

लोकवाङ्मयातली खाद्यसंस्कृती
डॉ. मुकुंद कुळे
सौरऊर्जा हा शब्द आपण अलीकडे वारंवार ऐकतो. सौरऊर्जेच्या आधारे अन्न शिजवण्याचे विविध प्रकार आज शोधले जात आहेत. पण भारतातील महिलांनी परंपरागतरीत्या चैत्र-वैशाखातील सूर्याची उष्णता वेगवेगळ्या प्रकारे वापरली आहे. वाळवणाच्या विविध पदार्थांमध्ये जणू साठवली आहे. वाळवणाच्या या पदार्थांनी लोकसाहित्यही समृद्ध केलं आहे.
फाल्गुनातली उन्हं रटरटायला लागली की पूर्वी घरोघरच्या आयाबायांना वाळवणाच्या पदार्थांची स्वप्नं पडायला सुरुवात व्हायची. काय काय तर म्हणे- सांडगे, पापड, कुरडया, खारोड्या, चिकोड्या, मिरगुंड, शेवया, बोटवे, गव्हले, सालपापडी... आणखीही बरंच काही. मग सारा उन्हाळा ही स्वप्नं पूर्ण करण्यात कसा सरायचा तेही या मायबाईंना कळत नसे. आज आपल्या घरी, उद्या दुसरीच्या दारी... असं करीत अख्ख्या गावाची वाळवणं होइपर्यंत तो सिलसिला संपूर्ण गिमभर (म्हणजे उन्हाळभर) सुरू असायचा. कारण एकमेकींच्या घरी जाऊन केलेली ही वाळवणं म्हणजे केवळ उन्हाळ्यात करायचे पदार्थ नसायचे. तर एकमेकींच्या आयुष्याला, एकमेकींच्या सुखदुःखाला करून दिलेली ती मोकळी वाट असायची. म्हणून तर एखादी मायबाई शेवया वळता-वळता आपल्या दुबळ्या माहेराच्या आठवणीने हळवी व्हायची आणि अगदी सहज म्हणून जायची-
“लक्षुमीबाई कोणीकडं केलं येणं
बंधूचं दुबळंपण तुला सांगितो कोण
आई लक्षुमीबाई तुला शेवयांचा थाळा
सुखांत राहू दे माझ्या माहेराचा मेळा...”
एखादीच्या तोंडून असा गहिवर निघाला की मग बाकीच्या सगळ्या तिची समजूत घालायच्या. तिला उगीउगी करायच्या. दिवस पालटतात, शेणातले किडे शेणात रहात नाहीत... याची तिला आठवण करून द्यायच्या. म्हणजे मग बघता बघता ती हिरमुसलेली, रडवेली झालेली मायबाई खुदकन् हसायची आणि म्हणायची कशी -
“काय सांगू बायांनो, एकदा काय झालं
आखाजीच्या सणाला, माहेरचं मूळ आलं
मुराळी आला बंधू, मोठा बाजिंदा मावळगडी
आत्याबाई म्हणत्यात, सूनबाई लपव सालपापडी...”
म्हणजे या मायबाईच्या भावाला सालपापड्या भयंकर आवडायच्या तर... पण सालपापड्या करायच्या तर त्यांचा कोण घाट घालावा लागतो. सारं काम एकदम नजाकतीचं. म्हणजे रोज पाणी बदलत तांदूळ तीनेक दिवस भिजत ठेवायचे. मग ते सुकवायचे. त्याची अगदी बारीक पिठी करायची. मग त्यात सरसरीत मिश्रण होईल असं बेतास बात पाणी घालायचं. त्यातच चवीला मीठ आणि जिरं टाकायचं. आवडत असेल तर ठेचा टाकायचा. एवढी तयारी झाली की चुलीवर एका पातेल्यात पाण्याचं आधण ठेवायचं. आधणाला उकळी आली की, त्या पातेल्यावर बरोबर बसेल अशा झाकणाच्या आतल्या बाजूवर (म्हणजे पाण्याची वाफ लागेल अशा बाजूला) तांदळाच्या पिठीचं ओलं मिश्रण चमचाभर टाकायचं आणि झाकण गोल फिरवून घ्यायचं. म्हणजे त्या मिश्रणाला आपोआप गोल आकार येतो. तो आकार आला की ते मिश्रण लावेलला भाग आत जाईल या पद्धतीने पातेल्यावर झाकण मारायचं आणि अगदी पंधरा-वीस सेकंद झाकण ठेवून ते लगेच काढायचं. एव्हाना उकळत्या पाण्याच्या वाफेवर तांदळाच्या पिठीच्या मिश्रणाची पुरी चांगलीच वाफवून निघते की लगेच हलक्या हाताने ती पुरी झाकणावरून सोडवून घ्यावी आणि उन्हात अंथरलेल्या साडीवर अलगद वाळत टाकावी... या पुऱ्या, म्हणजेच तांदळाच्या सालपापड्या. त्या सुकवून वर्षभर कधीही सणासुदीला तळून जशा खाता येतात, तशाच अगदी ताज्या-ताज्या ओल्याही खाता येतात.
वाळवणाचे पदार्थ म्हटले की ते साधेसोपे वाटतात खरे, पण त्यांचा घाट घालायचा म्हणजे फारच उस्तवार करावी लागते. मग ते साधे पापड असोत वा मिरगुंडे. सोपं काही असं नसतंच. उलट हे सगळेच पदार्थ बाईमाणसाच्या संयमाची-धीराची कसोटी पाहणारे असतात. म्हणून तर एखादी नवखी नार धसमुसळेपणा करायला लागली की, जुनीजाणती बाई म्हणतेच -
“जीवाची उलघाल नको करू तू शेजीबाई
कुरडया शेवयांना अशी घाई सोसत न्हाई...”
...आणि खरंच असतं हे. वाळवणाचे पदार्थ घाईघाईत करायला गेलो की हमखास बिघडतात. तिथं सगळं निगुतीनेच करावं लागतं. अगदी कुरडया करताना देखील पाच-सहा दिवस गहू भिजत ठेवावे लागतात. रोज त्याचं पाणी बदलायचं. सहाव्या-सातव्या दिवशी पाणी उपसून ते गहू पाट्यावर (आता मिक्सरमध्ये) वाटायचे. मग ते वाटण बारीक चाळणीतून किंवा कापडातून एका भांड्यात गाळून घ्यायचं. म्हणजे गव्हाचा कोंडा वर राहतो आणि गव्हाचा पांढरा शुभ्र चिक भांड्यात खाली गाळला जातो. हा चिक अजून एक-दोन दिवस पाण्यात भिजत ठेवून (वरचं पाणी बदलत राहायचं) मग ते पाणी काढून टाकून तो उकळी आलेल्या पाण्यात शिजवायचा आणि त्यानंतर चकलीच्या सोऱ्यात शेवयांची चकती टाकून त्यात हा चिक भरून त्याच्या कुरडया पाडायच्या. हा एवढा सगळा खटाटोप करूनच पूर्वीच्या काळी पापड काय किंवा कुरडया-शेवया काय, केल्या जायच्या. अगदी बोटवे, नखुल्या, गव्हले असं काय काय केलं जायचं. गंमत म्हणजे हे सारं खूप मोठ्या प्रमाणावर केलं जायचं आणि दिवाळीच्या फराळाचे डबे जसे नातेवाईकांच्या घरी जातात, तसे वाळवणाचे डबेदेखील कधी काळी पोचवले जायचे. एखादीच्या माहेरची माणसं तर उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या लेकीकडून हमखास येणाऱ्या या वाळवणाच्या भेटीची वाट पाह्यची. म्हणून तर एखादा भाऊ हक्काने म्हणतो-
“सांगावा मी धाडितो मिरजंच्या बुरुडाला
सूप नि दुरड्या द्याव्या बहिणाच्या कुरडयाला..’’
निमित्तानिमित्ताने वर्षभर लागणाऱ्या या वाळवणांना चांगलं उन्ह द्यावं लागतं. अन्यथा ओलसरपणा राहिला तर वाळवणं खराब होण्याची शक्यता असते. मात्र एकदा का वाळवणं झाली की मग घरोघरच्या बहिणाबाई सणावाराच्या निमित्ताने येणाऱ्या आपापल्या माहेरच्या माणसांची आवर्जून वाट पाहतात. ते येतात कधी आणि आपण त्यांना खाऊ-पिऊ घालतो कधी याचीच जणू त्यांना ओढ लागलेली असते. अशी संधी मिळाली की मग माहेरचा माणूस असो वा कुठलाही पाव्हणा-रावळा असो, त्यांच्यासाठी वाढलेल्या ताटात तळलेल्या वाळवणाच्या पदार्थांची हजेरी हमखास असते. कधी कधी एखाद्या बहिणाबाईच्या भावाला तांदळाची खीर आवडत नाही. मग ती काय करते, तर-
“साळीचा तांदूळ बंधूजी नाही खात
बोटव्याचं ताट येळिते मंदिरात..”
म्हणजे ती जिरेसाल तांदळाच्या खिरीऐवजी बोटव्यांची खीर करते. बोटवे म्हणजेही एकप्रकारचा वाळवणाचाच प्रकार. गव्हाचं पीठ, मैदा किंवा रवा भिजवून मग ते मळून त्यापासून हाताच्या बोटांच्या आकाराचे बोटवे केले जातात. हे बोटवे दुधात शिजवून त्यापासून केलेली खीरही चवीला भन्नाट असते. त्यामुळेच एखादी बहिणाबाई आपल्या भावासाठी त्याच्या आवडीची बोटवयाची खीर करते, तर क्वचित कधी एखाद्या बंधुरायाला आपल्या बहिणीने कितीही छान शेवया केलेल्या असल्या तरी त्या आवडत नाहीत. मग त्या बहिणाबाईची मोठीच पंचाईत होते. तेव्हा मग नाइलाजास्तव ती बहीण आपल्या शेजीबाईला म्हणते -
“शेजारीण बाई उसनी देई साई
पाहुणे माझे बंधू शेवया घेत न्हाई...”
अर्थात शेवया आवडणारे भाऊरायादेखील अनेक असतातच. त्यामुळेच मग लोकवाङ्मयात
“जिरसाळी तुझा भात, पावण्या रावळ्याला
येळिते सेवाया भाऊ माझ्या जिव्हाळ्याला...”
अशा ओव्याही कधी कधी सापडतात. तर क्वचित कधी एखादी सासू आपल्या जावयाला खिचडीबरोबर आवर्जून पापड वाढते. तो पापडही त्या जावयालाही एवढा आवडतो की तो पुन्हा पुन्हा मागून खातो. मग अशी सासूबाई आपल्या जावयाचे लाड करताना म्हणते -
“जेवण जेवतो तूप खिचडी पापड
जावई राजसाला घरला जायाची निकड...”
अर्थात बंधुराया किंवा जावईच कशाला, वाळवणाचे पदार्थ ताटात सगळ्यांनाच आवडतात. किंबहुना असे पदार्थ म्हणजे तर घरोघरच्या सासुरवाशिणींची सोयच. ऐन वेळेला एखादा पाहुणा घरात टपकलाच तर भाजीबरोबर हे वाळवणाचे पदार्थ तिच्या मदतीला धाऊन जातात. या वाळवणाच्या पदार्थांनी ताटही कसं भरलेलं दिसतं!
आपल्या खाद्यसंस्कृतीत वाळवणाच्या पदार्थांनाही हक्काची जागा आहे आणि त्यामुळेच परंपरेने चालत आलेल्या लोकवाङ्मयातही ते स्थान कायम राहिलेलं दिसतं. विशेष म्हणजे अनेक ओव्यांमध्ये तर या वाळवणाच्या पदार्थांचे दाखले मिळतातच, पण क्वचित कधी लग्नातील रुखवताच्या गमतीशीर गाण्यांमध्येही वाळवणाच्या पदार्थांची नावं सापडतात. आता हेच बघा-
“आला आला रुखवत, त्यात होत्या फेण्या
विहीणबाई आमच्या भलत्याच शहाण्या...”
किंवा
“आला आला रुखवत, रुखवतात ठेवला शेवयांचा खण
विहिणीपेक्षा व्याही बरे, म्हणते सुनबाईची मावळण...”
आताचा जमाना इन्स्टंटचा आहे. तेव्हा घरात वाळवणाच्या पदार्थांचा घाट कोण आणि किती घालत असेल शंकाच आहे. किंबहुना अलीकडे वाळवणाचे पदार्थ विकतच आणले जातात. अर्थात वाळवणाचे पदार्थ घरीच करणाऱ्या हौशी महिला आजही आहेत. पण त्यांचं प्रमाण कमी झालंय. पूर्वी कसं गावाकडे घराघरांतील अगणं आणि शहरांत चाळीतील मोकळ्या जागा या दिवसांत वाळवणाच्या पदार्थांनी सजलेल्या असत. आता ते दृश्य नजरेस पडत नाही एवढंच!
लोकवाङ्मय व लोककलांचे अभ्यासक.