कासव पुराण

कासव दादाची पाठ इतकी कडक का असते? आणि समुद्रातील छोटी पिल्लं स्वतःचा रस्ता कशी शोधतात? या प्रश्नांची उत्तरं देणारी ही मजेदार सफर!
कासव पुराण
कासव पुराण
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

कासव दादाची पाठ इतकी कडक का असते? आणि समुद्रातील छोटी पिल्लं स्वतःचा रस्ता कशी शोधतात? या प्रश्नांची उत्तरं देणारी ही मजेदार सफर!

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कायम भोवतालचा निसर्ग आणि पुराणकथा यांचा सांधा जुळलेला पाहायला मिळतो. कदाचित या पुराणकथा रचणाऱ्या आपल्या पूर्वजांना मानवाचं अस्तित्व हे अवतीभवतीच्या निसर्गावरच अवलंबून आहे याची पक्की जाणीव असावी आणि म्हणूनच पुराणकथांमध्ये चलाखीने सृष्टीतल्या विविध जीवांना महत्त्व देऊन त्यांचं रक्षण हा जणू धर्मच आहे, अशी शिकवण त्यांनी दिली असावी. अगदी आपल्या पौराणिक ‘दशावतारांच्या’ कथेतही हेच पाहायला मिळतं. मत्स्य, कूर्म, वराह अशा प्राण्यांचा अवतार परमेश्वराने घेऊन या पृथ्वीचं रक्षण केलं; त्यामुळे या प्राण्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्यच आहे असंच जणू सांगितलं आहे. त्यातल्या त्यात अवतीभवती जमिनीवर किंवा आकाशात विहरणारे पशू-पक्षी आपल्या नजरेस पडतात, त्यामुळे त्यांच्या रक्षणाची वेगळी आठवण करून द्यावी लागत नाही; पण सागरातले जलचर मात्र तसे नजरेआडच असतात. त्यातही समुद्रातले प्राणी म्हटल्यावर चटकन आठवतात ते मासे, मात्र या माशांइतकेच महत्त्वाचे सागरी जीव म्हणजे कासवे. आपल्या दशावतारांमध्ये परमेश्वराने दुसरा अवतार धारण केला तो ‘कूर्म’ म्हणजेच याच कासवांचा. कासवांचे ढोबळपणे जे प्रमुख प्रकार केले जातात, त्यात जमिनीवरची कासवे आणि पाण्यातली कासवे हे दोन गट येतात. पाण्यातल्या कासवांमध्ये गोड पाण्यातली म्हणजे नदी, विहीर, झरे यांतली कासवे आणि समुद्रातली कासवे असे दोन प्रमुख गट पडतात.

ही सगळ्या प्रकारची कासवे या पृथ्वीवर सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी अवतरली. कासवे ही सरीसृप म्हणजे ‘रेप्टाईल’ वर्गाचे सभासद आहेत. जगभरात मिळून कासवांच्या सुमारे अडीचशे जाती पाहायला मिळतात. कासवांचं सगळ्यात मोठं शरीरवैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगावरचे कवच. जमिनीवरचे असो किंवा पाण्यातले, कवचाशिवाय कासव पाहायला मिळणारच नाही. जमिनीवर वावरणाऱ्या कासवांच्या पायाची बोटे वेगवेगळी किंवा जुळलेली असतात, नदीतल्या कासवांच्या पायाची बोटे पातळ त्वचेनं जोडलेली असतात, तर समुद्रातील कासवांच्या पायांचे रूपांतर वल्ह्यात झालेले असते. सागरी कासवांच्या शरीररचनेतील वेगळेपण म्हणजे इतर कासवांप्रमाणे त्यांना आपले डोके आणि पाय कवचात आत ओढून घेता येत नाहीत. सागरी कासवांमधील नर मादीपेक्षा आकाराने लहान असतात. कासवांची नजर तीक्ष्ण असते, पण त्यांना रंग कळत नाहीत. त्यांना सगळ्या प्रतिमा कृष्ण-धवल (ब्लॅक अँड व्हाईट) दिसतात. कासवांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते, त्यांना पाण्यात आणि पाण्याबाहेर दोन्हीकडे आवाज ऐकू येतात. पाण्यातली कासवे पाणवनस्पती, गोगलगाई, शिंपले, झिंगे, मासे, कीटक आणि काही वेळा पाण्यात वाहणाऱ्या प्राण्यांच्या मृतदेहावरही गुजारा करतात. सागरी कासवे सोडून बाकी सगळी कासवे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रतिकूल वातावरणापासून बचाव करण्यासाठी ‘दीर्घनिद्रेची’ (Hibernation) मदत घेतात.

सागरी कासवांच्या जगभरात मिळून सात प्रजाती आढळतात: फ्लॅटबॅक, ग्रीन, हॉक्सबील, लेदरबॅक, लॉगरहेड, केम्प्स रिडले आणि ऑलिव्ह रिडले. यातील फ्लॅटबॅक आणि केम्प्स रिडले या जाती वगळता बाकीच्या पाचही जातींची कासवे भारताच्या सागरकिनाऱ्यांवर आढळतात. त्यातही भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यासाठी ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे नियमितपणे येतात. सगळ्याच सागरी कासवांचं वैशिष्ट्य म्हणजे अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पिल्ले एकदा का समुद्रात पोहोचली की, त्यानंतर नर कासवे कधीच किनाऱ्यावर येत नाहीत; ते आपलं सगळं आयुष्य समुद्रातच घालवतात. त्यांचे मिलनही समुद्रातच होते. मादीच्या पोटात अंडी तयार झाली की मग मादी मात्र किनाऱ्यावर अंडी घालायला येते. त्यातही ज्या किनाऱ्यावर त्या मादीचा जन्म झालेला असतो, त्याच किनाऱ्याकडे ती अंडी घालायला परत येते. जर त्या किनाऱ्यावर मानवी हस्तक्षेप, उपद्रव वाढलेला असेल किंवा नैसर्गिक कारणांमुळे त्या किनाऱ्यावर पोहोचणे शक्य नसेल, तर मादी इतरत्र जात नाही; पोटात अंडी फुटून ती मरण पावते. त्यामुळे सागरी कासवांच्या संवर्धनात सागरकिनारे स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि मानवी हस्तक्षेपांपासून मोकळे ठेवणं आवश्यक असतं.

यासाठी चिपळूण येथील ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ ही सेवाभावी संस्था गेली पंधरा-वीस वर्षे काम करत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आधी महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर पाहणी करून कोणत्या गावांजवळ ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालायला येतात, त्याची माहिती जमा केली. पालघरपासून ते मालवणपर्यंतच्या सागरकिनाऱ्यावर सुमारे २५ पेक्षा अधिक जागा निश्चित झाल्या, जिथे वर्षानुवर्षे ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालायला येत होती. या कासवांच्या बाबतीत अंड्यातून पूर्ण वाढीचं कासव तयार होण्याचं प्रमाण अत्यल्प, म्हणजे साधारण हजार अंड्यांमधून एक कासव इतकं कमी असतं. किनाऱ्यावर आपल्या पायांनी वाळूत खड्डा खोदून अंडी घालून मादी परत समुद्रात निघून जाते, ती अंड्यांची देखभाल करत नाही. अंडी घालताना अनेकदा कासविणीच्या डोळ्यांतून पाणी वाहत असतं. त्यामुळे "आपण आपल्या पिल्लांना पाहू शकणार नाही म्हणून मादी रडते" असा गैरसमज प्रचलित आहे. प्रत्यक्षात कासवांच्या डोळ्यांजवळ मोठ्या ग्रंथी असतात; अन्न भक्षण करताना शरीरात गेलेले अतिरिक्त क्षार त्या ग्रंथींमधून द्रावरूपाने बाहेर पडत असतात आणि लोकांना वाटतं कासवीण रडते आहे.

कासवीण रात्रीच्या अंधारात किनाऱ्यावर अंडी घालून गेल्यानंतर त्या अंड्यांचे रक्षण करणे हे महत्त्वाचे होते. त्यासाठी ‘सह्याद्री निसर्ग मित्र’च्या स्वयंसेवकांनी स्वतःबरोबर त्या त्या गावांत ‘कासव मित्र’ तयार केले. किनाऱ्यावरची अंडी कोल्हे, कुत्रे असे प्राणी जसे उकरून खातात, त्याचप्रमाणे माणसेही ती विकायला पळवतात. म्हणून कासविणीने अंडी घातल्यानंतर काही तासांतच ती संरक्षित भागात स्थलांतरित करणं आवश्यक असतं. त्यामुळे कासवमित्र रात्री उशिरा आणि पहाटे लवकर किनाऱ्यावर गस्त घालून अशी अंडी सुरक्षितपणे तयार केलेल्या ‘हॅचरीत’ आणून परत वाळूत पुरून ठेवतात. मात्र हे करताना त्यांना एक काळजी घ्यायची असते; ज्या क्रमाने अंड्यांचा थर मुळात लागलेला असतो, त्याच क्रमाने म्हणजे खालचा थर खाली आणि वरचे वर अंडी ठेवावी लागतात. पुढे साधारण ५५-५८ दिवसांनी या घरट्यातली अंडी उबून, आपोआप फुटून त्यांतून पिल्ले बाहेर येऊ लागतात. मग या पिल्लांना भरतीच्या रेषेपर्यंत आणून ठेवण्यात येते आणि तिथून ती चालत चालत समुद्रात जातात. अशी चालत जाताना त्या पिल्लांमधील माद्यांच्या शरीरातील चुंबकाची फ्रिक्वेन्सी जमिनीतल्या चुंबकाशी जुळते आणि पंधरा-सोळा वर्षांनंतर ती मादी त्याच बळावर पुन्हा आपल्या जन्माच्या सागरकिनाऱ्यावर अंडी घालायला येऊ शकते. कासवांचे हे प्रजनन चक्र एप्रिल-मे मध्ये तुम्हीही पाहू शकता. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी ‘कासव महोत्सव’ आयोजित केला जातो, त्यात सहभागी होऊन अजब निसर्गातील हे ‘कासव पुराण’ जरूर पाहावे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in