कुठे हरवली? 'लोकशिक्षकांची परंपरा'

५ सप्टेंबर. शिक्षक दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही तो होईल. पण खरा शिक्षक कोण? जो वर्गातल्या मुलांना शिकवतो तो की जो वर्गाबाहेरच्या समग्रांचा विचार करत लोकशिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी आयुष्य वेचतो तो?
कुठे हरवली? 'लोकशिक्षकांची परंपरा'
Published on

विचारभान

संध्या नरे-पवार

५ सप्टेंबर. शिक्षक दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही तो होईल. पण खरा शिक्षक कोण? जो वर्गातल्या मुलांना शिकवतो तो की जो वर्गाबाहेरच्या समग्रांचा विचार करत लोकशिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी आयुष्य वेचतो तो? या राज्यातल्या, या देशातल्या काही मोजक्या व्यक्तींनी लोकशिक्षकाची भूमिका स्वीकारून आयुष्यभर काम केलं म्हणूनच आज शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होऊ शकलं. म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त या लोकशिक्षकांचं स्मरण करायला हवं.

"उठा बंधूनो, अतिशूद्रांनो, जागे होऊनि उठा परंपरेची गुलामगिरी ही, तोडणेसाठी उठा बंधूनो, शिकणेसाठी उठा..."

वर्गात मुलांना शिकवताना, वर्ग संपल्यावर मुलांशी गप्पा मारताना, शाळा भरण्याआधी मुलांच्या पालकांशी बोलताना कोणीतरी पोटतिडकीने हे सांगत आहे. देशातल्या सर्वसामान्य माणसांनी, बहुजनांनी शतकानुशतकाच्या झोपेतून जागं व्हावं, परंपरेच्या नावाने आपल्या पायात बांधलेल्या अज्ञानाच्या बेड्या, या अज्ञानाच्या आधारे लादलेली गुलामगिरी तोडण्यासाठी आपल्या 'बंधूंनी' उठावं, अशी ही आर्त साद घातली जात आहे.

कशासाठी उठावं ? तर शिकण्यासाठी उठावं.

कारण शिक्षण घेतलं तरच परंपरेने लादलेली अज्ञानाची गुलामगिरी तोडता येईल. शिक्षण कशासाठी? आणि कोणासाठी ? यामागचं उद्दिष्ट किती स्पष्ट आहे. यासाठी बहुजन हिताय झटणारी द्रष्टी दृष्टीच हवी. आद्यशिक्षिका जी मुळात 'लोकशिक्षिका' ही होती, तिच्याचपाशी अशी दृष्टी असणार ना? तिलाच मूळ दुखणं काय आणि त्यावरचा उपाय काय ? हे कळणार ना? म्हणूनच ती म्हणते,

"दोन हजार वर्षांचे, शूद्रा दुखणे लागले

ब्रह्मविहित सेवेचे, भू-देवांनी पछाडले

अवस्था पाहूनि त्यांची,

होय शब्द मनी उठे

सुलभ मार्ग कोणता काय,

विचारे बुद्धी अटे

शूद्रांना सांगण्याजोगा,

आहे शिक्षण मार्ग हा

शिक्षणाने मनुष्यत्व,

पशुत्व हटते पहा.."

गेली दोन हजार वर्षं इथले बहुजन शिक्षण न घेता केवळ सेवाकर्म करत आहेत. ज्ञानाअभावी एक पशुअवस्था त्यांना प्राप्त झाली आहे. कारण त्यांचं कारागिरीचं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणून मान्यताच दिली जात नाही. अभिजनांची सेवा म्हणून केल्या जाणाऱ्या परंपरागत कारागिरीला, त्यामागच्या हस्तकौशल्याला, त्यामागच्या ज्ञानाला शब्दज्ञानाची, आधुनिक ज्ञानाची जोड दिल्याशिवाय ही पशुगत अवस्था संपुष्टात येणार नाही. बहुसंख्य बहुजनांना, शूद्रातिशूद्रांना मनुष्यत्व लाभणार नाही. या आद्यशिक्षिकेला केवळ मूठभरांच्या ज्ञानोदयाची चिंता नाही, तर सर्वजनांच्या, लोकांच्या ज्ञानोदयाची चिंता आहे. कारण मुळात ती एक 'लोकशिक्षिका' आहे.

एखाद्या पाठशाळेची पढिक पंतोजी नाही. शिक्षिकेचा पेशा तिने लोककार्यासाठी स्वीकारलेला आहे. म्हणूनच शिक्षणाची वाट चालताना वाटेत आलेले दगडगोटे, शेणगोळे आणि क्वचित वाट्याला आलेलं कौतुक सारं काही तिने समभावाने स्वीकारलं. म्हणूनच ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन साजरा करताना या आद्यशिक्षिकेची, सावित्रीबाई फुले यांची 'लोकदृष्टी' जरूर आठवावी. 'लोकशिक्षकां'चं स्मरण करावं. कारण या लोकशिक्षकांनी मूठभरांच्या शिक्षणापेक्षा लोकशिक्षणावर अधिक भर दिला. समाजातला अभिजन वर्ग प्रत्येक कालखंडात त्या त्या काळात उपयुक्त असलेलं शिक्षण घेतच असतो आणि त्यातून स्वतःची उन्नती साधत असतो. ज्या काळात संस्कृत शिकणं उपयुक्त असतं तेव्हा तो संस्कृत शिकतो, जेव्हा फारसी शिकणं उपयुक्त असतं तेव्हा तो फारसी शिकतो आणि जेव्हा इंग्रजी शिकणं उपयुक्त असतं तेव्हा तो इंग्रजी शिकतो. शिक्षणापासून वंचित असतो तो बहुसंख्य बहुजन समाज. त्याने शिक्षणापासून वंचित रहावं, अशीच उतरंडीची व्यवस्था तयार केली जाते. ही उतरंडीचीच व्यवस्था मग एकलव्याकडून न दिलेल्या ज्ञानासाठीही अंगठा कापून मागते.

ज्ञानावर केवळ मूठभरांची मक्तेदारी प्रस्थापित करते. लोकशिक्षक ही मूठभरांची मक्तेदारी मोडून शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचं काम करतात.

हंटर कमिशनसमोर साक्ष देताना म. जोतिबा फुले प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचं करण्याची मागणी करतात, ते या लोकशिक्षकाच्याच भूमिकेतून. ब्रिटिश विद्वान अधिकाऱ्यांनी भारतातील शिक्षणाची व्यवस्था लावताना पर्कोलेशन थिअरी, झिरपण्याचा सिद्धान्त मांडून शिक्षण आधी समाजातील अभिजनांपर्यंत पोहचवावं, मग या अभिजनांमार्फत ते झिरपत झिरपत खाली जाऊन बहुजनांपर्यंत पोहोचेल, असे सांगितले. पण फुलेंनी या झिरपण्याच्या सिद्धान्ताला विरोध करत शिक्षण झिरपण्याची वाट न पाहता प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी केली. कारण इथल्या अभिजनांकडून झिरपत शिक्षण बहुजनांकडे पोहोचेपर्यंत म्हणजेच अभिजन पुढाकार घेऊन बहुजनांना शिकवेपर्यंत आणखी काही शतकांचा कालावधी जाईल, हे जोतिबा ओळखून होते. म्हणूनच शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची मागणी करत शिक्षण सर्वजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा काढण्यापासून, प्रतिकूल परिस्थितीत त्या चालवण्यापासून ते हंटर कमिशनला साक्ष देत सर्वजनांच्या शिक्षणाची कैफियत मांडण्याचं काम जोतिबांनी केलं.

जो शिकवतो तो शिक्षक. पण शिकवणारा हा शिक्षक जर पोटार्थी असेल तर तो जे ज्ञान देईल तेही 'पोटार्थी'च असेल. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत प्रामुख्याने असे पोटार्थी शिक्षकच दिसतात. जे शाळेतील वर्गात शिकवण्यापेक्षा खासगी क्लासेसमध्ये अधिक शिकवतात. शिक्षकांचा दुसरा वर्ग आहे तो अति महागड्या इंटरनॅशनल स्कूल्समधल्या अतिमहागड्या शिक्षकांचा. या शाळांची फी भरण्यासाठी पालक कर्जबाजारी होत आहेत, तर शिक्षक एका महागड्या शाळेतून दुसऱ्या अति महाग शाळेत उडी घेत आपलं 'करियर' घडवत आहेत. जिथे खासगी शिक्षण संस्था काढून राजकीय नेतेच 'शिक्षणमहर्षि' वगैरे होतात, तिथे शिक्षण व्यवस्थेत हा असा बाजार शिरणारच.

आज शिक्षणव्यवस्था बाजारकेंद्री झालेली आहे. साहजिकच शिक्षक दिन हाही त्याचाच एक भाग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक दिन साजरा करताना पुन्हा एकदा लोकशिक्षणाचं आणि लोकशिक्षकांचं स्मरण करायला हवं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या लोकशिक्षकाच्या भूमिकेतूनच अस्पृश्य समूहाला संघटित होऊन संघर्ष करण्याआधी शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...या त्यांच्या लोकवचनात शिक्षणाला पहिल्या पायरीवर ठेवलं आहे. त्यांनी जी शिक्षण संस्था काढली, त्यालाही 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' असं नाव दिलं. तर महात्मा गांधींनी आपल्या 'नई तालीम'च्या माध्यमातून शिक्षण अधिकाधिक सर्वसमावेशक करण्याचा मार्ग चोखाळला. स्वातंत्र्यपूर्व काळात सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजातील बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी शिक्षणसंस्था काढली. शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य केलं. कांदूकरी वीरसलिंगम यांनी आंध्र प्रदेशात पहिली मुलींची शाळा काढली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बहुसंख्य समाज शिक्षणापासून वंचित होता. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेसाठी, रयतेसाठी शिक्षण संस्था काढल्या. बहुजन गरीब मुलांसाठी 'कमवा आणि शिका' यासारख्या श्रम आधारित योजना आणल्या.

शिक्षक दिनी या अशा 'लोकशिक्षकां'चं स्मरण करावं. किंबहुना आज शिक्षणव्यवस्था ज्या गर्तेत सापडली आहे, एकीकडे उच्चशिक्षितांची बेकारी वाढत आहे आणि दुसरीकडे २०२५ सालीही शाळाबाह्य मुलांची संख्या लक्षणीय आहे, अशा स्थितीत लोकशिक्षकांची गरज तीव्रतेने जाणवत आहे.

शिक्षक दिनानिमित्त या लोकशिक्षकांच्या स्मृतीला अभिवादन !!

sandhyanarepawar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in