

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
प्रत्येक पावसाळ्यात कोकण एखाद्या हिरव्या स्वप्नासारखा खुलतो. या स्वप्नवत निसर्गात दडलेलं देवगडचं विमलेश्वर मंदिर इतिहास, अध्यात्म आणि निसर्गप्रेमींसाठी एक अनमोल ठेवा आहे.
पावसाळ्यात कोकणच्या वाटांनी प्रवास करणं म्हणजे मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्यासारखं असतं. निसर्गाचं हे देखणं रूप अनुभवायला मी नेहमीच उत्सुक असते. अशाच एका सुखावणाऱ्या पावसाळी सकाळी मी कोकणातल्या एका अत्यंत गूढ, निसर्गरम्य आणि अद्भुत मंदिराचा अनुभव घेण्यासाठी प्रवासाला निघाले.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला या जागेबद्दल सुचवलं होतं आणि गुगलवर काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणाचे फोटोज पाहिले होते, तेव्हापासूनच विमलेश्वरला जाण्याचं मनात पक्कं केलं होतं. पावसाने थोडी उसंत घेतली होती, त्यामुळे आम्ही गाडी थेट विमलेश्वरच्या दिशेने वळवली. देवगडपासून विमलेश्वरपर्यंतचा हा दहा किलोमीटरचा रस्ता अत्यंत रम्य आहे. वाटेत सुंदर असा वाडातरचा पूल लागतो, रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार भातशेती पाहत, निसर्गाची जादू डोळ्यांत साठवत आम्ही कधी पोहोचलो ते आम्हाला समजलंच नाही.
विमलेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचले आणि वाटेतली दृश्यं पाहून मन थक्क झालं. समोर एक भव्य कमान दिसत होती आणि तिथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या होत्या. आम्ही जशा पायऱ्या उतरत गेलो, तसा पाण्याचा मंजूळ आवाज कानावर पडू लागला. आजूबाजूला पाहिलं तर तो जांभ्या दगड पाहून असं वाटत होतं की, हे संपूर्ण मंदिर आणि परिसर जांभ्यात खोदूनच काढलाय की काय!
पायऱ्या उतरून खाली आल्यावर बाजूलाच काही प्राचीन विरगळ दिसल्या. तिथेच एक नळ होता. तिथे हात-पाय धुवून पुढे जाण्याची एक सूचना लिहिली होती. त्यामुळे आधी व्यवस्थित हात-पाय धुतले. समोरच ‘कालभैरव गुंफा’ असं लिहिलेलं दिसलं आणि आम्ही त्या गुहेत प्रवेश केला. त्या छोट्याशा जागेत एक प्रसन्न पिंडी होती. संपूर्ण गुहेत फुलांचा पवित्र गंध भरून राहिला होता.
गुहेतून बाहेर आल्यावर समोरच एक सुंदर तुळशी वृंदावन दिसलं. या तुळशी वृंदावनाच्या अगदी समोर आणि गुहेला लागूनच गणपती बाप्पाचं एक छोटं आणि देखणं मंदिर आहे. बाप्पाचं दर्शन घेऊन थोडं पुढे आल्यावर लगेच विमलेश्वराचं मुख्य मंदिर डोळ्यांसमोर येतं.
हे मुख्य मंदिर पूर्णपणे कातळात साकारलेलं आहे. मंदिराच्या समोर तीन दीपमाळा डौलाने उभ्या आहेत आणि बाजूला दोन हत्तींची शिल्प आहेत. पण त्या हत्तींच्या शिल्पकलेविषयी मला एक मोठं कुतूहल वाटलं. त्या हत्तींचा पुढचा भाग एकदम नवीन वाटत होता, पण मागचा भाग मात्र मूळ जांभ्या दगडाचाच आहे. हे शिल्प त्याचवेळी कोरलं गेलंय की नंतर डागडुजी केली आहे, हे मात्र कळत नव्हतं.
मंदिराजवळ गेले तशी वरती असलेली शिल्पं पाहिली, ती पंचतत्त्वाची प्रतीकं आहेत असं म्हणतात. पण मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना मात्र मनात थोडी धाकधूक होत होती. आत जायची खूप भीती वाटत होती, कारण तिथे कित्येक वटवाघळांचा सहवास होता आणि त्यांचा आवाज तिथे प्रचंड घुमत होता. तरीही धीर करून पायऱ्या चढून गेले. वर पाहिलं तर झुंबरासारखी उलटी लटकलेली कित्येक वटवाघळं दिसत होती. अगदी पाच-पाच, सहा-सहाच्या ग्रुपने ती फिरत होती.
मंदिरात प्रवेश करताच पहिल्यांदा नंदीचं दर्शन झालं. तिथून पुढे पायऱ्या चढून वर गेल्यावर गाभाऱ्यात विमलेश्वराची ती भव्य शिवपिंड दिसली. शांतपणे दर्शन घेतलं आणि वटवाघळांच्या आवाजाचा थरार अनुभवत बाहेर आले.
आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळ होत चाललेली. सगळी जनावरं गोठ्याकडे परतत होती आणि त्यांची वाट मंदिराच्या परिसरातूनच जात होती. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला काही पायऱ्या खाली गेल्या होत्या, तिथून आम्ही खाली उतरलो. समोर पाणी साठवलेली दोन कुंडं दिसली. वरून येणारा पाण्याचा प्रवाह पहिल्यांदा एका कुंडात जातो, तिथून थोडं पाणी साठून ते दुसऱ्या कुंडात आणि मग पुढे वाहून जातं. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर लोक याच कुंडातील पाण्याचा वापर करतात.
पायऱ्या उतरल्यावर बाजूला पाहिलं तर एक विलक्षण दृश्य दिसलं. तिथे एक गोमुख होतं आणि त्या गोमुखातून पाण्याची पवित्र धारा अखंड वाहत होती. जणू काही एखादा गुप्त खजिनाच सापडल्याचा आनंद मला झाला. त्या पायऱ्यांवर मी काही वेळ शांत बसून राहिले. पाठीशी ते सुंदर पुरातन मंदिर, समोर झाडावेलींच्या सान्निध्यातून खळखळत वाहणारा झरा आणि लांबवर दिसणारी नारळापोफळीची उंचच उंच झाडं... एखाद्याचं सहज ध्यान लागून जाईल अशी तिथली शांतता होती.
त्यानंतर समोरच्या पुलाकडे जाण्यासाठी निघाले. पुलावरून वरून जाता येत होतं, पण मला त्या झऱ्याच्या थंडगार पाण्यातून चालत जाण्याचा मोह आवरला नाही. पायाला स्पर्श करणाऱ्या त्या थंडगार पाण्याच्या प्रवाहात जात असताना आजूबाजूला माडाची, सुपारीची सुंदर कुळागरं दिसत होती. समोरच जांभ्या दगडाचा एक देखणा पूल होता.
या जांभ्याच्या पुलावर उभं राहिल्यावर जाणीव होते की, हे विमलेश्वर मंदिर निसर्गाचा किती सुंदर अविष्कार आहे. पुलावर उभे राहून जेव्हा मी विमलेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर निरखिला, तेव्हा डोक्यातले सगळे विचार शांत झाले होते. समोर कातळातलं मंदिर, पाठीमागून वाहणारा झरा आणि त्याला जोडणारा हा पूल... पावसाळ्यात तर या पुलावर हिरवं आल्गी (शेवाळ) जमा झाल्यामुळे हा परिसर आणखीनच मनमोहक आणि सिनिक दिसतो. विमलेश्वरचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर तो पावसाळ्यातच घ्यायला हवा, हे मात्र नक्की! देवगडची ही पावसाळी भटकंती मनाला तृप्त करून गेली.
जाण्यासाठी मार्ग : मुंबई-गोवा महामार्ग.
कोल्हापूरवरून फोंडाघाट किंवा करूळ घाट मार्गे.
जवळचे बसस्थानक : देवगड.
जवळचे रेल्वेस्थानक : कणकवली, वैभववाडी.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com