भारतीय संस्कृतीतील वृषभ महात्म्य

भारतीय संस्कृतीत बैल म्हणजेच वृषभ हा श्रम, सामर्थ्य, श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. भीमबेटकाच्या गुंफाचित्रांपासून, सिंधु संस्कृतीतील मुद्रा, वैदिक साहित्य, पुराणे, जैन-बौद्ध परंपरा ते सम्राट अशोकाच्या स्तंभांपर्यंत त्याचे दर्शन घडते. शिवाचा नंदी रूपातील बैल तर सामर्थ्य व रक्षणाचे प्रतीक ठरतो. बैल पोळ्यानिमित्त भारतीय संस्कृतीतील वृषभाचे महत्त्व सांगणारा हा लेख.
भारतीय संस्कृतीतील वृषभ महात्म्य
Published on

पाऊलखुणा

भारतीय संस्कृतीत बैल म्हणजेच वृषभ हा श्रम, सामर्थ्य, श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. भीमबेटकाच्या गुंफाचित्रांपासून, सिंधु संस्कृतीतील मुद्रा, वैदिक साहित्य, पुराणे, जैन-बौद्ध परंपरा ते सम्राट अशोकाच्या स्तंभांपर्यंत त्याचे दर्शन घडते. शिवाचा नंदी रूपातील बैल तर सामर्थ्य व रक्षणाचे प्रतीक ठरतो. बैल पोळ्यानिमित्त भारतीय संस्कृतीतील वृषभाचे महत्त्व सांगणारा हा लेख.

भारतीय संस्कृतीमध्ये, विविध स्थानिक कलांमध्ये बैलाचं महत्त्व आगळं आहे. मानवाने शेतीचा शोध लावल्यापासून मानवी संस्कृतीमध्ये बैलाचे महत्त्व वाढले. बैल शेतकऱ्यासोबत शेतात वर्षभर राबराब राबतो. शेतात पिकवलेल्या प्रत्येक दाण्यांमध्ये त्याचाही वाटा असतो. शेतकऱ्यासोबतचे त्याचे संबंध अगदी जीवाभावाचे असतात. घरातील एका सदस्यासारखे. प्राचीन काळापासून आजतगायत हे भावबंध कायम आहेत. हे बंध कधी शब्दांमध्ये, कधी चित्रांमध्ये तर कधी शिल्पांमध्ये उमटले आहेत.

भीमबेटका येथील गुफांमधल्या भित्तीचित्रांमध्ये, सिंधु काळातील मुद्रांवर, वैदिक साहित्यामधल्या ऋग्वेद या ग्रंथामध्ये, वराह पुराण, श्रीलिंगपुराण या पुराणग्रंथांमध्ये बैलांचे चित्रण केलेले दिसते. त्यानंतर मौर्य काळात सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर बैल रेखांकित झालेला दिसतो. मध्ययुगीन काळातील शिवाच्या मंदिरातही नंदी रूपाने बैल आहे.

अश्मयुगात गुंफामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र काढणाऱ्या आदिम मानवासाठीही बैल हा विशेष आवडीचा विषय राहिला आहे. अश्मयुगीन मानवाने शैलचित्रांमध्ये कधी कळपामधला, कधी सामर्थ्यशाली रूपातला, कधी कुबड असलेला, कधी टोकदार किंवा लांब शिंगांचा, तर कधी यू-आकाराची शिंग असलेला बैल विविध रीतीने रेखाटला आहे. गाईंच्या कळपात असतानाही त्याची देहयष्टी व देखणेपणा यामुळे तो सहज वेगळा ओळखला जातो. भीमबेटका गुंफा क्रमांक तीनमध्ये लाल रंगात एक तरुण बैल रेखाटलेला आहे. घट्ट बांध्याचा, टोकदार शिंगांचा हा बैल ताठ, सावध आणि शांत भासतो. संपूर्ण शरीर रंगाने भरलेले असूनही देहबांध्यातील ताठरतेतून त्याचा स्वभाव स्पष्ट दिसतो. कळपाच्या दृश्यात हा बैल ठळकपणे उठून दिसतो, जणू तोच त्यांचा अधिपती आहे.

हडप्पा संस्कृतीत सिंधु काळात बैलाला फार महत्त्वाचे स्थान होते. सिंधु मुद्रांवर प्रामुख्याने प्राण्यांची चित्रे कोरलेली असून, त्यातील सर्वोत्कृष्ट चित्रण बैलाचे आहे. मुद्रांवर तर तो विशेषत्वाने दिसतो. शिवाय भांड्यांवरील नक्षीतही तो आहे. बैलाच्या भाजक्या मातीच्या मूर्ती तर उत्खननांमधून विपुल प्रमाणात आढळतात. सिंधु मुद्रांवर बैल उभा दाखविलेला असतो. तो चांगला धष्टपुष्ट असून त्याच्या वळणदार शिंगांमुळे तो आपल्याकडील खिलारी जातीच्या बैलाप्रमाणे वाटतो. हुबेहूब असे दिसणारे बैल महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकात आज देखील पहावयास मिळतात. मुद्रेवरील बैलाची पोळी खूप लोंबणारी असून तिला वळणदार घड्या पडलेल्या दिसतात. त्याचे उंच, अर्धगोलाकृती वशिंड आणि पिळदार स्नायू यांचे चित्रण तर अवर्णनीय आहे. शेपूट लांबलचक असून जमिनीपर्यंत पोहोचलेले असते. आज जसे पोळ्याचा सण असला म्हणजे बैलाला रंगवून मिरवणुकीने नेतात, तसा एखादा बैलांचा सण त्या काळातही असावा, असे बैलांच्या चित्रांवरून म्हणता येईल.

वैदिक साहित्यामध्ये अग्नी, इंद्र, वायू आणि इतर अनेक देवतांची वैशिष्ट्यं बैलाशी जोडली गेली आहेत. ऋग्वेदात ‘ऋषभ’ हा शब्द बैलासाठी वापरला गेला असून तो अग्नी, इंद्र, रुद्र आणि द्यौस यांसारख्या देवतांसाठीही वापरला आहे. अग्नीला असा बैल म्हटले आहे, जो जोरात गर्जतो; शांत असलेला बैल छेडल्यावर जसा उग्र होतो, तसाच अग्नी प्रज्वलित झाल्यावर प्रखर बनतो, असे म्हटले आहे. इंद्राची तुलना अशा बैलाशी केली आहे, जो पर्जन्य देतो, पण कधी कधी महापूरही आणतो. रुद्रालाही प्रजापतीकडून निर्माण झालेल्या बैलाशी जोडले आहे. यजुर्वेदामध्ये बैल व बैलजोडी नांगर ओढत आहेत आणि गाडा खेचत आहेत, याचे संदर्भ सापडतात. ऋग्वेदात वर्णन केलेले बैलाचे एक वैशिष्ट्यपूर्ण संमिश्र रूप चार शिंगे, दोन मस्तके, तीन पाय, सात हात आणि त्रिगुणबंधनांनी बांधलेले असे आहे. पुराणांमध्ये बैलाला अग्नी, इंद्र, द्यौस यांसारख्या नैसर्गिक देवतांचे प्रतीक मानले आहे. वामन पुराणात शिवाचे वाहन म्हणून बलवान, सामर्थ्यशाली, वेगवान व तत्पर अशा बैलाचे वर्णन आहे. जिथे बैल असतो, तिथे अपायकारक शक्ती येत नाहीत, असे त्यात म्हटले आहे.

श्रीलिंगपुराणात महादेवाच्या नंदी रूपाची उत्पत्ती वर्णिली आहे. नंदी हा शिलाद आणि सुरभीचा पुत्र असून शिवासारखे स्वरूप व गुणधर्म लाभलेला होता. रुद्राच्या गुणांचा प्रतीक म्हणून नंदीला स्वर्गातील देवता, पृथ्वीवरील जीव आणि विविध आत्म्यांचा अधिपती मानले जाते. शिवाचे प्रतीकात्मक रूप असलेला नंदी बलवान, बुद्धिमान, चपळ, शांत, परंतु प्रसंगी उग्र, स्नायुसंपन्न, आक्रमक आणि प्रजननक्षम आहे. हे सर्व गुण शिवाशी सुसंगत आहेत. त्यामुळेच शिवासोबत नंदीचीही पूजा केली जाते. दक्षयज्ञाच्या वेळी सतीचे रक्षण करण्यासाठी शिवांनी नंदीला पाठविले होते. शिव-नंदी यांचे हे नाते त्यांना परस्परपूरक बनवते. जैन धर्मातही पहिल्या तीर्थंकर ऋषभनाथांचे प्रतीक बैल आहे. प्राचीन बौद्ध साहित्यातही बैल, हत्ती, सिंह, हंस, माकड यांसारख्या प्राण्यांचा उल्लेख बुद्धांच्या पूर्वजन्मांत आढळतो. ‘नंदीविशाल जातका’त बुद्धाचा जन्म सामर्थ्यवान बैलाच्या रूपात झाल्याचे वर्णन आहे.

काही मंदिरांमधील शिल्पांमध्ये बैलाची आकृती हत्तीच्या आकृतीवर अध्यारोपित केलेली असते. ही सजावटीची शिल्पे स्तंभांच्या कपारींमध्ये किंवा मोकळ्या जागांवर बसवलेली असतात. बैल आणि हत्ती यांचे तोंड एकच असते, पण शरीर वेगवेगळे असून ते भिन्न दिशांना वळलेले असतात. हाताने हत्तीचे शरीर झाकले की, संपूर्ण बैलाची आकृती दिसते, आणि उलटपक्षी बैल झाकला की हत्तीची आकृती उभी राहते. जणू दोन्ही प्राणी शक्ती, आकार आणि स्वभावाने समसमान आहेत, अशी भासमानता निर्माण होते. अशा शिल्पांची उदाहरणे अनेक ठिकाणी आढळतात. बदामीच्या गुहेच्या प्रवेशद्वाराबाहेर त्रिशूळ हातात धारण केलेल्या द्वारपालाच्या पुतळ्याखालील कपारीत, बैल-हत्ती यांच्या या जोडशिल्पाचा देखणा नमुना पाहायला मिळतो. याच प्रकारची शिल्पे दारासुरम, त्रिभुवनम आणि पट्टदकल मंदिरांमध्येही आढळतात.

वैदिक ऋचांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी नंतरच्या काळात राज्यकर्त्यांनी शिल्पकला आणि चित्रकलेचा वापर केला. मौर्य सम्राट अशोकाने बैल-स्तंभ उभारून वैभवाचे आणि आपल्या सत्तेचे प्रदर्शन केले. सम्राट अशोकाने उभारलेला बिहार, रामपूरवा येथील बैल-स्तंभ भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय उदाहरण आहे. त्याची ठेवण अगदी नैसर्गिक भासते. चुनखडीच्या दगडावर केलेल्या ‘मौर्यकालीन पॉलिश’मुळे तो आजही नव्यासारखा झळाळतो. १९४८ मध्ये हा भव्य स्तंभ नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात स्थापित करण्यात आला.

गुप्त, सातवाहन, पल्लव, चालुक्य, राष्ट्रकूट, पांड्य, चोल अशा राजवटींनी कलांचा विकास केला. शैव पंथीय राजांनी बांधलेल्या मंदिरांत शिवलिंगासमोर एकाश्म नंदी प्रतिष्ठापित केला जाई. दक्षिणेकडील मंदिरांत आजही असे नंदी बघायला मिळतात. शिवाचे वाहन म्हणून नंदी हे हिंदू प्रतीकांमधील सर्वात जुने रूप मानले जाते. मिसरच्या ‘अपिस’ व मेसोपोटेमियाच्या ‘मर्दुक’प्रमाणे इतर प्राचीन संस्कृतींमध्येही बैल देवस्वरूपात पूजला जात असे. शिवमंदिरात नंदीचे स्थान विशेष मानले जाते. नंदी हा असा एकमेव वाहनदेव आहे, ज्याची स्वतंत्रपणेही पूजा केली जाते. सामर्थ्य, श्रद्धा आणि सातत्याचे प्रतीक असलेला नंदी मंदिराचा रक्षक मानला जातो. तो बहुधा विशाल आकारात व उंचावर ठेवला जातो, जेणेकरून चारही दिशांवर लक्ष ठेवता येईल. शिवाने दिलेल्या अमरतेच्या माळांनी सजलेला नंदी संकटांत सगळ्यांचे रक्षण करतो.

थोडक्यात, शेतामधला बैल असो किंवा मंदिरामधला, शिल्पांमधला किंवा चित्रांमधला, तो सतत माणसाची सोबत करत असतो. साथ देत असतो. म्हणूनच बैल पोळ्यासारखा कृतज्ञतेचा सण अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

rakeshvijaymore@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in