विनायकी

'विनायकी' गणेशाचे स्त्री रूप. ही देवी भारतात फारशी प्रसिद्ध नाही आणि तिच्या मूर्तीही विरळ. प्राचीन काळात 'विनायकी' योगिनी आणि तंत्र-मंत्र साधनेशी संबंधित एक महत्त्वाची देवता मानली गेली. विनायकीला विविध नावांनी ओळखले जाते, तरीही तिचे अस्तित्व गणेशामुळे झाकोळले गेले आहे.
विनायकी
Published on

पाऊलखुणा

'विनायकी' गणेशाचे स्त्री रूप. ही देवी भारतात फारशी प्रसिद्ध नाही आणि तिच्या मूर्तीही विरळ. प्राचीन काळात 'विनायकी' योगिनी आणि तंत्र-मंत्र साधनेशी संबंधित एक महत्त्वाची देवता मानली गेली. विनायकीला विविध नावांनी ओळखले जाते, तरीही तिचे अस्तित्व गणेशामुळे झाकोळले गेले आहे.

कन्याकुमारी येथील थानुमलायन मंदिराच्या एका कोपऱ्यात, एका लहानशा देवळात एक अद्भुत मूर्ती दडलेली आहे. सुखासनात म्हणजे पाय दुमडून बसलेली ही चार हातांची देवी. डाव्या वरच्या हातात परशू, खालच्या हातात शंख, उजव्या हातात कलश आणि दुसऱ्या हातात काठी ज्याभोवती तिची लांब सोंड गुंडाळलेली दिसते. ही मूर्ती म्हणजे हत्तीमुखी देवी, विनायकी किंवा गणेशनी.

गणेश चतुर्थीला संपूर्ण देशभर लोक मोठ्या उत्साहात लाडक्या गणेशाचा जन्मोत्सव साजरा करतात. सर्व अडथळे दूर करणारा देव महणून त्याची पूजा केली जाते. त्याच्यावर अगणित गाणी, कथा आणि चित्रे आहेत; मात्र, विनायकी ही भारतात फारशी प्रसिद्ध नाही आणि तिच्या मूर्ती देखील विरळच.

हिंदू धर्मात आपल्याला विविध देव-देवतांची रूपं पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे 'विनायकी', जिचं रूप हत्तीच्या सोंडेप्रमाणे आहे. 'विनायकी' हे नाव गणपतीच्या शक्तींच्या (पत्नींच्या) यादीत सापडत नाही. प्राचीन भारतात विनायकीची पूजा फारशी लोकप्रिय नव्हती. तिचा समावेश योगिनी आणि इतर देवींच्या यादीत केला जातो. गाणपत्य संप्रदायाच्या वाढीमुळे आणि योगिनी व तंत्र-मंत्र साधनेमुळे विनायकीला मध्ययुगीन काळात एक महत्त्वाची स्त्री-देवता मानले जाऊ लागले. भारतातील काही प्रसिद्ध चौसष्ट-योगिनी मंदिरांमध्ये (उदा. रखियान, भेराघाट, हणुपूर, राणीपूर-झरियाल) विनायकीच्या मूर्ती इतर योगिनींसोबत आढळतात. त्यापैकी ओदिशातील हिरापूर येथील तांत्रिक मंदिर 'चौसष्ट योगिनी'मध्येही या देवीची एक मूर्ती आहे. 'गंडिस विनायकी: द फिमेल गणेश' या पुस्तकात पृथ्वी के. अग्रवाल लिहितात की, या मूर्तीत देवी एका दुर्मिळ नृत्यमुद्रेत उभी आहे. "ती 'चतुर' मुद्रेत नृत्य करत आहे, ज्यात तिचे पाय आतल्या दिशेने वाकलेले आहेत आणि ती पायाच्या बोटांवर उभी आहे." काळानुसार ही मूर्ती झिजली असल्यामुळे तिच्या हातातली चिन्हे आता स्पष्ट दिसत नाहीत. पण, एका डुकरावर उभी असलेली, मोठे पोट असलेली तिची ठळक मुद्रा आजही स्पष्ट दिसते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्येही विनायकीची आणखी काही दुर्मिळ शिल्पे सापडली आहेत. तरीही, विनायकीच्या अस्तित्वाचा सर्वात सामान्यपणे स्वीकारला जाणारा अर्थ हाच आहे की, ती गणेशाचे स्त्री रूप किंवा त्याची 'शक्ती' आहे.

'द एनगमा ऑफ वैनायकी' या शोधनिबंधात बालाजी मुंडकुर यांनी लिहिलं आहे की, "सुरुवातीपासूनच या देवीचं महत्त्व गणेशाच्या लोकप्रियतेखाली झाकोळलं गेलं आहे. त्यामुळे तिच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं किंवा तिला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं." ते पुढे म्हणतात, "गणेशाच्या मूर्ती प्रचंड लोकप्रिय असल्या, तरी विनायकीचं प्रतिनिधित्व सहसा मूर्तीच्या रूपात केलं जात नाही, अगदी मानवी रूपातही नाही. शिवाची शक्ती म्हणून देवीला जे महत्त्व दिलं जातं, ते ऐतिहासिक काळात विनायकीला कधीच मिळालं नाही." मुंडकुर यांच्या मते, विनायकी ही धार्मिक साहित्यात फारशी आढळत नाही. तिला एक निश्चित नावही नाही; तिची विविध नावं ही गणपतीच्या नावांची स्त्रीलिंगी रूपं आहेत, जसे की, गजाननी, विघ्नेशी, गजरूपा. या देवीचा उगम रहस्यमय असला, तरी तिचं मूळ वैदिक काळापूर्वीचे असून अनेक प्राण्यांच्या रूपातील देवतांप्रमाणेच ते आहे.

विनायकीचा सर्वात जुना उल्लेख मत्स्य पुराणात आढळतो, जिथे तिला शिवाच्या शक्तीचा एक अवतार मानले आहे. अग्निपुराणातही तिचा उल्लेख आहे, जिथे ती गणेशाची शक्ती म्हणून ओळखली जाते. या पुराणातील ५२ आणि १४६ या अध्यायांमध्ये सप्तमातृका आणि प्रत्येक दिशेसाठी असलेल्या योगिनींचे वर्णन आहे. याच वर्णनात 'गजाजिह्निका' नावाच्या देवीचा उल्लेख आहे, जिचे वर्णन 'हत्तीच्या जिभेसारखी जीभ असलेली देवी' असे केले आहे. स्कंद पुराणाच्या काशीखंडाच्या ४५ व्या अध्यायात चौसष्ट योगिनींच्या यादीत हत्तीमुखी देवी गजमुखाननाचा सर्वात पहिला उल्लेख आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार, अंधकासुराचे रक्त पिण्यासाठी शिवाने विनायकीची निर्मिती केली होती. मत्स्य पुराणातही विनायकीचे नाव इतर दोनशे देवींसोबत घेतले आहे. गणेश ज्याप्रमाणे अडथळे निर्माण करतो आणि दूर करतो, त्याचप्रमाणे या विनायकी देवीचे कार्य मानले जाते. विनायकीचा उल्लेख जैन आणि बौद्ध साहित्यातही सापडतो. विनायकीला हिंदू आणि जैन धर्मात चौसष्ट योगिनींपैकी एक मानले जाते, तर बौद्ध धर्मात तिला 'गणपतीहदया' म्हणून पूजले जाते.

भारतात अनेक ठिकाणी विनायकीच्या मूर्ती सापडल्या आहेत. १९०९ साली उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात १० व्या शतकातील प्रतिहार शैलीतील विनायकीची मूर्ती सापडली, ज्यामुळे या विषयावर अधिक संशोधन सुरू झाले. पॉल मार्टिन दुबोस या फ्रेंच संशोधकाने गणेशावर केलेल्या कामात विनायकीवर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले. त्यांनी भारतभर फिरून तिची शिल्पे शोधली आणि तिच्या अस्तित्वाचे पुरावे दिले. त्यांच्या संशोधनातून तिला 'गणेश्वरी', 'गणेशनी' आणि 'लम्बोदरी' या नावांनीही ओळखले जाते हे समोर आले. या माहितीनुसार, विनायकी ही एक स्वतंत्र देवी नसून, ती गणेशाची शक्ती आहे. ती मातृका किंवा चौसष्ट योगिनीपैकी एक म्हणूनही गणली जाते.

१६ व्या शतकातील 'शिल्परत्न' या ग्रंथात तिचे मूर्तीशास्त्रीय वर्णन आहे, ज्यात तिला हत्तीचे मुख, वक्षस्थळ आणि स्त्रीच्या आकाराचे नितंब असलेली देवी महटले आहे. ती नेहमीच जड दागिने जसे की हार, बांगड्या, बाजूबंद, तोरड्या आणि कानातले घातलेली दिसते. तिच्या कमरेला एक सुंदर मोती जडित मेखला आहे. विनायकीच्या मूर्ती दोन किंवा चार हातांच्या असून तिच्या हातात अंकुश, मोदकांचे पात्र आणि कट्यार (खंजीर) अशी आयुधे दिसतात. काही मूर्तीमध्ये ती कमळ, हस्तिदंत, सोंड किंवा अंकुश धारण केलेली दिसते. ती सामान्यतः ललितासन या आसनात बसलेली किंवा उभी दाखवलेली आहे. तिच्या वाहनामध्ये बहुतांश ठिकाणी उंदीर दिसतो. काही मूर्तीमध्ये तिच्यासोबत तिच्या स्त्रीगण आणि भक्तगण दाखवले आहेत.

गणेशाच्या लोकप्रियतेखाली तिचं अस्तित्व झाकोळलं गेलं असल्यामुळे तिच्या मूर्ती फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि तिच्यासाठी खास मंदिरे देखील बांधलेली नाहीत. तरी तिची स्वतंत्र ओळख आजही संशोधक आणि कलाप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय आहे.

rakeshvijaymore@gmail.Com

logo
marathi.freepressjournal.in