो. पण जिथे आईलाच पोटभर अन्न मिळत नसेल तिथे स्तनांत तरी दूध कुठून येणार? मग क्वचित कधी अशा मायबाईचं दुःखही गाण्या-ओव्यांमध्ये येतं. विदर्भातील प्रसिद्ध लोकसाहित्यिक डॉ. ना. रा. शेंडे यांनी गोळा केलेल्या लोकवाङ्मयात असं एक गाणं आहे, ज्यात मायबाईचं काळीजच उकलून ठेवलेलं आहे. ही मायबाई म्हणते-

“नको झोंबू तान्या, थानी नाही बुंद

कुस जी बेईमान, उगी रे गोईंद

दल्ला जलम सांजिले, तान्ह्या व्हती कारी रात

घुगऱ्याचे दाने दोन, तुह्या जलमीची साथ..”

एकीकडे दुधा-तुपातले पदार्थ, तर दुसरीकडे घुगऱ्यांचे दोन दाणेच बाळाच्या निशिबी असल्याचं दिसतं. मुलांच्या खाण्या-पिण्यातही किती ही तफावत. मात्र लोकवाङ्मयाने मुलांमध्ये आपपर भेद न करता सारंच आपल्या प्रेमळ कवेत घेतलेलं दिसतं.

लोकसाहित्याचे अभ्यासक.

mukundkule@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in