नोंद
भावेश ब्राह्मणकर
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात झालेला विविध अस्त्र-शस्त्रास्त्रांचा वापर सध्या विशेष चर्चेचा बनला आहे. काळाच्या ओघात जसे युद्धतंत्र बदलले आहे तसे रणांगणही. जमिन, हवा, पाणी, आभाळ यांच्या बरोबरीनेच आंतरजालाच्या, अफवांच्या माध्यमातूनही युद्ध खेळले जात आहे. म्हणूनच ते समजून घेणे अगत्याचे आहे.
बलाढ्य मुघलशाही, आदिलशाही आणि कुतुबशाहीला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यासारखे शस्त्र परजले. त्याचा एवढा प्रभावी वापर केला की, हजारो आणि लाखोच्या संख्येने असलेल्या फौजा केवळ शेकड्याने असलेल्या मावळ्यांनी हादरवून सोडल्या. पारंपरिक शस्त्रांना फाटा देत वाघनखे, दगड, गोफण, अग्नी अशा कल्पक अस्त्रांचा चपखल उपयोग महाराजांनी केला. परिणामी, तीनशे ते चारशे वर्षांच्या साम्राज्याला छ. शिवाजी महाराजांनी अवघ्या काही दशकांतच सुरूंग लावला. म्हणजेच पारंपरिक युद्धाला तोंड देण्यासाठी महाराजांनी युद्ध तंत्राला नवा आयाम दिला. त्यानंतर भारतात प्रवेश केलेल्या ब्रिटीश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आदींनी त्यांच्याकडील बंदुकांसह तोफांचा वापर करुन पुढील पिढीच्या शस्त्रास्त्रांची ओळख सर्वांना करुन दिली. तेव्हापासून आता २१व्या शतकातील तिसऱ्या दशकात युद्ध तंत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. हा बदल काही एकाएकी किंवा विशिष्ट गरजांमधून झालेला नाही. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनातून हे शोध लागले. बॉम्बचं उदाहरणच घ्या. त्याच्या शोधाची मनिषाच मुळी शांतता होती. मात्र, त्याचा वापर विध्वंसासाठी होऊ लागल्याने शोधकर्तेही हतबल झाले. सांगायचा मुद्दा हा की, शोध कुठल्या कारणासाठी लागला आणि प्रत्यक्षात त्याचा वापर भलत्याच बाबींसाठी झाला. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान हे वरदान असले तरी त्याचा वापर कोण आणि कशासाठी करतो यावरच सारा खेळ अवलंबून आहे.
संसर्गजन्य रोग: पहिल्या महायुद्धात घोडे आणि गायींच्या माध्यमातून संसर्गजन्य रोग पसरविण्याचा कुटील डाव जर्मनीने खेळला. त्याचे धोके लक्षात घेऊन अशा प्रकारच्या जैविक अस्त्रांचा वापर न करण्यावर जागतिक पातळीवर सहमती झाली. दुसऱ्या महायुद्धात हिटलरसारख्या क्रूर हुकुमशहाने आणि आयबीएमसारख्या कंत्राट घेतलेल्या निष्ठूर कंपनीने रसायनांचा वापर करुन ज्यूंचे भयानक हत्याकांड घडवले. म्हणजेच, रसायनांचा वापर अस्त्र म्हणून झाला. त्यानंतर याच महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर अमेरिकेने जपानवर केला. जगात प्रथमच हे महासंहारक अस्त्र डागले गेले. त्याचे नानाविध परिणाम लक्षात घेऊन जपानने माघार घेतली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले. काही दशकांपूर्वी सिरीयामध्ये दहशतवाद्यांनी पाण्यालाच अस्त्र बनविले. धरणामध्ये विष टाकण्याची धमकी दिली. याद्वारे शेकडो निष्पाप जीव गतप्राण होण्याची टांगती तलवार जगाला धडकी भरवणारी ठरली. पाण्यासारख्या नैसर्गिक घटकाचा युद्धतंत्र आणि आयुध म्हणून वापर होण्याची ही घटना नक्कीच चिंतनीय होती.
अफाट वेग असलेले ब्रह्मोस : वरील सर्व उदाहरणं पाहता काळाच्या ओघात युद्धांचं तंत्र, पद्धती आणि शस्त्र सारेच बदलत गेले आहे. पण हा बदल विकासात्मक आहे का? या प्रश्नाचे उत्तर मात्र समाधानकारक नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारे संशोधनाला वाव मिळतो. याच्याच आधारे प्रकाश किंवा ध्वनीच्या वेगाने धावणारी आयुधे देशोदेशीच्या सैन्याकडे आता दिसू लागली आहेत. अशक्यप्राय वाटू शकणारे तंत्र प्रत्यक्षात अवतरले आहे. भारताकडे असलेले ‘ब्रह्मोस’ हे क्षेपणास्त्र हे अत्याधुनिक शस्त्राचे मोठे उदाहरण आहे. ब्रह्मपुत्र आणि मास्कोवा या नद्यांच्या नावावरुन भारत आणि रशिया सरकारने संयुक्तरित्या ब्रह्मोस विकसित केले. ध्वनीच्या वेगाच्या तीन पट अधिक वेगाने ब्रह्मोस निश्चित लक्ष्याकडे जाते. अजूनही ब्रह्मोसमध्ये संशोधन सुरू आहे. त्यात अंतर, अचूकता आणि वेग यावर भर दिला जात आहे. अफाट वेगात अधिकाधिक अंतर कापून लक्ष्य अचूक भेदावे हा हेतू आहे. आता तर सुपरसोनिककडून जग हायपरसोनिककडे जात आहे. लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमध्ये प्रामुख्याने संशोधन केले जात आहे.
एस ४०० चे सुदर्शन चक्र : रशियन बनावटीची ‘एस ४००’ ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली भारताने घेतली आहे. त्याला ‘सुदर्शन चक्र’ असे नाव देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या संघर्षात पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्र, ड्रोन आणि मानवविरहीत वाहनं यांना नष्ट करणे याच ‘एस ४००’ प्रणालीमुळे भारताला शक्य झाले. ही प्रणाली थेट ४०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूक भेदू शकते. बहुउद्देशीय रडार, विमान विरोधी क्षेपणास्त्र, स्वयंचलित शोध यंत्रणा, लाँचर्स, कमांड कंट्रोल सेंटर आदींचा ‘एस ४००’ प्रणालीमध्ये समावेश आहे. जमिनीवरुन हवेत मारा करणे, एकाचवेळी ३६ वेळा मारा करणे ही क्षमता हे सुद्धा या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. या प्रणालीने पाकिस्तानला नक्कीच धडकी भरली असणार. भगवान कृष्णांच्या हाती असलेले सुदर्शन चक्र हे भिरभिरत जाऊन शत्रूला लक्ष्य करायचे. अशाच प्रकारे ‘एस ४००’ सुद्धा कार्य करते.
आग ओकणाऱ्या तोफांचे वज्र: अमेरिकन बनावटीची ‘अल्ट्रा लाईट होवेत्झर’ (M777 A2) आणि कोरियन बनावटीची ‘वज्र’ (K9) या अत्याधुनिक तोफाही भारतीय सैन्याकडे आहेत. वज्र तोफ ही अवघ्या ३० सेकंदात तीन, तर तीन मिनिटात १५ तोफगोळे डागू शकते. दर मिनिटाला एक याप्रमाणे सलग ६० मिनिटे या तोफेद्वारे गोळे डागता येऊ शकतात. ३६० अंशांसह वाळवंट, ओसाड आणि पर्वतीय भागात ही तोफ काम करु शकते. खडकाळ असलेल्या किंवा कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर तिची अतिशय वेगाने वाहतूक करता येते. ३८ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची या तोफेची क्षमता आहे. तर होवेत्झर ही तोफ ३१ किमीवरील लक्ष्य भेदू शकते. अवघ्या दोन मिनिटांत ती सज्ज होते. दिवसा व रात्री काम करणे, खडकाळ किंवा कुठल्याही प्रकारच्या रस्त्यांवरुन वाहतूक करता येणे, ऑटोमेटिक लक्ष्य फिक्स करण्याचा पर्याय आणि अवघ्या दोन मिनिटात चार तोफगोळे डागण्याची क्षमता ही होवेत्झरची वैशिष्ट्ये आहेत.
उदाहरणादाखल ब्रह्मोस, वज्र व होवेत्झर तोफांची वैशिष्ट्ये दिली आहेत. अशाच प्रकारे लष्कर, हवाईदल, नौदल यांच्याकडे रडार, रणगाडे, ड्रोन, मानव विरहीत वाहन आदी प्रकारची आधुनिक शस्त्रे दाखल होत आहेत. दिवसागणिक होणाऱ्या संशोधनातून त्यांचे नवे रुप समोर येत आहे. आंतरखंडीय स्वरुपाची क्षेपणास्त्रेही भारतासह काही देशांच्या दिमतीला आहेत. एक ते दहा लढाऊ विमाने उतरु शकणाऱ्या महाकाय युद्धनौका, खोलवर महासागरात राहून अण्वस्त्र डागणाऱ्या पाणबुडी अशी कितीतरी आधुनिक संरक्षण सामग्रीही उपलब्ध झाली आहे.
रणांगणातील बदल : आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो रणांगणाचा. प्रत्यक्ष किंवा समोरासमोर येऊन युद्ध लढण्याचे दिवस आता राहिले नाहीत. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे हवेतून जमिनीवर केलेला अचूक मारा. शत्रू राष्ट्रात प्रत्यक्ष न जाता केले जाणारे हवाई हल्ले आणि डागली जाणारी घातक क्षेपणास्त्रे अनेक अर्थाने महत्त्वाची आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षात इस्त्राईलने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. आयरन डोम ही हवाई संरक्षण प्रणाली त्यासाठी वापरली. म्हणजेच जमीन आणि पाण्यातून होणाऱ्या पारंपरिक युद्धाऐवजी सध्या हवेतील युद्धाचा वापर वाढत आहे. हवेतून जमिनीवर, हवेतून हवेत, पाण्यातून जमिनीवर, जमिनीवरुन पाण्यात, जमिनीवरुन हवेत अशा विविध प्रकारच्या हल्ल्यांना एकाचवेळी तोंड देण्याची वेळही येऊन ठेपली आहे. सध्या सुरु असलेल्या भारत-पाक संघर्षाची व्याप्ती वाढली तर एकाच वेळी वेगवेगळ्या रणांगणांवरुन युद्ध लढले जाईल.
सायबर युद्ध : सायबर युद्ध हे एकाच ठिकाणी बसून शत्रू राष्ट्राचे प्रचंड आर्थिक नुकसान करणारे ठरते. त्याचबरोबर माहिती-तंत्रज्ञानाद्वारे सोशल मीडियामध्ये अफवा तसेच खोटे वृत्त पसरवून मोठा परिणाम साधला जातो. सध्या हेच घडते आहे. घराघरात टिव्ही आणि सोशल मीडिया स्क्रीनवर माहितीचा भरमसाठ भडिमार केला जातो आणि ती पसरवली जाते. यातून नागरिक व यंत्रणांमधील संभ्रम वाढविणे, त्यांना भरकटवणे, त्यांचे लक्ष विचलित करणे आदी बाबी सहज साध्य होतात. म्हणूनच सध्या सुरु असलेल्या भारत-पाक युद्धाच्या दरम्यान खरी माहिती आणि अफवा यांच्यातील फरक ओळखून खोट्या माहितीला बढावा न देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.
छुपे युद्ध : प्रत्यक्ष युद्ध न करता शत्रू राष्ट्रातील दहशतवादी, फुटीर किंवा बंडखोर यांना बळ देऊन त्यांच्या माध्यमातून शत्रूला क्षती पोहचविणारे छुपे युद्ध हे सुद्धा अतिशय प्रभावी आणि चिंताजनक असेच आहे. नुकताच झालेला पहलगाम हल्ला हे अशा छुप्या युद्धाचेच उदाहरण आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो संरक्षण क्षेत्रालाही लागू आहे. रणांगण, युद्ध तंत्र, शस्त्रास्त्रे अशा सर्वच पातळ्यांवरील बदल जसा सुखावह वाटतो तसाच तो आव्हानात्मकही आहे. अद्याप आकाशातील युद्ध (स्पेस वॉर) झाले नसले तरी तेही नजिकच्या काळात होण्याची चिन्हे आहेत. हा बदलता ट्रेण्ड मानव जातीला सुरक्षा प्रदान करतो आहे की आणखीनच असुरक्षित बनवतो आहे, हा सुद्धा काळजीचा आणि संशोधनाचा विषय आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.