नववर्षाच्या नाना तऱ्हा

एकतीस डिसेंबरची रात्र म्हणजे केवळ कॅलेंडर बदलण्याचा क्षण नाही, तर जगभरातील माणसांनी आपल्या श्रद्धा, आशा आणि आनंद व्यक्त करण्यासाठी उभ्या केलेल्या रंगीबेरंगी परंपरांचा उत्सव आहे.
नववर्षाच्या नाना तऱ्हा
नववर्षाच्या नाना तऱ्हा
Published on

विशेष

मेधा आलकरी

एकतीस डिसेंबरची रात्र म्हणजे केवळ कॅलेंडर बदलण्याचा क्षण नाही, तर जगभरातील माणसांनी आपल्या श्रद्धा, आशा आणि आनंद व्यक्त करण्यासाठी उभ्या केलेल्या रंगीबेरंगी परंपरांचा उत्सव आहे.

एकतीस डिसेंबरची रात्र, बारा वाजायला फक्त बारा सेकंद उरले आहेत, चौकातल्या टोलेजंग घड्याळात बाराचे टोले सुरू झाले, शेवटचा टोला पडताच एकच जल्लोष… नववर्षाचं स्वागत अगदी झोकात.. आलिंगनं, हस्तांदोलनं, फटाक्यांची आतषबाजी, फसफसून वर उडणारी शॅम्पेनची कारंजी.. एक ना दोन..

जगातील काही देशात मात्र थोड्या हटके, मजेशीर अशा प्रथा आहेत. नववर्षात सुख-समृद्धी येवो, दुःखाला तिलांजली मिळो, प्रेमसाफल्य लाभो या सदिच्छाच त्या प्रथांमागे असल्या तरी त्याचा वेगवेगळा आविष्कार पाहिला की गंमत वाटते.

चला स्पेनमध्ये जाऊया. बाराचे टोले सुरू होण्यास अगदी थोडा अवधी उरला आहे. प्रत्येकाने आपल्या समोर मोजून बारा द्राक्षं ठेवली आहेत. टोले सुरू झाले आणि त्या प्रत्येक टोल्याला सगळ्यांनी समोरचं एकेक द्राक्ष खायला सुरुवात केली. एकेका महिन्याचं नाव घ्यायचं आणि द्राक्ष तोंडात टाकायचं. महिन्याच्या नावात गफलत न करता आणि सेकंदाचे ठोके न चुकवता द्राक्षं स्वाहा झाली तर पुढील वर्षभर भाग्यदेवता तुमच्यावर प्रसन्न! पण हे बोकाणे भरणं वाटतं तितकं सोपं नाही बरं का! एक द्राक्ष चावून पूर्ण होत नाही, तोवर दुसरा टोला पडतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबर म्हणत खाताना तर फारच गोंधळ उडतो. जे महिने म्हणताना गोंधळ उडाला त्या महिन्यात भाग्य तुमच्यावर रुसणार हा तिथला पक्का समज. वर्तुळाकार द्राक्ष म्हणजे वैभवाचं प्रतीक. आजही स्पेनमधील नागरिक घरोघरी आणि शहराच्या मुख्य चौकात सामुदायिकपणे हे द्राक्षसेवन करतात. आता द्राक्षच का? असा मला पडलेला प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. १९०९ साली म्हणे द्राक्षाचं भरघोस पीक आलं. द्राक्षं उदंड जाहली! म्हणून बागायतदारांनी ही शक्कल लढवली, अशी आख्यायिका आहे.

फिलिपाइन्समध्ये नुसतीच द्राक्ष नव्हे; तर बारा गोलाकार फळं नववर्षाच्या स्वागतासाठी टेबलावर विराजमान होतात. वर्तुळाचा आणि वैभवाचा संबंध म्हणाल तर ‘गोल गोल नाणी’! म्हणून हा गोलाकाराचा अट्टाहास! मग खायचं गोल आणि ल्यायचंही गोल. कपड्यांवर हवं ठिपक्याठिपक्यांचं डिझाईन. झाडाचे बुंधेसुद्धा ‘पोलका डॉट’ची चिरगुटं बांधून मिरवत असतात. खिशात नाणी खुळखुळवली की धनाला धन्याची ओळख पटते आणि ते त्याच्याकडे धाव घेतं. नववर्षाच्या स्वागतासाठी इथे ‘या सुखांनो या!’ म्हणत सगळी दारं-खिडक्या सताड उघडल्या जातात. बहुदा त्यांच्याकडेही ‘को जागरती?’ म्हणत लक्ष्मीदेवी फिरत असावी आणि उघड्या दारातून घरात येत आपली समृद्धीची पावलं उमटवत असावीत.

या उघड्या खिडक्यांमधून एखादी जुनी वस्तू भिरकावली गेली आणि खिडकीबाहेर फर्निचरचे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे ढीग दिसले की समजा तुम्ही साऊथ आफ्रिकेत आला आहात. ‘आऊट विथ द ओल्ड अँड इन विथ द न्यू’ हा त्यांचा नववर्षाचा मंत्र!

गोकुळाष्टमीला गोविंदांच्या अंगावर बादलीभर पाणी ओतणाऱ्या आपल्या देशवासीयांना, कॅरेबियन बेटांमधील प्युर्टो रिको या देशातील नववर्षाचं स्वागत खूप ओळखीचं वाटेल. आपल्या शेजारील बर्मा देशातही ही पाणी ओतायची प्रथा आहे. वाईट प्रवृत्तींना पिटाळून लावणारं हे पाणी म्हणजे परम शुद्धतेचं द्योतक. तन, मन आणि आत्मा नववर्षात, नव्या शुद्ध स्वरूपात!

समुद्रकिनारी वसलेल्या देशांमध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व! ब्राझील या साऊथ अमेरिकेतील देशाने तर समुद्राला देवत्व बहाल केलं आहे. मुळातच हा उत्सवप्रिय देश! एकतीस डिसेंबरच्या रात्री रिओ शहराचा प्रसिद्ध कोपाकबाना बीच शुभ्र वेशातल्या लोकांनी खच्चून भरलेला असतो. सांबा संगीताच्या ठेक्यावर नृत्य आणि फटाक्यांची आतषबाजी अशा आवाजी वातावरणात एका क्षणी, समुद्रमंथनानंतर लक्ष्मीदेवीनं बाहेर यावं तशी त्यांची ‘लेमान्या’ ही सागरदेवता समुद्रातून वर येते (कोणीतरी तिचा वेष घेतलेला असतो) आणि हर्षोल्हासाने फसफसणारी गर्दी अचानक शांत होते. लाटांच्या जवळ जाऊन पांढरी फुलं आणि मेणबत्त्या समुद्रात सोडतात. नववर्षात इच्छा-आकांक्षांची पूर्तता व्हावी म्हणून समुद्रदेवतेला अर्पण केलेली भाविकांची ही प्रेमांजली तरंगत पुढे पुढे जाते.(गंगेत सोडलेल्या दिव्यांची आठवण व्हावी.) धवल रंग म्हणजे शांती आणि समृद्धीचं प्रतीक. पायाला लाटांचा स्पर्श झाला की, मनात एकेक इच्छा धरून सात लाटांवरून उड्या मारायच्या आणि लेमान्याला पाठ न दाखवता आदराने नतमस्तक होत पाण्याबाहेर यायचं. पुढील आयुष्यात येणाऱ्या खडतर आव्हानांवर मात करू शकू अशी देवीची करुणा भाकणं हे लाटांवरून उड्या मारण्याचं प्रयोजन. पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा स्पर्श म्हणजे नवचैतन्याचा संचार! नववर्षाचा हा खास क्षण खळाळत्या पाण्याच्या सान्निध्यात घालवणं ही पूर्वापार चालत आलेली प्रथा किती अर्थगर्भ आहे ना?

सात आकडा हा भाग्याचा स्वामी! ब्राझीलमध्ये बाराच्या ठोक्याला सात डाळिंबाचे दाणे चावून, त्याचा चोथा कागदात लपेटून वर्षभर एका नोटेबरोबर पाकिटात ठेवण्याचीही प्रथा आहे. वर्षभर मग नोटांची वानवा राहत नाही अशी श्रद्धा. डाळिंब हे धनाचं प्रतीक. ब्राझीलमध्ये नववर्षाच्या मेजवानीत नाण्याच्या आकाराची म्हणून चवळी आणि काळासारखा नेहमी ‘पुढेच जायचे’ या शिरस्त्याचा म्हणून मासा, या दोन गोष्टींचं सेवन आवर्जून केलं जातं. उलट्या पावली चालू शकणाऱ्या टर्की किंवा खेकड्याचं कालवण वर्ज्य!

इस्टोनिया देशात नववर्षाच्या दिवशी सात किंवा नऊवेळा अन्नग्रहण केलं जातं. येणारं वर्ष सुजलाम‌ सुफलाम‌ असेल, अन्नाची ददात नसेल हे दर्शवणारी ही प्रथा! (अहो, पण पोटोबाचं काय?)

डेन्मार्कमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरासमोर चिनीमातीच्या बशांचा खच पडलेला दिसतो. या फुटलेल्या बशा नव्हेत, तर मुद्दाम फोडलेल्या, त्याही मित्रप्रेमाखातर! चिरंतन मैत्रीचं प्रतीक अशा या फुटक्या काचांच्या तुकड्यांचा खच ज्या दारासमोर जास्त, तितका तो इसम लोकप्रिय. बशा खळकन फुटण्याचा आवाज दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावतो हा त्यातला गर्भितार्थ. डॅनिश लोक नववर्षात पदार्पण करताना मनात इच्छा धरून चक्क खुर्चीवरून उडी मारतात.

कोलंबियाचे आणि इक्वाडोरचे रहिवासी प्रवासवेडे. म्हणून ते रात्री बारानंतर रिकामी सुटकेस घेऊन गल्लीबोळातून धावत फेरफटका मारून येतात. नववर्षात भरपूर आणि आनंददायी प्रवासाचा आशीर्वाद त्यांना प्रवासदेवतेकडून मिळतो.

डोंगराळ प्रदेशातील स्कॉटलँडवासीयांना आस असते ती भाग्यपुरुषाच्या पदार्पणाची. कोण हा भाग्यपुरुष? स्कॉटलंडमध्ये पूर्वी उत्तर युरोपातून येणाऱ्या व्हायकिंग या समुद्रचाच्यांचं भय असे. या लुटारूंचे केस सोनेरी असत. म्हणून गतवर्षाची मध्यरात्र उलटून गेल्यावर आनंदभेटी घेऊन येणारा अनोळखी पुरुष हा काळ्या केसांचा असावा अशी आशा केली जायची. ऊब देणारा कोळसा, समृद्धीसाठी नाणं, अन्नासाठी ब्रेड, आयुष्यातील स्वाद म्हणून मीठ आणि आनंददायी पेय म्हणून स्कॉटलँडमधली प्रसिद्ध व्हिस्की या भेटी घेऊन उंबरठा ओलांडणारा हा भाग्यपुरुषच समजला जातो. त्याच्या स्वागतार्थ कडाक्याच्या थंडीत कायम धगधगणाऱ्या फायरप्लेसमधील राख काढून टाकून घर झाडून-पुसून स्वच्छ केलं जातं. दिवाळीत घराचा नरक करणाऱ्या नरकासुरास घरात येण्यास मज्जाव करण्यासाठी आपणही घराची साफसफाई करतोच की!

रशियातसुद्धा या साफसफाईला खूप महत्त्व आहे. घराची आणि तनामनाची साफसफाई करण्यासाठी रशियन लोक रात्री बारा वाजता कडकडीत गरम पाण्याने अंघोळ करतात. नववर्षाचा पहिला क्षण आनंदी असावा म्हणून हे सचैल स्नान! वादविवाद संपवून, चिंतांना तिलांजली देऊन, जुने कर्ज फेडून, वैर विसरून, कोरी पाटी घेऊन ‘जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरुनी टाका’ म्हणत हसऱ्या चेहऱ्याने नववर्षाचं स्वागत करायचं असतं. ‘झोपला तो संपला!’ झोपलेल्याचं पुढचं वर्ष निष्क्रिय जाणार अशी त्यांची पक्की धारणा असल्यामुळे सगळं घर उत्साहाने फसफसत असतं. बाराच्या ठोक्याला शॅम्पेनचे ग्लास किणकिणतात; मात्र त्याआधी आपल्या नववर्ष आकांक्षांची यादी एका कागदावर उतरवून, त्याला जाळून ती राख शॅम्पेनच्या ग्लासात मिसळली जाते.

रंग आणि भाग्याचा मेळ जमवणारे मेक्सिको देशाचे नागरिक नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध रंगांची अंतर्वस्त्र परिधान करतात. लाल रंग देणार उदंड प्रेम, पिवळा आनंददायी, हिरवा समृद्धी आणि शुभ्र पांढरा शांती प्रदान करणार. जसा ढंग तसा रंग!

पूर्वेकडील संस्कृती मात्र वेगळी. जपानमधील जनता सूर्यप्रेमी आणि भाविक! प्रार्थना, शुभकामना आणि ईश्वराप्रति अपार कृतज्ञता यांनी भारलेली ही मंडळी नववर्षाच्या पहिल्या दिवशी हमखास देवळात सापडतात. बारा वाजता बुद्धमंदिरातील घंटेचे टोल वाजू लागतात; परंतु पश्चिमेकडील रीतीप्रमाणे बारा टोले न पडता १०८ वेळा ती घंटा वाजते. हा पवित्र नाद बौद्ध धर्मात मानल्या जाणाऱ्या १०८ इच्छा, वासनांचा नाश करतो. नववर्षाच्या सूर्याचं प्रथम दर्शन घेण्यासाठी काही उत्साही लोक उंच टेकाडावर जातात. नववर्षाचा सूर्योदय हा त्यांच्या लेखी भाग्योदय!

नववर्ष साजरं करण्याच्या किती वेगवेगळ्या प्रथा आहेत बघा. कुणासाठी रंग महत्त्वाचा. लाल प्रेमाचा, तर धवल शांतीचा. कुणासाठी क्रिया महत्त्वाची. खुर्चीवरून उडी, लाटांवरून उडी, फर्निचरची फेकाफेक, पाण्याचा वर्षाव, दारात बशा फोडणे किंवा गल्लीत सामान घेऊन फिरणे. कुणासाठी खाणे महत्त्वाचे. गोलाकार संत्र, द्राक्षं, नाहीतर डाळिंबाचे दाणे. जेवणात नाण्यांची आठवण करून देणारी चवळी किंवा काळासारखा पुढे पुढेच सरकत जाणारा मासा. या सगळ्या चालीरीतींमध्ये मला जाणवतो आशावाद! नवीन वर्ष, नव्या आकांक्षा! नवी उमेद!

‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवे जन्मेन मी!’

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in