विचारभान
संध्या नरे-पवार
पहलगाम इथे निरपराध नागरिकांवर झालेल्या हल्ल्याने भारतावर युद्ध लादलं गेलं. लादलेलं युद्ध भारताला लढावं लागलं. ते लढायलाच हवं होतं. पण आजवर कोणताच प्रश्न हिंसेने, युद्धाने सुटलेला नाही. अंतिम मार्ग हा चर्चेचा, मुत्सद्देगिरीचा व शांततेचाच असतो. हिंसेने भारलेल्या जगात बुद्धाची करुणाच हळूवार फुंकर घालेल. १२ मेची बुद्धपौर्णिमा साजरी करताना करुणेचा विचार सोबत हवा.
झाडावर अंकुरलेलं, फांदीवर लगडत झाडाच्या समग्र अस्तित्त्वाचा एक भाग बनलेलं पान कधी तरी अवचित गळून पडतं, वाऱ्याबरोबर इथे-तिथे उडतं आणि खाली मातीत मिसळून जातं. अखेरीस त्याची माती होते. मातीतूनच होणारा जन्म आणि मातीतच होणारी अखेर. मानवी जन्माबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीचं सत्य सागणारं हे घटित म्हणजे ‘वे ऑफ द लीफ’ - ‘पानाचा जगण्याचा मार्ग’. झाडापासून वियोग होताना, गळून पडताना वाऱ्याबरोबर संघर्ष नाही, मातीत मिसळून जाताना कोणताही विलाप नाही. अहिंसा आणि स्थितप्रज्ञता ही पानाच्या जगण्याच्या मार्गाची मुख्य वैशिष्ट्य आहेत. ही वैशिष्ट्य आत्मसात करुन जगायचं असेल तर कसं जगायचं?
‘द व्हील ऑफ टाईम’ या महामालिकेतील दाशेन ऐल ही जमात स्वत:ला ‘लीफ पीपल’ असं म्हणवत पानाच्या जगण्याचं तत्त्वज्ञान जगत असते. आजूबाजूला सगळ्या हिंसक जमातींचं साम्राज्य असताना, माणूस मारणं हे पान चुरगळण्या इतकं सहजतेने केलं जात असताना, किंबहुना कोणत्याही सजीवाच्या जीवाचं कोणतंही मोल मानलं जात नसतानाच्या आदिम काळात दाशेन ऐल ही जमात अहिंसा स्वीकारते. हिंसा करणं, स्वत:चा जीव वाचवण्यासाठीही दुसऱ्याचा जीव घेणं नाकारते. हिंसा ही त्यांच्या द्दष्टीने सर्वात हीन बाब असते. म्हणूनच समुदायातील कोणी हिंसा केल्यास, दुसऱ्याचा जीव घेतल्यास त्याला समुदायातून बहिष्कृत केलं जातं. त्याला ‘ओथ ब्रेकर’ म्हणून हिणवलं जातं. समुदायावर दुसऱ्या हिंसक जमातीचा हल्ला झाला तर... तर वाऱ्याच्या वेगाने पळायचं. शत्रूला पाठीवर घेऊन पळायचं, पण मागे परतून हल्ला करायचा नाही. पण म्हणून ही जमात भ्याड नाही. त्यांच्या आश्रयाला आलेल्या कोणावर शत्रूने हल्ला केला, आश्रयाला आलेल्या त्या व्यक्तीला सुपूर्द करण्याची मागणी केली, तर भित्र्यासारखं त्या व्यक्तीला शत्रूच्या स्वाधीन केलं जात नाही. तर त्या व्यक्तीभोवती संपूर्ण जमात गोल करुन उभी राहते. गोलाच्या आत आश्रयाला आलेल्या व्यक्तीला ठेऊन सगळे स्वत: शत्रूला तोंड देतात. प्रसंगी शत्रूकडून मरण पत्करतात आणि आश्रय घेतलेल्या व्यक्तीला स्वत: जिवंत असेपर्यंत शत्रूच्या स्वाधीन करत नाहीत. मृत्यूला कवटाळण्याचे शौर्य या जमातीकडे आहेच, पण एखाद्याचा जीव घेण्याचा भ्याडपणा त्यांना मान्य नाही. उर्वरित जगापेक्षा त्यांची जीवनमूल्यं पूर्णपणे वेगळी आहेत. पानाच्या जगण्याला प्रमाण मानणारी आहेत.
‘वुई ब्युरी अवर पीपल आणि गो ऑन. व्हाट एल्स इज देअर?’ हे त्यांचं ब्रीद वाक्य असतं, त्यांच्या जगण्याचं सूत्र असतं. ‘सूड’ या शब्दाला, भावनेला इथे पूर्णविराम दिलेला आहे.
हे सूत्र घेऊन जगताना अर्थातच परीक्षा बघणारे अनेक प्रसंग येतात. अशाच एका समर प्रसंगात हिंसक जमातीचा पाठलाग सुरु असतो. लीफ पीपल पळत असतात. जमातीच्या प्रमुख स्त्रीचा मुलगा मागे राहतो. त्याच्याकडे तान्ह बाळ असतं. पळता पळता तो खाली पडतो आणि शत्रूचा सैनिक त्याला पकडतो. त्याला स्वत:च्या जीवाची पर्वा नसते. पण हातात तान्ह बाळ असतं. त्याला काही करुन वाचवायचं असतं. त्याच्याही नकळत तो शत्रूच्याच शस्त्राने त्याला मारतो. आपण समोरच्याला मारलं हे कळता क्षणीच त्याच्या डोळ्यात अतीव पक्ष्चात्ताप दाटून येतो. त्याचवेळी पुढे गेलेली त्याची आई मुलाच्या मदतीसाठी मागे येते. आणि मुलाच्या हातून झालेली हिंसा पाहते. तिच्याही डोळ्यात तेच दु:ख दाटून येतं. मुलाने हिंसा केली याचं दु:खं आणि आता मुलाला जमातीतून बहिष्कृत करावं लागणार, याचं दु:खं. त्या संपूर्ण द्दश्यात एक वेदना व्यापून राहिलेली आहे.
ही अशी एखादी जमात आज महामालिकेसारख्या काल्पनिक जगातच असू शकते. पण वेगवेगळ्या जमातींची दहा-दहा पिढ्या सुरु असलेली युद्ध, संघर्ष पाहताना अशी एखादी स्वत:ला ‘लीफ पीपल’ म्हणवून घेणारी जमात पाहणं हे सुखद आहे. भगवान बुद्ध, महावीर यांचा वारसा असा एखाद्या कथानकात प्रतिबिंबित झालेला बघणं हे हिंसेने भरलेल्या जगात आश्वासक वाटतं.
त्याचवेळी एक सत्य देखील लख्खपणे समोर येतं. स्वत:ला लीफ पीपल म्हणवणारा तो, हिंसेला नकार देणारा तो तान्ह्या बाळाला वाचवताना प्रतिआघात करतोच. मानवी जीवाचं मोल म्हणून हिंसेचा स्वीकार करतो. पर्यायच उरत नाही, तेव्हा अपरिहार्य म्हणून हिंसेचा वापर करावाच लागतो. अहिंसा कितीही प्रिय असली तरी.
पहलगाम हल्ल्याची बातमी आल्यापासून दाशेन ऐल ही जमात डोळ्यासमोर येत राहिली. हिंसेने भरलेल्या जगात अहिंसेचं तत्त्व जगणारी. अंतिम मार्ग कोणता हे सांगणारी. यावर्षी १२ मेची बुद्ध पौर्णिमा युद्धांच्या ढगांसह, आगीच्या लोळांच्या पार्श्वभूमीवर साजरी होणार आहे. पहलगामच्या २६ पर्यटकांच्या मृत्यूनंतर कारवाईची भूमिका भारताने घेतली आणि भारतावर युद्ध लादलं गेलं. लादलेलं युद्ध लढावंच लागतं. योग्य रणनीती आखत भारताने ते लढलंही. आणि पुढेही वेळ आल्यास पुन्हा लढेलही.
पण लादलेलं युद्ध लढतानाच आपला अंतिम मार्ग कोणता, ज्या भारतीय संस्कृतीचा आपण वारसा सांगतो तिची गाभ्यातील मूल्य कोणती, याचा विचार करावाच लागतो. ज्या दहशतवादी मार्गाचा पाकिस्तानने सतत अवलंब केला त्या दहशतवादानेच पाकिस्तान आता पूर्णत: पोखरला आहे. १९४७ च्या धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीपासून, स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्त्वापासून पाकिस्तानने कायम युद्धखोरीचीच नीती अवलंबिली आहे. यात तो देश गळ्यापर्यंत कर्जबाजारी झाला आहे. विकासापासून वंचित झाला आहे. देशाबाहेर बड्या आंतरराष्ट्रीय सत्तांच्या हातातलं बाहुलं बनला आहे आणि त्याचवेळी देशांतर्गत धर्मांध लष्करशहांच्या ताबेदारीत राहत लोकशाही तत्त्वांना पारखा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने १९४७ ते २०२५ ..भारताने सातत्याने विकासाचं एकेक पाऊल पुढे टाकलं आहे. विविध जाती-जमाती, भाषा-धर्म यांना घेऊन भारत एकसंध राहिला आहे. या एकसंध भारताचं प्रतीक म्हणजे सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन भारतीय सैन्यातील अधिकारी, ज्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगाला दिली. या दोघींना हे असं समोर आणणं, हा भारतीय मुत्सद्देगिरीचा अचूक बाण होता. तो बरोबर धर्मांध पाकिस्तानच्या वर्मी लागला. पाकिस्तानला हे असं करता आलं असतं? भारताकडे जशी ‘सोफिया कुरेशी’ आहे, तशी पाकिस्तानकडे ‘व्योमिका सिंग’ आहे?
इथे आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पुरुषसत्ताक मूल्य मानणारं, स्त्रीच्या वैवाहिक स्थितीशी निगडित असणारं नाव दिलं. अनेक विचारी महिलांना हे नाव आणि त्यामागचा पुरुषप्रधान द्दष्टिकोन आवडला नाही. या स्त्रियांनी त्याचा निषेधही केला. लष्करी कारवाईला पाठिंबा असला तरी ‘सिंदूर’ विषयीचा आक्षेप नोंदवला गेला. कारण प्रत्येक युद्धात कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा जोडीदार मृत्यूमुखी पडत असतो. पुरुषसत्ताक निकषांनुसार तिच्या कपाळीचा सिंदूर, कुंकू पुसलं जाऊन ती ‘विधवा’ होत असते. कोणत्याही स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचा आनंद मानणं, ही भारतीय संस्कृती नाही. कोणत्याही युद्धाची झळ स्त्रियांनाच सर्वाधिक बसते हा जगभरचा इतिहास आहे. आणि त्यावर अनेक अभ्यासही झाले आहेत. ‘युद्ध नको’ ही भूमिका जगभरातील अनेक स्त्री संघटना सातत्याने घेत असतात. त्यामुळे लादलेलं युद्ध लढतानाही संवेदनशीलता दाखवणं आवश्यक असतं. पक्षीय राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या गणितांच्या रेट्याखाली ही संवेदनशीलता दाखवली गेली नाही. पण त्याचवेळी किमान काही विचारी महिलांनी त्यावर आक्षेपही नोंदवले. भारतीय संविधान या अशा स्त्रियांच्याच बाजूने आहे. कारण व्योमिका किंवा सोफिया या दोघींच्याही कपाळावर कोणत्याही धर्माचं, व्यवस्थेचं प्रतीक असलेलं कोणतंही चिन्ह नव्हतं. होती ती युनिफॉर्मवर लगडलेली मेडल्स. त्यांच्या त्या मेडल्समधून आणि मोकळ्या स्वच्छ कपाळांमधून संविधानावर आधारलेली राज्यसंस्थाच व्यक्त होत होती. अशी राज्यसंस्था जी कोणत्याही एका धर्माच्या किंवा व्यवस्थेच्या अधीन नाही.
धर्माच्या वाटेवर चालणाऱ्या पाकिस्तानमध्ये हेही शक्य आहे का? पाकिस्तानची ही अशी धर्मांध अवस्था का झाली? असा प्रश्न विचारणारं मीम गेले काही दिवस समाज माध्यमांवरुन फिरत आहे. आणि उत्तरादाखल ‘पाकिस्तानमध्ये गांधी, नेहरु, आंबेडकर झाले नाहीत’, असं सांगितलं जात आहे. ‘गांधी-नेहरु-आंबेडकर’ झाले नाहीत याचाच अर्थ गौतम बुद्ध आणि महावीर यांच्यासह सुफी संतांचा, अकबर-दारा शुकोहचा, सर्वधर्मसमभावाचा वारसा जो भारताने आपला मानला, तो पाकिस्तानने स्वीकारला नाही, हा आहे. त्या देशाने कट्टरतावाद आपला मानला.
गेली काही वर्ष भारतातही हा धार्मिक कट्टरतावाद वाढत आहे. आज सोफियाचं कौतुक होत असलं तरी सुल्ली ॲपसारखी प्रकरणंही याच समाजात होत आहेत. धर्मांध पाकिस्तानला धर्मांध भारत हे उत्तर नाही. युद्ध अपरिहार्य ठरतं तेव्हा ते लढावंच लागतं, पण अंतिमत: आपला मार्ग शांततावादी सहजीवनाचा, प्रेम आणि करुणेचाच असावा लागतो. बुद्धांच्या पिंपळपानासारखा!
sandhyanarepawar@gmail.com