त्यांना पीठ हवंय...

कोणतंही युद्ध सुरु झालं की शत्रुपक्षाची नाकेबंदी करताना त्यांची रसद म्हणजेच त्यांचं अन्न तोडलं जातं. पण शत्रूसैन्याच्या बरोबरीनेच शत्रूपक्षाच्या नागरिकांना उपाशी मारणं, हा पायंडा आजच्या आधुनिक काळातही सुरु आहे.
त्यांना पीठ हवंय...
Published on

फूडमार्क

श्रुति गणपत्ये

कोणतंही युद्ध सुरु झालं की शत्रुपक्षाची नाकेबंदी करताना त्यांची रसद म्हणजेच त्यांचं अन्न तोडलं जातं. पण शत्रूसैन्याच्या बरोबरीनेच शत्रूपक्षाच्या नागरिकांना उपाशी मारणं, हा पायंडा आजच्या आधुनिक काळातही सुरु आहे.

अल जझिरा न्यूज प्लॅटफॉर्मची पॅलेस्टाईनमधील पत्रकार मराम हूमेदने लिहिलेल्या एका लेखामध्ये “फ्लावर, फायर ॲण्ड फिअर” (पीठ, आग आणि भीती) असे म्हणत नेमक्या शब्दांमध्ये तिथल्या परिस्थितीचं वर्णन केलं आहे. इस्त्राइल-पॅलेस्टाईन युद्ध संपल्यासारखं वाटत असतानाच पॅलेस्टाईनमधल्या लोकांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. आधी बंदुका, बॉम्ब आणि मिसाईल्सच्या हल्ल्यामध्ये जिवंत राहण्यासाठी धडपड आणि आता जिवंत राहिल्यावर अन्नावाचून मरण अशा भयंकर कचाट्यात ते सापडले आहेत. अन्नाचा तुटवडा, अन्न खरेदी करायला पैशांची कमतरता या गोष्टी आहेतच. पण इस्त्राईलही या परिस्थितीला जबाबदार असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रू पक्षाची रसद तोडणे हे मानवी इतिहासासाठी नवीन नाही. शत्रूपक्षाला कमजोर करण्यासाठी हे एक धोरण अनेकदा अवलंबलं जातं. पण त्याचे महाभयंकर परिणाम दुसऱ्या महायुद्धात पुढे आले.

नाझी हंगर प्लॅन

कम्युनिस्ट रशियाला धडा शिकवण्यासाठी नाझी जर्मनीनेही अशाच धोरणाचा अवलंब केला. त्याला “नाझी हंगर प्लॅन” म्हणून म्हटलं जातं. रशियातील शेतीसधन प्रदेशातून अन्न जर्मनीत आणायचं आणि रशियन जनतेला भूक, उपासमारीने मारायचं असा हा कट होता. महायुद्धा दरम्यान, जर्मनांच्या ताब्यात असलेल्या लाखो सोव्हिएत सैनिकांचा मृत्यू उपासमारीने झाला. हा परिणाम नाझी काळातील अन्नं आणि कृषीमंत्री हबर्ट बाकं याच्या नियोजनाचा भाग होता. याविषयी प्राध्यापक जेसिन गेर्हार्ड यांनी पहिल्यांदाच “नाझी हंगर पॉलिटिक्सः ए हिस्टरी ऑफ फूड इन थर्ड राइश” या पुस्तकाच्या माध्यमातून सखोल माहिती पुढे आणली आहे.

नाझींनी अन्न हे जनतेशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम असल्याचं ओळखलं होतं. त्याचा वापर त्यांनी आपल्या प्रचारासाठी केला. नाझी अन्न धोरणामुळे अंदाजे चार ते सात दशलक्ष लोक ठार झाले, परंतु अन्नं यादृष्टीने त्याकडे बघितलं जात नाही. नाझी हंगर प्लॅननुसार, स्लाव वंशाच्या लोकांना जर्मन शेतकऱ्यांसाठी गुलाम मजूर म्हणून वापरण्याचे ठरले होते. बाकंने सोव्हिएत संघाला “उत्पादन क्षेत्र” (युक्रेन, दक्षिण रशिया, कॉकशस प्रदेश) आणि “तुटवडा क्षेत्र” (बेलारूस, उत्तर आणि मध्य रशिया) असं विभागलं. तुटवडा क्षेत्रातील लोकांना सर्व अन्नसाठ्यापासून पूर्णपणे तोडून उपाशी ठेवण्याचं ठरलं, तर युक्रेन आणि कॉकशसच्या सुपीक जमिनीवरील शेती उत्पादन जर्मन गरजांसाठी वापरायचा निर्णय घेण्यात आला. पूर्व आघाडीवर असलेल्या जर्मन सैनिकांना त्यांनी आक्रमण केलेल्या प्रदेशातून गरजेपुरतं अन्न ठेवून अतिरिक्तं अन्नं आपल्या कुटुंबियांना पाठवण्यास सांगितलं गेलं. पोलंड आणि सोव्हिएत संघातील नागरिकांना अन्नपुरवठ्यापासून जाणीवपूर्वक तोडण्यात आलं, तर लाखो सोव्हिएत सैनिक जर्मन कैदेत उपासमारीने मृत्यूमुखी पडले आणि ज्यू छळछावण्यांमध्ये अन्नाअभावी मरण पावले. याच काळात बहुतांश जर्मन नागरिकांना मात्र उत्तम अन्न रेशनवर मिळत होतं.

यातून अपेक्षित परिणाम नक्कीच साधला गेला. लेनिनग्राड शहरात १९४१ ते १९४४ हा काळ अन्नाचा तुटवडा, उपासमारीत गेला. या दरम्यान, जवळपास दररोज चार हजारांच्या संख्येने नागरिक मरू लागले. जर्मनीने दिलेल्या वेढ्यामध्ये केवळ लेनिनग्राडमध्येच सुमारे १० लाख लोक उपासमारी आणि संबंधित कारणांमुळे मृत्यू पावले. या पीडितांपैकी एक अकरा वर्षांची तानिया साविचेवा होती. तानियाने आपल्या डायरीमध्ये डिसेंबर १९४१ ते मे १९४२ दरम्यान आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या मृत्यूची नोंद केली आहे. तिची १९४२ मधील शेवटची नोंद अशी होती, “सगळे मेले. फक्त तानिया उरली आहे”, आणि त्याचवर्षी तिचाही मृत्यू झाला.

विशिष्ट अन्नाविरुद्धचा प्रचार

एकीकडे शत्रू पक्षाला उपाशी मारताना नाझींनी जर्मन जनतेसाठी मात्र अन्नाची चांगली तरतूद करून ठेवली. तसेच अन्न उत्पादन वाढवण्यासाठी, आर्यन वंश टिकवण्यासाठी आणि वंशाची ‘शुद्धता’ कायम रहावी म्हणून सेंद्रीय शेतीपासून विविध कायदे केले. युद्ध सुरू होण्याआधीच, नाझी सरकारने मांसाला — विशेषतः आयात कराव्या लागणाऱ्या गोमांसाला — पर्याय शोधण्यास प्रोत्साहन दिले आणि देशातील उपलब्ध संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होईल, अशा आहार बदलांच्या सूचना जर्मन नागरिकांना दिल्या. नाझी सरकारने ‘डॅनिश लोणी, पोलिश अंडी, कॅलिफोर्नियातील फळे, अर्जेंटिनातील मांस, कॅनडातील गहू, फ्रेंच वाइन, उष्णकटिबंधीय फळे’ याविरोधात प्रचार मोहिमा राबवल्या आणि ‘पोषण स्वातंत्र्य’ची (nutritional freedom) मागणी केली. नाझी लष्करी अधिकारी हर्मन गॉईंगने लोकांना फक्त जर्मन मातीतून येणारं अन्नं खाण्याचं आवाहन केले. पांढऱ्या गव्हाच्या पावाऐवजी लोकांना संपूर्ण धान्याचा (वॉलकॉर्न) पाव किंवा राई पाव खाण्यास प्रवृत्त केलं. याचं कारण राई ही जर्मनीतील कमी प्रतीच्या जमिनीतही सहज पिकवता येत होती. नाझी नियोजकांनी प्राण्यांना खायला दिल्या जाणाऱ्या नासक्या दुधापासून तयार होणारा ‘क्वार्क’ हा दुग्धजन्य पदार्थ लोणी किंवा मार्गारीनऐवजी वापरण्यास सुचवलं.

स्थानिक अन्नाचा प्रचार

हिटलर स्वतः शाकाहारी होता आणि त्याचं जेवण साधं असल्याचा प्रचार करण्यात आला. बार्लीचे सूप, क्रॅकर्स (बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अगोड पदार्थ), थोडं लोणी आणि चीज पुडिंग असे तो खायचा. गॉबेल्स नीतीसाठी प्रसिद्ध असलेला जॉसेफ गॉबेल्स आपल्या पाहुण्यांना “हेरिंग माशांसोबत उकडलेले बटाटे” इतकेच जेवण द्यायचा व त्यासाठीही त्यांच्याकडून रेशन कूपन घ्यायचा अशी विचित्र उदाहरणं आहेत. नाझींचा दावा होता की, स्थानिक अन्नं हा अधिक नैसर्गिक आहार असून ‘जर्मन वांशिक आरोग्यास’ तो फायदेशीर आहे आणि त्याने प्रजननदर वाढेल. अधिक नैसर्गिक आहाराला प्रोत्साहन म्हणजे पर्यायाने सेंद्रिय शेतीला त्यांनी प्रोत्साहन दिले. पोषण ही सार्वजनिक बाब मानली गेली आणि महिलांना सांगण्यात आलं की, “त्यांचं शरीर फ्युहररच्या मालकीचे (हिटलर) आहे. त्यामुळे त्यांनी जर्मनीसाठी अधिक मुलांना जन्म द्यायला हवा.” अशाच पद्धतीची ‘अधिक मूलं जन्माला घाला’, अशी मागणी अलीकडेच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया-युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केली होती.

मर्यादित अन्न व युथेनेशिया कार्यक्रम

मर्यादित अन्नाचे वाटप ‘योग्य’ (?) पद्धतीने करण्यासाठी युथेनेशिया कार्यक्रम राबवण्यात आला. नाझी डॉक्टरांनी रुग्णालयातील व सामाजिक संस्थांतील रुग्णांना, मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्यांना दयामृत्यूच्या नावाखाली ठार मारलं. त्यातून लहान मुलंही सुटली नाहीत. “फॉग इन ऑगस्ट” या चित्रपटात तसेच दुसऱ्या महायुद्धावरच्या अनेक चित्रपटांमध्ये याचं चित्रण आलं आहे. अन्नाचा जास्तीत जास्त वापर करायचा म्हणून नाझींनी झाडाची साल, लाकडाचा भुगा आणि चेस्टनट फळे चूल पेटवण्यासाठी वापरण्याच्या सूचना दिल्या. तसेच जेवणासाठी बेडूक पकडण्याच्या टिप्सही दिल्या. “सैनिक आणि कामगारांना भाकरी द्या” असं भावनिक आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं.

शेतजमीन आणि अन्नशुद्धता

शेतजमीन आणि त्यातून पिकणाऱ्या धान्यावर जर्मन मक्तेदारी कायम रहावी म्हणून कृषी कायद्यातही बदल करण्यात आला. शेतजमिनीचा वारसा फक्त एका वारसाकडेच आणि तोही वंशपरंपरेने आर्यन असलेल्याकडेच जाईल, असे ठरवण्यात आले. माती आणि वंशवादाला खतपाणी घालत घरातील मोठा किंवा काहीवेळेस धाकटा मुलगा हा कायदेशीर वारस ठरवण्यात आला. हा हक्क फक्त शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि “निर्दोष नैतिक आचरण” असलेल्या जर्मनांसाठी राखीव होता. योग्य पुरुष वारस नसेल तरच मुलीला हा हक्क मिळत होता. ज्यूंशी लग्न केलेल्या जर्मनांना हा हक्क गमवावा लागला. ‘शुद्धते’चे रक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. कठोर निर्बंध घातले गेले. नाझींनी सेंद्रिय शेतीचे समर्थन केले, नैसर्गिक औषधांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आणि स्वतःला निसर्गप्रेमी, प्राणी मित्र म्हणवून प्रदर्शित केलं.

या सगळ्या हंगर प्लॅनचा मानव वंशावर झालेला परिणान भयंकर होता. पण त्यातून धडा घेऊन माणूस काही शिकला का, असा प्रश्नं इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाने निर्माण केला आहे. त्यावेळी ज्यूंचा झालेला छळ आणि त्या अत्याचाराच्या कहाण्यांवर आजही चित्रपट निघतात, पुस्तकं लिहिली जातात आणि संशोधन होऊन नाझी राजवटीवर टीका होते. पण पॅलेस्टाईनमध्ये त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते. त्यावर भविष्यात संशोधन होईल, लिहिलं जाईल. पण आता त्या नागरिकांना दोन घास मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे.

मुक्त पत्रकार

shruti.sg@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in