हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
भारतीय संस्कृतीत प्रत्येक नवीन उपक्रम, मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी एकच नाव घेतले जाते - श्री गणेश. त्यांची उपस्थिती दैनंदिन जीवनात इतकी खोलवर रुजलेली आहे की लोक क्वचितच विचारतात की, तो प्रथम का? ती केवळ परंपरा आहे की ती एखाद्या सखोल सत्याचे प्रतिबिंब आहे? गणेशाचे हे मंगलस्मरण म्हणजे जीवनप्रवासाची पहिली पायरी पवित्र करणारा प्रकाश आणि प्रत्येक घरात सुख, शांती, समाधान आणि कल्याण यांचा सततचा वास. म्हणूनच श्रीगणेश म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
श्री गणेश हे विधीच्या अनेक देवतांपेक्षा अधिक प्रिय आहेत. रंगीबेरंगी मूर्ती, लयबद्ध ढोल, दैवी व्यक्तिरेखेभोवती एकत्र येणारे कुटुंब आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ असा हृदयस्पर्शी जयघोष. परंतु श्री गणेश हे केवळ एक उत्सवाचे प्रतीक नाही. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती आपल्याला मानसिक आनंद, भक्ती आणि श्रद्धेचा अनुभव देते. गणेश सर्जनशीलतेचा आदर्श आहे. चित्रकार, शिल्पकार, कवी, लेखक, नर्तक अशा प्रत्येकाला त्यातून नवीन सृजनात्मक प्रेरणा मिळते. गणपतीला समजून घेणे म्हणजे केवळ पौराणिक कथाच नव्हे, तर मानवी जीवन, मन आणि समाजात लपलेले शाश्वत ज्ञान देखील समजून घेणे होय.
गणेशाचे रूप आणि प्रतीकात्मक दृष्टिकोन
गणेशाचे रूप म्हणजे केवळ पूजेसाठीची साजिरी गोजिरी मूर्ती नाही; त्याचा प्रत्येक अवयव, प्रत्येक आकार आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारा गूढ संदेश देतो. मोठे कान सक्रिय ऐकण्याची शिकवण देतात, तर लहान डोळे एकाग्रतेचा धडा शिकवतात. सोंडेची लवचिकता समस्यांना सामोरे जाण्याची मानसिक लवचिकता सुचवते आणि उंदरावर आरूढ गणेश आपल्याला लहान घटकांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. अगदी साधी दुर्वादेखील हिरवाई, ताजेपणा आणि अंतर्मनाला शांती देणाऱ्या नैसर्गिक अर्पणाचे प्रतीक ठरते. या सर्व रूपकांचा मानसिक उहापोह करून आपण आपल्या मनोविश्वाला नवी दिशा देऊ.
मानसशास्त्रीय आणि संज्ञानात्मक दृष्टिकोन
स्मितमुखी गणेश म्हणजे स्मृतींचा रक्षक, ज्ञानाचा अधिपती. त्याचे विशाल मस्तक जणू स्मरणशक्तीचे अथांग सागर. खरी बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे; तर विचारांना चिंतनात रूपांतरित करण्याची आणि जीवनातील धडे आत्मसात करण्याची लवचिक कला, जी मनाला एकाग्र करते, ताण हलका करते आणि आत्मशांतीचा मार्ग उलगडते.
आधुनिक मानसशास्त्रात संज्ञानात्मक पुनर्रचनेची (cognitive restructuring) जी शिकवण दिली जाते, ती मंगलमूर्ती आधीपासूनच मूर्त स्वरूपात दाखवतो. संकटे आणि विघ्ने हे कुठले थांबे नाहीत, तर ती प्रगतीची चढती पायरी आहे. त्याच्या पायाशी बसलेला उंदीर आपल्या असंख्य इच्छांचा, चंचल मन व अस्वस्थ आवेगांचा आरसा आहे आणि त्या उंदरावर आरूढ गणेश म्हणजे विवेकबुद्धीने मनावर प्रभुत्व मिळवण्याची, सजगतेचा मार्ग खुला होण्याची शिकवण. हेच आज मानसशास्त्र ‘ध्यानधारणा’ आणि ‘माइंडफुलनेस’च्या स्वरूपात स्पष्ट करते.
गणेशाचे मोठे कान हे जिज्ञासेचे प्रतीक आहे, तर गालांवरील स्मित हे निष्पापतेचे द्योतक. ही बालसुलभता मुलांना आकर्षित करतेच; पण त्याच बालसुलभ आकर्षणाने तो मुलांना धैर्य शिकवतो आणि प्रौढांच्या थकलेल्या मनालाही स्पर्शून जातो. ‘गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो’, ही कथा आपल्याला भीतीवर मात करण्याचे धाडस देते. प्रौढांसाठी तो अंतर्मनातील खेळकरपणा, आश्चर्य आणि आनंद जिवंत ठेवणारे ‘अंतरात्म्याचे बाल्य’ ठरतो. गणेशाचा मोडलेला दात आपल्याला वेगळाच संदेश देतो. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून मोठ्या कल्याणासाठी, सर्जनशीलतेसाठी काहीतरी गमावले तरी, त्यातून उदयाला येते एक महान निर्मिती. त्यागाशिवाय सृजन अपूर्ण आहे आणि स्वार्थ बाजूला ठेवला तरच ज्ञान खऱ्या अर्थाने प्रकाशमान होते.
गणेशाचे चार हात जणू आपल्याला चार अनमोल गुणांची देणगी देतात - ज्ञान, विवेक, आत्मसंयम आणि कर्मयोग.
मोदकातील आनंद
गणेशाच्या नैवेद्यातील मोदक कसे विसरूया. हा केवळ प्रसादाचा गोड पदार्थ नाही; ते प्रतीक आहे मेहनतीनंतर मिळणाऱ्या गोड आनंदाचे. हा आनंद त्वरित न मिळता, श्रम आणि संयमानंतर जेव्हा येतो तेव्हाच तो अधिक चिरंतन ठरतो.
विरोधाभासाचे अद्भूत ऐक्य
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर गणेश फक्त देवता नाही, तर मानवी चेतनेतील कालातीत संकल्पना आहे. खरे अडथळे बाहेर नसून आपल्या आत असतात. भीती, शंका, आसक्ती इत्यादी. हे अदृश्य बंध तोडल्याशिवाय खरी प्रगती शक्य नाही, याचे स्मरण गणेश करून देतो. त्याचे हत्तीचे डोके आणि मानवी शरीर हे विरोधाभासाचे अद्भुत ऐक्य आहे. बुद्धी आणि भावना, सहजता आणि शिस्त यांचे संतुलन म्हणजे गणेश. मूर्ती विसर्जनाची प्रथा अनित्यत्वाचे स्मरण करून देते. ‘ज्याचा जन्म झाला तो नाश पावतो आणि याच चक्रात सौंदर्य दडलेले आहे’, हे ही प्रथा सांगते. बाप्पाचे गोलाकार उदर हे विश्वाच्या महानतेचे प्रतीक आहे. सर्व शुभ-अशुभ, पाप-पुण्य, सुख-दुःख हे करुणा, क्षमा आणि विशाल अंत:करणाने स्वीकारणारा हेच त्याचे खरे लक्षण आहे.
लोकसंस्कृतीतील गणेश
गणेशोत्सव हा केवळ दहा दिवसांचा धार्मिक विधी नाही; तो एक सांस्कृतिक जल्लोष, सामाजिक ऊर्जेचा उत्सव आणि कलात्मक अभिव्यक्तीचा अविष्कार आहे. आपल्या मनाची पुनर्भेट आहे, एक प्रकारची आत्म-ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया आहे. ठिकठिकाणी दिसणारे भव्य मंडप, शाडूच्या मातीचे सुगंधित मूर्तिरूप, आरत्यांचे गजर, भजनांची सुरेल लय, नाट्यप्रयोगांचे मंच आणि समाजोपयोगी उपक्रमांचा संदेश...हे सारे समाजाला एका अदृश्य विधायक धाग्याने बांधून ठेवतात. गणेशाचे रूप म्हणजे मानवी मनाचे प्रतीक. आजच्या धकाधकीच्या जीवनात, ताणत आपण अंतर्मनाचा स्वर हरवून बसतो. गणेशोत्सव आपल्याला पुन्हा त्या प्रसन्न आत्मस्वराशी संवाद साधायला शिकवतो. माझ्या आईसाठी गणेश फक्त देव नव्हता, तो आपुलकीचा पुत्र होता. त्या श्रद्धेच्या छायेत मी देवत्व आणि स्नेहाचा गूढ गाभा जाणला, तोच या लेखातून आज आपल्यासमोर ठेवला आहे.
जीवनाला आकार देणाऱ्या पौराणिक कथा
गणेशाचा जन्म हा केवळ देवकथांपैकी एक प्रसंग नाही, तर मानवी निष्ठा आणि मातृप्रेमाची एक अप्रतिम रूपक कथा आहे. देवी पार्वतीने आपल्या स्नानासाठी अंगावर लावलेला हळदीचा लेप काढून त्याला जीवनश्वास दिला आणि त्यातून गणेशाची निर्मिती केली. त्याला स्वतःचा प्रिय व निष्ठावान पुत्र म्हणून तिने घोषित केले. आईच्या आज्ञेप्रती अढळ राहून त्याने भगवान शंकरालाच अडवले. परिणामी झालेला शिरच्छेद आणि नंतर हत्तीमुख लावून झालेली पुनर्जन्मकथा आपल्याला शिकवते की, निष्ठा जरी संघर्षाला जन्म देत असली तरी, सत्याचा स्वीकार आणि परिवर्तन यातून नवीन जीवन मिळते. दुसरी कथा बुद्धिमत्तेची शिखरे दाखवते. कार्तिकेयासोबत पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याच्या स्पर्धेत वेगातल्या शर्यतीपेक्षा गणेशाने बुद्धीची दिशा निवडली. त्याने आपल्या आईवडिलांची परिक्रमा केली आणि उद्गारला, “हेच माझे विश्व, हेच माझे जग.” खरे ज्ञान हे दूरवरचे अंतर पार करण्यात नाही, तर मूल्यांची जाणीव ठेवण्यात आहे.
महाभारताच्या लेखनप्रसंगी व्यास महर्षींनी ठरवले की, ते अखंड उच्चारत राहतील; मात्र श्री विनायकाने लिहिताना कधीही थांबता कामा नये. त्यावर गणेश उत्तरले, “जेवढे मला समजेल तेवढेच मी लिहीन.” अशा रीतीने निर्माण झालेले महाभारत हे केवळ घटनांचे महाकाव्य न राहता प्रत्येक श्लोकात शब्दांच्या गतीसह ज्ञानाचा गंभीर ठाव उमटला आणि या संयोगातून जन्मली एक अखंड गाथा, मानवाच्या नियतीची, विचारांच्या गहिराईची आणि तत्त्वचिंतनाच्या अनंत प्रवाहाची.
गणेशकथांचे स्मरण म्हणजे केवळ पुराणातील मनोरंजन नाही, आजी-आजोबांच्या गोष्टी नाहीत; त्या आपल्या संस्कृतीच्या मुळाशी रूजलेल्या बीजकथा आहेत.
गणेशपूजा आणि माइंडफुलनेस
गणेशोत्सवातील आरती, भक्तिगीत, ध्यान या केवळ परंपरा नाहीत, तर आत्मशोधाचे मार्ग आहेत. मूर्तीसमोर ध्यान करताना त्याचे विशाल मस्तक जणू सांगते, “मन विस्तारले पाहिजे, विचार विशाल झाले पाहिजेत” आणि उंदरावर आरूढ असलेला गजानन कुजबुजतो, “मनाचे चंचलपण जिंकले, तरच खरे स्वराज्य लाभते.” विघ्नहर्ता ही संज्ञा बाह्य अडथळ्यांपुरती मर्यादित नाही; खरी विघ्ने आपल्या मनात असतात. गणेशस्मरण म्हणजे त्या काळ्या ढगांना बाजूला सारून आत्मविश्वासाचा दिवा पुन्हा प्रज्वलित करणे. गणेशाप्रतीच्या प्रार्थना आणि भावनात्मक अभिव्यक्ती संघर्षातही धीर देतात आणि मन मोकळे करण्यासाठी सुरक्षित अवकाश उपलब्ध करून देतात. हा असा अवकाशच मानसोपचारामध्येही मिळत असतो.
मानसोपचाराच्या भाषेत सांगायचे, तर गणेशपूजा ही ‘माइंडफुलनेस’ची नाजूक कला आहे, ज्यात वर्तमान क्षणाशी एकरूप होऊन मन स्थिर होते, चिंता विरघळते आणि आत्मशांतीचा झरा अंतर्मनात झुळझुळतो. गणेश शिकवतो की विवेक, संयम आणि आत्मनियंत्रण हीच खरी पूंजी आहे. हाच तो मार्ग, ज्यावरून चालत गेलो तर जीवन केवळ निभावण्यापुरते राहत नाही, तर सुंदरतेने आणि आनंदाने जगण्यासारखे बनते.
मनोचिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता