

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
मानवी वस्त्या अस्ताव्यस्त आणि अंदाधुंद पसरत चालल्या आहेत. विकास प्रकल्पांची आक्रमणे अधिक वेगवान झाली आहेत, तर दुसरीकडे शेती, जंगले आक्रसली जात आहेत. आमची रोजीरोटी, अधिवास हिरावून आमच्या अस्तित्वावरच घाला घातला जात आहे. तेव्हा, हे माणसांनो.. 'आमच्या नजरेतूनही जरा जग बघा' आणि आमच्या व्यथा-वेदना समजून घ्या. परिसंस्था वाचवून जंगलांनाच देवरायामाना, हेच गाऱ्हाणे यंदाच्या वन्यजीव सप्ताह आणि जागतिक प्राणी दिनानिमित्त जंगलाच्या कानाकोपऱ्यात घातले जात आहे.
सध्या महाराष्ट्रासह देशात जल, जंगल आणि जमीन ओरबाडण्याचे काम वेगाने सुरू आहे. सोने हवे, बॉक्साइट हवे, खनिजे हवीत आणि आम्हाला सर्वात श्रीमंत व्हायचे आहे. याच अभिलाषेने शेतीचे व जंगलांचे लचके तोडले जात आहेत. एका रात्रीत हजारो झाडे खुलेआम नष्ट करून वन्य पशुपक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त केले जात आहेत. परिणामी, काही पशुपक्षी मानवी वस्त्यांकडे वळू लागले आहेत. उंच वाढलेले उसाचे शेत बिबट्यांसाठी नवे सुरक्षित घर बनले आहे. हा ऊस तोडल्यानंतर बिबट्या आणि मानव यांच्यात संघर्ष उद्भवत असल्याच्या घटना सातारा आणि जुन्नर भागात घडत आहेत. कोकणात जंगली हत्ती, रानगवे आणि वानरसेनेने उच्छाद मांडला आहे. प्राणी आणि माणूस यांच्यातील संघर्षांची तीव्रता कमी करायची असेल, तर जंगलांकडे आपुलकीच्या भावनेने आणि देवरायांच्या जपवणुकीच्या नजरेने बघायला हवे. हाच वन्य पशुपक्ष्यांच्या जगताचा सांगावा आहे.
वन्यप्राण्यांचे विश्व केवळ सुंदरच नाही, तर ते मायाळू आणि दयाळू आहे. या निसर्गदेवतेच्या गूढ प्रदेशात प्रवेश केल्यानंतर शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी मिळते. इथला निसर्ग ताणतणाव हलका करतो आणि मन प्रसन्न करतो. मुख्य म्हणजे, नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विसावा, शांत, निवांतपणा देतो. या शांतीसुखाची पैशात कधीही मोजदाद होऊ शकत नाही. निसर्ग अमर्याद आनंद देतो आणि जगण्याचे सुख काय असते ते तिथे गेल्याशिवाय कळत नाही. तिथली रंगीबेरंगी फुले मन वेडावून टाकतात, गवताची हिरवाई लहान होऊन बागडायला लावते आणि मुके विश्व लळा लावते. रानपाखरांच्या मंजुळ स्वरांनी जगण्याचे गाणे होते. पशुपक्ष्यांचा मुलायम स्पर्श हवाहवासा वाटतो आणि त्यांच्या निरागस डोळ्यांतील बोल मनाशी हितगुज साधतात. निसर्गाचे हे अनमोल वैभव आणि ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवा, हाच संदेश निसर्ग देत आहे. त्याला अधिक गांभीर्याने घेण्याची अपेक्षा यंदाच्या जागतिक प्राणी दिनाद्वारे व्यक्त होत आहे.
आमच्या विश्वात हव्यास नाही, भेदभाव नाही, विद्वेष नाही, सत्तेची मस्ती नाही, हुकूमशाही प्रवृत्ती नाही आणि कोणाशी स्पर्धा किंवा संघर्षही नाही. आमच्या विश्वात भाषा स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिथे लोकशाही आहे. प्रत्येकाला मानमर्यादा आहेत. जगण्याची स्पेस आहे. म्हणूनच आम्ही आमच्या विश्वात रमतो आणि 'आनंदाचे डोही आनंद तरंग' निर्माण करतो. आम्ही आमच्या जीवनात सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत. तेव्हा, हे माणसा.. तुलाही आनंद व शांतता हवी असेल, तर आमच्याकडे जरूर ये; आमची दारे सदैव तुझ्यासाठी खुली आहेत, पण आमचे घरसंसार उद्ध्वस्त करू नकोस, हेच जंगलाचे सांगणे आहे.
आम्हाला बोलता येत नसले तरी आमची एक विशिष्ट भाषा आहे, ज्यात संकेत आणि भावभावना आहेत. त्यासाठी तुम्हाला पर्यावरणमित्र व्हावे लागेल आणि जंगलांच्या व्यथा-वेदनांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावे लागेल. गरजा तुम्हालाही आहेत आणि आम्हालाही आहेत. सहजीवनातच निसर्गाची परिसंस्था सामावलेली आहे. या पृथ्वीवर केवळ मानवाचाच अधिकार नाही, तर तो समस्त जीवसृष्टीचा आहे, हे तुम्ही समजून-उमजून घेतले पाहिजे. प्राण्यांच्या नजरेतून जगाकडे बघितले, तर 'जगा आणि जगू द्या' ही मानवतावादी दृष्टी तुम्हाला बरेच काही दाखवून देईल.
एकेकाळी माळरानावर डौलाने वावरणारा माळढोक आता दिसेनासा झाला आहे. ताडोबा आणि मेळघाटातील वाघ, बिबटे वाहनांची शिकार ठरत आहेत. कोकणच्या किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवे प्लास्टिकच्या जाळ्यात फसत आहेत. महाराष्ट्राचा राज्यप्राणी आणि झुपकेदार
शेपटीचा शेकरू याला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायला सलग जंगलाची गरज असते याची जाणीव असूनही त्याच्या रहदारीच्या मार्गात रस्त्यांचे अडथळे आणले जात आहेत. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात काळ्याकभिन्न बिबट्याचे दर्शन घेण्यासारखे दुसरे सुख नाही, जे त्याच्या गावी गेल्याशिवाय कळणार नाही. माऊस डिअर, चौशिंगा, सोनपाठीचा बेडूक आणि सोनेरी शेपटीचा कोल्हा यांना जिवंत ठेवायचे आहे ना? त्यांचा 'डायनासोर' होऊ द्यायचा नाही ना? मग, आता काय करायचे हे तुम्हीच ठरवा, हेच जंगलाचे सांगणे आहे. आगामी काळात वन्यजिवांच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाच्या संकटामुळे वन्यजिवांचे जगणे अधिक खडतर होत जाणार आहे. भविष्यात 'जंगले आणि वन्यजीव वाचवा' यापेक्षा 'वन्यजिवांना जगवणारी परिसंस्था वाचवा' हीच हाक द्यावी लागेल.
परस्परसंबंध जपावे लागतील. प्लास्टिकचा मर्यादित वापर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. आपला एखादा चुकीचा निर्णय हजारो वर्षांपासून जपलेल्या समृद्ध जगण्याचा एका क्षणात नाश करून संपूर्ण जीवसृष्टीला विनाशाकडे नेऊ शकतो. म्हणूनच मानवाने निसर्गावर राज्य करण्याचे सोडून निसर्गाचा भाग बनून सहजीवनाची भूमिका स्वीकारायला हवी. मानवकेंद्रित नव्हे, तर परिसंस्थाकेंद्रित जीवनशैलीचा स्वीकार करण्यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.
तंत्रज्ञान, धोरण आणि सहानुभूती यांचा संगम साधल्याखेरीस वसुंधरेचे भवितव्य सुरक्षित होऊ शकणार नाही. त्यासाठी वन्यजिवांच्या हक्क आणि अधिकारांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहण्याची गरज आहे. प्राण्यांच्या वेदना आणि त्यांच्या डोळ्यांतील भावभावना आपण ओळखायला शिकू, त्यांच्या जगण्याचा हक्क मान्य करू, तेव्हाच मानवी संस्कृती अधिक प्रगल्भ होईल. प्राण्यांच्या नजरेतून जग बघायला शिकू, तेव्हाच त्यांच्या जगण्याचा खरा अर्थ महासागरातील प्रवाळच नव्हे, आपल्याला कळेल.
तर सागराची तटबंदी असलेली खारफुटीची जंगले जपावी लागतील. जंगलाचा एक तुकडा वाचवणे पुरेसे ठरणार नाही, तर जंगलांना जोडणाऱ्या पायवाटा, नद्या, माळराने, किनारे आणि सागरी परिसंस्था यांचे जागतिक प्राणी दिन, वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीव संशोधक निकित सुर्वे, साताऱ्याचे वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविल्या. त्यांच्या सूचना राज्याला नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध, संपन्न करतील, हे निश्चित.
बिबट्या समोर आल्यास आवाज करावा, हातवारे करावेत, स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करावा याची खबरदारी घ्यावी. त्यांच्या येण्या-जाण्याचे मार्ग न अडवता ओव्हर पास, अंडरपास बनवावेत. जंगलातून प्रवास करताना वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याचे वन्यजीव संशोधक निकित सुर्वे यांनी स्पष्ट केले. जंगलांचे देवराया समजून रक्षण केल्यास जीव जैवविविधता जपली जाईल, असा विश्वास त्यांनी जागविला.
वन्यजिवांच्या अस्तित्वाचा धोका केवळ एखाद्या शिकारीपुरता मर्यादित राहिलेला नाही. वाढती उष्णता, वणव्यांमुळे वन्यजिवांचे अन्न, पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याचा धोका वाढत चालला आहे. त्याने निसर्गाची अन्नसाखळी खंडित होण्याचा धोका आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील पश्चिम घाट पर्यावरण सलगतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. या भागातील ३२५ प्रजातींपैकी १२९ प्रजाती असुरक्षित आहेत. १४५ प्रजाती संकटग्रस्त आहेत. ५१ प्रजाती अतिगंभीर संकटात असल्याचे साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी नमूद केले.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने साताऱ्याच्या कराड, पाटण तालुक्यात 'नेचर क्लब' सुरू केला आहे. त्यात ४० शाळांनी सहभाग घेतला आहे. निसर्ग, पर्यावरण, वन्यजिवांबद्दलच्या संवेदना जागे करण्याचा हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल. पेंच, मेळघाट, ताडोबा, सह्याद्री व्याघ्घ्र प्रकल्प, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान यासारखे प्रकल्प जंगल संवर्धन, मृदसंवर्धन व जल सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, ग्राहक, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी, स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वन्यजीव संवर्धन समाजाच्या प्रत्येक घटकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. जंगले नष्ट झाली, नद्या प्रदूषित झाल्या, वन्यजिवांचा भ्रमण मार्ग खंडित झाला, तर संपूर्ण परिसंस्थाच धोक्यात येईल. हा धोका ओळखूनच पावले उचलायला हवीत, हाच 'त्यांच्या नजरेतून जग पाहण्याचा' जागतिक प्राणी दिनाचा संदेश आहे.
prakashrsawant@gmail.com