
हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
फसवणूक, दुर्लक्ष, गैरसमज किंवा अगदी पराकोटीचा शारीरिक-मानसिक अत्याचार...प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला यातलं काही ना काही येत असतं. या अनुभवाला ती व्यक्ती कसं तोंड देते, आपण व्हिक्टिम आहोत, ‘बळी’ आहोत, असं म्हणत बळीपणाचं दु:खं कायमस्वरुपी जवळ बाळगते का विचारपूर्वक या दु:खावर मात करते, यावर त्या व्यक्तीच्या आयुष्याची पुढची वाटचाल ठरते.
कोणत्या ना कोणत्या स्वरुपाची वेदना हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण ती वेदना हीच आपण आपली ओळख बनवली, तर आपण केवळ त्या घडून गेलेल्या घटनेचे बळी राहत नाही, तर आपण ‘बळी मानसिकते’चे बळी होतो. बळी मानसिकतेमध्ये व्यक्ती स्वतःला परिस्थितीचे बळी समजतात. आपल्या आयुष्यातील समस्या या परिस्थितीमुळे, इतरांमुळे येत आहेत आणि ही परिस्थिती बदलण्याची शक्ती आपल्यात नाही, असे त्यांना वाटते. बळी मानसिकता असलेले लोक अनेकदा असहाय्य आणि शक्तीहीन वाटतात. राग, संताप आणि निराशेशी झुंझत राहतात.
‘बळी मानसिकता’ ही प्रत्यक्षात घडलेल्या घटनांपेक्षा त्या घटनांचा आपण कसा अर्थ लावतो त्यावर आधारित असते. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेमुळे भावनिक त्रास होतो, पण त्याहून अधिक रेंगाळतो तो दीर्घकाळ टिकणारा असहायतेचा, रागाचा आणि इतरांवर अवलंबून राहण्याचा अनुभव. आज मानसिक आघात आणि अन्याय यांचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत ‘बळी मानसिकता’ हा एक प्रकारचा भावनिक साथीचा रोग बनत आहे.
बळी किंवा पीडित मानसिकतेचे व्यवहारिक, मानसशास्त्रीय आणि तात्त्विक पैलू कोणते हे समजून घेणे आवश्यक आहे. या लेखाचा उद्देश ‘बळी’वर टीका करणे हा नसून त्यांना स्वशक्तीचा आणि अंतर्गत मुक्तीचा मार्ग दाखवणे, हा आहे.
बळीपणाची मानसिकता म्हणजे काय?
बळीपणाची मानसिकता असलेली व्यक्ती सतत स्वतःला परिस्थितीचा बळी समजते. वास्तव वेगळं असलं तरीही. यात प्रत्येक अनुभवाला त्रास, अन्याय आणि दोष या दुर्बिणीतून पाहिलं जातं. या ‘बळी मानसिकते’त अडकलेल्या व्यक्तीची वैयक्तिक वाढ खुंटते आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची क्षमताही कमी होते.
‘मीच का?’, ‘माझ्यासोबतच नेहमी वाईट गोष्टी का घडतात?’ असे प्रश्न एखादा आघात झाला की बहुतेकांना पडतात, हे खरं. पण हे प्रश्न हाच जर त्यांचा ‘विचार’ बनला, तर अशा व्यक्तींचा जगाकडे आणि इतर लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ‘बळी मानसिकते’ला बळी पडणारी व्यक्ती परिस्थितीशी सामना करण्याची स्वतःची क्षमता हरवते आणि मग आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण नाही, असं त्या व्यक्तीला वाटू लागतं.
दैनंदिन जीवनातील प्रतिबिंब
बळी मानसिकतेची व्यक्ती वारंवार जुनं दुःख उगाळत राहते, इतरांनी तिच्यावर केलेल्या कथित अन्यायाची उदाहरणं देत आक्रंदत राहते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर अन्याय करतात, असे तिला वाटते. वैयक्तिक नात्यांमध्ये ती सतत दुखावल्यासारखी वागते. आपल्या दुःखासाठी इतरांना जबाबदार धरते, मात्र त्यावेळी त्यातला स्वतःचा सहभाग मात्र पूर्णपणे नाकारते.
सतत नकारात्मक अनुभवांवर लक्ष केंद्रीत करुनआत्मपरीक्षण करणं टाळल्यामुळे जबाबदारीपासून पळ काढण्याची सवय निर्माण होते. कोणत्याही समस्येला तोंड देण्याऐवजी तक्रार करत राहाण्याची वृत्ती बळावते. अशा लोकांना ‘बळी’, ‘व्हिक्टिम‘ ही ओळख हवीशी वाटते. कारण त्यातून त्यांना एक आधार मिळतो. लोकांमध्ये सहानुभूतीचे स्थान मिळते. पण सुरुवातीला आधार देणारी ही ओळख कायम राहिल्यास नंतर ती वैयक्तिक विकासाच्या आड येते.
मानसशास्त्रीय गुंतागुंत
बळी मानसिकतेची सुरुवात अनेकदा वैयक्तिक अनुभव, मानसिक प्रवृत्ती आणि व्यापक सामाजिक प्रभाव यांच्या संमिश्रतेतून होते. ज्या मुलांना बालपणी दुर्लक्ष, शारीरिक किंवा भावनिक अत्याचार, अथवा गंभीर भावनिक ताण सहन करावा लागतो, त्यांच्यात अन्यायाविषयी अतिसंवेदनशीलता निर्माण होऊ शकते. हे अनुभव त्यांच्या विचारपद्धती आणि आत्मप्रतिमेवर खोल परिणाम करतात. परिणामी, मोठं झाल्यावरही त्यांना सतत वाटत राहतं की, त्यांचं जग हे शत्रुत्वाने भरलेलं आहे आणि त्यांना कायम इतरांकडून होणारा अन्याय सहन करावा लागतो.
याव्यतिरिक्त पालक, शिक्षक किंवा इतर प्रभावशाली व्यक्तींची वर्तनपद्धती देखील बळी मानसिकतेस कारणीभूत ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोक सतत आपल्या अनुभवांना ‘बळीपणाच्या’ नजरेतून मांडत असतील, तर ती व्यक्तीही हळूहळू तसाच दृष्टीकोन स्वीकारते. अनेकदा माध्यमांमधील कथन हे बळीच्या भूमिकेभोवती फिरते, व्यक्तीला ‘बळी’ म्हणून मान्यता देते. यामधून ‘बळीपणाची ओळख’ ही एक समाजमान्य भूमिका म्हणून प्रतिष्ठित केली जाते. बळी असलेल्या व्यक्ती त्यांच्याही नकळत हे आत्मसात करत असतात. यातून ही शिकलेली असहायता (learned helplessness) अधिक तीव्र होते.
वाढती असहाय्यता
बळी मानसिकता ही जाणूनबुजून केलेली निवड नसून, अनेक वेळा ती व्यक्तीच्या मनात खोलवर रुजलेली, स्व अस्तित्व टिकवण्यासाठी काम करणारी यंत्रणा असते. जग म्हणजे एक असुरक्षित जागा आहे आणि आपल्यामध्ये प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नाही, या भावनेतून हे घडत असते.
मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिगमन यांच्या प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे की, जेव्हा व्यक्तीला वारंवार अपयश किंवा शिक्षा मिळते, तेव्हा ती हळूहळू प्रयत्न करणेच सोडून देते. कारण तिच्यात, ‘ही परिस्थिती कधीच बदलणार नाही’ या स्वरुपाची वेगवेगळ्या अनुभवांमधून अवगत केलेली असहायता (learned helplessness) निर्माण होते.
आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे गंभीर किंवा दीर्घकालीन मानसिक आघात झालेत आणि जर त्यावर प्रक्रिया किंवा उपचार झाले नसतील तर ते व्यक्तीला मानसिकदृष्ट्या त्या एका अवघड ठिकाणी अडकवून ठेवतात. जणू काही ती व्यक्ती आजही, अजूनही त्या आघाताच्या क्षणात अडकलेली आहे.
या मानसिकतेमध्ये अनेकदा काही वाक्यांच्या स्वरूपात विचार विकृती (cognitive distortions) दिसून येतात. ‘माझ्या वाट्याला काहीच चांगले येत नाही.’ ‘कशाचा उपयोग होणार नाही. काही बदलतच नाही.’, अशी वाक्य वारंवार मनात येत राहतात. या मानसिकतेला काही दुय्यम लाभ सुद्धा असतात. त्या व्यक्तीला इतरांची सहानुभूती मिळते, इतरांचे लक्ष वेधून घेता येणे, जबाबदारी टाळता येते, राग व्यक्त करता येतो किंवा सामाजिक संबंधांपासून दूर राहता येते. बळी मानसिकतेचे हे तात्पुरते लाभ आरामदायक वाटले तरी, ही मन:स्थिती दीर्घकाळ राहिल्यास भावनिक, सामाजिक आणि मानसिक नुकसान होते. म्हणूनच या मानसिकतेची मुळे, तिचे स्वरूप आणि तिच्यामागची कारणे समजून घेणे हे बदलाच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत.
बळी मानसिकतेतून स्वशक्तीकडे वाटचाल
आज अनेकजण बळी मानसिकतेशी संघर्ष करत आहेत. पण या मानसिकतेपासून मुक्त होणे आणि अधिक समाधानकारक जीवन जगणे शक्य आहे. पीडित, बळी मानसिकतेवर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याची जाणीव होणे. याचा अर्थ तुम्ही कधी बळी मानसिकता स्वीकारुन विचार करता किंवा वागता, ते ओळखा. तुमचे विचार आणि भावना याकडे लक्ष द्या आणि तुमच्या बळी मानसिकतेला हातभार लावणारे कोणतेही घटक किंवा ट्रिगर्स ओळखा. बळी मानसिकतेवर मात करण्यासाठी ‘मी मला हवे असलेले जीवन निर्माण करण्यास सक्षम आहे’ या स्वरुपाची सकारात्मक विधानं स्वत:ला पुन्हा पुन्हा सांगून, मानसिकता असहाय्यतेपासून सक्षमीकरणाकडे वाटचाल करता येते. याबरोबरीनेच मानसोपचार घेणेही आवश्यक आहे.
पीडित मानसिकतेवर मात करण्यासाठी तुमच्या सीमा निश्चित करणे हा एक आवश्यक भाग आहे. याचा अर्थ तुमच्या हिताच्या नसलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकणे आणि इतरांकडून तुम्ही काय सहन करण्यास तयार आहात यावर मर्यादा निश्चित करणे. स्पष्ट सीमा निश्चित करून, तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळवू शकता आणि अधिक सकारात्मक आणि परिपूर्ण भविष्य घडवू शकता.
थोडक्यात, विचारपूर्वक कृती करुन प्रत्येक व्यक्ती बळी मानसिकतेतून बाहेर पडून स्व सबलीकरणाकडे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकते.
मनोचिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता