
पाऊलखुणा
महाराष्ट्राच्या मातीत, कधी पाराजवळ तर कधी शेतावर, इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले ‘वीरगळ’ आढळतात. शेंदूर फासून पूजल्या जाणाऱ्या या कोरीव शिळा म्हणजे युद्धात वीरगती मिळालेल्या शूर योद्ध्यांची स्मारके! वीराचा पराक्रम, देवलोकाकडे प्रवास आणि स्वर्गातील स्थान कोरलेले हे वीरगळ अपरिचित योद्ध्याचा इतिहास उलगडतात.
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये, कधी पाराखाली, कधी देवळाजवळ, तर कधी शेताच्या बांधावर आपल्याला काही कोरीव शिळा पाहायला मिळतात. काही ठिकाणी त्या भग्नावस्थेत पडलेल्या असतात, तर काही ठिकाणी शेंदूर फासून त्यांची पूजा केलेली असते. या कोरीव दगडांनाच ‘वीरगळ’ असे म्हटले जाते. काळाच्या ओघात हरवलेला, लोप पावलेला इतिहास उलगडण्यास हे ‘वीरगळ’ खूप मदत करू शकतात. पण तो इतिहास उलगडण्यापूर्वी, आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की, वीरगळ म्हणजे काय? ते कुठे असतात? ते कसे ओळखायचे आणि त्यांच्या मदतीने हा हरवलेला इतिहास नेमका कसा उलगडला जाऊ शकतो?
जगभरात एक परंपरा आहे, जेव्हा एखादा शूर योद्धा युद्धात धारातीर्थी पडतो, तेव्हा त्याचे शौर्य आणि बलिदान स्मरणात ठेवण्यासाठी स्मारके उभारली जातात. प्राचीन भारतातही अशीच पद्धत होती. या शूरवीरांच्या स्मरणार्थ ज्या स्मारकशिळा बसवल्या जात होत्या, त्यांनाच ‘वीरगळ’ म्हणतात. या वीरगळांवर त्या वीराची संपूर्ण गाथा कोरलेली असते. यामध्ये तीन भाग महत्त्वाचे असतात :
वीराचा पराक्रम : मृत झालेल्या योद्ध्याने युद्धात गाजवलेल्या पराक्रमाचे शिल्पपट यात कोरलेले असतात.
देवलोकीचा प्रवास : या शिल्पपटावर, वीरगती प्राप्त झालेल्या त्या योद्ध्याचा अप्सरांसोबतचा देवलोकाकडील प्रवास शिल्पबद्ध केलेला दिसतो.
देवलोकातील स्थान : शिलाखंडावरील सर्वात वरच्या भागातील शिल्पपटावर त्या वीराला देवलोकात मिळालेले स्थान किंवा त्याचे वास्तव्य दाखवलेले असते.
भारतामध्ये आढळणाऱ्या हजारो वीरगळांचे हे मूळ स्वरूप आहे. अर्थात, ठिकाण आणि काळानुसार या वीरगळांच्या रचनेत थोडाफार बदल किंवा फरक दिसून येतो. पण त्यांचा मूळ गाभा मात्र वीर योद्ध्याच्या अमर बलिदानाचा गौरव करणाराच असतो. वीरगळ एखाद्या शिलालेखाप्रमाणेच इतिहासात घडलेल्या घटनेची अगदी संक्षिप्त पण महत्त्वपूर्ण माहिती देणारे प्राथमिक दर्जाचे अस्सल साधन ठरते. वीरगळ उभारण्याची परंपरा जगभरात आढळते. विशेषतः भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही परंपरा मोठ्या प्रमाणावर टिकून राहिलेली दिसते.
थोर पुरुषांच्या स्मारकशिळा तयार करणे आणि त्यांची पूजा करणे ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू असून, ती जगभर आढळते. भारतात अश्मयुगीन काळापासून वीरगळ म्हणजेच स्मारकशिळा तयार करण्याची प्रथा प्रचलित होती. इ.स.च्या तिसऱ्या शतकानंतर या परंपरेला विशेष चालना मिळाली, असे मत दक्षिण भारतातील विद्वान के. राजन यांनी मांडले आहे. हळूहळू ही पद्धत सर्वत्र पसरली आणि लिखित साधनांच्या अभावी दगडी शिळांद्वारे इतिहासाची नोंद करण्याची पद्धत रुजली.
वीरगळास वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळे शब्द आहेत. इंग्रजीत यास Hero-Stone तसेच A-Stone-Image असे म्हटले जाते. म्हणून हा ‘वीराचा दगड’ असतो. म्हणूनच याला ‘वीरकल्लू’ असेही म्हणतात. यापैकी ‘वीर’ हा संस्कृत शब्द असून ‘कल्लू’ हा शब्द कानडी आहे. शूरवीराची, योद्ध्याची, मोठ्या माणसांची मरणोत्तर दशा असाही याचा अर्थ आहे. ‘वीरकल्लू’ हा शब्द कानडी भाषेला अधिक जवळचा आहे. वीरगळाशी साधर्म्य सांगणारे काही शब्द पुढीलप्रमाणे आहेत. उदा. वीरेवीर, वीरठाण, वीरपीर, वीरासन, वीरस्थान इत्यादी. संस्कृत भाषेतील महाकाव्यांसारख्या वेगवेगळ्या साहित्यांमधून मरण पावलेल्या शूरवीरांचे वर्णन आढळते. शूर, पराक्रमी व खूप मोठे कार्य करणाऱ्या वीरांची स्मृती मरणोत्तर आठवणीत राहावी म्हणून वीरगळ-निर्मितीस सुरुवात झाली. काही वेळा वीरांवर साहित्य निर्माण झाले, ते ‘वीरकाव्य’ म्हणून ओळखले जाते, तर काही वेळा मृत झालेल्या वीराची आठवण म्हणून ‘वीरगळ’ निर्माण झाले. वीरगळ हा ‘शिल्पविशेष’ आहे. ग्रंथांमध्ये वीरगळाबाबत वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आढळतात. मल्याळी भाषेत यास ‘तर्रा’ म्हणतात, कानडीमध्ये ‘कल्लू’, इंग्रजीत ‘हीरोस्टोन’, मराठीत ‘वीरगळ’ असे म्हणतात. उत्तर भारतात यास ‘वीरब्रह्म’ म्हणतात.
महाराष्ट्रात गावोगावी शेंदूर लावून पूजले जाणारे दगड सहज आढळतात. हेच वीरगळ असतात, जे प्रामुख्याने मृत आणि यशस्वी वीरांशी जोडलेले असतात. परंतु वीरगळांचे खरे महत्त्व न समजल्याने त्यांच्याभोवती अंधश्रद्धा तयार झाल्या आहेत. भारतीय संस्कृतीत ‘मोक्ष’ या संकल्पनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की, पुण्यकर्माने मरण पावलेल्या व्यक्तीलाच मोक्षप्राप्ती होते. अशा व्यक्तीचे स्मरण समाजाने करावे म्हणूनच वीरगळ-निर्मितीची कल्पना उदयास आली.
याचे पुरावे प्राचीन ग्रंथांत सापडतात. मृत वीराची पूजा आणि स्मरणार्थ उभारलेली शिळा - हीच वीरगळ निर्मितीची मूळ कल्पना. त्यामुळेच वीरगळाची व्याख्या अशी दिली जाते की, “शूर पुरुषाच्या स्मारक शिळा म्हणजे वीरगळ.” भारतीय संस्कृतिकोशाच्या खंड क्रमांक ९, पृष्ठ क्रमांक १९ वर ही व्याख्या सापडते.
महाभारतातील स्त्रीपर्वातही या संकल्पनेचा उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, रणांगणात मरण पावलेला शूरवीर यक्षलोकी जातो आणि त्याची पूजा केली जाते. यावरून असे दिसते की, युद्धात मृत्यू आलेल्या पराक्रमी वीराचे मृत्यूनंतरचे जग आणि त्याचे स्थान या विचारातून वीरगळांची निर्मिती झाली. गुंथर डी. सोनथायमर यांनी त्यांच्या ‘मेमोरियल स्टोन्स्’ (Memorial Stones) या ग्रंथात लिहिले आहे की, रणांगणात प्राण गमावलेल्या शूरवीराच्या मृत्यूनंतरच्या जगाविषयी असलेली श्रद्धा ही वीरगळ परंपरेमागची प्रेरणा आहे.
वीरगळ हे एक ऐतिहासिक साधन असून ते समाजाच्या जीवनाचे जिवंत प्रतिबिंब आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक व कलात्मक परिस्थिती समजून घेण्यासाठी या शिळा महत्त्वाच्या आहेत. कारण कला ही त्या काळाचा आरसा असते आणि या शिळांमधून त्या काळातील समाजजीवनाचे दर्शन घडते. वीरगळ म्हणजे फक्त पुरुषांच्या नव्हे, तर शूर स्त्रियांच्या स्मृतीही जतन करणाऱ्या शिळा. गावाच्या रक्षणासाठी, धर्मसंरक्षणासाठी किंवा जनावरांच्या सुरक्षेसाठी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ या शिळा उभारल्या गेल्या. त्यामुळे वीरगळ ही केवळ दगडी रचना नसून, त्या काळातील लोकांच्या श्रद्धा, शौर्य आणि संस्कृती यांचा दगडी पुरावा आहेत.
वीरगळांना लोकजीवनात फार मोठे स्थान
वीरगळ, सतीशिळा आणि शिलालेख अभ्यासक अनिल किसन दुधाणे सांगतात, “वास्तविक पाहता वीरगळांना लोकजीवनात फार मोठे स्थान आहे. एखाद्या कामधंदा नसलेल्या पाथरवटाने वेळ घालवण्यासाठी कोरलेली ही पाषाण चिन्हे नव्हेत. या पाषाणचिन्हांमागे त्या त्या गावाच्या संदर्भात संस्मरणीय इतिहास दडलेला असतो. प्रत्येक वीरगळ वेगवेगळी घटना सांगतो. त्या वीरांच्या कथा शेकडो वर्षांपासून आपल्या हृदयाशी जपून ठेवलेल्या दिसतात. त्यामुळे या वीरगळांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील नदीचा काठ असो की गाव, मंदिरे, लेण्या असोत किंवा आपल्या संस्कृतीच्या खाणाखुणा असोत, सगळीकडे ते विखुरलेले दिसतात. यावर संशोधन न झाल्याने ही शिल्पे कोणी उभारली अन् केव्हा उभारली, ही शिल्पे नक्की काय आहेत, असा अनेकांना प्रश्न पडतो. हा अज्ञात वारसा नोंदविला गेला पाहिजे. जर असा प्रयत्न झाला, तर नक्कीच पुढील पिढीला किमान पाहण्यासाठी तरी त्यांचे जतन करता येईल. या वीरगळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी तरुण पिढीने पुढे येऊन जिल्हावार संग्रहालये तयार केली पाहिजेत. गावागावांत कार्यशाळा घेऊन त्यांचा इतिहास व महत्त्व लोकांना पटवून दिले पाहिजे, अन्यथा इतिहासाची ही साधने काळाच्या ओघात नष्ट होऊन जातील.”
rakeshvijaymore@gmail.com