

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
वरवर भांडखोर आणि कंजूष वाटणारा हा माणूस आतून अतिशय भाबडा आणि ‘चिंता करतो विश्वाची’ असं म्हणणारा होता. विंदा कुटुंबवत्सल होते. कोल्हापूरला वार लावून शिक्षण घेण्याची वेळ आली, पण विंदांनी आपली ज्ञान लालसा आणि तत्त्वनिष्ठा कधी सोडली नाही. प्रचंड परिश्रम आणि विविध ज्ञानशाखांचा व्यासंग करीत आपली उपजत प्रतिभा त्यांनी निरंतर लखलखीत ठेवली.
काही उंच धिप्पाड वाटणारी शरीरयष्टी, कुरळे पण भुरूभुरू उडणारे काहीसे विरळ केस, विलक्षण शुभ्र दंतपंक्ती आणि बोलताना मोठ्या डोळ्यांच्या होणाऱ्या भावसमृद्ध हालचाली, खांद्यांना झोक देत आपल्याच धुंदीत चालणारी बेदरकार मूर्ती हे विंदांचं बाह्यरूप होतं. खादीचा कुर्ता-पायजमा हा नेहमीचा पोशाख आणि प्राध्यापक म्हणून शिकवताना सफेद पॅन्ट आणि तीमध्ये खोवलेला सफेद शर्ट किंवा कधीतरी टाय व कोट घालणारे करंदीकर मूलभूत आत्मविश्वासाचं मूर्तिमंत प्रतीक होते. वरवर भांडखोर आणि कंजूष वाटणारा हा माणूस आतून अतिशय भाबडा आणि ‘चिंता करतो विश्वाची’ असं म्हणणारा होता. विंदा कुटुंबवत्सल होते. कोल्हापूरला वार लावून शिक्षण घेण्याची वेळ आली, पण विंदांनी आपली ज्ञान लालसा आणि तत्त्वनिष्ठा कधी सोडली नाही. प्रचंड परिश्रम आणि विविध ज्ञानशाखांचा व्यासंग करीत आपली उपजत प्रतिभा त्यांनी निरंतर लखलखीत ठेवली. ते ॲटलांटिक पार करून आले, पण पोंभुर्ल्याच्या लाल मातीत रुजलेली पाळमुळं विसरले नाहीत. कविता, लघु निबंध, अनुवाद, बालकविता, अर्वाचीनकरण, समीक्षा अशी चतुरस्त्र वाङ्मयीन मुसाफिरी करणाऱ्या विंदा करंदीकर यांनी मराठी भाषिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र मुद्रा स्थापित केली आणि सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्यास आपण पात्र आहोत हेही सिद्ध केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील धालवली या गावी २३ ऑगस्ट १९१८ रोजी विंदांचा जन्म झाला आणि १४ मार्च २०१० रोजी मुंबई येथे त्यांचं दुःखद निधन झालं.
विंदांच्या व्यक्तित्वात ज्ञानाची पिपासा आणि प्रतिभावंत कलाकाराची तरलता मिसळलेली दिसते. हा वारसा त्यांना आपले गुरू माधव जुलियन यांच्याकडून मिळाला असावा. तारुण्याच्या पहिल्या अध्यायात वीर सावरकर, आर्य समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते गांधीवाद, मार्क्सवाद अशा अनेक वैचारिक आवर्तनातून ते गेले. बौद्धिक पातळीवर आईन्स्टाईन आणि क्वांटम फिजिक्स यासारख्या विषयांशी झोंबू पाहताना भावनिक आणि सांस्कृतिक पातळीवर राधाकृष्णाच्या रासक्रीडेचाही त्यांना विसर पडला नाही. सूक्ष्म प्रेमभावनेपासून प्रचारकी घोषणांपर्यंत कोणताही अनुभव त्यांनी वर्ज्य मानला नाही. पौर्वात्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांचा करंदीकरांनी अफाट व्यासंग केला. “बर्ट्रंड रसेल नंतर मार्क्सिझम वाचल्यामुळे काय झालं? तर सावधगिरी राहिली. क्रिटिकल क्वेश्चनिंग करण्याची ताकद शाबूत राहिली,” असं करंदीकर जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या अंतिम सत्याविषयीची जिज्ञासा आणि ध्यासाचा प्रत्यय येतो. समाजाला परिपूर्ण अवस्थेपर्यंत ‘मानवाचे अंतिम एक गोत्र’ या स्थितीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने तत्त्वज्ञानातील निरनिराळ्या विचारधारांचा मागोवा त्यांनी घेतला. या वाटचालीत समग्रता आणि सत्य शोधताना, प्रत्ययाला येणाऱ्या साधनांच्या, शास्त्रांच्या, अनुभवांच्या व तर्काच्या मर्यादा, त्यातील ताण ही करंदीकरांच्या शब्दांमधील प्रेरक शक्ती होती.
माती आणि रक्ताशी अतूट नातं सांगणारं विंदांचं काव्य ऐहिकाशी इमान राखता राखताच अधिभौतिकातून अंतिम सत्याचा शोध घेत अशा शोधातून भोवंडत, भिरभिरत राहणारं त्यांचं वाङ्मयीन अस्तित्व म्हणजे व्यथांचं दर्शन घेत जाणाऱ्या त्यांच्या लौकिक जीवनाचं केवळ सार आहे. त्यांची काव्य प्रतिभा सातत्यानं जाणिवांच्या वेगवेगळ्या वाटा शोधत चाललेली दिसते. आपल्या अनुभूतींशी त्यांची कविता प्रामाणिक राहिली. आपल्या धाकट्या मुलाच्या मनातील भीतीची भावना घालवण्याच्या निमित्तानं त्यांनी बालकविता लिहायला सुरुवात केली आणि मग दीर्घकाळ बालकविताही ते लिहीत राहिले. लहान वयातील मुलांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, शंका, भीती, सहज प्रवृत्ती, कल्पकता हळवेपणानं साकारणारी करंदीकरांची बालकविता लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखवते. “कोणत्याही लेखनात आयुष्य आपोआप अटळपणे आलं पाहिजे. अरण्यात घुसावं तसं आयुष्यात घुसलं पाहिजे. अनुभवाला भिडल्यानंतर त्यात घुसमटलं पाहिजे,” अशी करंदीकरांची वाङ्मयीन भूमिका होती आणि याच धारणेतून त्यांनी बहुतांश लघुनिबंध लेखन केल्यामुळे आपली स्वतंत्र मुद्रा याही वाङ्मय प्रकारात उमटविली.
करंदीकरांची समीक्षा स्वतःच्या लेखनामधील प्रेरणा शोधून काव्यामध्ये त्याची अभिव्यक्ती कशी होत गेली याचं विवेचन करते. स्वतःच्या परंपरांचा व काव्य प्रवाहाबरोबर येणाऱ्या नवतेचा शोध हाच आत्मशोधाचा मूळ हेतू असल्याने याबाबतच्या मर्ढेकरांच्या विचाराला अनुसरून करंदीकर आपल्या आत्मनिष्ठा तपासून बघतात. विंदांनी भाषांतरासाठी ॲरिस्टॉटलचं ‘काव्यशास्त्र’, गटेचं ‘फाऊस्ट’ आणि शेक्सपियरचन ‘किंग लियर’ यासारखे वैश्विक मान्यता असलेले ग्रंथ- साहित्यकृती निवडण्यामागे केवळ बौद्धिक खुमखुमी होती असं म्हणता येणार नाही, तर आपल्या मातृभाषा मराठीत जागतिक वाङ्मयाची व्यापक जाणीव निर्माण व्हावी ही तळमळ त्यामागे होती. उच्च शिक्षणाचं माध्यम होण्याची मराठीची पात्रता वाढावी ही आकांक्षा होती. करंदीकरांनी स्वतःच्या कविता इंग्रजीत अनुवादित केल्या आणि अनुसूजन म्हणजे काय असतं हेही दाखवून दिलं. अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण करताना किंवा ‘अष्टदर्शने’ची सृजनशीलता प्रत्यक्षात आणतानाही मराठी भाषेची ताकद आणि विश्वपालाण घालण्याचा ध्यास विंदांनी दाखवून दिला.
आयुष्यातला क्षणन् क्षण समरसून, मनापासून जगलेले विंदा ‘मृत्यू असे म्हणून जगण्यास अर्थ आहे’ असं म्हणून शांतपणे १४ मार्च २०१० रोजी अनंतात विलीन झाले. त्यावेळी ‘रक्तसमाधी’ या त्यांच्या कवितेतील अखेरच्या पंक्तींना वेगळ्या संदर्भात नवा उजाळा मिळाला. ब्रम्ह आणि माया यांच्यातील द्वैत मिटत असताना विंदा पुन्हा म्हणाले असतील-
अव्यक्ताला व्यक्त करायासाठी
अद्वैतातच विरल्या साऱ्या गाठी
विसरूनी गेलो अद्वैतातच मीपण
स्वत्वाचे संरक्षण;
आणिक त्या अत्यंतिक अद्भुत वेळी
दिक्कालाची बेडी भंगून गेली
रक्तसमाधी लागून विरली माया
रक्तातुनी या रक्त मिसळले
जीवन पुढती न्याया!
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com