

विशेष
राजा गायकवाड
एक पारदर्शक, दुसरी सोनेरी; एकाची चव जवळपास न्यूट्रल, तर दुसरीचा प्रत्येक घोट अरोमा आणि फ्लेव्हरने भरलेला! व्होडका आणि व्हिस्की दोन्हीही शेवटी इथेनॉलच असले, तरी त्यांची ओळख, निर्मितीची पद्धत आणि पिण्याचा अनुभव मात्र पूर्णपणे वेगळा आहे. कच्चा माल, डिस्टिलेशन, एजिंग आणि ‘कंजेनर’ या सगळ्यांचा या फरकात मोठा वाटा असतो. मग व्होडका इतकी पारदर्शक का असते आणि व्हिस्कीला तो सोनेरी रंग कुठून मिळतो? दोन्हींच्या नशेत खरोखर काही फरक असतो का? चला, या दोन लोकप्रिय मद्यांच्या दुनियेचा रंजक वेध घेऊया.
मला बरेच मद्यरसिक व चौकस लोक हा प्रश्न विचारतात की, सर्वच प्रकारचे मद्य हे इथेनॉलच असते तर मग त्यात व्हिस्की, रम, व्होडका, जीन, टकिला असा फरक का केला जातो? प्रश्न अतिशय तर्कशुद्ध व योग्य आहे. पण याचे उत्तर सोपे आहे. वर उल्लेख केलेले सर्व मद्याचे प्रकार हे इथेनॉल असले तरी ते बनवण्याची पद्धत, त्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, एजिंगची पद्धत यांत फरक असल्याने ही मद्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात.
व्होडका ही रशिया व पोलंड या देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले पेय आहे. त्या देशांचे हे राष्ट्रीय पेयच म्हटले तरी चालेल. जसा व्हिस्कीचा अर्थ "वाॅटर ऑफ लाइफ" होतो, तसा व्होडकाचा अर्थ "पाणी" असा होतो. इतिहासाच्या पानांवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, मध्ययुगीन काळात औषधी वनस्पतींचे अर्क काढण्यासाठी आणि जंतुनाशक म्हणून सर्वप्रथम या पेयाचा वापर केला जात असे. व्होडका हे पेय मुख्यत: बटाटा, राई, गहू, या स्टार्चयुक्त पदार्थांपासून बनवले जाते. अर्थात आता काही ब्रँडसने मका, उस, फळे, मध यांपासून बनवलेली व्होडका बाजारात आणली आहे.
व्होडका आणि व्हिस्कीत मुख्य फरक म्हणजे व्होडकाचे व्हिस्कीप्रमाणे बॅरलमध्ये एजिंग केले जात नाही. बॅरलमध्ये एजिंग न केल्याने व्होडका हा कुठलाही सोनेरी, डार्क रंग न घेता पाण्याप्रमाणेच पारदर्शक राहतो. यामुळेच व्होडका दिसायला अतिशय साधी वाटत असली तरी तिची निर्मिती प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. दुसरा फरक म्हणजे व्होडकाचे अनेक वेळा डिस्टीलेशन केले जाते. त्यामुळे कच्चा माल जो आहे, त्या धान्याची मूळ चव ही काढून टाकली जाती व खऱ्या अर्थाने न्यूट्रल स्पिरीट तयार होते.
या अनेक वेळा डिस्टीलेशन केल्याचा फायदा म्हणजे व्होडकात 'कंजेनर' (Congener) अत्यल्प प्रमाणात असतात, जे की हँगओव्हरला कारणीभूत आहेत. त्यामुळे व्हिस्की पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बहुतांश वेळा हँगओव्हर होतो, तो व्होडका पिल्यानंतर होत नाही. अर्थात यात आपण किती प्रमाणात मद्यप्राशन करतो हा भाग असला तरी मुख्य कारण व्होडकात कंजेनर अत्यल्प असणे हे आहे. अर्थातच, खूप जास्त प्रमाणात व्होडका पिला तर डोके जड पडून हँगओव्हर होणारच.
आता हे कंजेनर म्हणजे काय? तर मद्याचे फर्मेंटेशन व डिस्टीलेशन होत असताना इथेनॉलव्यतिरिक्त जे केमिकल तयार होतात, त्यांना कंजेनर म्हणतात. व्होडकाचे डिस्टीलेशन हे व्हिस्कीपेक्षा खूप जास्त वेळा होत असल्याने त्यात कंजेनरचा अंश शिल्लक राहत नाही. पण यात आणखी एक भानगड अशी की, बऱ्याचदा चव आणि रंगासाठी कंजेनर आवश्यक असतात. विशेषत: डार्क लिकर जसे की, व्हिस्की विशेषत: बोर्बन (Bourbon), रेड वाईन, रेड रम यात जास्त कंजेनर असतात. तसेच जास्त वेळा डिस्टीलेशन करून "हेड्स" (Heads) आणि "टेल्स" (Tails) काढून टाकले जातात. ही अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाची पायरी मद्यातील विषारी घटक दूर करण्याचे काम करते.
प्रत्येक ब्रँडची व्होडका बनवण्याची पद्धत वेगळी असते. काही उत्पादक व्होडकाचे चारकोल फिल्टरेशन (Charcoal filtration) करतात. व्हिस्कीप्रमाणेच बॅरलमध्ये एजिंग करण्याची पद्धत नसल्याने व्होडकाला रंग नसतो आणि खरेतर स्वतःची अशी चवही नसते. स्वतःची चव नसणे हेच मुख्य कारण आहे की, बहुतांश कॉकटेल्ससाठी व्होडका वापरला जातो. व्होडकाला चव नसली तरी बऱ्याचदा चवीसाठी वेगवेगळे फ्लेवर्स वापरले जातात. विशेषत: अलीकडच्या काळात फ्लेवर्ड व्होडका हा प्रकार बराच लोकप्रिय झालेला आहे.
माझ्या माहितीनुसार, फ्लेवर्ड व्होडका हे बाजारात प्रथम 'Absolut' ने आणले. यांत आपणांस ऑरेंज, सायट्रस, वॉटरमेलन, ॲपल, व्हॅनिला अशा अनेक चवीत मिळतात. यात एक गमतीचा भाग आहे. मी नेहमी म्हणत असतो की भारतीयांना मद्य हे चवीने पिण्याची चीज आहे, त्यातही एक नजाकत आहे हेच ठाऊक नाही. आपले लोक अगदी महागडी स्कॉचदेखील सोडा टाकून तिचा अपमान करतात. भारतीय उपखंड म्हणजेच भारत, बांगलादेश व पाकिस्तान वगळता जगात इतरत्र कोठेही शक्यतो स्कॉचमध्ये सोडा किंवा कोक टाकत नाहीत. मद्याबद्दलचे अज्ञान व गैरसमज हे याचे मुख्य कारण आहे.
तसाच प्रकार व्होडकाच्या बाबतही तुम्हाला आढळेल. अलीकडच्या काळात बारमध्ये गेले असता तुम्हाला बऱ्याच टेबलवर Smirnoff किंवा Magic moments च्या निळ्या रंगाच्या बाटल्या दिसतील. हे या कंपन्यांनी नवीनच बाजारात आणलेला जांभूळ फ्लेवर्ड व्होडका आहे. हा प्रकार अचानक इतका लोकप्रिय होण्याच्या कारणांचा शोध घेतला असता, मला असे समजले की, बरेच डायबेटिस पेशंट्स हल्ली जामुन व्होडका पित आहेत असे विनोदी व चमत्कारिक उत्तर मिळाले. आता यावर काय बोलावे? याचे मी टेस्टिंग करून बघितले असता मला असे आढळले की, यांत जांभळाचा फक्त फ्लेवर आहे. हा काही जांभळाचे infusion करून बनवलेला व्होडका नाही. हा म्हणजे लोकांना शुद्ध वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. त्यापेक्षा प्लेन व्होडका घेऊन त्यात ज्यूस मिसळणे केव्हाही चांगले.
बऱ्याच कॉकटेल्ससाठी व्होडका प्रिफर केला जातो. याचे कारण असे की, याला विशिष्ट चव व वास नसतो. आपण सर्वांनी मेन्यूकार्डवर 'स्क्रू ड्रायव्हर' किंवा 'ब्लडी मेरी' हे कॉकटेल वाचले असेलच. ते बनते व्होडकापासून. शिवाय, विविध प्रकारच्या सिरप्स आणि फळांच्या रसांसोबत ही सहज मिसळत असल्याने बारटेंडर्सची ही नेहमीची पसंती असते.
व्होडका ही नीट पिली जाते किंवा थोडे स्प्राईट, पाणी आणि आइसबरोबर घेतला जातो. यांत देखील साधारण ४० टक्के ABV (Alcohol by volume) असते. म्हणजेच किक बसण्याच्या दृष्टीने व्हिस्की आणि व्होडकात काहीच फरक नाही. मित्रमंडळींची मैफिल जर दुपारी बसली तर शक्यतो मंडळी व्होडकाला पसंती देतात. का? याचे उत्तर मला अद्याप मिळालेला नाही. पण व्होडका पिल्यानंतर तोंडाचा कमी वास येतो वगैरे निव्वळ गैरसमजुती! वैयक्तिक मी प्राधान्याने Grey Goose किंवा Absolut हा ब्रँड पसंत करतो.
व्हिस्की चांगली की व्होडका, हा प्रश्न मला काही जण विचारतात. मुळात प्रश्नच चुकीचा आहे. दोन्हीही वाईटच; परंतु मी व्हिस्कीलाच पसंती देतो. याचे कारण म्हणजे त्यातील अरोमा आणि चवीसाठी. कच्च्या मालाच्या नैसर्गिक स्वादाचा वारसा जपत केलेली मद्याची निर्मिती आणि त्याचा रसास्वादाचा अनुभव मला अधिक सुखद वाटतो. अर्थात नशा ही पिणाऱ्याच्या रसिकतेत किंवा तो किती नजाकतीने पितो त्यावर अवलंबून आहे. कारण, नशा शराब मे होती तो नाचती बोतल!