पाण्याचे एटीएम!

पैसे काढण्यासाठी एटीएम माहीत आहे, पण पाणी मिळवण्यासाठी एटीएम? हो, अशी यंत्रंही आहेत! स्वच्छ पाणी मिळणं कठीण झालं, तर त्याची किंमत मोजावी लागते. जपानमधील मिनामाटाची दुर्घटना आपल्याला सांगते- पाणी वाचवा, पाणी स्वच्छ ठेवा!
पाण्याचे एटीएम!
पाण्याचे एटीएम!
Published on: 

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

पैसे काढण्यासाठी एटीएम माहीत आहे, पण पाणी मिळवण्यासाठी एटीएम? हो, अशी यंत्रंही आहेत! स्वच्छ पाणी मिळणं कठीण झालं, तर त्याची किंमत मोजावी लागते. जपानमधील मिनामाटाची दुर्घटना आपल्याला सांगते- पाणी वाचवा, पाणी स्वच्छ ठेवा!

मित्रांनो, कल्पना करा, एक दिवस तुम्हाला तहान लागली आणि पाणी प्यायला गेल्यावर कळलं की पाणी विकत घ्यावं लागणार आहे! तेही एटीएम मशीनमधून! आश्चर्य वाटलं ना? पण पाण्याच्या बाबतीत असं का घडतं? याचं उत्तर शोधताना आपण पोहोचणार आहोत जपानमधील मिनामाटा या शहरात.

जपानमधील मिनामाटा हे शहर १९५० आणि १९६० च्या दशकांत साऱ्या जगात चर्चेचा आणि काळजीचा विषय बनले होते. ‘कारखान्यांचे शहर’ अशी या शहराची ओळख होती! शहरात असंख्य कारखाने होते. जवळच समुद्रकिनारा होता आणि तिथले शेलफिश तसेच इतर अनेक प्रकारचे मासे लोकप्रिय होते. पन्नास-साठच्या दशकात समुद्रकिनाऱ्यालगत असंख्य मासे मरून पडलेले दिसू लागले. एकाएकी ज्यांनी इथले मासे खाल्ले होते, त्यांच्यापैकीही अनेकांचा मृत्यू झाला. अंदाजे तीन हजार लोक मृत्युमुखी पडलेच, परंतु हजारो लोक अनेक आजारांनी ग्रस्त झाले. किती मासे मेले, याची तर गणतीच नव्हती. सगळीकडे हाहाकार माजला.

एकाएकी काय झालं? असं कसं घडलं? याचं कारण स्पष्ट होतं. कारखान्यांतून निघणारा मिथाईल मर्क्युरी हा घातक, विषारी औद्योगिक कचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडला जात होता. तो माशांच्या शरीरात साठत जात होता. माणसं जेव्हा हे मासे खात होती, तेव्हा त्यांच्या शरीरातही या विषाचं प्रमाण वाढत होतं. याला ‘बायोॲक्युम्युलेशन’ म्हणतात. प्रदूषित पदार्थ पाण्यात सोडले गेले की ते अन्नसाखळीतून सजीवांच्या शरीरात साठत जातात आणि विषाचा परिणाम अधिकाधिक तीव्र होत जातो. मिनामाटा रोग (Minamata Disease) या नावाने ही घटना प्रसिद्ध झाली आणि लोक पाण्याच्या प्रदूषणाबद्दल अधिक सतर्क झाले.

निसर्ग एका विशिष्ट पातळीच्या प्रदूषणानंतर हतबल होतो आणि मग त्याचे उलटे परिणाम दिसू लागतात. मानवाने केलेले प्रदूषण मानवाकडेच परत येते आणि तेही रौद्र रूपात! म्हणूनच पाणी मुळात नितळ आणि रंगहीन असते. त्याचा रंग ‘आपण’ बदलतो, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

आता समजा, पाणी असेच खराब होत गेले आणि शाळेत गेल्यावर तुम्हाला एक, दोन किंवा तीन रुपयांत प्यायचे पाणी विकत घ्यावे लागले, तर काय वाटेल? पैसे देऊन पाणी? पण घडते काय, की आपण नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकतो की देशाचे नागरिक म्हणून आपले हक्क कोणते आहेत. त्याच वेळी एका चौकटीत नागरिक म्हणून आपली कर्तव्ये कोणती आहेत, हेही दिलेले असते. मात्र, ती फारशी वाचली जात नाहीत! गंमत म्हणजे, परीक्षेतही त्यावर फारसे प्रश्न विचारले जात नाहीत. ‘आपले मूलभूत अधिकार कोणते?’ हा प्रश्न नेहमी विचारला जातो; मात्र मूलभूत कर्तव्यांवरील प्रश्न धड्याच्या शेवटीही विचारलेला नसतो आणि म्हणूनच आपण जेव्हा कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्याची किंमत मोजावी लागते.

सार्वजनिक ठिकाणी आपण पाण्याचा वापर कसा करतो? कोणी तरी येईल आणि नळ बंद करेल, असे प्रत्येकाला वाटते. पण सार्वजनिक ठिकाणी ‘कोणीतरी’ म्हणजे कोण? तर प्रत्येक व्यक्तीच त्यासाठी जबाबदार असते आणि मग नळ वाहतच राहतो!

असं होऊ नये म्हणून रेल्वे स्थानकांवर पाण्याचे ‘एटीएम’ ही संकल्पना राबवण्यात आली. आधी रेल्वे स्थानकांवर मोफत पाणी उपलब्ध करून दिले जायचे. आता काही ठिकाणी पाण्याच्या एटीएमचा प्रयोग करण्यात आला आहे. अगदी कमी किमतीत आपल्याला या मशीनमधून पाणी मिळते. शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. अशी एटीएम सर्वत्र असावीत, अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

‘पैसे दिले की त्याची किंमत कळते,’ असे म्हणतात. पण पाणी म्हणजे जीवन! कधी कोणत्या कारणाने जवळ पैसे नसतील, तर पाणी न पिता आपण जगू शकू का? निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागणार का? ही वेळ आपल्यावर का आली? तर निसर्गाचे नैसर्गिक स्रोत आपण खराब केले आणि आटवले. जलचक्र बिघडवले.

असे व्हायला नको असेल, तर सुरुवात शाळेपासून करायला हवी. स्वच्छ जागी पाणी उपलब्ध असेल, तर आपण ती जागा, ते नळ आणि पिण्याची भांडी यांचा योग्य वापर करायला हवा. पाण्याची नासाडी थांबवायला हवी. नाहीतर पाण्याचे एटीएम वापरण्याची वेळ आपल्यावर येईल!

आणि याची सुरुवात आपण या दिवाळीपासून नक्की करूया! अभ्यंगस्नानाच्या वेळी पाणी जपून वापरूया. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषणही कमी करूया.

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@ gmail.com