आत्मरंग- ओळखीची अनोळखी अक्षरे

कविताप्रेमींना आत्मीय वाटणाऱ्या उषा मेहता या कवयित्रीच्या आजवर आठ संग्रहात संग्रहित न झालेल्या अशा एकूण छप्पन कवितांचा 'ओळखीची अनोळखी अक्षरे' हा संग्रह. 'वार्धक्याच्या पिवळ्या प्रक्रिये'त त्या या संग्रहात एकवटल्या हे वाचकांच्या नजरेतून चांगलेच झाले. त्यामुळे एक समग्न स्त्रीमन त्यातून उभे ठाकले, जे सर्वसाधारणपणे अवघडच असते.
आत्मरंग- ओळखीची अनोळखी अक्षरे
Published on

रसास्वाद

सुहासिनी कीर्तिकर

कविताप्रेमींना आत्मीय वाटणाऱ्या उषा मेहता या कवयित्रीच्या आजवर आठ संग्रहात संग्रहित न झालेल्या अशा एकूण छप्पन कवितांचा 'ओळखीची अनोळखी अक्षरे' हा संग्रह. 'वार्धक्याच्या पिवळ्या प्रक्रिये'त त्या या संग्रहात एकवटल्या हे वाचकांच्या नजरेतून चांगलेच झाले. त्यामुळे एक समग्न स्त्रीमन त्यातून उभे ठाकले, जे सर्वसाधारणपणे अवघडच असते. 'वार्धक्याच्या पिवळ्या प्रक्रियेत' असं म्हणण्याचं कारण आहे; पुस्तकाच्या सुरुवातीला असलेली त्यांची मनाचा वेध घेऊ पाहणारी मनोगतातली 'ऑटोप्रोमिंग' ही कविता. या कवितेत अदृष्टाची एक अबोध थरथर आहे. 'पार... मृत्युपार' होण्याआधी मग, आजपावेतो विखुरलेलं कवितांचं संचित या संग्रहातून असं एकत्रित गोळा केलंय; अन् ते "आदरणीय, प्रिय सानेगुरुजींना" अर्पण केलंय. सानेगुरुजींच्या कार्याला 'स्व' शोधत एकेकाळी 'मम' म्हणणारी उषा मेहता यांनी हे भान राखलं; यातच या कवयित्रीचं घडणं दिसतं. या संग्रहातील सर्वच कवितांत हा 'स्व' आहे.

हा 'स्व' व्यक्त होताना काही नवीनच शब्दमांडणी करतो. जसं 'वार्धक्याची पिवळी प्रक्रिया' किंवा 'क्लोन कोळ' किंवा 'मुकी सिमेटी जंगले' किंवा 'निराश वाटा...' असे कृतीला रंगरूप देणारं भान त्या शब्दांतून देतात तेव्हा शब्दातीत भाव काव्यात्म, सजीव होतो. कधी त्या नवीनच क्रियापद वापरतात - जसं, 'कभी पहाटेल बाई' किंवा 'दुःखानंदाचे मंद तरंग' पसरत जाणं. यातून भाव शारीररूप घेऊन वाचकमनाशी जवळीक साधतात. शारीररूप असलेलं एक उत्कट चित्र 'मुसळधार पावसाचं कार्य' या कवितेत येतं. त्यात आकाशाला आकाशबुवा म्हटलंय! 'आकाशबुवा' आता विश्रांती घ्यायला अलिप्त झालं आणि उंचउंच निघून गेलं! दशपदी असलेल्या या कवितेत मुसळधार पावसाचं आणि मनोवस्थेचं अत्यंत जिवंत असं रेखाचित्र येतं. याचं कारण म्हणजे उषा मेहता तो धुंवाधार पाऊस जणू जगतात. किंबहुना पाऊसच होतात.

अनेक कवितांतून त्यांचे जगणे शब्दांतून शब्दातीत होऊन येते. कधी स्त्री म्हणून येते. 'पटल्यासारखं दाखवून' ही कविता पाहावी वानोळा म्हणून. 'पुरुषी अधिकारवाणी' समोर 'मी स्त्री आहे म्हणून!' गप्पच राहावं की 'बोंबलून बोभाटा' करावा? असा कल्लोळ त्यात आहे. पण आयुष्य आपलंसं वाटताना 'आपण जगतच असतो' हे भानही इतरत्र त्यांना आहे. म्हणूनच त्या जाणतेपणाने 'पानगळ सुरूच असते'; हे स्वीकारतात. मात्र ही पानगळ कविता निर्मितीसंदर्भात येते. तसं या निर्मिती अवस्थेवर प्रत्येक कवी व्यक्त होत आलाय. पण इथे 'कवितापात' करते कवयित्रीचं मन. 'कवितापात' ही संकल्पनाच इथे अर्थगर्भ ठरते! 'पानगळ' ही नवीनच प्रतिमा त्यामुळे वाचकमनाला भावते.

उषा मेहता मनोवस्था, भावावस्था अशा प्रतिमांतून मांडतात; तसे भोवतालचे मनाला ओरखडणारे वास्तवही त्या नेमके शब्दांत उतरवतात. त्यासाठी त्यांची 'झाड' ही कविता पाहावी. त्यात शेवटच्या ओळीत 'तसं तेही निघालंच आहे 'देव'दर्शनाला रस्तारुंदीकरणाच्या निमित्तानं...' हे वास्तव खस्कन् काटा रुतावा तसं येतं. 'तेवढीच फक्त बोलको आहेत' या कवितेतही गुलबक्षी, गोकर्ण, पारिजातक, गुलमोहर फुलतोय, पण 'बाकी परिसर व्यापलंय मुक्या सिमेंटी जंगलांनी...' हेच अधोरेखित होतं.

उषा मेहता आपला भवताल, आपली माणसं, आपला प्रवास, आपला अनुभव संवेदनशील मनानं कवितेतून जगतात. म्हणूनच त्यांच्या कवितेत अनेक विषय पालवले आहेत. बाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली 'मॉरिशस सारखी दीर्घ कविता त्यातूनच बहरते. तो मॉरिशसबरोबरचा मुक्त आत्मसंवाद आहे; अगदी 'बरं का मॉरिशस!' असे त्या देशाला संबोधून. प्रवास करणं वेगळं आणि प्रवासिनी होणं वेगळंच असतं. ही प्रवासिनी पाखरू होते मनानं आणि इतरांनाही समांतर अनुभवते... 'माणसं पाखरे होतात आणि त्या जाळ्यात अडकून राहतात, कधी कधी त्यांना फुटलेल्या पंखांनी झेपावतात आकाशात (पृ. क्र. ७२) असं अनुभवाचं रेखाचित्र मग साकारतं. असं चित्र केवळ निसर्गाचंच नाही, आत्मीय माणसांचं देखील आहे. 'स्वामी आनंद यशवंत!' या कवितेत त्याचा पडताळा येतो. इतकं सुंदर, नेटकं 'देव'रूप पाहायला प्रत्यक्षात यशवंत देवच पुन्हा अवतरावेत, असंही वाटून जातं. चरित्र, कर्तृत्व, माणूसपण, कलासक्ती, निर्मिती... अशा परिपेक्ष्यात समग्र 'देव'रूपच उभं आहे या कवितेत; उषाच्याच नाही, तर आपल्या सर्वांच्या भावना मग वाहत राहतात. पण कवयित्री एकदा व्यक्त झाली की त्यात वाहून नाही जात. याला कारण आहे ते तिचे अनुभव-चिंतनातून येणारे जगण्याचे शहाणपण. त्यांना माहीतच आहे की 'करायचाच झाला हा प्रवास तर स्वतःला सोलून काढावं लागतं, थेट अंतर्मनापर्यंत खणून बघावं लागतं. (पृ. क्र. ८०) 'संहारपर्व जाणवलं की या अंतर्मनात विचारांची खळबळ माजते, अशा भावनांच्या विचारांच्या अनवट वाटा त्या चालत राहतात.

तरीही उषा मेहतांना जगण्यातील आनंद कळतो अन् त्यांचा आशावाद फुलतो. 'मनस्वी फुललेत गुलाब' त्यांना पाहता येतात. 'मुक्त करतो निसर्गानंद, खोट्यामोठ्या चिंतांमधून, काही काळापुरता तरी...' हे त्यांना ठाऊक आहे. 'खरोखरीचं संपून जाईपर्यंत जगत राहाणं, आनंद करीत' हे तत्त्वज्ञान त्यांनी समजून घेतलं आहे. डॉ. वावीकर म्हणतात, तो 'प्रयाणोत्सव' जणू त्यांनी भावावस्था म्हणून तनमनात रूजवला आहे. म्हणूनच त्या अजूनही कविता करतात; कविता जगतात; आनंद देतात इतरांनाही त्यांच्या लेखनातून. या संग्रहात आजवरच्या इतर अंकांमधे निपचित पडलेल्या कवितांना उषा मेहता यांनी स्वतःचा असा तजेलदार चेहरा दिलाय... काही प्रमाणात आकळतेही. मात्र काही कविता कवयित्री म्हणून असा चेहरा राखत नाहीत. 'चांदणचकवा' ही अशीच एक कविता. भाबडी अशी. प्रेमाचा हळवा सूर, सावळा कान्हा ही पारंपारिक प्रतिमा, 'कसा बाई' अशा शब्दांतून होणारा भक्तभाव... यातून खरं तर उषा मेहता ज्या आपल्या ओळखीच्या आहेत, लाडक्या आहेत, त्या हरवतात. 'ओंजळीत फुलं आहेत काही' ही कविता आरती प्रभूना स्मृतिवंदना करणारी. या तशा अपवादात्मक अशा कविता, पण इतर सगळ्याच कविता फार फार आस्वाद्य, आनंददायी, म्हणून परत परत भेटीलागी याव्यात, अशा आहेत. 'जगत राहावं आनंद करीत असे सांगणाऱ्या, अनघड वाटेवरून चालणार्‍या आहेत. आत्मरंग साजरा करणार्‍याही आहेत.

सृजनसंवाद प्रकाशनचे हे शंभरावे पुस्तक असून नेहमीप्रमाणे उत्तम छपाई, मांडणी व दर्जेदार निर्मितीचा ध्यास यातही अनुभवायला मिळतो. मिलिन्द मुळिकांनी साकारलेले तजेलदार मुखपृष्ठ व नीलेश बागवे यांचे रेखीव अक्षरसुलेखन संग्रहाची सौंदर्यदृष्टी वाढवणारे आहे.

  • ओळखीची अनोळखी अक्षरे

  • कवयित्री : उषा मेहता

  • प्रकाशक : सृजनसंवाद

  • पृष्ठे : ८८ • मूल्य : ₹ २५०

  • पुस्तकासाठी संपर्क : ९८२०२७२६४६

logo
marathi.freepressjournal.in