
विचारभान
संध्या नरे-पवार
१० जूनला वटपौर्णिमा आहे. यमाकडून नवऱ्याचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीच्या धैर्याचं, ज्ञानाचं कौतूक करत या पुराणकथेचा नव्याने अन्वयार्थ लावून बुद्धिवादाची निवड करायची का केवळ वडाला फेऱ्या घालून या दिवसाचं सेलिब्रेशन करायचं?
भरजरी शालूमध्ये सजलेल्या, अंगभर सोन्याचे दागिने घालून मढलेल्या स्त्रिया हातात पूजेचं ताट घेऊन वर्षानुवर्षं वडाला फेऱ्या घालत आहेत. नेमकी किती वर्षं? हे माहीत नाही. पण पिढ्यान् पिढ्या हा उपक्रम सुरू आहे. जन्मोजन्मी हाच पती हवा, हे मागणं मागत स्त्रियांच्या वडाभोवतीच्या फेऱ्या एकविसाव्या शतकातल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कालखंडातही थांबलेल्या नाहीत. उलट त्याला एआयचा टच लाभला आहे. त्याचे रिल्स बनत आहेत. वटपौर्णिमेच्या आधीचे आणि नंतरचे चार दिवस वेगवेगळ्या वाहिन्यांवरील मालिकांमध्ये कथानक कोणतंही सुरू असू दे, प्रमुख स्त्री व्यक्तिरेखांची वटपौर्णिमा दणक्यात साजरी होतेय. कथानकाला वटपौर्णिमेच्या निर्जळी उपवासाचा ट्विस्ट दिला जातोय. तिच्या या अशा कठोर व्रतामुळे नायिकेला एक सात्त्विक ताकद लाभतेय, तिचं पुण्य वाढतंय आणि तिच्या या पुण्यामुळेच नायकाच्या जीवावरचं संकट टळतंय, असंही दाखवलं जातं.
हे केवळ मालिकांच्या आभासी जगापुरतं मर्यादित राहत नाही. मालिका, चित्रपट, गाणी यामधून सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडत असते. त्यातून विशिष्ट मूल्य समाजमनात रुजवली जातात. जे पूर्वी पुराणकथांच्या माध्यमातून होत होतं, ते आता सिनेमा-मालिका यांच्या माध्यमातून घडत आहे. प्रत्यक्ष वास्तवात उच्चशिक्षित, द्विपदवीधर मुलगीही लग्नालाच सर्वस्व मानत वडाभोवती फेरे घालताना दिसत आहे. तिच्या डॉक्टर, इंजिनिअर असलेल्या नवरा नामक जोडीदारालाही यात काहीही खटकत नाही. किंबहुना याला ‘प्रथा-परंपरा’ पाळण्याचं, ‘संस्कृती जपण्याचं’ मूल्य दिलं जातं आणि हे सगळं श्रद्धेने पार पाडलं जातं. विवेक, तर्क, विज्ञान यांना सोडचिठ्ठी देत.
पावित्र्याचं वलय चढवल्याशिवाय कोणतीच श्रद्धा-अंधश्रद्धा समाजात टिकून राहत नाही. एखादी प्रथा-परंपरा समाजात शतकानुशतकं पाळली जाते, आचरणात आणली जाते, ती तिच्याभोवतीच्या अद्भुततेमुळेच.
पितृवंशक, पुरुषसत्ताक समाजात स्त्रिया केवळ सती जात नाहीत, तर सती गेलेल्या स्त्रियांची पतिव्रता म्हणून मंदिरं उभारली जातात. पावित्र्याचं, अद्भुततेचं वलय त्यांच्याभोवती निर्माण केलं जातं. सतीसारखी प्रथा बंद करताना शासन-प्रशासनाला समाजातील काही लोकांचा तरी रोष सहन करावा लागला तो या प्रथेभोवती असलेल्या अद्भुततेच्या, पावित्र्याच्या वलयामुळेच. सती जाणारी स्त्री पवित्र असते, महान असते, अद्भुत असते या वलयामुळेच आधुनिक काळ येईपर्यंत या प्रथेला समाजमनाने विरोध केला नाही. या अद्भुततेच्या वलयामुळेच अनेकजणी स्वखुशीने सती गेल्या, त्यातच त्यांनी आपल्या आयुष्याचं सार्थक मानलं; तर अनेकजणी मनाविरुद्ध, पण लोकलाजेस्तव या प्रथेला शरण गेल्या. ज्यांनी असं शरण जाणं नाकारलं, ज्यांनी चितेतून बाहेर येण्यासाठी उड्या मारल्या त्यांना काठ्यांनी ढोसून पुन्हा जळत्या चितेत आत ढकलण्यात आलं. एखाद्या मनुष्यदेहाला जिवंत जाळणं समाजाने सहज स्वीकारलं ते त्या प्रथेभोवतीच्या पावित्र्याच्या, महानतेच्या वलयामुळेच.
एखादी व्यवस्था समाजात रुजवण्यासाठी त्या व्यवस्थेला पोषक अशा प्रथा-परंपरा समाजात निर्माण केल्या जातात आणि या प्रथा-परंपरांभोवती महानतेचं, पावित्र्याचं, अद्भुततेचं वलय निर्माण केलं जातं. ब्राह्मणाला ‘भूदेव’ केल्याशिवाय चातुर्वर्ण्य व्यवस्था समाजात शतकानुशतकं टिकून राहिली नसती, इतर तीन वर्णांनी ती स्वीकारली नसती. पितृवंशक पुरुषसत्ताक व्यवस्था समाजात रुजायची, टिकायची असेल तर पुरुषांचं अधिपत्य स्त्रियांनी स्वीकारायला हवं, पुरुष वारसा कायम राहायचा असेल, पुरुषाची संपत्ती त्याच्या बीजाच्या वारसालाच मिळायची असेल, तर स्त्रियांनी एका पुरुषाची ‘मालकी’ स्वीकारायला हवी. स्त्रियांनी हे स्वखुशीने करायचं तर या ‘मालकी’भोवती पवित्रतेचं, महानतेचं वलय निर्माण करायला हवं. यासाठी आधी विवाहाला पावित्र्य देण्यात आलं. ती ‘जन्मगाठ’ मानण्यात आली. विवाहित स्त्री इतर उर्वरित स्त्रियांमध्ये म्हणजेच अविवाहिता, परित्यक्ता, घटस्फोटिता, विधवा या स्त्रियांमध्ये अधिक श्रेष्ठ मानली गेली. तिचं हे श्रेष्ठत्व ‘सौभाग्यवती’ या पदवीने आणि सौभाग्यलंकारांनी वलयांकित करण्यात आलं, त्याला पावित्र्य देण्यात आलं. यातून विवाहिता ही ‘शुभ’ ठरली, तर विधवा, परित्यक्ता या ‘अशुभ’ ठरल्या. एकदा विवाहिता सौभाग्यवती ठरली की, तिचं हे ‘सौभाग्य’ सोन्यासारखं बावनकशी, निखळ असायला हवं, ही अटही पुढे आलीच. ‘पतिव्रता’ ही संकल्पना निर्माण करून ही अट काटेकोर करण्यात आली. पातिव्रत्याभोवती पवित्रतेचं, अद्भुततेचं वलय निर्माण करण्यात आलं. पतिव्रता स्त्री महान मानण्यात आली. त्याचवेळी पातिव्रत्याच्या कसोट्या अधिकाधिक कठोर करण्यात आल्या. कुठे दुसऱ्या पुरुषाचा विचार मनात आला म्हणून पतीने पुत्राकरवी आईचं शिर धडावेगळं करण्याची शिक्षा सुनावली, तर कुठे अग्निपरीक्षा घेण्यात आली. पातिव्रत्याच्या कसोट्या जितक्या अधिक कठीण, तितकं पातिव्रत्य अधिक पवित्र ठरत गेलं. पातिव्रत्य अधिकाधिक पवित्र करायचं तर ते एका जन्मापुरतं मर्यादित राहून चालत नाही. ते ‘जन्मोजन्मी’चं हवं. मग सत्यवान-सावित्रीची पुराणकथा आदर्श ठरवण्यात आली आणि वडाला फेऱ्या घालून ‘सात जन्म हाच पती हवा’चं मागणं सुरू झालं. पातिव्रत्य या मूल्याच्या पायावर संपूर्ण पितृवंशक पुरुषसत्ताक समाजरचना शतकानुशतकं आपला प्रवास विनासायास करत आहे.
या प्रवासाला प्रश्न विचारायला सुरुवात झाली ती एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात. विवेक, तर्क, समता या आधुनिक मूल्यांशी सर्वसामान्यांचा परिचय होऊ लागल्यावर. १८८२ मध्ये म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘स्त्रीपुरुषतुलना’ हा ग्रंथ लिहिणाऱ्या, भारतीय स्त्रीवादी विचारवंत ताराबाई शिंदे ‘सावित्रीने जसे यमाकडून वर मिळवून सत्यवानाचे प्राण परत आणले तसे कुठच्या पुरुषाने आपल्या पत्नीचे प्राण परत आणल्याचा दाखला आहे का?’ असा प्रश्न विचारतात. पत्नी मेल्यास पुरुष बाराव्या दिवशी दुसरे लग्न करून मोकळे होतात, याउलट पती मेल्यास त्या पत्नीचे केस कापून, तिला काळोख्या खोलीत कोंडून तिची दशा दशा केली जाते, असा सणसणीत टोलाही ताराबाई लगावतात. स्त्रीला दुसऱ्या लग्नाचा अधिकार का नाही? हा प्रश्न ताराबाई त्या काळात विचारतात, तर त्यांच्यानंतर काही काळाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात डॉक्टर रखमाबाई सावे बालपणी झालेला विवाह आपल्याला मान्य नाही, असं सांगत नवऱ्याच्या घरी नांदायला जायला नकार देतात. नांदायला जायच्या न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून न्यायालयाने शिक्षा सुनावताच त्या तुरुंगात जायला तयार होतात, पण मान्य नसलेल्या लग्नात नांदायला जाणार नाही, असे ठामपणे सांगतात.
भारतीय समाजातच ताराबाई, रखमाबाई यांच्यासारख्या विचारी स्त्रिया झाल्या ज्यांनी वडाभोवतीचे फेरे उलटे करत स्त्री-पुरुषांच्या नात्यामध्ये प्रेम-आदर-विश्वास या मूल्यांचा पाया हवा, केवळ पवित्रतेचा आणि पातिव्रत्याचा इमला नको, असे सांगितले. दोन मानवी जीवांनी एकत्र येणं, त्यातून प्रजोत्पादन करत वंशसातत्य कायम राखणं या जैविक प्रक्रियेला सामाजिक प्रक्रियेत बांधताना विवाह हा विधी निर्माण झाला. जगभर विवाहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक सामाजिक विधी असलेल्या विवाहाला पुरुषसत्ताक समाजरचना खोलवर रुजताना अधिकाधिक पावित्र्य देण्यात आलं. मूळ विवाह रचनांमध्ये काडीमोड सहजसोपा होता. आदिवासी समाजांमध्ये आजही तो आहे. पण जसजसा विवाहविधी पवित्र होत गेला, तसतशी लग्नगाठ ही साताजन्माचं बंधन ठरली. त्यातून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, ही मागणी करणारं व्रत जन्माला आलं. वडाभोवतीची गर्दी वाढू लागली. आहे त्या जन्मात आपलं जगणं समतावादी आहे का? मानवी जन्माची प्रतिष्ठा राखणारं आहे का? ते जर तसं नसेल तर आहे त्या जन्मात ती समता, ती प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा वापर करणार का नाही? हा प्रश्न स्वत:ला उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या प्रत्येकीने विचारायला हवा.
बुद्धीचा वापर करतच स्त्रीजीवनावर लादलेल्या पुराणकथांना प्रश्न विचारायला हवे. सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले ते कसे आणले? कोणतंही व्रत करून किंवा उपवास करून नाही, तर यमाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊन. सावित्री-सत्यवानाच्या कथेनुसार सावित्री ही राजकन्या आहे. पण राजघराण्यातील संपन्न, सुखी आयुष्य नाकारून ती बहिष्कृत राजपुत्र असलेल्या गरीब कुटुंबातल्या ज्ञानी सत्यवानाची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करते. म्हणजेच ती ऐश्वर्याच्या मागे न जाता ज्ञानाची निवड करते. जोडीदार निवडीचा आपला अधिकार बजावते. सत्यवानाच्या मृत्यूनंतर न घाबरता यमाच्या मागे जात राहते. थोडक्यात आल्या प्रसंगाला धीराने तोंड देते. यमाने विचारलेल्या प्रश्नांना योग्य ती उत्तरं देते म्हणजे पुन्हा बुद्धीचा वापर करते. ही कथा जोडीदारावरचं प्रेम आणि बुद्धिवादी जगणं हे दोन आदर्श पुढे करते. या बुद्धीवादी जगण्यात वडाच्या झाडाला फेऱ्या घालणं, येत नाही. जोडीदारावरच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या घातल्या जातात, असाही युक्तिवाद याबाबत करण्यात येतो. पण जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण अधिक समतावादी, विज्ञानवादी प्रतीकाची निवड करू शकतो. शिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या घालायच्याच असतील तर त्या पती-पत्नी दोघांनी मिळून घालाव्यात, एवढी अपेक्षा तर करू शकतोच.
कारण विचार बाजूला ठेवून आचरणात आणलेल्या प्रथा इतर दुष्परिणाम घडवत असतात. आज महाराष्ट्रात प्रमोद झिंझाडेंसारखे कार्यकर्ते विधवा स्त्रियांच्या संदर्भात पतीच्या मृत्यूनंतर बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे यासारख्या ज्या अनिष्ट प्रथा आचरणात आणल्या जातात त्याविरोधात काम करत आहेत. पण जोवर ‘सौभाग्यवती’ मानल्या जाणाऱ्या विवाहित स्त्रीभोवती पावित्र्याचं वलय कायम आहे, तोवर विधवा स्त्रीची ‘अपवित्र’, ‘अशुभ’ म्हणून गणना होणारच.
शिवाय या वडपूजनात खरेखुरे जोडीदारावरच्या प्रेमाचे निर्मळ भाव किती आणि भरजरी साड्या नेसून, दागिने घालून केलेलं एका दिवसाचं ‘सेलिब्रेशन’ किती, याचा प्रत्येकीने विचार करायला हवा. मात्र त्यासाठी आधी बुद्धीची कवाडं उघडायला हवीत आणि आपल्या कृतीचा नेमका अर्थ काय होतो आणि त्याचे पडसाद काय उमटतात, याचा विचार करायला हवा. १८८२ साली ताराबाई शिंदे काय प्रश्न विचारत होत्या, हे २०२५ साली तरी समजून घ्यायला हवं.
sandhyanarepawar@gmail.com