विचारभान
संध्या नरे-पवार
स्त्री चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३ सप्टेंबरला ठाणे शहरात महिला साहित्य संमेलन झाले. गोंड आदिवासी असलेल्या, गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या लेखणीने स्त्री शोषणाचे आणि स्त्री सामर्थ्याचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या उषाकिरण आत्राम या ह्या संमेलनाच्या उद्घाटक होत्या. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सजगता प्रखरपणे जाणवली.
आत्राम घराणं हे गोंड आदिवासींमधील राजघराणं. मोगलांबरोबर लढलेली राणी दुर्गावती ही गोंड आदिवासी. राणी हिराईसुद्धा अशीच पराक्रमी. कर्तबगार स्त्रियांचा वारसाच गोंड आदिवासींमध्ये आहे. प्रत्येक स्त्रीला माता मानून मायपूजा करणारा हा समाज. स्त्रीचं श्रेष्ठत्व मान्य करणारा समाज. मुलीच्या जन्माचं स्वागत करणारा हा समाज. मोगल, मराठे, ब्रिटिश या काळात या समाजाचं राज्य तुकड्या तुकड्याने हिरावलं गेलं. ब्रिटिशांसोबत लढताना सारंच संपलं. स्वातंत्र्योत्तर काळात शहरीकरणाने आदिवासी जमातींना वेढलं. पण तरी स्त्रियांचं श्रेष्ठत्व मानणाऱ्या या समाजाने आपला संघर्ष कायम ठेवला. यातल्याच काहींनी शिक्षणाच्या वाटेवर आपली पावलं ठेवली. लेखणी हातात घेतली आणि संघर्षाची परंपरा कायम ठेवली. ज्या निसर्गाच्या साथीसोबतीने जन्मलो, वाढलो त्यातून नेमकं काय घ्यायचं, हे आदिमातेशी नातं सांगणाऱ्या आदिवासी मनाला अचूक उमगतं. म्हणूनच उषाकिरण आत्राम यांना आपल्या समोर मुलींची छेडछाड होताना पाहून पळसाच्या लाल फुलांमधला अंगार दिसला आणि सहज शब्द उमटले,
“रातरानी होऊ नगं,
बाजाराले जाशील त्,
समद्या सुधारलेल्या बाप्यायच्या
डोयाले आग लागन,
म्हनून मणते,
रातरानी होऊ नगं,
व्हशील त् पयसाची
लाल लाल आग व्हय,
लाल लाल धदकती अंगार
न् थ्योच तुहा शिणगार...”
स्त्रीने रातराणी न होता लाल लाल धगधगता अंगार व्हावं असं सांगणाऱ्या उषाकिरण आत्राम या १४ सप्टेंबरला ठाण्यात झालेल्या महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. गोंडी, मराठी आणि हिंदी या भाषेतून कथासंग्रह, काव्यसंग्रह, एकांकिका, नाटक अशा १३ पुस्तकांचं लेखन, त्यातील काही पुस्तकांचा इंग्रजी, बंगाली, हिंदी या भाषेत अनुवाद, अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद, राज्य आणि राष्ट्र पातळीवरच्या साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग, वेगवेगळ्या संस्थांकडून, शासनाकडून पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली मान्यतेची मोहोर आणि या बरोबरीने एक स्त्रीवादी-पर्यावरणवादी कार्यकर्ती, ‘गोंडवाना दर्शन’ या मासिकाची संपादक..असा व्यापक पैस आहे उषाकिरण आत्राम यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा. म्हणूनच महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती चळवळीची पन्नाशी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीने वर्षभर जे विविध कार्यक्रम होत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ठाणेनगरीत महिला साहित्य संमेलन आयोजित केल्यावर त्याच्या उद्घाटक पदाचा बहुमान पहिली आदिवासी लेखिका असलेल्या उषाकिरण यांनाच मिळावा, हे उचितच होतं.
देशाला स्वातंत्र्य मिळून काही वर्षं होत असताना १९५४ मध्ये उषाकिरण आत्राम यांचा जन्म झाला. एक दीर्घ कालखंड आणि या काळात झालेले बदल त्यांच्या विचक्षण नजरेने टिपले आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना समाजाचं अंतरंग तपासणारी त्यांची शोधक नजर जाणवते. सत्तरच्या दशकापासूनच उषाकिरण स्त्रीप्रश्नांशी, स्त्री आंदोलनांशी जोडलेल्या होत्या. सीमा साखरे, इंदुताई लहाने या विदर्भातील स्त्रीवादी कायकर्त्यांमुळे आपली समकालीन स्त्रीप्रश्नांविषयीची जाण वाढली, असं त्या आवर्जून सांगतात. तरुणींवर होणारे बलात्कार, हुंड्यासाठी स्त्रियांचा होणारा छळ, नवऱ्याकडून होणारी मारहाण या गोष्टी सभोवतालच्या समाजात घडत होत्या, घडताना दिसत होत्या. त्याचवेळी लहानपणापासून वडिलांकडून, दहाजींकडून त्यांनी गोंडांच्या, गोंड स्त्रियांच्या पराक्रमाच्या कथा ऐकलेल्या होत्या. राणी दुर्गावती, राणी हिराई असा प्रेरक इतिहास ऐकतानाच वर्तमानात गोंड स्त्रियांची, मागास वर्गातल्या इतर स्त्रियांची रितीरिवाजांच्या नावाखाली कशी दुर्दशा केली जाते, हेही त्या ऐकत होत्या. मागास-वंचित समाजातल्या कोणाचं लग्न झालं की नवीन जोडप्याने आधी गावातल्या पाटलाचे किंवा जमीनदाराचे आशीर्वाद घ्यायला जायचं, अशी प्रथा होती. नवीन जोडपं आशीर्वादासाठी जमीनदाराकडे गेलं की, नवरीला ती रात्र जमीनदाराकडेच घालवावी लागे. नवरीचा पहिला उपभोग घेण्याचा मान जमीनदाराचा, सावकाराचा हा जणू अलिखित नियम होता. इथे पुरुषसत्ता-जातसत्ता आणि वर्गसत्ता एकत्रित येऊन शोषित-वंचित जातजमातीच्या स्त्रियांचं शोषण करत होत्या. या विरोधात आदिवासी स्त्रियांनी बंडही केलं होतं. शाळा-कॉलेजमध्ये असतानाच उषाकिरण लिहू लागल्या होत्या. आपल्या लिहित्या हाताच्या लेकीने या प्रथेविरुद्ध लिहावं, असं दहाजी सतत सांगत असत. शहरी समाजात असलेल्या हुंडा, बलात्कार यासारख्या प्रथा मुळातच सुसंस्कृत असलेल्या आदिवासी समाजात नव्हत्या. पण बाह्य समाजाने लादलेल्या अनिष्ट प्रथांना हा समाज बळी पडत होता. ही वेदना उषाकिरण यांच्या मनातही होतीच. तीच ‘अहेर’ या कथेच्या रूपाने व्यक्त झाली. जमीनदाराकडून स्त्रियांचं होणारं शोषण या कथेमधून तीव्रतेने व्यक्त झालं आहे. या कथेचं नाट्य रूपांतरही उषाकिरण यांनी केलं.
जे पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही, ऐकलेलं नाही, असं काही लिहून केवळ शब्दांचे फुलोरे उषाकिरण यांना फुलवायचे नव्हते. त्यांच्या शब्दांना त्यांच्या मातीचा गंध आहे. म्हणूनच भौगोलिक अंतराच्या, प्रमाण भाषेतील निकषांच्या पलीकडे जाऊन त्यांचं लेखन सगळ्यांना आपलेसं वाटतं. आपल्या लेखन प्रक्रियेविषयी उषाकिरण सांगतात, “माझ्या वडिलांना संगीताची, वाचनाची आवड होती. ते भजन म्हणत, इतरांनाही शिकवत. लहानपणापासून भजनं कानावर पडत होती. त्यामुळे शब्दांमधलं सौंदर्य, माधुर्य कळत गेलं. मला जे शब्द कळत नसत त्याचा अर्थ मी वडिलांना विचारत असे. वडिलांना वाचनाची आवड असल्याने ते पुस्तकं विकत घेऊन घरी आणत. त्यामुळे पुस्तकांची, शब्दांची दुनिया लहानपणापासून ओळखीची झाली. शिवाय आपल्या मुलांनी आणि मुलींनीही शिकावं, ही वडिलांची इच्छा होती. आम्हा आठ भावंडांमध्ये मी सहावी. माझ्या मोठ्या बहिणीला ६० च्या दशकामध्ये वडिलांनी चंद्रपूरला वसतिगृहामध्ये ठेवून शिकवलं. मीही माझं सातवीनंतरचं शिक्षण यवतमाळ, चंद्रपूर इथल्या वसतिगृहांमध्ये राहून पूर्ण केलं. माझी मोठी बहीण ही आमच्या समाजातील पहिली मॅट्रिक होणारी मुलगी आहे, तर आमच्या गोंड आदिवासी समाजातील एम.ए. होणारी पहिली स्त्री मी आहे. नंतर १९७७ पासून मी शासकीय नोकरी करू लागले. याच काळात माझा लेखन प्रवासही सुरू होता. आतल्या आत खदखदणाऱ्या सगळ्या भावना मी कागदावर उतरवत होते. माझी पहिली कथा ‘आक्रोश’ ही मी १९८४ साली लिहिली. त्याआधी बालवयापासून काव्यलेखन सुरूच होतं.”
सातत्याने लिहिणाऱ्या या लेखिकेला आजचा काळ कसा वाटतो? कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याच्या या काळात लेखकाची अभिव्यक्ती कुठे संकोचते आहे का? असे प्रश्न विचारल्यावर उषाकिरण आत्राम यांच्यातील लेखिका उसळते आणि लेखकाचा धर्म काय आहे, ते सांगते. गुळगुळीत लिहिण्यासाठी लेखक नसतो, तर सत्य सांगण्यासाठी लेखकाची लेखणी कसाला लागली पाहिजे, हे सांगताना त्या म्हणतात, “लेखकांनी अंग चोरलं तर ते गुन्हेगार ठरतील. लेखकाने लिहिलं तरच समाज विचार करील. म्हणूनच लेखकांनो अंग चोरू नका. जे समाजाला घातक ते ते लिहिणं हे लेखकाचं काम आहे. त्याने ते बिनधास्त लिहावं. मोकळ्या हाताने लिहावं. संविधानाने लिहिण्याबोलण्याचा हक्क दिला आहे. स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला आहे. असं लिहिलं तर डावे, तसं लिहिलं तर नक्षलवादी, असं नसतं. सत्य लिहिल्यावर शहरी नक्षलवादी म्हणायचं, हे बरोबर नाही.”
आपलं म्हणणं ठामपणे सांगत असतानाच शेवटी उषाकिरण आत्राम महत्त्वाचं वाक्य उच्चारतात. पळसाच्या फुलातील लाल लाल धग जपणारी ही लेखिका सांगते, “लिहित्या हातांना मोकळेपणाने लिहू द्या.”
राणी दुर्गावतीचा वारसा सांगणारी ही लेखिका कोणतीच दडपशाही जुमानायची नाही, हाच संदेश महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देते.
sandhyanarepawar@gmail.com