वीगनचे मिथक आणि वास्तवाचा सामना

वीगन अन्नाचा प्रचार-प्रसार करताना तो मुख्यत: शुद्धतेच्या आणि सात्विकतेच्या संकल्पनेभोवती केला जातो. पर्यावरण रक्षक म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण वास्तव काय आहे? मांसाहार अधिक नुकसानकारक आहे की शेती?
वीगनचे मिथक आणि वास्तवाचा सामना
Published on

फूडमार्क

श्रुति गणपत्ये

वीगन अन्नाचा प्रचार-प्रसार करताना तो मुख्यत: शुद्धतेच्या आणि सात्विकतेच्या संकल्पनेभोवती केला जातो. पर्यावरण रक्षक म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण वास्तव काय आहे? मांसाहार अधिक नुकसानकारक आहे की शेती? शेतीने आजवर काय नुकसान केलं आहे? अशा प्रश्नांचा उहापोह करतच वीगनच्या मिथकाला सामोरं जाणं आवश्यक आहे.

आता वीगन डाएटचं प्रमोशन करताना प्राणी मारून खाण्यापेक्षा शेती कशी फायदेशीर आहे, असा दावा केला जातो. शेती ही पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असून मांसाचा व्यापार हा क्रूरता आणि पर्यावरणालाही घातक आहे, हेही कायम लोकांना सांगितलं जातं. त्याही पुढे जाऊन ऑरगॅनिक शेती, ऑरगॅनिक फूड खाण्याकडेही काहींचा कल असतो. पण अनेक तज्ज्ञांच्या मते, शेती हे माणसाच्या अनेक रोगांचं मूळ आहे. शेतीसाठी पूर्ण नैसर्गिक परिसंस्था नष्ट करावी लागते. म्हणजे जंगल तोडून फक्त विशिष्ट वनस्पतींची (आंबा, काजू, संत्री) लागवड केली जाते, तसंच विशिष्ट पिकं घेतली जातात. ते एकप्रकारे निसर्गाचं नुकसानच असतं. ऊसासारख्या पिकाच्या शेतीत हजारो एकर जमीन कशी नष्ट होते हे आपण आधीच्या लेखात पाहिलं आहे.

पर्यावरणासोबतच शेती केल्याने माणसाचं शारीरिक नुकसानही होतं, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. शिकार करणाऱ्या माणसाच्या तुलनेत शेतकरी हा कितीतरी जास्त तास मेहनत करतो. वैद्यकीय मानवशास्त्रज्ञांच्या मते, माणसाच्या हाडांच्या अवस्थेवरूनच तो शेतकरी होता की शिकारी हे सांगता येतं. सरासरी शिकारी-भटकंती करणारा माणूस आठवड्यात सुमारे सतरा तास काम करायचा. त्याव्यतिरिक्त त्याला सर्जनशील उपक्रम, गप्पा-गोष्टी आणि दुपारची झोप घेण्यासाठी भरपूर वेळ मिळायचा. शेतकरी मात्र पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आणि त्याहीपुढे काम करत राहतो. आधुनिक अमेरिकेतील नागरिकही एका आठवड्यात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊनही सरासरी चाळीसपेक्षा जास्त तास काम करतो. त्यात परंपरेने स्त्रियांवर सोपवल्या गेलेल्या जीवनावश्यक जबाबदाऱ्या, उदा. स्वयंपाक, साफसफाई आणि मुलांचे संगोपन आदी अंतर्भूत केलेल्या नाहीत. भारतासारख्या विकसनशील देशात तर अंगमेहनत हा भाग गृहीतच धरला जातो. पण कर्ज, पिकांना योग्य भाव न मिळणं, त्यातून सतत आर्थिक नुकसान होणं, विशिष्ट कंपन्यांचीच बियाणी-खतं विकत घेण्यासाठी दबाव येणं यातूनही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं.

‘द व्हेजिटेरिअन मिथ’ या आपल्या पुस्तकात लॅरि किथ म्हणतात की, “प्रत्यक्षात शेतीने मानवी हक्क व मानवी संस्कृती यांचा निव्वळ तोटा केला आहे - गुलामगिरी, साम्राज्यवाद, लष्करीकरण, वर्गभेद, उपासमारी आणि रोग (शेतीमुळे आले).” किथ या ३० वर्ष वीगन होत्या. त्यातून त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन गंभीर आजार उद्भवलेच, पण मानसिकदृष्ट्याही त्यांना डिप्रेशनसारख्या आजारांना सामोरं जावं लागलं. आपल्या आरोग्याचं नुकसान झाल्यावर त्यांना वीगन डाएटमधला फोलपणा कळून चुकला. आपल्या या वैयक्तिक अनुभवावर त्यांनी हे पुस्तक लिहिलं असून शाकाहार किंवा वीगन पद्धतीत एकाच प्रकारचा आहार घेतल्याने होणारं शारीरिक, मानसिक नुकसान यांचे अनेक जागतिक दाखले त्यांनी समोर आणले आहेत. विशेषतः प्रथिनांची कमतरता अशा आहारात कायम राहते, असं त्या सांगतात.

शेतीबाबतही खासगीकरण आणि व्यापारीकरण हे आणखी धोकादायक आहेत. विशिष्ट पद्धतीच्या पिकांचा आग्रह, मोठ्या प्रमाणावर होणारी कीटकनाशकांची फवारणी, याबरोबरीनेच जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी माणसाच्या खाण्यास घातक अशाही रसायनांचा वापर होतो. एवढं सगळं करूनही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतच नाही आणि ग्राहकांनाही परवडेल अशा किमतीत अन्न मिळत नाही. आता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या या भारतामध्ये ‘नॉर्मल’ झाल्या आहेत. त्या केवळ एक आकडा बनून राहिल्या आहेत. त्यानंतर त्या कुटुंबांचं काय होतं, ती कशी जगतात, याची फिकीर कोणालाच नसते. शेतीच्या धोरणांमध्ये काही बदल होताना दिसत नाही.

शेतीत चांगलं उत्पादन आलं तर सगळा फायदा मधल्या मध्ये कंपन्याच उचलतात. अनेक विकसित देश तर जबरदस्तीने स्वस्त, निकृष्ट माल विकसित देशांच्या माथी मारतात. पाश्चात्य देश हे अन्न उत्पादकांना एकूण ३६० अब्ज डॉलर अनुदान देतात. त्याचा परिणाम असा होतो की जागतिक दर प्रचंड प्रमाणात खाली येतात. ऑक्सफॅमच्या मते, “अमेरिकेचे अतिरिक्त उत्पादन अर्ध्या खर्चात निर्यात बाजारात विकले जाऊ शकते; त्यामुळे स्थानिक शेती नष्ट होते आणि बंदिस्त बाजारपेठ तयार होते.” भुकेल्या लोकांकडे हे स्वस्त धान्य घेण्याएवढेही पैसे नसतात. दूरच्या प्रदेशांमधून आलेल्या स्वस्त वस्तूंमुळे स्थानिक अन्न उत्पादन अधिकच उद्ध्वस्त होते. इथेच अन्नसुरक्षा कोसळून पडते. त्यामुळे एकही आंतरराष्ट्रीय मदत संस्था जगातील उपासमार मिटवण्यासाठी शाकाहाराचा सल्ला देत नाही, कारण तो उपाय नाही.

मांसाहाराला पर्याय म्हणून सोयाबीनचा बर्गर खा, असं सांगणारे अनेक आंतरराष्ट्रीय वीगन तज्ज्ञ आहेत. जगभरात ‘मॉक मीट’मध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्या निघाल्या आहेत. मांसाहाराला पर्याय म्हणून मांसासारखा दिसणारा, तसंच रूप असणारा पदार्थ बाजारात आणण्यात आला आहे. त्यात सोयाबीन आणि इतर वनस्पती वापरल्या जातात. मात्र मांसाचं रूप देण्यासाठी त्यात आणखी काय आणि किती प्रिझर्वेटीव्ह वापरतात याची काही गणती नाही. त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल याचीही जाणीव नाही. मुळात मांसाहारालाच विरोध आहे तर अशा पद्धतीचं मॉक मीट का खायचं? त्यामागे अर्थातच कंपन्यांची एक मोठी लॉबी आहे आणि नफा मिळवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. बरं यातून गरीबांचा उपासमारीचा प्रश्न सोडवला जाणं अशक्य आहे. त्यामुळे शेती आणि ऑर्गेनिक शेती हा मांसाला खरोखरंच पर्याय असू शकतो का, हा एक प्रश्नच आहे.

मानव मिश्राहारी आहे. रवंथ करणारे प्राणी किंवा इतर प्राण्यांप्रमाणे विशिष्ट अन्नच पचवण्याचं शारीरिक वैशिष्ट्य माणसांत नाही. वीगन आणि शाकाहाराच्या माध्यमातून माणूस स्वतःला केवळ धान्य या एकाच आहारावर मर्यादित करू पाहतोय का, असा प्रश्न निर्माण होतो. माणसाचे पूर्वज पाच कोटी वर्षांपूर्वी आले. पण गवतापासून निर्माण झालेलं धान्य खाण्याची सुरुवात ही फक्त १०,००० वर्षांपूर्वीची आहे. शेतीच्या शोधामुळे आता तेच आपल्यासाठी आहारातील मुख्य घटक झाले आहेत. पुरातत्त्वज्ञांच्या मते, त्याचा परिणाम असा झाला की, शिकारी जीवनातून शेतीकडे गेलेल्या लोकांमध्ये हाडांची घनता कमी झाली, वाढ खुंटली, कुपोषणाची लक्षणं दिसू लागली, दात खराब झाले, वगैरे. अमेरिकन शास्त्रज्ञ आणि इतिहासतज्ज्ञ जॅरेड डायमंड शेतीला ‘मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक’ म्हणतात ते कदाचित त्याचसाठी.

माणूस शेतीकडे वळला, तेव्हा फक्त एका पिकावर अवलंबून राहिला. आज आपल्याकडे जगभर धान्याच्या विविध जाती आहेत. परंतु स्थानिक खाद्यपदार्थांची विविधता मात्र गमावली गेली आहे.

भारतापुरता विचार करायचा असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या माजी संचालक डॉ. वीणा शत्रुघ्न यांनी दिलेलं स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “१९५० आणि ६०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञ आणि पोषणतज्ज्ञ यांनी देशासाठी आहार भत्ते (Recommended Dietary Allowances) तयार करताना उष्मांकच नव्हे तर प्रथिनांचा स्रोत म्हणून तृणधान्ये आणि कडधान्ये यांचा अन्नात समावेश करण्यास प्रोत्साहन दिले. इथे एक लक्षात घ्या की हे तज्ज्ञ उच्चवर्णीय ब्राह्मण होते ज्यांचा वैयक्तिक आहार शाकाहारी होता. मांसाहारातून मिळणारी प्रथिनं आणि मानवी ऊती प्रथिनं यात खूप साम्य असल्याचे वैज्ञानिक पुरावे असूनही, तसेच मांसाहारी प्रथिनांचा १०० टक्के वापर (ज्याला जैविक मूल्य म्हणतात) शरीरात होत असतानाही, अन्नधान्य आणि कडधान्ये ४:१ या प्रमाणात खाल्ली तर पुरेशी प्रथिनं मिळतील असं सांगण्यात आलं. ‘प्रोटीन उणिवेचं मिथक’ या नावाने या सिद्धांताची घोषणा मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आली आणि त्यातून दूध आणि प्राणिजन्य प्रथिनांना वगळल्याचं समर्थन करण्यात आलं.”

वीगन आणि शाकाहारातूनही एकाच प्रकारचे अन्न पोटात जाण्याचा संभव असतो. आहार जितका भिन्न असेल तितकी पोषकतत्त्वं जास्त पोटात जातात. किथच्या मते, “शाकाहारी मिथक फक्त तुमच्या ताटात काय आहे याबद्दल नसतं. त्याभोवती विविध कथा गुंफलेल्या असतात. शाकाहारी अन्न शुद्ध आहे, योग्य आहे, सुरक्षित आहे...अशी आपण समजूत करून घेतो. जीवन हे जीवनावरच टिकून असतं. हे क्रौर्य नाही, ही पर्यावरणीय साखळी आहे....आपण निसर्गाकडे त्रयस्थासारखं पाहू शकत नाही. आपण त्याचा भाग आहोत, त्याच्याशी बांधलेले आहोत, त्याच्याकडून अन्न मिळवत आहोत आणि शेवटी त्याच्यातच परत जाणार आहोत. हे विसरणं म्हणजे आपण कोण आहोत हे विसरणं होय.”

shruti.sg@gmail.com

मुक्त पत्रकार

logo
marathi.freepressjournal.in