मनाचे अभंग
डॉ. रूपेश पाटकर
प्रत्येक व्यक्तीत एक बालक, पालक, चालक असतो. बालकाला शाबासकीची, पालकाला सहमतीची अपेक्षा असते, तर चालक योग्य प्रकारे मतभिन्नता व्यक्त करू शकतो. आपण बोलतो तेव्हा आपल्याला समोरच्याकडून नेमकं काय अभिप्रेत असतं? सहमती, शाबासकी की मतभिन्नता? तुम्हीही तपासून पहा.
डॉ. शहा म्हणून आमचे एक प्रोफेसर होते. ते एकदा म्हणाले, "पाठ्यपुस्तकात काय सांगितले आहे, ते तूर्तास बाजूला ठेवू. मी तुम्हाला कंटाळा कमी करण्याचा मार्ग सांगतो. जेव्हा तुम्हाला जाम वैताग येईल, तेव्हा रेल्वे स्टेशनवर जा आणि लोक कसे चालतात ते पहा. कोणी चप्पल घासत चालतात, कोणी उड्या मारत चालतात, कोण कंबर झुकवत चालतं, काहीजण चालताना खांद्यांची गमतीशीर हालचाल करत चालतात. मी हा अनुभव घेऊन पाहिलाय. खूप मजा येते."
शहा सरांनी सांगितल्यानंतर मी जाणीवपूर्वक येता-जाता लोकांचे चालणे निरखू लागलो. माझ्या हेदेखील लक्षात आले की माणसांचे चालणेच नाही, तर संभाषण देखील रंजक असते. व्यक्ती आणि वल्ली फक्त पु. ल. देशपांडेंनाच भेटल्या असे नाही. त्या मलाही भेटतात. फक्त डॉ. शहांनी कंटाळ्यावर मात करण्याचा मार्ग सुचवेपर्यंत त्या माझ्या लक्षात आल्या नव्हत्या.
जेव्हा मी 'ट्रान्झेंक्शनल ॲनॅलिसीस' पहिल्यांदा वाचले तेव्हा मला जाणवले की डॉ. एरीक बर्न हे पुलंची अमेरिकन आवृत्ती असले पाहिजेत. जेव्हा मी डॉ. थॉमस हॅरिस यांचे 'आय ॲम ओके, यू आर ओके' वाचले तेव्हा माझा हा विचार अगदी पक्का झाला. या पुस्तकातील एक प्रकरण तर चक्क एका बस प्रवासात आजूबाजूचे लोक एकमेकांशी काय बोलत होते यावर आहे.
डॉ. हॅरिस यांच्या बाजूच्या सीटवर चेहऱ्यावर अजिबात हास्य नसलेल्या दोन मध्यमवयीन बायका बसल्या होत्या. त्यातील एका बाईंनी आपल्या घड्याळात पाहिलं, चेहऱ्यावर वैतागाचे भाव आणत नकारार्थी मान हलवली आणि एक दीर्घ उसासा टाकत बाजूच्या बाईंकडे पाहिलं.
त्या शेजारच्या बाईंनीदेखील दीर्घ श्वास सोडत आपल्या घड्याळात पाहिलं आणि पहिलीच्या मूक म्हणण्याला दुजोरा दिला.
पहिल्या बाई: असं दिसतंय की आज पुन्हा उशीर होईल.
दुसऱ्या बाई : हो ना.
पहिल्या बाई : तुम्ही कधी वेळेवर पोचणारी बस
पाहिलीय का?
दुसऱ्या बाई: छे! बस वेळेवर पोहोचली तर
आश्चर्यच म्हणायला हवं!
पहिल्या बाई: आजच मी आमच्या यांना म्हणत होते, पूर्वीसारखं आता काहीच उरलं नाही.
दुसऱ्या बाई : खरं आहे. आजकाल कोणालाच दुसऱ्याच्या वेळेचं अजिबात महत्त्व राहिलेलं नाही.
डॉ. हॅरिसनी ऐकलेला हा संवाद आपण थोड्याफार फरकाने नेहमीच ऐकत असतो. बरेचदा आपण त्यात भाग देखील घेत असतो.
हा संवाद तुम्हाला कोणामधला वाटतो? यात दोषारोप आहेत म्हणजे ब्लेमिंग करणं आहे. दुसऱ्यातले दोष शोधणं आहे (fault finding) आहे. जेव्हा आपण एखाद्यावर ब्लेम करत असतो आणि त्यांच्यातले फॉल्ट शोधत असतो तेव्हा आपण लहानपणी 'पालक' (Parent) या सदरात रेकॉर्ड झालेली टेप पुन्हा वाजवत असतो आणि असे आपण का करतो ते माहीत आहे का? डॉ. हॅरिस सांगतात, "कारण पालक हे नेहमीच ओके असतात, असे आपले मत लहान असतानाच बनलेले असते म्हणून आणि जेव्हा आपल्याला आपण करत असलेल्या ब्लेमिंगला आणि दोष शोधण्याला सहमती दर्शवणारा माणूस भेटतो तेव्हा गप्पांचा खेळ सुरू होतो. या खेळाचा व्यवहाराच्या दृष्टीने काहीही उपयोग नसतो. पण ही मंडळी 'हे सारं किती वाईट आहे' हे मोजत बसण्यात एक तऱ्हेची मजा घेत राहतात."
डॉ. हॅरिस यांच्या गोष्टीतील पहिल्या बाईंमधील पालकाने (Parent) खेळाची सुरुवात केली. दुसऱ्या बाईंमधील पालकाने (Parent) प्रतिसाद देऊन हा खेळ पुढे नेला. खरं तर, या दुसऱ्या बाईंमधील चालक (Adult) योग्य ते उत्तर देऊन कोणत्याही पायरीवर हा खेळ थांबवू शकला असता. आपण त्यांच्यातील संवाद पुन्हा मांडून दुसऱ्या बाईंच्या चालकाने (Adult) काय उत्तरे देणे शक्य होते, ते पाहू.
पहिल्या बाईंनी घड्याळात बघत जेव्हा नकारार्थी सुस्कारा सोडला तेव्हा दुसऱ्या बाईतील चालक (Adult) साधं स्मित करू शकला असता किंवा दुसरीकडे पहात दुर्लक्ष करू शकला असता. पुढे-
पहिल्या बाई: असं दिसतंय की आज पुन्हा उशीर होईल. (पालक)
दुसऱ्या बाई : पण ही बस नेहमी वेळेवर पोहोचते. (चालक) किंवा मी विचारून बघते. (चालक)
पहिल्या बाई: तुम्ही कधी वेळेवर पोहोचणारी बस पाहिलीय का? (पालक)
दुसऱ्या बाई: हो. (चालक) किंवा मी असा कधी विचारच केला नाही. (चालक)
पहिल्या बाई: आजच मी आमच्या यांना म्हणत होते, पूर्वीसारखं आता काहीच राहिलं नाही. (पालक)
दुसऱ्या बाई : मी या मताशी सहमत नाही. (चालक) किंवा: बदल दोन्ही बाजूने आहेत. काही चांगले आहेत, काही अडचणीचे आहेत. (चालक)
दुसऱ्या बाईंमधील 'चालका'ने वरीलप्रमाणे प्रतिसाद दिला तर काय होईल? 'हे किती वाईट आहे' हा पहिल्या बाईंनी सुरू केलेला खेळ सुरू राहील का? नाही. म्हणजे यात प्रतिसाद जर चालकाने (Adult) दिला तर तो पहिल्या बाईंच्या चालीला पूरक ठरणार नाही. त्यामुळे हा संवाद पुढे जाऊ शकणार नाही. पण त्यांच्यातील पालक-पालक संवाद मात्र वास्तवाच्या दृष्टीने अर्थशून्य असताना देखील चालत राहू शकतो. कारण तो पूरक आहे.
त्या दोन स्त्रियांचा पालक-पालकमधील संवाद चालू असताना एक गंमत घडली. त्यांच्यासमोर बसलेल्या गृहस्थांनी ड्रायव्हरला विचारले, "बर्कले स्टँडवर गाडी वेळेवर पोहोचेल का?"
"हो. सव्वा अकराला बर्कले टच!" ड्रायव्हरने उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने त्या स्त्रियांमधील पालक-पालक संवाद देखील संपुष्टात आला.
त्या गृहस्थांनी विचारलेला प्रश्न आणि त्या ड्रायव्हरने दिलेलं उत्तर हे त्यांच्यातील कोणाचे होते ? तुमच्या लक्षात आलेच असेल की दोघांमधील 'चालक' (Adult) संवाद साधत होते. त्यामुळे त्या दोघांचा संवाद एकमेकांना पूरक तर होताच, शिवाय तो व्यावहारिकदृष्ट्या उपयोगाची माहिती देणाराही होता. त्या माणसाच्या सरळ प्रश्नाला ड्रायव्हरचे सरळ उत्तर होते आणि ड्रायव्हरच्या उत्तराने त्या दोन स्त्रियांमधल्या 'हे किती वाईट' या खेळाला, संवादाला देखील पूर्णविराम मिळाला.
इथे आणखी एक गंमत होऊ शकली असती. त्या माणसामधील चालकाऐवजी (Adult ऐवजी) त्याचा पालक (Parent) प्रश्न विचारू शकला असता. जर त्याच्या पालकाने (Parent) प्रश्न केला असता तर तो खोचक असला असता. उदाहरणार्थ, "आज बर्कलेला वेळेत पोचण्याचा काही चान्स आहे की नाही आम्हाला?" किंवा त्यांच्यातील बालकाने (Child) जर प्रश्न केला असता तर तो म्हणाला असता, "नेमकी स्लो गाडीच नेहमी माझ्या वाट्याला कशी येते कळत नाही."
यावर ड्रायव्हरने नेमके उत्तर देण्याची किती शक्यता होती, हे कळणे कठीण नाही. पण तरीही अनेकजण आपल्या पालकाला किंवा बालकाला दुसऱ्याच्या अंगावर सोडतात आणि सुसंवादाची शक्यताच गमावून बसतात.
डॉ. हॅरिस यांच्या मागील सीटवर दोन अठरा-वीस वर्षांचे तरुण बसले होते. ते दोघे दबक्या आवाजात बोलत होते आणि हसत होते. त्यांच्या हातात चित्रं असलेलं मासिक होतं.
पहिला तरुण : रिचर्ड काय सेक्सी दिसतो, यार. पोरी जाम मरत असतील.
दुसरा तरुण : होय रे. खेळाडू होण्यात हीच तर मजा आहे.
हा संवाद दोघांमधल्या बालकांमध्ये (Child) होत होता. बालक-बालक (Child-Child) संवादांमध्ये एकमेकांना काही सांगण्यापेक्षा सोबत आनंद अनुभवणं असतं. बालकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला शाबासकीची थाप दुसऱ्याकडून हवी असते. दोघांच्यातील फक्त 'बालक'च संवाद करणार असतील तर दोघांनाही शाबासकीची अपेक्षा असणार, पण कोणीही दुसऱ्याला थाप देणार नाही.
त्यामुळे बालक-बालक संवाद सतत चालू राहणे शक्य नसतं. तो चालू ठेवायचा असेल तर चालकाने संवादावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं.
पाच वर्षांची मिशेल आणि साडेचार वर्षांची सना खेळायचं ठरवतात.
मिशेल : मी आई होईन आणि तू बाळ हो. (बालक)
सना : मीच का नेहमी बाळ व्हायचं? (बालक)
मिशेल : ओके. तू आधी आई हो, मग मी आई होईन. (चालक)
तुमच्या लक्षात आलं का, की आधी हा संवाद बालक-बालक असा होता. पण नंतर मिशेलमधल्या चालकाने संवादात भाग घेतला. जर असं झालं नसतं तर त्यांच्यातला संवाद सुसंवादी राहिला असता का? नाही. बालक-बालक संवाद जरी परस्पर पूरक असला तरी तो सुरू राहण्यात अडचण येते. कारण बालकाला मान्यतेची थाप हवी असते.
डॉ. हॅरिस यांचं लेखन वाचल्यापासून मला आजूबाजूला ऐकू येणारे संवाद तपासण्याचा छंद लागलाय. यात खूप मजा येते. फक्त ते ऐकताना आपल्यातील पालकाने (Parent) उत्तेजित होऊन उपदेशाचे डोस पाजण्यासाठी त्यांच्या संवादात नाक न खुपसण्याचे पथ्य पाळणं मात्र गरजेचं आहे.
मनोचिकित्सक व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक