

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
ज्या गीताने ब्रिटिशांविरुद्धचा ‘चलेजाव’चा नारा बुलंद केला. मनामनात स्वातंत्र्यज्योत जागवली. या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात कुणी निडरपणे बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. कुणी हसत हसत फासावर गेले. ते राष्ट्रप्रेमाचे अंगारगीत अन् स्फूर्तिगीत म्हणजे तुमचे आमचे ‘वंदे मातरम्.’ या अजरामर राष्ट्रगीताला आता दीडशे वर्षे पूर्ण झाली असली तरी त्यावरून सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या विचारमंथनातून ते अधिकच झळाळून उठले, तर त्यात नवल नसावे.
प्रत्येक भारतीय मनाला उभारी देणारे ‘जनगणमन’ राष्ट्रगीत असो अथवा ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीत असो ती समस्त भारतीयांची ‘प्रेरणास्थाने’च नव्हे, तर ‘शक्तिस्थळे’ देखील बनली आहेत. ही स्फूर्तिगीते देशाविषयी, इथल्या राज्यांविषयी, इथल्या माणसांविषयी ममतेचे, समतेचे, सौहार्दाचे, सहिष्णुतेचे, बंधुभावाचे, सर्वधर्मसमभावाचे अन् सहजीवनाचे नाते दृढ करतात. ती भारताच्या राज्यघटनेला अभिप्रेत अशीच आहेत.
‘वंदे मातरम्’ हे स्फूर्तिगीत काही डोक्यात ठेवायची जागा नाही, तर ते हृदयसिंहासनावर विराजमान करण्याचा स्वाभिमान, आत्माअभिमान आणि आत्मगौरवसुद्धा आहे. हा गौरव आहे देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्य-अहिंसा, असहकाराचे अस्त्र परजणाऱ्या महात्मा गांधींचा. हा सन्मान आहे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अन् माणसाला माणूसपण दावणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. हा गुणगौरव आहे राष्ट्रभक्तीचा अंगार फुलवणाऱ्या गुरुवर्य महाकवी रवींद्रनाथ टागोर आणि महाकवी बंकीमचंद्र चटोपाध्याय यांच्या अनमोल विचारांचा. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मदनमोहन मालवीय, आचार्य जे बी कृपलानी यांच्या सामूहिक विचारमंथनातून ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय मानसन्मान देण्याचा निर्णय झाला. त्याचा देशवासीयांनी मनोमन स्वीकार केला.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचा जुलमी वरवंटा देशावर फिरत होता. त्यात शेतकरी, कष्टकरी, व्यापारी सारेच भरडले जात होते. त्याविरूद्ध जी ललकारी गुंजली, ती ‘वंदे मातरम्’ गीताची. या गीताला स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाहून प्रिय मानले. हे गीत राष्ट्रप्रेमाचे धगधगीत अंगारगीत बनले. ‘झोडा, फोडा आणि राज्य करा’ ही कूटनीती अंगीकारणाऱ्या ब्रिटिशांनाही या राष्ट्रगीताने अक्षरश: घाम फोडला. स्वातंत्र्य, स्वदेशी चळवळीच्या रेट्यापुढे अखेर ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. एवढे हत्तीचे बळ या राष्ट्रगीताने समस्त भारतीयांना दिले. या राष्ट्रगीतापुढे ब्रिटिशांची कपटनीती हरली आणि जिंकला तो समस्त भारतीयांना एकाच धाग्यात गुंफणारा ऐक्याचा, राष्ट्रप्रेमाचा विचार.
बऱ्याचदा ‘पुराणातली वांगी पुराणातच बरी’ असे जाणकार म्हणतात ते काही उगाच नाही. तसे अनुभव आपल्याला अधून मधून येत असतात. तथापि, ज्यांचा दृष्टिकोनच पूर्वग्रहदूषित असेल तर त्याला कोण काय करणार? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षें पूर्ण झाली आहेत. ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीतास जवळपास १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढ्या वर्षात आपण काय कमावले आणि आपण काय गमावले याचे सिंहावलोकन करीत पुढील दिशा ठरवण्याचा आजचा काळ आहे. आपले विचार संकुचित न होता ते कालपरत्वे अधिकाधिक प्रगल्भ होण्याची आजची वेळ आहे. या काळ-वेळाने आपल्याला बरेच बरे-वाईट अनुभव दिले आहेत. त्यातून शिकून साऱ्या देशवासीयांचे जगणे अधिक सुसह्य व्हायला हवे. आपल्या देशापुढे प्रश्न काही कमी नाहीत. त्यावर मात करण्याची विजिगीषूवृत्ती असायला हवी. तथापि, तीच नसल्याने विचार भरकटतात व पावले चुकीच्या दिशेने पडू लागतात याचे भान राज्यकर्त्यांनी राखणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यास दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती बळावते. सध्या देशाच्या राजकारणात हेच घडताना दिसत आहे.
स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनलेल्या ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारने मागील सोमवारी संसदेत चर्चा घडवून आणली. या चर्चेची सुरुवात अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिम लीग पुढे झुकून ‘वंदे मातरम्’चे तुकडे केले. त्यातून देशाच्या फाळणीची बिजे रोवली गेली. तेव्हापासून काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण आरंभले,’ असा घणाघात मोदी यांनी केला. या आरोपावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असून त्या स्वाभाविकच आहेत.
मुळात महाकवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवी लिहिली ती १८७५ मध्ये. या कवितेला पार्श्वभूमी होती बंगालमधील दुष्काळाची. त्यानंतर त्यांनी तब्बल सात वर्षांनी म्हणजे १८८२ मध्ये त्यांनी ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहिली. त्या कादंबरीत त्यांनी ‘वंदे मातरम’ गीतामध्ये आणखी चार कडवी जोडली. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये सर्वप्रथम गायिले. त्यानंतर हे गाणे जातपात, धर्मप्रांताच्या पलीकडे जाऊन ब्रिटिशांविरुद्धचे युद्धगान बनले. या गीतावर स्वातंत्र्यलढ्यातील मान्यवर सेनानींनी विचारमंथन केले.
‘वंदे मातरम्’च्या पहिल्या दोन कडव्यांवर काँग्रेसच्या बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब झाले. लोकसभेत हा घटनाक्रम उलगडला काँग्रेसच्या युवा नेत्या प्रियंका गांधी यांनी. इतिहासातील सोयीची पाने निवडत, अपुऱ्या आणि तथ्यहीन माहितीच्या आधारे मोदींनी ज्या मुद्द्यांना बगल दिली, त्यावरच प्रियांका गांधी यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात ‘वंदे मातरम्’वरून वेळोवेळी झालेला पत्रव्यवहार क्रमाक्रमाने उलगडून सांगितला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजीच्या संविधान समितीच्या बैठकीत ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले. त्या बैठकीला डाॅ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच श्यामाप्रसाद मुखर्जी हेसुद्धा होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पश्चिम बंगालची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ‘वंदे मातरम्’चा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
‘देशापुढे सध्या वायू प्रदूषण, दूषित पाणी, बेरोजगारी यासारखे ज्वलंत प्रश्न आवासून उभे आहेत. देशातील जमिनीचा पोत बिघडला आहे. शिक्षण, तंत्रज्ञान यावर पुरेसा निधी खर्च होत नाही. ‘मनरेगा’सारख्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासत आहे. आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत खूपच मागे पडला आहे. धर्म म्हणजे वर्तन. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्याकाळी प्रजेत भेदाभेद न करता तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राजधर्माचे पालन करण्यास सांगितले होते,’ याकडे तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रॅण्ड खासदार महुआ मोइत्रा यांनी सभागृहाचे लक्ष वेधत मोदींचे म्हणणे खोडून काढले. आगामी निवडणुकीत दहा कोटी बंगाली तुम्हाला ‘वंदे मातरम्’चे धडे देतील हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.
ज्यांनी कधी राष्ट्रगीत गायिले नाही, तिरंगा फडकवला नाही, तीच मंडळी आता ‘वंदे मातरम्’चे गुणगान करत आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून जेव्हा ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला गेला, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे होता? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भागच घेतला नाही त्यांना ‘वंदे मातरम्’चे महत्व कसे काय कळणार असा प्रश्न समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांनी दिलेल्या अपूर्व योगदानाची ‘एआयएमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आठवण करून दिली. ‘आप’च्या संजय सिंग यांनी मोदी यांच्या भाषणातील मुद्दे खोडून काढले. संसदेत ‘वंदे मातरम्’वरून भाजपविरुद्ध काँग्रेस व इतर पक्ष अशी उभी फूट दिसून आली. यातून काय साधले गेले, हा एक प्रश्नच आहे.
खरे तर, देशालगच्या शत्रू राष्ट्रांनी डोके वर काढले आहे. जगात युद्धखोरी वाढली आहे. आपला देश आजही दारिद्र्य, कुपोषणासारख्या समस्यांमध्ये खितपत पडलेला आहे. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन यात आपला देश खूप मागे आहे. या देशाला सर्वधर्मसमभावाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या, एकात्मता व अखंडतेच्या समान धाग्यात गुंफून ठेवणाऱ्या राष्ट्रीय गीतावरून देशात मतभेद, मनभेदांची दरी वाढत जाऊन त्याची जागा विद्वेषाने घेतली आहे. यासंदर्भात संयमाने, समंजसपणाने, आत्मीयतेने आणि गांभीर्याने जेव्हा आत्मचिंतन होईल, तेव्हाच राष्ट्रीय गीतामागच्या भावभावनांची थोरवी कळेल.
prakashrsawant@gmail.com