गोड चूक

लहान मुलांच्या प्रत्येक कृतीमागे एक निरागस कारण दडलं असतं. ते समजून घेतलं, की रागाची जागा आपोआप प्रेम घेतं.
गोड चूक
गोड चूक'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

कथा

हार्दिका

लहान मुलांच्या प्रत्येक कृतीमागे एक निरागस कारण दडलं असतं. ते समजून घेतलं, की रागाची जागा आपोआप प्रेम घेतं.

आज पुन्हा एकदा जुने दिवस आठवले. अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं. म्हणजे काय, शाळेचा गणवेश घालून, पाठीवर दप्तर मारून नाही गेलो मी; पण कधी कधी रोजचं जीवन जगताना काही अनुभव असे येतात, की आपण भूतकाळात कधी मागे जाऊन पोहोचतो ते आपलं आपल्यालाच कळत नाही. फरक एवढाच असतो की, त्यावेळी आपण लहान असतो आणि आज पालक झाल्यावर मोठ्यांच्या भूमिकेत असतो.

काल दुपारी आमची लहानगी मनू शाळेतून घरी आली. नेहमीसारखी बागडत, गाणी म्हणत. पण आज तिच्या बॅगेचं वजन जरा जास्तच वाटत होतं. तिची आई, म्हणजे माझी सरू, तिचं दप्तर रिकामं करायला गेली नि तिच्या हातातून पेन्सिलचा मोठा गठ्ठाच खाली सांडला! बापरे, लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या... अशा कितीतरी रंगीबेरंगी पेन्सिली फरशीवर पसरल्या. सरूने लगेच फोन काढला. शाळेचा व्हॉट्सॲप ग्रुप उघडला नि तिचा चेहराच उतरला.

सरू तडक माझ्याकडे आली. हातात तो फोन होता. “बघ तुझ्या लाडक्या मुलीचे कारनामे!” ती जरा वैतागूनच म्हणाली, “शाळेतून मॅडमचा मेसेज आलाय. मुलं जेव्हा मैदानावर खेळायला गेली होती, तेव्हा मनू मॅडम वर्गात नव्हत्या. याच संधीचा फायदा घेऊन मनूने वर्गातल्या बाकी सगळ्या मुलांच्या कलर पेन्सिल उचलल्या आणि परस्पर स्वतःच्या बॅगेत भरल्या. पहिलीत गेली तरी हिची मस्ती काही कमी होत नाही. “राजू, तू रोज तिला पाठीशी घालतोस, म्हणून ही अशी वागते!”

सरूचा राग रास्त होता, पण मी शांत राहिलो. मी तिच्याकडे बघून हळूच विचारलं, “अगं सरू, तू मनूला विचारलंस का, की तिने असं का केलं?”

“छे! काय विचारायचंय? स्पष्ट दिसतंय तिने दुसऱ्यांच्या गोष्टी उचलल्यात” सरू म्हणाली.

मी सरूचा हात हातात घेत मऊ आवाजात म्हणालो,

“तसं नाही ग, आधी आपण तिला कारण विचारू या. मग काय ते बघू. पण प्लीज, तिच्यावर ओरडू नकोस किंवा तिला मारू नकोस.”

सरू जरा निवळली, पण माझ्या मनात मात्र आठवणींचं एक जुनं दुकान उघडलं गेलं. माझं मन थेट १९९६ सालात जाऊन पोहोचलं. मी तेव्हा अवघा दुसरीत असेन. साधारण सात-आठ वर्षांचा लहानगा राजू! त्यावेळी आम्हाला नुकतीच शाईच्या आणि बॉल पेनची ओळख झाली होती. वर्गातल्या काही मुलांकडे छान छान, नवनवीन पेनं असायची. कुणाकडे चार रंगांची एकत्र टोकं असणारं पेन, तर कुणाकडे वर झाकणाला छोटं खेळणं असलेलं पेन! मला ती पेनं खूप आवडायची. मी मित्रांकडे मागायचो, “अरे, जरा बघू तरी दे.” पण मुलं द्यायची नाहीत. ती पेनं हातात लपवून ठेवायची. मला तो नकार खूप लागायचा. बालमन ते, आत कुठेतरी राग आणि हट्ट साचत गेला.

तो शनिवारचा दिवस होता. सकाळीच शाळा असायची. शेवटी कवायत झाली की फुल्ल सुट्टी! कवायतीची घंटा वाजली, सगळी मुलं मैदानावर पळाली. मी मात्र हळूच “मला तहान लागलीय, पाणी प्यायला जातो” असं सांगून रिकाम्या वर्गात शिरलो. बाकांवर, बॅगेत जिथे जिथे पेनं दिसली, ती सगळी मी गोळा केली आणि माझ्या दप्तराच्या गुपित कप्प्यात कोंबली.

आज विचार केला की वाटतं, ती एक प्रकारची चोरीच होती. पण त्या वयात मला ‘चोरी’ या शब्दाचा गांभीर्यपूर्वक अर्थ कुठे कळत होता? मला पेन बघायला दिलं नाही, हा राग मनात होता. बस, एवढंच! मला ती सगळी सुंदर पेनं स्वतःजवळ हवी होती.

त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आल्यावर माझ्या आबांजवळ, म्हणजे माझ्या वडिलांजवळ बसलो होतो. मन मोकळं करताना नकळतपणे माझ्या तोंडून ते पेन जमा केल्याचा किस्सा बाहेर पडला. सांगून झाल्यावर मला अचानक भीती वाटली. वाटलं, आता आबांचा मोठा हात पाठीत बसणार किंवा आबा खूप रागावणार! पण आबांनी तसं काहीच केलं नाही. आबांनी मला जवळ घेतलं. माझ्या पाठीवरून हात फिरवला. रागावण्याऐवजी त्यांनी शांतपणे विचारलं, “राजू, तू असं का केलंस रे बाळा?”

मी डोळ्यांत पाणी आणून मनातील सगळी घालमेल आबांना सांगितली. आबांनी माझं ऐकून घेतलं. मग अतिशय प्रेमाने, हळुवारपणे समजवलं, “बघ राजू, दुसऱ्याची वस्तू आपल्याला आवडली म्हणून ती न सांगता घेणं योग्य नाही. ज्यांची ती पेनं आहेत, ती मुलं आता घरी रडत असतील ना? त्यांना किती वाईट वाटलं असेल? तुला तुझं पेन कुणी घेतलं तर आवडेल का?” आबांच्या त्या प्रेमळ शब्दांनी माझ्या मनात असा काही प्रकाश पाडला की, मला माझी चूक उमगली. सोमवारी शाळेत जाऊन मी ती पेनं ज्याची त्याला देऊन टाकली. त्या वेळच्या शिक्षकांनीसुद्धा या गोष्टीचा

फार मोठा तमाशा केला नाही. समजून घेतलं आणि विषय तिथेच संपला.

पण आता काळ बदललाय. आता पालकांच्या फोनवर लगेच धडकन मेसेज येतात! तक्रारींचे पाढे वाचले जातात. मी भूतकाळातून वर्तमानात आलो. तेवढ्यात सरू आतल्या खोलीतून आली. तिच्या चेहऱ्यावर आता रागाऐवजी एक मऊपणा होता. ती माझ्या शेजारी बसली आणि हळूच म्हणाली, “तू म्हणत होतास तेच खरं निघालं. मी मनूला जवळ घेऊन प्रेमाने विचारलं, गोंड्या, तू का आणल्या ग सगळ्यांच्या पेन्सिली?” तर ती काय म्हणाली माहितीये?”

“काय म्हणाली सांग ग सरू पटकन.”

ती म्हणाली, “आई, वर्गातल्या सगळ्या मुलांकडे वेगवेगळे आकार, रंग असलेल्या सुंदर पेन्सिली आहेत. मला त्या फक्त तुला आणून दाखवायच्या होत्या. कारण मलाही तशाच पेन्सिल हव्या आहेत!”

सरूचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांत पाणीच आलं.

लहान मुलांना कधीच ‘चोरी’ करायची नसते. त्यांच्या त्या छोट्याशा डोक्यात, त्या चिमुकल्या जगात कोणताही वाईट हेतू नसतो. त्यांच्या प्रत्येक वागण्यामागे एक गोंडस, निरागस कारण असतं. फक्त ते कारण शोधण्याची, ते समजून घेण्याची संयमी नजर पालकांकडे असावी लागते.

मी मनूकडे गेलो. तिला मांडीवर बसवलं. तिला अजिबात ओरडलो नाही. तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणालो, “माझी गोड मनू! हे बघ मनू, दुसऱ्यांच्या पेन्सिल न सांगता आणायच्या नसतात हं बाळा. उद्या आपण शाळेत जाऊन सगळ्या मुलांच्या पेन्सिली परत करू या आणि हं, आपणसुद्धा बाजारात जाऊन तुझ्यासाठी सुंदर, रंगीबेरंगी पेन्सिल घेऊ या. पण सगळ्या नाही हा दोन-तीनच घेऊ. मग परत कधीतरी आणखीन नवीन घेऊ. मी मोबाईलमध्ये या साऱ्या पेन्सिलीचा फोटो काढून ठेवतो. ठीक आहे?”

माझं हे बोलणं ऐकून मनूच्या चेहऱ्यावर एक मोठं, गोड हसू उमललं. तिने माझे दोन्ही गाल घट्ट पकडले नि म्हणाली, “थँक्यू बाबा! उद्याच जाऊ हं आपण!”

मी तिला छातीशी घट्ट धरलं. मनात एकच विचार आला, मुलं म्हणजे मातीचा गोळा असतात. त्यांना रागाच्या काठीने आकार द्यायचा नसतो, तर प्रेमाच्या हातांनी हळूवार खुलवावं लागतं. आजच्या या छोट्याशा प्रसंगाने मला पुन्हा एकदा बालपणाची सफर घडवून आणली होती आणि एक बाप म्हणून माझं मन अधिक समृद्ध केलं होतं.

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in