कोणी सवित्री आदर्श

वटसावित्री हे अनेक स्त्रियांसाठी श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे; मात्र बदलत्या काळात त्यामागील विचारांचाही चिकित्सक आढावा घेण्याची गरज आहे. या लेखात परंपरा, स्त्रीस्वातंत्र्य आणि सामाजिक बदल यांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
कोणी सवित्री आदर्श
Published on

समाजचिंतन

जगदीश काबरे

वटसावित्री हे अनेक स्त्रियांसाठी श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे; मात्र बदलत्या काळात त्यामागील विचारांचाही चिकित्सक आढावा घेण्याची गरज आहे. या लेखात परंपरा, स्त्रीस्वातंत्र्य आणि सामाजिक बदल यांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे. विशेषतः स्त्रियांना हे सण फार आवडतात. वर्षानुवर्षे पुरुषी मानसिकतेचा वरचष्मा असलेल्या या समाजात निदान सणांच्या निमित्ताने स्त्रियांना मोकळीक मिळते. अशीच वटपौर्णिमेसंबंधी पौराणिक कथा पुरुषसत्ताक मानसिकतेने चतुरपणे धर्माचा लेप लावून पतीप्रेम दाखवण्यासाठी निर्माण केली गेली होती. ही अर्थातच मिथक कथा आहे. त्यामुळे तिचे वर्तमानात अवडंबर माजवणे कितपत योग्य आहे, याचा पुनर्विचार व्हावा. पूर्वीच्या काळी स्त्रियांना नटण्या-मुरडण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी काही निमित्ते असायची. या निमित्ताने त्या बाहेर पडत, सगळ्या एकत्र येत आणि मनीच्या सुखदुःखाचे हितगुज एकमेकांशी बोलत. अशा स्त्रियांमध्ये अनेक स्त्रियांचे नवरे त्यांना मारझोड करणारे, बाहेरख्याली असले तरी त्यांना तोच नवरा सात जन्म हवा असतो. कारण त्या नवऱ्याला देवासमान मानावे, अशी त्यांची मानसिकता गुरुचरित्राच्या रूपाने तयार करण्यात आलेली होती. (संदर्भ : गुरुचरित्र अध्याय 31-पतिव्रतेचा धर्म...)

जरी असे अभाग्य पुरुष।

नपुसक जरी असे देख।

असे व्याधिष्ठ अविवेक।

तरी देवासमान मानावा ॥ ६६ ॥

पतीचे मनी जी आवडी।

तैसीच ल्यावी लेणी लुगडी।

पति दुश्चित्त असता घडी।

आपण श्रृंगार करू नये ॥ ६८ ॥

पतीस क्रोधे उत्तर देती।

श्वानयोनी जन्म पावती।

जंबुक होवोनि भुंकती।

ग्रामासन्निध येऊन ॥७६॥

(जंबुक म्हणजे कोल्हा)

आपुला पुरुष दुर्बल किती।

समर्थाची न करावी स्तुति।

पति असता अनाचाररीती।

आपण निंदा करू नये ॥८०॥

पण आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत. त्या स्वतः विचार करू शकतात, स्वावलंबनाने जगू शकतात. तेव्हा पूर्वीच्या काळातील परावलंबी स्त्रियांसारखेच प्रवाहपतीत जीवन जगावे का हा त्यांनी विचार करायला नको का? पतीवरील प्रेम दाखवण्यासाठी वटसावित्रीचे व्रत असेल तर पुराण पुरुषांनी आपल्या स्त्रीवर प्रेम दाखवण्यासाठी एखादे व्रत वा सण का निर्माण केला नाही? कारण स्त्रिया या फक्त उपभोग्य वस्तू आहेत आणि नवऱ्याच्या पायाची दासी आहेत, हेच आपल्या धार्मिक संस्कारातून ठसवले गेले आहे. त्यातूनच पुराणकथेत पुरुषप्रधान मानसिकतेची बळी असलेल्या सावित्रीचे उदत्तीकरण केले गेले. त्याचा परिणाम म्हणून आजही धार्मिक पगड्याखाली असणाऱ्या शिक्षित स्त्रिया वडाच्या झाडाचे वैज्ञानिक महत्त्व सांगत या कथेला वैज्ञानिक आधार द्यायचा प्रयत्न करतात. पण ही पश्चातबुद्धी झाली. यालाच धार्मिक कथेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आजच्या विज्ञानाचा फसवा आधार घेणे म्हणतात. हा शिक्षणाचा दुरुपयोग नाही काय ? शहरात वडाचे झाड दुर्मिळ झाल्यामुळे धंदेवाईक धार्मिक जंगलातील वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून शहरातील स्त्रियांना विकतात. त्या फांद्यांना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तोच पती सात जन्म मिळावा म्हणून दोरा गुंडाळला जातो. म्हणजे ज्या विज्ञानाचा आधार घेऊन वडाच्या झाडाचे महत्त्व सांगितले जाते त्याच वडाच्या झाडांची कत्तल या निमित्ताने केली जाते. वडाचे झाड लावून वायुप्रदूषण कमी करण्याच्या ऐवजी वडाचे झाड तोडून त्याच्या फांदीभोवती दोरा गुंडाळणारा विरोधाभास आपल्या शिक्षित स्त्रियांच्या कसा लक्षात येत नाही ? धर्माच्या नावाखाली काही लोक धंदा करतात आणि शिक्षित स्त्रिया त्याला बळी पडतात ! स्त्रिया शिक्षित झाल्या तरी आपली गतानुगतिक मानसिकता सोडायला मात्र तयार नाहीत, हेच यावरून सिद्ध होत नाही काय ?

वडाला दोरा गुंडाळूनही जर घटस्फोट होत असतील तर सातही जन्म तोच नवरा हवा म्हणून घटस्फोट घेण्याची तयारी आहे का? दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या नवऱ्याची बायको देखील कसा काय सातही जन्मी तोच नवरा मागते ? अनेक वर्ष नवऱ्यासह न नांदणारी बायको माहेरी वटसावित्रीची पूजा का करते ? हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे आणि

सातही जन्मात हाच पती मिळावा, म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळतात, पण मला आश्चर्य वाटते की मुस्लिम, ईसाई, बौद्ध धम्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून कुठल्याही प्रकारचे व्रत किंवा विधी करीत नाहीत; मग त्या स्त्रियांच्या पतीचे आयुष्य कमी होते का? जर सात जन्म हाच पती मिळणार असेल तर मग पुढचे सहा जन्म कुंडली बघून ३६ गुण मिळवून लग्न करायची गरज काय? असेच समजायचे ना की, मागच्या जन्मात वटपौर्णिमा केली म्हणून हा आपला मागच्या जन्माचा पती आहे, असे गृहीत धरून पंचांग वा कुंडली न बघताच विवाह का करत नाहीत ? आणखी एक गंमत म्हणजे नवरा दीर्घायुषी झाला तर नवऱ्याच्या आधी त्या मरणार. म्हणजे पुढच्या जन्मी अशा स्त्रिया नवऱ्यापेक्षा जास्त वयाच्या असणार नाही का? असो.

आज अनेक स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसतात, ते सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केल्यामुळेच. ज्या स्त्रियांची आज वाईट अवस्था आहे त्याचे कारण मनूने मनुस्मृती लिहून त्यांच्या मनात घट्ट संस्कारित केलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि धार्मिक कर्मकांडात त्या रममाण होत असतात हे आहे. व्रतवैकल्यात अडकून पडलेल्या अशा स्त्रियांना आपली मानसिक धार्मिक गुलामीच प्रिय आहे. संस्कृती रक्षणाचा सोन्याचा पिंजराच त्यांना आपलासा वाटू लागलेला आहे. म्हणून त्यांना आपले शोषण होत असूनही ते होत नाही असे वाटते. परिणामी भट-पुरोहित अजूनही कर्मकांड, पूजाअर्चा, थोतांडी ज्योतिष यांच्या सहाय्याने 'हुशारी' दाखवून त्यांना व्यवस्थित लुटत आहेत. वडाचे झाड लावायचे निमित्त हवे असेल तर त्यासाठी 'वटसावित्री'पेक्षा '५ जून हा जागतिक पर्यावरण दिन' केव्हाही चांगला. म्हणूनच आता स्त्रियांना मानसिक गुलामीत ढकलणारी व्रतवैकल्ये स्त्रियांनीच झुगारून द्यायला हवीत. एका सावित्रीने वडाला फेऱ्या मारायला शिकवलं तर दुसऱ्या सावित्रीने अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर पडायला शिकवलं. सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजाला कळाली असती तर देशाचा इतिहास काही वेगळाच असता. पण ज्या सावित्रीने मागच्या शतकात स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी हालअपेष्टा सोसल्या त्यांच्या उपकारांची फेड आजच्या शिक्षित स्त्रिया मानसिक गुलामीत ढकलणाऱ्या पुरातन कालीन सावित्रीची पूजा करून करत असतील तर आजच्या स्त्रिया खरंच शिक्षित झाल्या आहेत का, हा प्रश्न त्यांनी आपल्या मनाशीच प्रांजळपणे विचारावा.

खरे पाहता, १९ व्या शतकात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आजच्या सावित्रीने स्त्रीला स्त्रीचे स्वत्व, स्त्रीची अस्मिता, स्त्रीची विजिगिशू वृत्ती जागी केली. स्त्रियांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहायला शिकवले. तेव्हा या सावित्रीचे स्मरण करणे जास्त उचित ठरणार नाही का? पुराणकालीन सावित्री पुराणात ठीक होती; पण शिक्षित झालेल्या सावित्रीच्या लेकींनी वर्तमानात जगताना पुराणकालीन विचारांना किती महत्त्व द्यावे हे ठरवायला नको का? २१ व्या शतकातील स्त्रियांना कोणती सावित्री व्हायला आवडेल-पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे नवऱ्याच्या धाकात आणि आज्ञेत राहणारी सत्यवानाची सावित्री की स्वतःच्या आयुष्यात शिक्षित होऊन सर्वांशी प्रेमादराने आणि स्वावलंबनाने जगण्याची दिशा देणारी फुल्यांची सावित्री ?

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in