महिमा वसंत पंचमीचा...

वसंत पंचमी हा दिवस फक्त ऋतू बदलाचं प्रतीक नाही, तर निसर्ग, ज्ञान आणि स्त्रीशक्ती यांच्या पूजेसाठी साजरा होणारा उत्सव आहे; तो आपल्याला निसर्गाशी, संस्कृतीशी आणि सर्जनशीलतेशी जोडतो.
महिमा वसंत पंचमीचा...
Published on

विशेष

श्रीराम शिधये

वसंत पंचमी हा दिवस फक्त ऋतू बदलाचं प्रतीक नाही, तर निसर्ग, ज्ञान आणि स्त्रीशक्ती यांच्या पूजेसाठी साजरा होणारा उत्सव आहे; तो आपल्याला निसर्गाशी, संस्कृतीशी आणि सर्जनशीलतेशी जोडतो.

आज रथसप्तमी. परवाच, म्हणजे २३ तारखेला वसंत पंचमी झाली. सध्या सुरू असलेल्या शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळ होत आहे. हवेत मात्र अजूनही गारवा आहे. काही ठिकाणी दिवसा हवा गरम असली, तरी सूर्य मावळताच हवा पालटायला लागते. ती हळूहळू थंड होऊ लागते आणि उत्तर रात्री तर हवेतला गारठा चांगलाच वाढतो. तो आपल्या घरात येऊ नये, म्हणून सारी माणसं दारं आणि खिडक्या बंद करून त्यावर जाड कापडांचे पडदेही सोडतात. सूर्य मावळून अंधाराचे कण आसमंत व्यापून टाकायला लागतात. घराच्या दारं आणि खिडक्यांवर सोडलेल्या पडद्यांच्या फुगीर घोळांमध्ये ते आस्तेआस्ते शिरू लागतात. त्या अंधारकणांसोबतच थंड हवेचे कणही त्या पडद्यांच्या फुगीर भागांत शिरतात. तिथून हळूच घरात घुसतात. घर थंड करून टाकतात. मग माणसं चहा आणि कॉफीच्या प्याल्यांमधल्या गरम पेयातली उब शोधतात. चॉकलेट किंवा खजूर खातात. प्रत्येकजण उबेच्या शोधात राहतो. उबदार कपड्यांचा आसरा घेतो. ज्यांच्या घरात सारंच काही बेताचं असतं, अशांची मात्र पंचाईत होते. थंडी त्यांना सळो की पळो करून टाकते. सारा आसमंतच गारठून जातो. थंडीचं राज्य अशी ऐट मिरवत असतानाच वसंत पंचमी येते. थंडीचा कडाका कमी व्हायला लागतो. शिशिराची पानगळ मंदावते. गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या उघड्याबोडक्या आकारांत दडून राहिलेलं सौंदर्य दिसायला लागतं. एरवी हिरव्याकंच पानांनी ती सुंदरता झाकलेली असते. पण आता सुंदरतेचा तो ठेवा निसर्ग मोकळ्या हातानं उधळत राहतो... वसंत पंचमीनंतर याच झाडांच्या फांद्यांवर नवीन पालवीच्या अस्फुट खुणा दिसायला लागताते. वसंत ऋतूच्या आगमनाची द्वाहीच जणू त्या फिरवत असतात. आंब्याच्या झाडांच्या फांद्या मोहोर धारण करण्यासाठी तय्यार व्हायला लागतात. कोकिळच्या मनात दडून बसलेलं गाणं वरवर यायला लागतं. आता मोकळ्या गळ्यानं तो गाणार असतो आणि दोन महिने आपल्या स्वरांनी सार्‍यांची मनं आनंदानं पुलकित करणार असतो.

वसंत पंचमी होऊन गेल्यानंतर निसर्गात होणार्‍या या सार्‍या बदलांच्या अस्फुट खुणा सगळीकडं दिसायला लागतात. काहीजणांना होळीचेही वेध लागतात. होलिकोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला या जाणिवेबरोबरच आता उष्ण हवेचा ताप आणि काचही सहन करावा लागणार आहे, या कल्पनेनं अनेकजण अस्वस्थही होतात. शेतात पिकलेल्या नवीन धान्याच्या लोंब्या घरी आणून वसंत पंचमी साजरी करतानाच शेतकर्‍यांच्या नजरेसमोर पावसाळा आणि त्यावेळी आपल्या शेतात करायची उस्तवार दिसायला लागते. वसंत पंचमीच्या निमित्तानं अशा किती तरी गोष्टी अगदी सहजपणं घडायला लागतात. एक ऋतू संपून दुसरा सुरू होणार आहे याची जाणीव, माणूस ज्या निसर्गाचाच एक भाग आहे, तोच त्याला करून द्यायला लागतो. ती जाणीव मनावर बिंबावी आणि आता आपल्या रोजच्या दिनक्रमातही हळूहळू बदल करायला हवेत, चैतन्यशील वसंताचं स्वागत करूया हे हळुवारपणं सांगण्यासाठीच वसंत पंचमीचा दिवस देशाच्या सार्‍या भागात उत्साहात साजरा केला जातो. माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून वसंतोत्सवाला सुरुवात होते, म्हणून या दिवसाला वसंत पंचमी असं म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये वसंत पंचमीचा सण रोममध्ये पाळला जात होता, असं मानण्यास सबळ कारण आहे, असं ऋग्वेदी यांनी आपल्या 'आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या ग्रंथात नमूद केलं आहे. लोचनसिंग बक्षी यांच्या मतानुसार बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तींनी या उत्सवाचा स्वीकार केला, असं दिसतं.

भारताच्या उत्तर भागामध्ये वसंत पंचमी जोरदारपणं साजरी केली जाते. मथुरा येथील बाके बिहारी मंदिरातील ४० दिवसीय होलिकोत्सवाचा प्रारंभ वसंत पंचमीपासून होतो. तिथं प्रेमभावनेचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सारी माणसं गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. राधा-कृष्ण, मदन-रति यांच्या प्रेमाची गाणी म्हणतात. मथुरेप्रमाणंच वृंदावन, राजस्थान येथेही वसंत पंचमीचा विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शंकर आणि सूर्य यांची मनोभावे प्रार्थना केली जाते. पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी सारी माणसं पिवळी वस्त्रं परिधान करतात आणि देवी सरस्वतीची पूजा करतात. सरस्वतीच्या पायाशी पुस्तकं आणि लेखणी ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काहीजण उपासही करतात. याच दिवशी लहान मुला-मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते. पाटीवर मुळाक्षरं काढून ती पाटी मुलांना देऊन त्यांना मुळाक्षरं शिकवण्यास सुरुवात केली जाते. दक्षिण भारतात वसंत पंचमीच्या सणाला 'श्री पंचमी' असं म्हणतात. श्री हे लक्ष्मीचंच एक नाव आहे. त्यामुळं एका अर्थानं हा देवी लक्ष्मीचाच उत्सव होतो. शंकराला मनानं वरलेल्या पार्वतीनं तपश्चर्येमध्ये बुडालेल्या शंकराच्या तपाचा भंग करण्यासाठी कामदेवाला पाठविलं होतं, ते वसंत पंचमीच्याच दिवशी! या सार्‍या कथा पाहिल्या की लक्षात येतं की वसंत पंचमी हा सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या तीन देवींचा उत्सव आहे. एका अर्थानं हा दिवस स्त्री-शक्तीच्या पूजनाचा दिवस आहे. आणि म्हणून तो फार महत्त्वाचाही आहे.

शीख धर्मियांतही वसंत ऋतूची सुरुवात म्हणून वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. एक सामाजिक उत्सव म्हणून गुरुद्वारात या दिवशी समारंभ आयोजित करण्याची पद्धत महाराजा रणजितसिंग यांनी सुरू केली. वसंत पंचमीच्या उत्सवाचाच एक भाग म्हणून पतंग उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. रणजितसिंग यांच्या काळात या दिवशी त्यांच्या दरबारामध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जात असे आणि या दिवशी रणजितसिंग यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख घालत असत.

या दिवशी करावयाचे धार्मिक विधी फारसे नाहीत. निसर्गातील बदलाचं स्वागत करण्यासाठी आणि दाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या वसंताच्या आगमनाची द्वाही फिरवण्यासाठीच हा दिवस भारतभर आणि इतरत्रसुद्धा वेगवेगळ्या प्रकारानं साजरा केला जातो. आताच्या काळात माणूस आणि निसर्ग यांच्यातील गहिरं नातं अवघ्या जनांच्या मनावर बिंबावं, त्यांनी आपण ज्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत त्या निसर्गाचं, आपल्या भोवतालच्या वृक्ष आणि वेलींचं, पक्षी आणि प्राणीसृष्टींचं रक्षण करावंच पण हवा आणि पाणी प्रदूषित होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी, हे जनमानसावर ठसविण्यासाठीच हा दिवस साजरा करायला हवा. या दिवसाच्या निमित्तानं 'आपला सखा असलेल्या निसर्गाला जपूया', असं प्रत्येकानं ठरवणं आणि होळी पौर्णिमेपर्यंत ते साऱ्यांना सतत सांगत राहणं गरजेचं आहे.

ज्येष्ठ पत्रकार, लेखक

shriramshidhaye@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in