दखल
जगदीश काबरे
एखादा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम, प्रथा कशी सुरु होते, याचा मागोवा घेतला तर काही वेगळीच व्यावसायिक तथ्ये हाती लागतात. मार्गशीर्षातील नव्याने सुरु झालेले वैभवलक्ष्मीचे व्रत हाही असाच एक उपक्रम आहे. भोळ्या श्रद्धाळू मनाला त्यातून काही आधार लाभत असले तरी या व्रताला कोणता आधार आहे, हेही तपासून पाहायला हवे.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू होणारे महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मी व्रत आज अनेक ठिकाणी अत्यंत लोकप्रिय झाले असले तरी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, धार्मिक प्रामाणिकता, सामाजिक आवश्यकता आणि तर्कशुद्ध मूल्य यांचे तपशीलवार परीक्षण केले तर हे व्रत मुळात अलीकडच्या काळात निर्माण झालेला एक सामाजिक-धार्मिक ‘ट्रेंड’ असल्याचे स्पष्ट होते. आपल्या गावोगाव हे व्रत कसे पसरले, कोणत्या गरजेतून उदयास आले, याचा मागोवा घेतला तर त्यामध्ये अंधश्रद्धा, स्त्री-आधारित गृहलक्ष्मी संकल्पना, पुरोहितांचे आर्थिक स्वार्थ, बाजारपेठेची व्यापारी चढाओढ आणि आधुनिक स्त्रीच्या मानसशास्त्रातील आकांक्षा या सर्वांचा गुंता दिसून येतो. म्हणजेच धार्मिक परंपरा म्हणून जे काही सांगितले जाते ती वास्तवात बाजारपेठेने निर्माण केलेली सांस्कृतिक रचनाच असते. मार्गशीर्षातील पहिला गुरुवार म्हणजे ‘विशेष’ गुरुवार ही कल्पना जशा पहिल्या आंघोळीला विशेष महत्त्व दिले जाते तशाच प्रकारच्या प्रतीकात्मक संरचनेतून आली; पण त्यामागे कोणताही धार्मिक आधार नाही, कोणतेही शास्त्राधिष्ठित विधान नाही, आणि कोणताही सामाजिक तर्क नाही.
गेल्या वीस–पंचवीस वर्षांत हा मार्गशीर्षातील गुरुवार जणू काही ‘श्रावणमास’ बनला! म्हणून या महिन्यात ‘शाकाहार’ करण्याला अध्यात्मिक अर्थ देण्यात आला. महिलांच्या विशिष्ट धार्मिक भावनेला व्यावसायिक बाजारपेठेने आणि पुरोहितांनी एकत्र येऊन या व्रताला अफाट लोकप्रियता दिली. हा प्रवास अभ्यासल्यावर स्पष्ट दिसते की, एका नव्याने तयार करण्यात आलेल्या व्रताचा प्रसार हा धार्मिकतेपेक्षा सामाजिक मानसशास्त्र, उत्सवप्रियता, परंपरेचा दबाव, आणि ‘काहीतरी चांगलं घडेल’ या भाबड्या भावनेवर अधिक आधारलेला आहे.
श्रावण महिन्यात शाकाहार महत्त्वाचा का मानला जातो याबद्दल पुराणांत काही कथनं आढळतात. पण मार्गशीर्षात शाकाहार आवश्यक का, याचा कोणताही प्राचीन आधार नाही. तो आजही कोणी देऊ शकत नाही. या व्रतासाठी शोधून काढलेल्या पोथ्यांमध्ये केलेली स्पष्टीकरणं ही मूलत: वैज्ञानिकही नाहीत. त्या कथा म्हणजे ‘आवृत्ती २.०’ प्रमाणे कल्पित पद्धतीने तयार केलेले धार्मिक साहित्यच जास्त आहे. या व्रताचा सर्वात मोठा फोलपणा इथेच उघड होतो. महालक्ष्मी व्रत केल्यावर घरात वैभव, समृद्धी, पैसा, शांती आणि सौख्य येते, असा समज पसरवला गेलेला आहे. पण प्रत्यक्षात हजारो स्त्रियांनी केलेल्या या व्रतामुळे कोणाच्या घरची आर्थिक परिस्थिती बदलली, हे पाहण्यासाठी संशोधनाचे किमान प्राथमिक मोजमापही उपलब्ध नाही. आजूबाजूला पाहिले तर एकही असे उदाहरण आढळणार नाही की कुणी फक्त वैभवलक्ष्मी व्रत केल्यामुळे श्रीमंत झाले.
लोकांनी अंधश्रद्ध राहावे म्हणून तयार केलेल्या या व्रतात पुरोहितवर्गानेही आर्थिक संधी पाहिली आहे. बाजारपेठाही मागे राहिलेल्या नाहीत. दादर, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरांत महालक्ष्मी-पॅकेज तयार करून विकले जाते: पाच फळांचे प्लास्टिक पॅक, ज्यातील फळे प्रत्यक्ष खाण्यायोग्यही नसतात; ‘महालक्ष्मी’ नावाने छापलेल्या पोथ्या; व्रतविधीसाठी लागणारे विडे, खारीक खोबरे आणि सुकामेवा, फुले, धूप, उदबत्त्या, दिवे, हळद-कुंकू, आणि ‘समृद्धी येवो’ अशा लिखित शुभेच्छा-कार्डांचे संच यांची विक्री शिगेला पोहोचलेली असते. धार्मिक भावना विकणारी ही यंत्रणा बाजारपेठेला प्रोत्साहन देणारी आहे. लोकांना ‘आध्यात्मिक हमी’ विकताना पुरोहित आणि दुकानदार यांचे सरळ आर्थिक हितसंबंध दिसून येतात. म्हणजे धर्माच्या नावाखाली केले जाणारे हे व्यावसायिकरण म्हणायला हवे.
उपवास आणि पूजा म्हणजे स्त्रीचा धर्म, आणि पैसा मिळवणे आणि प्रगती म्हणजे पुरुषाचे क्षेत्र असा भेद अजूनही कित्येक घरांमध्ये टिकून आहे. त्यामुळे उपवासाचे व्रत हे स्त्रीच्या ‘कर्तव्याला’ गोंडस आध्यात्मिक स्वरूप देणारेच जास्त आहे. लोक स्वतःच्या जीवनात जे बदल करू शकत नाहीत ते अलौकिक हस्तक्षेपाने मिळतील अशी भाबडी आशा यामागे असते. आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी मेहनत, कौशल्य, वेळ आणि अथक प्रयत्न लागतात. पण या व्रताद्वारे ‘फक्त घरी पूजा केली की समृद्धी येईल’ हा दावा लोकांना सोपा आणि आकर्षक वाटतो. त्यामुळे व्रताचे आश्वासन लोकांवर ‘मानसिक डोपिंग’ सारखे कार्य करते. परंतु या मानसिक आधाराला ‘अंधश्रद्धा’ म्हणतात. कारण या व्रताच्या दाव्याला तर्क नाही. उलट या व्रतामुळे महिलांवर मानसिक आणि सामाजिक दडपण वाढते. प्रत्येक गुरुवारी उपवास नाही केला तर काहीतरी वाईट होईल, पूजा वेळेवर केली नाही तर काहीतरी आपले नुकसान होईल, पोथी नीट वाचली नाही तर व्रत निष्फळ होईल, अशी भीतीही सशाच्या काळजाचा स्त्रियांच्या मनात ठासून भरलेली असते. या भीतीची ताकदच इतकी प्रबळ की घरातल्या सुशिक्षित स्त्रियाही प्रश्न विचारत नाहीत. प्रगतीचे सर्व मार्ग — ज्ञान, कौशल्य, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान — हे सर्व प्रत्यक्ष प्रयत्नांवर आधारलेले आहेत. पण व्रतांचे आश्वासन ‘अदृश्य शक्तीं’वर आधारलेले. लोकांना प्रयत्नांपेक्षा चमत्काराचे स्वप्न दाखवणे सोपे आहे, हे पुरोहित वर्गाने ओळखलेले आहे.
मंदिरे आणि पुरोहितवर्ग या व्रताच्या लोकप्रियतेतून स्वतःची आर्थिक आणि सामाजिक सत्ता मजबूत करतात. धार्मिक विधींमध्ये स्त्रीचा सहभाग वाढवला गेला की त्या विधी अधिक स्थायी ठरतात. कारण स्त्रियांची भावनिक गुंतवणूक अधिक असते. त्यामुळे हे व्रत धार्मिक सत्तासंरचनेचा भाग बनते. यामुळे पितृसत्ताक मूल्ये पुन्हा पुन्हा मजबूत केली जातात. उदा. ‘स्त्रीने उपवास केला तर घराची समृद्धी टिकेल’, ‘स्त्रीने पूजा केली तर देव प्रसन्न होतील’, ‘स्त्रीने व्रत अर्धवट सोडले तर घरात संकट येईल’ इत्यादी कल्पना स्त्रियांवर मानसिक बंधने लादतात. व्रत मुळात धार्मिक नसून सामाजिक आणि व्यावसायिक आहे. मानवी इच्छाशक्ती आणि आशांचे हुशारीने व्यवस्थापन करणारा हा एक ‘सांस्कृतिक उद्योग’ आहे. माणूस सुखाची आकांक्षा करतो, चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहतो, धकाधकीच्या जीवनात मानसिक आधार शोधतो, हे स्वाभाविक आहे; पण त्या नावाखाली अंधश्रद्धा वाढवणे चुकीचे आहे.
हे व्रत ज्या आर्थिक समृद्धीचे आश्वासन देते त्या समृद्धीचा सर्वात खरा लाभ कोण घेतो तर, पोथ्या विकणारे विक्रेते, धार्मिक वस्तू विकणारे दुकानदार आणि व्रताचे उद्यापन करणारे पुरोहित. जे लोक व्रत करतात त्यांना मात्र फक्त मानसिक आधार, सांस्कृतिक धारणा आणि कळपात सुरक्षितता असल्याची भावना मिळते. आर्थिक गतीमध्ये मात्र काहीच वाढ होत नाही, किंबहुना पूजेसाठी पैसे खर्च केल्यामुळे खर्चात वाढच होते. याच कारणामुळे हे व्रत सांस्कृतिक उपभोगवाद ठरते.
वेगाने शहरीकरण होत असताना लोकांना स्वतःची सांस्कृतिक ओळख टिकवायची असते. त्यामुळे सोपी, सुलभ परंपरा लोकप्रिय होते. महालक्ष्मी व्रत हे अगदी याच प्रकारचे आहे. फक्त एक पोथी, थोडी फळे, थोडेसे भजन, आणि उपवास. यामुळे ‘चमत्कार’ घडेल असे जे सांगितले जाते तेच लोकांना हवे असते. परंतु मानवी जीवनात चमत्कार घडत नसतात. वास्तवात असतात ते त्रास, अडचणी, चुकीचे निर्णय आणि त्यांचे परिणाम. ते दूर करायचे असतील तर अथक परिश्रम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनच मदतीला येतो.
सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
jetjagdish@gmail.com