विशेष
सौ. वृंदा कांबळी
११ जानेवारी- माणुसकीला साहित्याचा आत्मा मानणारे थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांची जयंती. मानवी वेदना, संघर्ष आणि आत्मबोध यांचा संवेदनशील आविष्कार करणारे वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही काळाच्या पलीकडे जाऊन वाचकांशी संवाद साधते.
साहित्याचा खरा धर्म माणसाला माणूस बनवणे हाच आहे,' ही ओळ वाचताच वि. स. खांडेकरांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. ज्यांचे जीवन सुख-दुःखांनी भरलेले, पण मनाने सदैव संवेदनशील राहिले. त्यांच्या प्रत्येक शब्दात माणसाच्या अंतरंगाची मखमली जाणीव, त्याच्या वेदनांचा वास आणि मनाच्या गूढ कोपऱ्यांशी संवाद साधण्याची क्षमता दिसते. खांडेकरांचे साहित्य केवळ कथाच नव्हे, तर माणसाच्या आत्म्याशी बोलणारे मंत्र होते. ज्याने आपल्याला हसू आणले, आपल्याला घाबरवले आणि शेवटी आपल्याला आपलेच आयुष्य समजावून सांगितले. समाजातील विषमता, दारिद्र्य, अन्याय आणि साध्या माणसाचे लहान-मोठे दुःख या सगळ्याचे त्यांच्या लेखनात प्रतिबिंब दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये फक्त कथा नाहीत; त्यामध्ये माणसाचा शोध, मानवतेची तपस्या आणि आत्मबोधाचा प्रवास आहे. वाचकाच्या हृदयाशी थेट भिडणारे हे साहित्य आजही तितकेच जिवंत आहे आणि मराठी मनाच्या संवेदनांना कायमच स्पर्श करते.
हा नववीत असतानाचा किस्सा आहे. 'काय वाचतेस?' मोठ्या भावाच्या (तात्या) या प्रश्नाने लपून वाचत बसलेली मी क्षणभर दचकले. आता रोजच्यासारखा वाचनासाठी ओरडा खावा लागणार या विचाराने घाबरून कंपित स्वरात, हळू आवाजात मी सांगितले, 'अमृतवेल' वाचतेय. यावर रत्नागिरीहून आलेला माझा भाऊ आनंदित झाला. माझ्या पाठीवर शाबासकीचा हात मारत म्हणाला, "वा. खांडेकरांचे पुस्तक, छान आहे. वाचत जा खांडेकरांची पुस्तके." तात्याच्या या सांगण्याने माझ्या वाचनाला जणू प्रेरणाच मिळाली. मी झपाटल्यासारखी त्यांची पुस्तके वाचू लागले. त्यांच्या साहित्याने मनावर केलेले गारूड अद्याप उतरलेच नाही. माझ्याच नव्हे तर अनेक भारतीय भाषांमधील असंख्य भारतीय रसिकांच्या मनावर त्यांचे साहित्य आजही गारूड करून राहिलेले आहे.
वि. स. खांडेकर यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी १९७४ साली भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना 'ययाति' या कादंबरीसाठी मिळाला, ही कादंबरी आजही वाचकांना जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार करायला प्रवृत्त करते. या पुरस्कारामुळे त्यांच्या साहित्यिक कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आणि मराठी साहित्याचा गौरव अधिक उंचावला.
अनेक समीक्षक त्यांच्या साहित्यातील न्यून दाखवतात. पण इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या साहित्याची जादू कमी झालेली नाही. रसिकांना त्यांच्या कलाकृती तितक्याच वेड लावतात. त्यांच्या कलाकृती या काळाच्या मर्यादा ओलांडून पिढ्यान्पिढ्या माणसांशी संवाद साधतात. त्यांच्या साहित्यात मानवी मनाचे अनेक कंगोरे दाखवले आहेत. मानवी संघर्षातून शेवटी आत्मबोध सांगितला आहे. त्यामुळेच ते साहित्य सामान्य माणसाला आपलेच वाटते. त्याला काळाची कुंपणे नाहीत. हिंदी, कानडी, तमिळ, उरिया, बंगाली, गुजराती, मल्ल्याळम आणि इंग्रजी इतक्या भाषांमधून त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली. त्यामुळे भारतीय माणसाला खांडेकर आपलेच वाटतात. भारतीय माणसाच्या मनाला भिडण्याचे खूप मोठे सामर्थ्य त्यांच्या साहित्यात आहे.
खांडेकरांची शैली सुभाषितप्रचूर होती. ती त्या त्या सुभाषितातून मानवी मनातील माणुसकीला व संवेदनशीलतेला आवाहन करते. त्यांच्या साहित्यात आदर्श जीवनाचे एक चित्र असे. जीवन कसे आहे हे सांगून ते थांबत नाहीत तर जीवन कसे असावे हेही चित्रित करतात. पांढरपेशा वर्ग व कष्टकरी वर्ग यांच्यातील सामाजिक विषमतेची जाणीव त्यांना अस्वस्थ करते. 'दोन ध्रुव'मध्ये हे विषमतेचे वातावरण त्यांनी मांडले आहे. दोन वर्गातील अंतर कमी करण्याची सामाजिक गरज सांगणारे 'हिरवा चाफा' सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मानसिक परिवर्तनाची बाजू मांडणारे 'दोन मने'; अशी त्यांच्या साहित्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यांच्या कादंबऱ्या सामाजिक आदर्शाचे ध्येय सांगणाऱ्या आहेत. काळाच्या खूप पुढे पाहणाऱ्या लेखकांमधले ते एक होते. म्हणूनच रसिकांच्या मनावर आजही त्यांच्या साहित्यकृती अधिराज्य करतात. ते द्रष्टे विचारवंत होते. समाजातील विविध प्रश्नांना त्यांनी साहित्यातून वाट करून दिली. त्यांची जीवनाभूती व कलात्मक आविष्कार यात प्रामाणिकपणा दिसून येतो. त्यावेळेस अनेक साहित्य प्रवाह होते. पण कोणत्याही साहित्य प्रवाहाचा त्यांच्या कलाकृतीवर परिणाम झाला नाही. त्यांनी स्वतःची वेगळी वाट निवडली. त्यांचे साहित्य त्यामुळेच स्वतःचा असा एक वेगळाच प्रकृतीधर्म घेऊन वाचकांसमोर आले. मानवी मूल्यांचा जागर त्यांनी आपल्या साहित्यातून केला. सामान्य माणूस हा त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होता. माणूस आणि मानवता यावर अपार प्रेम करणारे असे लेखक म्हणून ते प्रचलित होते.
त्यांची शंभराच्या पलीकडे पुस्तके होती. वाङ्मयाच्या सर्व दालनातून त्यांनी मुक्तपणे संचार केला. कविता, कथा, रूपक कथा, कादंबरी, नाटक, लघु निबंध, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, प्रस्तावना, अध्यक्षीय भाषणे अशा सर्व प्रकारात विपूल लेखन केले. त्यांच्या लेखनात म्हणूनच वैविध्य आहे. वाङ्मयीन प्रकार कोणताही असूदे, त्यातील आशयसूत्र हे जीवननिष्ठ ध्येयवादाशीच निगडित असे. माणुसकीच्या, समाजवादाच्या, समतेच्या तत्त्वावर, समानतेच्या पायावर समाजाची पुनर्बांधणी करणे हा मुख्य भावरूप आशय असे. समाजातील अनेक अनिष्ट गोष्टी ते हद्दपार करू इच्छितात. दारिद्र्य, विषमता, स्त्रियांवरील अनेकविध अन्याय हे सर्व नष्ट व्हावे यासाठी आदर्श समाजरचनेची आवश्यकता त्यांना वाटते. ही त्यांची आस साहित्यातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच ते नैतिक गुणांना प्राधान्य देतात.
त्यांचे साहित्य हे केवळ स्वप्नरंजन नव्हते. कल्पनेच्या भराऱ्या घेऊन चितारलेली चित्रे नव्हती. त्यांच्याकडून अशाच वेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती का झाली असेल, याचा विचार करत असताना त्यांच्यातील साहित्यिकाबरोबर त्यांच्यामध्ये वसत असणाऱ्या माणसाचा शोध घ्यावा लागतो. त्यांचे सुखदुःखांनी भरलेले वैयक्तिक जीवन व त्याला समांतर झालेला त्यांचा साहित्यिक प्रवास याविषयी लिहायचे झाले तर खूप लिहिता येईल. एका लेखाच्या चौकटीत त्यांच्याविषयी, त्यांच्या साहित्याविषयी सांगता येणार नाही. त्यांच्या साहित्यावर अनेक पुस्तके आहेत. पण या लेखात खांडेकरांमधील मला त्यांच्या साहित्यातून जाणवलेला माणूस खूप मोठा वाटतो त्याविषयी सांगावेसे वाटते. 'एका पानाची कहाणी' हे त्यांचे आत्मचरित्र वाचले तरी त्यांच्या जीवनातील सुखदुःखांचा आलेख व त्यांच्या दुःखांची दाहकता जाणवते. हजारो पानांचे साहित्य निर्माण करणाऱ्या या व्रतस्थ साहित्यिकाने आपल्या जीवनचरित्राला 'एका पानाची कहाणी' म्हणावे हे खूपच अर्थपूर्ण आहे. त्यातून त्यांच्यासारख्या महान प्रतिभावंताची हृद्य अशी विनयशीलता, प्रांजल नम्रता दिसून येते. त्यांच्या जीवनातील चढउतारांचा, सुखदुःखांचा स्पष्ट आलेख दिसतो. त्यांना आर्थिक संकटांना नेहमीच सामोरे जावे लागले. घरात आजारपणे असत. एका महान साहित्यिकाला भोगावी लागणारी दुःखं पाहून आपणही व्यथित होतो.
ऐन उमेदीची अठरा वर्षे त्यांनी शिरोड्यात काढली. शिरोड्यातील वास्तव्यात त्यांचा लेखक म्हणून जीवनप्रवास सुरू झाला. शिरोड्यातील वास्तव्यात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. तत्कालीन लोकजीवनाचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला होता. सामाजिक विषमता, दारिद्र्य, मध्यम वर्गाची संघर्षमय परिस्थिती, त्यांचे प्रश्न, स्त्रियांवरील अन्याय, कौटुंबिक प्रश्न, माणसांची निष्क्रियता इत्यादी अनेक सामाजिक गोष्टी त्यांना व्यथित करत असत. इथेच राहून या समाजाची सेवा करावी असे त्यांनी ठरवले. शिरोडा परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शाळेत आणून त्यांना संस्कारित करण्यासाठी प्रयत्न करत असताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या वैयक्तिक दुःखांपेक्षा त्यांच्या सामाजिक परिस्थितीविषयी वाटणाऱ्या दुःखांचा परीघ अधिक व्यापक होता. त्यांचे संवेदनशील मन या साऱ्या व्यथांची, दुःखांची, वेदनांची ओझी वाहत असताना हे सारे त्यांनी आपल्या साहित्यातून ओतले व मन रिते केले.
शिरोड्यात वास्तव्यास असताना शिरोडा परिसरातील जादूई निसर्गाने त्यांना भूरळ घातली. इथल्या नागमोडी लाल रंगाच्या पायवाटा, इथले आकर्षक व स्वच्छ समुद्रकिनारे, पसरलेल्या पांढऱ्या रंगाच्या पुळणीने सजलेले किनारे, उंचच उंच माडांची बने, आंबराई, हे सगळे मनमोहक चित्र त्यांना आपल्याशी बांधून ठेवी व या निसर्गाशी ते संवादी होत. त्यांच्या पुस्तकातील एक छोटा उतारा देण्याचा मोह आवरत नाही.
'रात्री बाहेर पाहिले की जाळीतून प्राण्याचे डोळे दिसावेत त्याप्रमाणेच माडांच्या हलत्या पानांमधून एखाद्या चांदणीचे दर्शन होई. या माडांवर संध्याकाळी कावळे व इतर पक्षी कलकलाट करत रात्रीच्या विश्रांतीसाठी येथे येत. पहाटेच त्यांची कुजबुज सुरू होई. निसर्ग हा माणसाचा जीवाभावाचा पण अबोल मित्र आहे. माडाचं पान वाऱ्यानं हलत नसून जणू काही आपल्याशी ओळख दाखवण्यासाठी तो आपला हात हालवत आहे, चांदण्या चमकत नसून नेत्रपल्लवी करत आहेत अशा प्रकारचे सुखद भास शिरोड्यातील वास्तव्यात त्यांना होत असत.'
शिरोड्यातील मनमोहक व जादूई निसर्ग व तेथील सामाजिक परिस्थिती यांचा खांडेकरांच्या संवेदनशील मनावर खोलवर परिणाम होऊन त्यांच्यातील हळुवार व संवेदनशील माणूस व्यथित झाला. त्यांच्यातील माणसाच्या मनाची वेदना त्यांच्या साहित्याच्या प्रेरणास्थानी असावी, म्हणूनच त्यांच्या हातून महान अशा अलौकिक साहित्य कृती घडल्या. साहित्यिक म्हणून कसे जगावे आणि साहित्याचे व्रत कसे जोपासावे, याचा एक आदर्श वस्तुपाठ खांडेकरांनी घालून दिला. आपली सर्व बौद्धिक आणि भावनिक शक्ती त्यांनी केवळ वाङ्मय निर्मितीसाठी अर्पिली. त्यांच्या साहित्यातील हाच 'माणूस' आजही वाचकांना आपल्यातल्या माणसाचा शोध घ्यायला प्रवृत्त करतो. अशा या महान माणुसकीच्या उपासकास आणि थोर साहित्यिकास विनम्र अभिवादन!
ज्येष्ठ साहित्यिका
vrindakambli1956gmail.com