
नोंद
अपर्णा पाडगावकर
आषाढी एकादशी, वारी हे शब्द लहानपणापासून ऐकलेले, पाहिलेले असतात. लाखो लोकांचं वारीतलं चालणं अप्रूपाचं वाटत असतं. पण विठुराया कळायला मात्र थोडा वेळ जावा लागतो. पण जेव्हा तो कळू लागतो तेव्हा आपोआप पंढरीच्या वाटेची ओढ वाटते, देवाशी सलगी करावी, अशी आस लागते. या अनुभूतीचं हे शब्दरूप.
आषाढी एकादशी हा सण बालपणापासूनच खूप आवडता होता. त्याची कारणं तशी बालीशच होती तेव्हा. एक तर शाळेला सुट्टी असे. बहुधा पाऊस पडे. शिवाय एकादशीचा उत्तम खाऊ.. थोडं कळायला लागल्यावर इतके लाखो लोक चालत जातात इतक्या दूरवर, याचं अप्रूप वाटू लागलं. हे काहीतरी वेगळं आहे, ही संवेदनक्षम वयातली पहिली जाणीव होती. तसं भारतीय मन उत्सवप्रियच. आतासारखी कोणत्याही सणाचा इव्हेंट करणारी मानसिकता तीस-चाळीस वर्षांपूर्वी फार प्रचलित नव्हती तशी. तरीही गणपती विसर्जन वगळता इतकी गर्दी कोण्या एका विठुरायासाठी होते, याचं कुतूहल वाटण्यातूनच जाणिवेचा प्रवास सुरू झाला.
फेअर अँड लवली बाजारात आलं, तोच हा काळ होता. इतर सर्व दैवतांच्या मानानं काळं असणारं हे रूप इतकं गोजिरवाणं का वाटतं मराठी मनाला, हे तेव्हा कळत नव्हतं.
भक्तिरसापलीकडे जाऊन संतसाहित्याकडे पाहू लागल्यानंतर या सावळ्या विठुरायाने जणू जादू केली.
ती माऊली, ती प्रिया, तोच गुरू, तोच भवसागरू.. आयुष्याकडे कोणत्याही नजरेनं पाहिलं तरी विठुरायाचं त्यातलं अस्तित्व नजरेआड न होणारं. अर्थात आपण त्याची दखल घ्यावी किंवा न घ्यावी, विठुराया आपल्या मायेची पाखर आपल्यावर कायम घालतच आलाय, या सत्याचा शोध लागायला अर्ध आयुष्य जावं लागलं.
पंढरपूरला जाणं अगदी गेल्या वर्षीपर्यंत काही ना काही कारणाने टळतच होतं. बरोबर एक वर्षापूर्वी याच काळात, कसा कुणास ठावूक, पण अंतरीचा उमाळा म्हणतात तशी पंढरीच्या वाटेची ओढ लागली.
ज्ञानोबांनी म्हटलं आहे ना,
"जाईन गे माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया.."
अगदी तसंच काहीसं, का कुणास ठावूक, पण आत दाटून आलं काहीतरी.
पंढरपूर आज व्यावहारिकदृष्ट्या अन्य कुठल्याही तीर्थस्थानापेक्षा वेगळं नाही. दुकानदारी, रांगा, कपाळी नाम उमटवण्यासाठी मागे लागणारी पोरं, रस्त्याच्या कडेला बसलेल्या कासार बाया... तरीही पंढरपुरात पाऊल टाकताच आत काहीतरी लक्ककन हललं. आज बाहेर कितीही सिमेंट आणि स्टीलचं बांधकाम झालेलं असलं, तरी मूळ सोळा खांबी मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर मन आपोआपच ज्ञानोबांच्या काळात जाऊन पोहोचतं. इथे विठाईसमोर हे सारे संत कसे एकमेकांच्या गळाभेटी घेत असतील, याच्या कल्पनेनेही अंगावर रोमांच उभे राहतात. आपण एक हजार वर्षांच्या परंपरेचे पाईक आहोत या जाणिवेने मन व्याकुळतं..
किती कळवळ्याने जनाबाई त्या विठूला हाक घालते -
"मी तुझें गा लेकरू
नको मजशी अव्हेरू
माय गेली, बाप गेला
आता सांभाळी विठ्ठला"
तो कळवळा त्या दगडी खांबांनी आजवर अंगी जोपासला आहे. आपण फक्त त्याला त्याच आर्ततेनं स्पर्श करायला हवा.. आजच्या तडकाफडकी निर्णय व कृती करण्याच्या डिजिटल युगाला कदाचित 'माहेरपण' शब्दाचा शब्दार्थ कळेल, ती अनुभूती जाणवेलच, असं नाही. ती अनुभूती त्या दगडी खांबांमध्ये आणि विठ्ठलाच्या त्या मूर्तीच्या दर्शनामध्ये खचितच आहे. नकळत नाक मुसमुसतं आणि डोळ्यांत पाणी दाटून येतं. कारण काहीच नाही काही मागायचं नाही, काही विचारायचं नाही.. तरीही जीवाची तलखी कमी होत गेल्याची अनुभूती दाटून येत राहते. हा काही माझ्या भाविकतेचा देखावा नव्हे..
महाराष्ट्रदेशीचे सारेच संत वेगवेगळ्या प्रकारे विषमतेने गांजले गेले होते. ज्ञानदेवादी भावंडांना धार्मिक संकेतांचा काच सहन करावा लागला.. चोखा जातीय वर्गवादाचा बळी ठरला, जनाबाई लिंगभेदाच्या अन्यायाचं उदाहरण ठरली.. या सगळ्यांनाच एका विराटाची ओढ लागून राहिली होती, जी सर्वांना समानतेने जवळ घेईल.. रंगरूपगुण या कशाचीही तमा न बाळगता अर्भकाला जवळ करते ती माताच.. हा देव कुणाला दंड करायला आलेला नाही, त्याच्या हातात कोणतंही हत्यार नाही, ही गोष्ट किती महत्त्वाची.. त्याच्या जवळ आहे ते निव्वळ वात्सल्य. समचरणांवर उभं राहून भक्तांना छायाछत्र देत राहिलेलं..
नामदेव म्हणतात -
"पक्षिणी प्रभाती चारियासी जाये,
पिलू वाट पाहे उपवासी
तैसे माझे मन करी वो तुझी आस,
चरण रात्रंदिवस चिंतीतसे.."
अशा या मातृत्वाची वत्सलता आजही या गर्भागारात दाटून आहे. संवेदनशील मनाला ती स्पर्श करते. आपल्या भौतिक आयुष्यातली काळजी, अपमान,नैराश्य हे विरून जाणं, आत्मपर आनंदाचा आभास व्हावा, असं काहीतरी त्या वास्तूत असल्याचं अनुभवायला येतं. विठ्ठलाच्या लोकप्रिय कथांपापैकी दोन सर्वज्ञात कथा या कदाचित या अनुभूतीचं स्पष्टीकरण देतील, एक आहे ती जगद्विख्यात पुंडलिकाची कथा.
मात्यापित्याच्या सेवेत तल्लीन झालेल्या पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग युगे अठ्ठावीस दोन्ही हात कडेवर ठेवूर उभा आहे, अशी ती कथा. ती नव्याने सांगायला नकोच. जो आपलं काम मन लावून करतो आहे, त्याच्या भेटीसाठी प्रत्यक्ष देव वाट बघत उभा आहे, या भावनेचं प्रकटीकरण हे 'कर कटावरी ठेवोनिया उभा' असलेल्या विठ्ठलमूर्तीतून होतं. कर्मसिद्धांताचा अजून वेगळा काय पुराचा हवा? आजच्या करिअरिस्ट मनोवस्थेलाही अजून काय वेगळं हवंय? आपण दिवसभर कष्ट करावेत आणि घरी कुणीतरी प्रेमाचा सखा वाट पाहत असावा, यापेक्षा अधिक आनंदाचं ते काय असणार आहे? असं मायेनं वाट बघणारा कुणीतरी विठू पंढरीला कायम थांबला आहे, या भावनेतूनच ती अनुभूती येत असेल का? आपल्या कष्टाची, नीतीची जाणीव असणारं कुणी आहे, ही भावनाच विठुराया आहे. त्या भावनेशी तिथे येणारा प्रत्येक जण तादात्म्य पावत असेल, तर त्या विचारानेच गाभारा भारून जात असणार.
तीच गोष्ट दुसऱ्या मिथकाची रुसून दिंडीरवनात आलेल्या रुक्मिणीला शोधून तिची समजूत काढायला पतीपरमेश्वर तिथवर आला.. ही कथा कृष्णरूपातून आकाराला आली आहे. राधेशी जवळीक दाखवल्याने रखुमाय रुसली. देवाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो तिचा रुसवा काढायला आला. मायेची, प्रेमाची ही आस परमेश्वर आपल्याच उदाहरणांतून दाखवून देत असेल, तर त्याने भक्ताची चित्तशुद्धी होणं स्वाभाविकच.. किंबहुना रा. चिं. ढेरे म्हणतात तसं - ही कथा मराठी संतांच्या भूमिकेची निदर्शक आहे. त्यांनी देवालाही विवाहबाह्य संबंधांच्या मोहातून सोडवले आणि गृहस्थाश्रमाची प्रतिष्ठा वाढली. रुक्मिणी गेलीही दिंडीरवनात म्हणजे चिंचेच्या बनात. प्रणयाचं हे रूप साखरेसारखं गोड मिट्ट नव्हे, त्यात मस्ती आहे, चेष्टा आहे, हवाहवासा लोभ आहे. हे असं प्रेम बहुजनांच्या आवाक्यातलं आहे. भक्ताच्या भावनांना, विचारांना प्रतिष्ठा देणारा हा देव आहे.
एकाचवेळी हा राया गोपालक आहे, आवडीने काल्याचा नैवेद्य खाणारा आहे. भक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडून गप्पा मारताना स्वतःला विसरणारा आहे. (म्हणून तर रखुमाई चिडून अजूनही आपल्या महालीच आहे), त्याचवेळी तो ज्ञानी मौन बाळगणाराही आहे. विष्णुरूप आहेही आणि तरीही दशावतारांहून वेगळा आणि सहस्रनामांमध्ये न मावणारा असा हा 'लोकदेव' आहे. क्वचित त्याची बुद्धरूपाशी सांगड घातली गेली आहे.
दशावतारांमधली पहिली आठ रूपे अष्टरसांच्या ठायी कल्पून नवव्या रसाची कल्पना पांडुरंगाठायी करुणरसाने केली आहे. (श्री विठ्ठल एक महासमन्वय - रा. चिं. ढेरे) असा लोकधर्मी असलेला हा विठ्ठल गेली हजार वर्ष सर्वसामान्य भाविकांना आपल्याकडे आकर्षित करतो आहे, यात नवल ते काय ?
सिने निर्मात्या व ललित लेखक