

रसास्वाद
प्रगती सुभाष
स्त्रियांच्या विरोधात राज्यसंस्था किती क्रूर होऊ शकते, स्त्रियांना दडपण्यासाठी आवाजविहिन, शस्त्रविहिन हिंसाचाराचा कसा वापर करू शकते, हे नर्गिस मोहम्मदी यांच्या ‘व्हाईट टॉर्चर’ या पुस्तकातून स्पष्ट होते. राजकीय महिला कैद्यांच्या मुलाखतींवर आधारलेले हे पुस्तक राज्यसंस्थेचा निर्मम चेहरा स्पष्ट करते. २५ नोव्हेंबर हा जागतिक स्त्रीहिंसाचार विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने समाजात ‘व्हाईट टॉर्चर’चे अस्तित्व किती व्यापक आहे हे समजून घ्यायला हवे. कारण व्हाईट टॉर्चर केवळ एका देशातल्या स्त्रियांच्या दडपशाहीची गोष्ट सांगत नाही, तर जगभरचे वास्तव सांगते.
अलीकडेच इराण या देशाने ‘हिजाब घालणे हे बंधनकारक नाही’ असे घोषित करत या बंधनातून स्त्रियांची कायदेशीर मुक्तता केली. सोशल मीडियावर ही बातमी वाचता क्षणीच इराणी स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांची आणि त्यांनी लिहिलेल्या ‘व्हाईट टॉर्चर’ या पुस्तकाची तीव्रतेने आठवण झाली. नर्गिस मोहम्मदी यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना २०२३ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
नर्गिस मोहम्मदी यांच्या ‘व्हाईट टॉर्चर’ या पुस्तकात इराणी राजकीय महिला कैद्यांचे मुलाखतवजा अनुभव आहेत. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी, हिजाबसक्तीसारख्या कायद्यांना विरोध करत आंदोलने केली होती. स्त्रियांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी आवाज उठवला होता. यासाठी त्यांना तुरुंगवास, एकांतवास, शारीरिक छळ आणि सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला. काहींना त्यांच्या मुलांपासून तोडत त्यांना मातृत्वापासून वंचित करण्यात आले, काहींना कोणतीही केस न चालवता बंदिस्त करण्यात आले.
मानसिक छळयंत्रणा
मुळात ‘व्हाईट टॉर्चर’ ही राज्यसंस्थेची मानसिक छळयंत्रणा आहे, जिथे कैद्याला बोलण्याचा, पाहण्याचा, ऐकण्याचा अधिकार दिला जात नाही. हे पुस्तक वाचताना त्याचे तपशील लक्षात येतात. यात कोठडीत शून्य आवाज असतो. कोणीही भेटत नाही. फक्त एकटं अस्तित्व. यातून मानसिक खच्चीकरण होते, अस्तित्वहीन जगणं वाट्याला येऊन हळूहळू स्वतःपासून दुरावण्याची प्रक्रिया घडते.
नर्गिस मोहम्मदी हा स्वत: राजकीय कैदी होत्या. ३१ वर्ष त्यांनी तुरुंगाच्या गजाआड काढलेली होती. त्यामुळे हे पुस्तक केवळ मुलाखतींवर आधारित नाही, तर त्याला नर्गिस यांच्या स्वानुभवांची जोड आहे. थोडक्यात हे लेखन म्हणजे साक्षीदाराचे लेखन आहे. यात देहाचा नव्हे, तर मनाचा केलेला छळ नोंदवलेला आहे. या शिक्षा स्त्रीच्या शरीरावर नव्हे, तर मनोविश्वावर आघात करणाऱ्या होत्या.
या पुस्तकातल्या सर्व स्त्रिया संघर्षशील असून एक राजकीय विरोधक असतानाच त्या आई आहेत, शिक्षिका आहेत, कार्यकर्त्या आहेत. पण त्यांचे हे सगळे ‘असणे’ तुरुंगात नाकारले जाते. ‘व्हाईट टॉर्चर’ म्हणजे शारीरिक नव्हे, तर मानसिक अन्याय. शुद्ध मानसिक छळ करणे, संवाद काढून घेणे, एकटे ठेवणे. प्रकाश, वेळ आणि संवादाचा अभाव असणे. यातून स्त्री म्हणून तिच्या इच्छा, संवेदना आणि तिचे शरीर नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘व्हाईट टॉर्चर’ हे शरीराला जखम न देता स्त्रीच्या स्मृतीवर आक्रमण करते. स्त्रियांना डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवणे, सभोवतालचे आवाज बंद करणे, हे सारे स्पर्शविरहित पण प्रत्यक्षात होणारे अत्याचार (touchless torture) आहेत. हे सारे केवळ भय निर्माण करण्यासाठी नव्हे, तर स्त्रीच्या देहभानाला तोडण्यासाठी केले जाते. त्यामुळे यातून बाहेर पडलेल्या स्त्रिया शरीराने मोकळ्या होतात, पण मनाने तुरुंगातच राहतात.
साक्षीदार स्त्रिया
या पुस्तकातील प्रत्येक अनुभव म्हणजे एका स्त्रीचा पुनःशोध आहे. स्त्रीत्वाच्या संघर्षाचे दस्तावेजीकरण आहे. हे पुस्तक सांगते की, “स्त्रीचा आवाज बंद करणे हे केवळ राजकीय नसून स्त्रीच्या अस्तित्वाला नाकारण्याचे साधन आहे.” यातील काही मुली/महिला त्यांच्या घरूनच पकडल्या गेल्या किंवा त्यांच्या घरानेच त्यांना नाकारले. त्यामुळे घर आणि सत्ता ही परस्परावलंबी संकल्पना इथे स्त्रीविरोधी रचनेच्या पातळीवर उभी राहते.
‘व्हाईट टॉर्चर’ हे केवळ तुरुंगाचे वर्णन नसून स्त्रीच्या मनोविश्वावर चालणारी सत्ता आणि छळाची जाहीर कबुली आहे. स्त्रीच्या तुटलेल्या आवाजांचा एकत्रित सूर, जो भयावह शांततेतून निघतो, पण बदलाची भाषा बोलतो. या मुलाखती म्हणजे केवळ अनुभव नव्हेत, तर त्या स्त्रीच्या प्रतिकाराच्या, अस्तित्वाच्या आणि अस्मितेच्या खुणा आहेत. कारावासाच्या बंदिस्त काळोखात इराणमधील स्त्रिया केवळ जिवंत राहिल्या नाहीत, तर त्या मौनात असलेल्या जगाला आवाज देण्यासाठी उभ्या राहिल्या. या स्त्रिया फक्त बळी नाहीत, तर त्या साक्षीदार आहेत. या मुलाखती त्यांच्या वैयक्तिक अनुभवांतील राजकीय सत्य स्पष्ट करतात.
या अनुभवात अनेक स्त्रिया स्पष्टपणे सांगतात की, पडताळणीसाठी कपडे उतरवले गेले, शरीरावर अत्याचार केला जाण्याची भीती निर्माण केली गेली, गर्भपात झाल्यास मदत नाकारली गेली. ही केवळ हिंसा नसून राज्ययंत्रणेचा स्त्रीच्या शरीरावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न आहे. कारावासातल्या स्त्रिया ही केवळ एखाद्या देशाची गोष्ट नसून ही जगभरच्या स्त्रियांवर होणाऱ्या दडपशाहीची कथा आहे.
स्त्रीवादी प्रतिकार
या अनुभवातून दिसते की, काही स्त्रिया शरीर झिजत असतानाही सत्य बोलतात. काहींनी उद्गार न काढता मौन राहत प्रश्न निर्माण केले. काहींच्या ओठांवर मृत्यूच्या छायेतसुद्धा कवितांचा सूर होता. हे स्त्रीवादी प्रतिकार आहेत, जिथे मौनालाही आवाज असतो. या मुलाखती एकमेकींना एकमेकींशी जोडतात. त्या इतिहास घडवतात. त्या न्याय मागतात. त्या पुढच्या पिढीसाठी एक आशेचा दीप लावतात. या मुलाखती म्हणजे स्त्रीवादी आठवणींचे लिंबट झाड, ज्यात एकाचवेळी दुःख, झळ आणि सावली आहे. या मुलाखती म्हणजे फक्त लेखी संवाद नसून त्या एकविसाव्या शतकातही स्त्रीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर लादल्या जाणाऱ्या अघोषित युद्धाचे दस्तावेजीकरण करतात. यात स्त्रिया सांगतात की, त्या फक्त कविता, लेख लिहित होत्या, विचार मांडत होत्या. पण त्यांचा हा आवाज ‘राष्ट्रविरोधी’ ठरवण्यात आला. त्यामुळेच हे ‘व्हाईट टॉर्चर’ म्हणजे केवळ वैयक्तिक शारीरिक शिक्षा नसून तो स्त्रीच्या सार्वजनिक ओळखीवरचा हल्ला आहे. या मुलाखती म्हणजे केवळ आठवणींची जंत्री नाहीत. त्या स्वतःतच एक राजकीय कृती आहेत.
‘स्त्री म्हणून जिवंत राहण्याची किंमत काय असते’ हे अधोरेखित करणारे ‘व्हाईट टॉर्चर’ हे पुस्तक वाचताना माझ्यासमोर केवळ तुरुंगाच्या बंद भिंती नव्हत्या, तर त्या भिंतींत अडकलेल्या स्त्रीचे श्वास घेणे, तिचा गहिवर, तिचा संताप आणि तिची थरथरणारी साक्ष उभी राहिली. स्त्रीवर लादलेले नियंत्रण हे फक्त तिच्या शरीरावरचे नसून तिच्या आवाजावरचे, तिच्या अस्तित्वावरचेही आहे.
घराघरातील व्हाईट टॉर्चर
हा छळ फक्त इराणपुरता मर्यादित आहे काय? याचे उत्तर ‘नाही’ हे आहे. कारण ‘व्हाईट टॉर्चर’ ही इराणमध्ये राजकीय संदर्भात तयार झालेली संकल्पना असली तरी ही संकल्पना म्हणजे ‘सत्ता-मानसिकता-संवादशून्यता’ यांचे एकत्रित रूप आहे, जी केवळ इराणपुरती मर्यादित नाही. उत्तर कोरिया, चीन, अफगाणिस्तान यांसारख्या देशांमध्ये मानसिक छळतंत्र म्हणून ही संकल्पना वापरली जाते. सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर स्त्रियांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारात (डॉमेस्टिक व्हायोलन्स) मौन, लादलेला एकांत, संवाद नाकारणे या स्वरूपाचे हिंसाचार हे ‘व्हाईट टॉर्चर’च्या प्राथमिक तत्त्वांशी साम्य दर्शवतात. त्यामुळे या संकल्पनेचा आकृतिबंध वैश्विक आहे. मात्र त्याची अंमलबजावणी स्थानिक संदर्भानुसार बदलत असते. ‘व्हाईट टॉर्चर’ ही संकल्पना मानसिक छळाची एक व्यापक रूपरेषा देते. कौटुंबिक हिंसाचाराबरोबरच जातीय बहिष्कारामध्येही ही संकल्पना दिसून येते. स्थानिक संदर्भात या संकल्पनेची विविध प्रकारे पुनर्रचना होताना दिसते.
परिघावरच्या स्त्रिया अजूनही मौनात
या पुस्तकाच्या सीमिततेकडे एक प्रश्नार्थक नजर टाकते तेव्हा निवडक महिला… निवडक आयुष्यं…दिसतात. या अनुभवांतून काहीतरी नसलेलं जाणवतं. या पुस्तकात दिसणाऱ्या स्त्रिया शिक्षक, वकील, कार्यकर्त्या आहेत. त्या खरोखरच अत्याचाराच्या विळख्यात आहेत, हे निर्विवाद. पण त्याचवेळी मनात एक विचार डोकावतो की, या मुलाखती सर्व स्त्रियांच्या अनुभवांचं प्रतिनिधित्व करतात का? या साक्षीदार स्त्रिया प्रामुख्याने शहरी, सुशिक्षित आणि सामाजिकदृष्ट्या साक्षर अशा वर्गातून येतात. मग ग्रामीण, अल्पशिक्षित, जातीयदृष्ट्या बहिष्कृत स्त्रियांचं काय? हा प्रश्न उरतोच. म्हणूनच या साक्षीदार स्त्रिया महत्त्वाच्या असल्या, तरी त्या समग्र नाहीत. हा सर्व पातळ्यांवरचा आवाज नाही.
सर्व स्त्रिया समान सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक किंवा राजकीय स्थितीत नसतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला बोलणे शक्य होईल हे गृहितकही अवास्तव ठरते. याशिवाय स्त्री ही एकसंध, समान अनुभवांचा गट नसल्याने जात, वर्ग, धर्म, रंगभेद, लैंगिकता आणि भाषा या विभाजकांमुळे स्त्रियांमध्ये प्रचंड असमानता आहे. अनेक स्त्रियांसाठी आजही ‘बोलणे’, ‘व्यक्त होणे’ हे स्वातंत्र्य नसून विशेषाधिकार आहे. कोणत्याही समाजात उच्चवर्गीय, शिक्षित, इंग्रजी भाषिक स्त्रियांचे आवाज अधिक ऐकले जातात, तर अल्पसत्ता असलेल्या स्त्रियांचे आवाज अप्रकट किंवा दुर्लक्षित राहतात. त्यामुळे ‘सगळ्या स्त्रिया बोलतात’ हा आदर्श प्रत्यक्षात काहींच्या आवाजाचा अतिरेक आणि अनेकांच्या मौनाचे पुनरुत्पादन बनू शकतो. त्यातच बोलण्यासाठी लागणारी भाषा आणि भाषिक कौशल्येही सत्तेच्या वर्चस्वात असतात. अनेक स्त्रियांचे अनुभव त्या फक्त विशिष्ट भाषिक चौकटीत न बोलल्यामुळे वैध ठरवले जात नाहीत आणि अखेर अशा परिघावरच्या स्त्रिया बोलल्या तरी त्यांचे आवाज राजकीय प्रणाली, माध्यमं किंवा संस्थात्मक रचना ऐकतीलच असेही नसते. म्हणूनच ‘बोलणे’ हे नेहमीच प्रत्यक्ष बदलाचे साधन ठरत नाही.
असे असले तरी प्रस्तुत व्हाईट टॉर्चरमधून हेच दिसते की, स्त्रीच्या शरीराला हात न लावता तिच्या मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे स्त्रियांवर शुद्ध पुरुषी मालकी हक्क प्रस्थापित करणे होय. हे एकप्रकारे स्त्रीचे वस्तुनिष्ठीकरण आहे. ही वस्तुनिष्ठीकरणाची चरमसीमा समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
स्त्रीप्रश्नाच्या अभ्यासक