ये काली काली..?

मालकीणबाईंचा मूड आज काही चांगला दिसत नव्हता. सारख्या येरझाऱ्या घालत होत्या. असं करता करता, त्या कपाटातील भांड्यांकडे बघायच्या. मार्गारेट मावशीला मालकीणबाईंची अस्वस्थता बरोबर जाणवत असे.
ये काली काली..?
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाईंचा मूड आज काही चांगला दिसत नव्हता. सारख्या येरझाऱ्या घालत होत्या. असं करता करता, त्या कपाटातील भांड्यांकडे बघायच्या. मार्गारेट मावशीला मालकीणबाईंची अस्वस्थता बरोबर जाणवत असे. अशावेळी, त्यांच्यासोबत इकडून-तिकडे फेऱ्या मारल्या की त्यांना किंचित बरं वाटायचं. फेऱ्या मारता-मारता कधीतरी त्यांचं लक्षं मार्गारेटकडे जायचं. मग, त्या तिला उचलून घेत नि सांगू लागत, “मार्गे, हे असं आहे बघ, ते तसं झालं बघ. तूच सांग आता काय करायचं बाई..” मार्गारेटसुद्धा आज्ञाधारकपणे डोळ्यात तेल घालून नि कान मोठे करून ऐकत असे. मालकीणबाईंना मार्गारेटशी बोलून बरं वाटत असावं. पण, मालकीणबाईंचा मूड कधी जाईल, याचा काही भरवसा नसे. कारण एक-दीड मिनिटं मार्गारेटशी प्रेमानं बोललं की लगेच, त्या तिला धाडदिशी सोफ्यावर ठेवत नि म्हणते, “मार्गे, हे तुला सांगून काय उपयोग म्हणा..” आजही तसंच घडलं.

नेमकं काय झालं, असं विचारावंसं वाटून मार्गारेटने, म्याव म्याव.. करून मालकीणबाईंचं लक्षं वेधण्याचा प्रयत्न केला.

“अग मार्गे, तुला सांगून काय उपयोग? ही भांडी दिसतातना, चांदीची आहेत. मोठ्या हौसेने घेतली होती बाई. बराच खर्चही केला. पण, ही भांडी सारखी-सारखी काळी पडतात. काय दुर्बुद्धी झाली नि ही भांडी घेतली बघ.” असं सांगून, मालकीणबाईंनी मार्गारेटला धाडदिशी सोफ्यावर टाकलं नि त्या पाय आपटत बेडरूममध्ये गेल्या. धाडदिशी दरवाजा बंद करण्याचा आवाज आला. पुढचे दोन-तीन तास, त्या आता झोपणार याची ती खूण होती.

रॉबिन्सनमामा या क्षणाचीच वाट बघत होता. मालकीणबाई कधी बेडरूममध्ये जातात

नि कधी आपण बिळाच्या बाहेर येतो, असं त्याला झालं होतं. मालकीणबाईंनी मार्गारेटला धाडदिशी सोफ्यावर टाकल्याचं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. खरंतर त्यांनी तिला फरशीवरच धाडदिशी टाकलं असतं तर तिचं डोकं फुटून मस्त मज्जा आली असती, असं त्याला वाटलं. पण हा दुष्टपणाचा विचार त्याने लगेच बाजूला सारला नि, सॉरी..सॉरी.. म्हणत तो बिळातून बाहेर येऊन सोफ्यावर चढला.

“रॉब्या, तू कशाला सॉरी-फॉरी म्हणतोस, ज्यांनी सॉरी म्हणायला हवं, त्या तर ढाराढूर झोपल्यातना..” रॉबिन्सनचा कान उपटत मार्गारेट म्हणाली. त्यावर रॉब्या म्हणाला कसा, “मावशे, अग, मी त्यांच्याच वतीने ‘सॉरी’ म्हणत होतो. तुला त्यांनी किती धाडदिशी आपटलं या सोफ्यावर. दुष्टाडली मेली! पण, मावशे मला हे कळलं नाही, त्यांना एवढा राग आला तरी कशाचा?”

“अरे, त्या सारख्या कपाटातल्या भांड्यांकडे बघत होत्या.”

“म्हणजे त्यांच्या रागाचं कारण, त्या भांड्यात तर दडलं नाही ना?” कपाटाच्या दिशेने उडी मारत रॉबिन्सन म्हणाला. मावशीही कपाटाकडे आली. कपाटातील बहुतेक भांडी काळ्या रंगाची झाली होती.

“तुझ्या लक्षात आलं का राब्या?”

“अरे, ही भांडी काही दिवसांपूर्वी कशी छान चकचकीत होती. चमचम करत होती. आता काळी पडलीत.”

“म्हणजे जादू की भुताटकी? याचाच तर राग नसेल ना आला मालकीणबाईंना.”

“मी तर काहीच केलं नाही.”

“मावशे, असं जर नसेल तर मग, ही भांडी काळी पडण्याचं रहस्य शोधलंच पाहिजे. त्यासाठी तू जेम्स बाँड झालीच पाहिजेस.” रॉबिन्सनने डोळे मिचकावित मार्गारेटला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं.

“हं, तू म्हणतोस ते खरंय. शोध तर घेतलाच पाहिजे.” मावशी नाक फुगवत म्हणाली. तिने काळजीपूर्वक कपाटातील भांडी बघितली. ती सगळी चांदीची भांडी होती. मालकीणबाईंनीसुद्धा तिला तेच सांगितलं होतं. पांढरीशुभ्र, चकचकीत असणारी ही भांडी काळी कशी झाली असतील, या विचारातच मावशी गढली. तिने डोळे मिटले. मेंदूला माहितीच्‍या महाजालात पाठवलं आणि मग क्षणात डोळे उघडून आनंदाने उडी मारत तिने रॉबिन्सनची पप्पी घेतली.

“म्हणजे, माझ्या या ‘स्मार्ट’ मावशीला उत्तर मिळालं म्हणायचं.” रॉबिन्सन मिशी हलवत म्हणाला.

“माम्या, मार्गारेटपासून काहीच लपून राहू शकत नाही.”

“म्हणूनच तर तू ग्रेट आणि मी तुझा लाडका ‘पेट’ ना मावशे! आता, मलाही हे रहस्य जरा सांगूनच देना.”

“माम्या, ही भांडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी चांदी, आर्जेन्टाइन खनिजातून प्राप्त करतात. हे आर्जेन्टाइन म्हणजे सिल्व्हर सल्फाईड. ते चांदीचं संयुग समजलं जातं.”

“पण त्याचा आणि चांदीच्या काळ्या होण्याचा काय संबंध?”

“अरे, हवेमध्ये सल्फरडाय ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड हे वायू असतात. त्यांचा संपर्क जेव्हा चांदीशी होतो, तेव्हा चांदीचं त्या संयुगात रूपांतर व्हायला मदत होते. त्यांचा रंग काळा असल्याने, चांदीच्या पृष्ठभागावर काळी पुटं जमतात. ही काळी पुटं, चांदीचा पांढरा शुभ्र चकचकीत रंग झाकोळून टाकतात.”

“याचा अर्थ, सगळी भानगड, हा जो कुणी सल्फरनामे, संयुग आहे तो घडवतो म्हणायचे.”

“माम्या भानगड नाही रे. ही एक रासायनिक क्रिया आहे. अंडी, बऱ्याच फळांचे रस, व्हिनेगर, ऑलिव्ह फळे, लोकर, रबर यामध्येही सल्फरची संयुगं असतात. त्यांच्याशीसुद्धा चांदीचा संपर्क झाला तरी, चांदी काळी पडते.”

“यावर काही उपाय नाही का?”

“आहे ना, चांदीच्या भांड्याचा संपर्कच हवेशी किंवा सल्फरचे संयुग असलेल्या भांडी किंवा वस्तू यांच्यासोबत येऊ द्यायचा नाही.”

“त्यासाठी काय करावं लागेल?”

“या भांड्यांना हवाबंद डब्यात ठेवायला हवं किंवा मग त्यांना सतत स्वच्छ करायला हवं. तसं केल्याने सिल्व्हर सफ्लाइडचा लहानसा सुद्धा थर तयार झाला असल्यास, तो निघून जातो नि चांदीची भांडी लखलखीतच राहतात.”

“हरे राम, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे!”

“आता तुला काय झालं गधड्या?”

“मावशे, मी माझ्यासाठी नाही, मालकीणबाईंसाठी म्हणालो. अधूनमधून चांदीची भांडी स्वच्छ करण्याची सुबुद्धी त्यांना मिळावी. त्यांनी, तुझ्यावरच हात चालवण्याऐवजी या भांड्यांवरही हात चालवावा, म्हणून…” रॉबिन्सन डोळे बारीक करत म्हणाला.

मार्गारेटनेही बेडरूमच्या दरवाज्याकडे बघत, “हरे राम, हरे कृष्ण..” असं पुटपुटून घेतलं.

ज्येष्ठ बालसाहित्यिक.

logo
marathi.freepressjournal.in