थंडीच्या रंगात हरवलेले क्षण

पहाटेची थंडी, गावातील धुक्याच्या कुशीतून सूर्यकिरणे येताना, त्या क्षणाचा अनुभव उब घेण्याच्या आठवणींना सजीव करतो. तरुणाईच्या रंगीत दिवसांपासून शेकोटीच्या उबदार क्षणांपर्यंतचा प्रवास सांगणाऱ्या या आठवणी-
थंडीच्या रंगात हरवलेले क्षण
थंडीच्या रंगात हरवलेले क्षण
Published on

हिवाळी शब्दछटा

अक्षय वाटवे

पहाटेची थंडी, गावातील धुक्याच्या कुशीतून सूर्यकिरणे येताना, त्या क्षणाचा अनुभव उब घेण्याच्या आठवणींना सजीव करतो. तरुणाईच्या रंगीत दिवसांपासून शेकोटीच्या उबदार क्षणांपर्यंतचा प्रवास सांगणाऱ्या या आठवणी-

पहाट फुलत जाते दूर डोंगराच्या कुशीत आणि गावावरची धुक्याची चादर हळुवार बाजूला सरकवत सूर्याची किरणं ओसरीपर्यंत येतात. पडदा सरकवलेल्या खिडकीमधून एक उन्हाचा कवडसा गालांना गुदगुल्या करत, कानात फुंकर मारून हळूच उठवतो. आळोखे पिळोखे देत, बेडवरच मांडी ठोकून छाती भरून श्वास घेतो..

तेव्हा पहाटेची गुलाबी थंडी गालगुच्चे घ्यायला लागते. पायाच्या तळव्यांना गुदगुल्या करू लागते. सर्वांगावर जणू मोरपीस फिरते अशी ही मोरपीशी थंडी मी एकेकाळी अनुभवली आहे. हे आज सांगताना मन स्वाभाविकपणे कालच्या आठवणींमधे भिरंगतं. आजकाल गारठा वाढला आहे किंवा कमी झाला आहे एवढ्याच गप्पा होतात, मात्र एक जमाना होता जेव्हा अवखळ तरुणाई ओसंडून वाहत होती तेव्हाचा. सकाळी-सकाळी कडाक्याच्या थंडीची दाट दुलई पांघरलेल्या रस्त्यावरून चालताना, शेजारी डोलणाऱ्या हिरव्यागार वनराईवरचे टपोरे ताजे दवबिंदू न्याहाळताना, जास्वंदीच्या पाकळ्यांवरचे दवाचे मोती अलगत टिपताना, कॉलेजमध्ये पोहोचायचं आणि एवढ्यात गेटवर समोरून सायन्सच्या तीनचार कॉलेज कन्यकांचा घोळका अक्षरशः हरणाच्या दुडक्या चालीने सरांच्या आधी वर्गात पोचण्यासाठी लगबग करायचा. आम्ही गेटवरच थिजून जायचो. सकाळच्या गारठ्याने आणि कोवळ्या उन्हाने त्यांच्या गालावर आणि नाकाच्या शेंड्यावर गुलाबी रंगाची जी छटा चढवलेली असे तशी छटा एखाद्या रंगपेटीत शोधूनही सापडणं कठीण. त्या गुलाबी थंडीतल्या अश्या असंख्य गुलाबी छटा आम्ही मनाच्या तळाशी जाळीदार पिंपळ पानासारख्या हळुवार जपल्या आहेत. (हे सांगताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो.)

इथून मोर्चा वळायचा कॉलेजच्या कॅन्टीनच्या दिशेने. किटलीतला वाफाळता चाहा ग्लासमध्ये ओतला जायचा आणि त्याचवेळी हाताचे तळवे एकमेकांवर चोळून थंडी बाजूला सारत पटकन ग्लासची कडा ओठाला टेकवली जायची.. आहाहा.. आलं, वेलची, मसाला मिश्रित त्या पहिल्या धारेच्या चहाचा अलौकिक दरवळ मनसोक्त नाकात भरून घेतानाच ओठांनी पहिला घोट घेतलेला असायचा. आणि मागोमाग सर्रर असा आवाज करत बटाटे वड्याने उकळत्या तेलाने भरलेल्या कढईत सूर मारलेला असायचा..

बाहेर पहाल तर मोती तलावावर धुक्याची चादर पसरलेली असायची.. मग जड पावलांनी कॅन्टीनचा निरोप घ्यायचा आणि वर्ग गाठायचा. एवढ्या सगळ्या भानगडीत पहिला लेक्चर बुडलेला असायचा.. आणि मन तरंगत असायचं तळ्यावरच्या धुक्यावर. या कॉलेजच्या, तळ्याच्या आठवणी आहेत तशा तिथे अनुभवलेल्या सगळ्या ऋतुंच्याही आठवणी आहेत, विशेषतः वयात येण्याचे ऋतू! ज्यात ऊन भाजत नाही, पाऊस भिजवत नाही आणि थंडी गोठावत नाही… मात्र तारुण्यांचा पाहिला बहर ओसरतो आणि वास्तवाची बोचरी थंडी हाडापेरापर्यंत गारठवून टाकते. तेव्हा नकळत उबेला आसूसतो आपण.

गारठा दूर करायचे तसे बरेच उपाय असतात. मात्र सुखद ऊब देणारी शेकोटी पेटवावी असं वाटतंच.

या शेकोटीचीही मोठी मौज आहे. गावाचा चौक, किंवा देवाळा समोरचा पार, एसटी स्टँड शहरात एखाद्या सिक्युरिटी गार्डच्या खोक्या शेजारची जागा अशा ठीक ठिकाणच्या शेकोटीचे संदर्भ वेगळे आहेत नाही का? एकदा शेवटच्या लोकलने सायनला उतरलो तेव्हा घरी जाताना रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी बाहेर विझत आलेली शेकोटी पाहिली. शेजारी देहाचं मुळकुटं करून कोणी पडलं होतं ते बिचारं कुडकूडत होतं. काहीच न करता मी तिथून निघालो आणि माझ्या ऊबदार घराचा आसरा घेतला. पण ती शेकोटी विझून उरलेली राख माझ्या स्मरणात आहे.

शेकोटी पेटवायची तर सगळी साग्रसंगीत पूर्व तयारी करायची. चांगली कोरडी लाकडं, थोडा पालापाचोळा गोळा करायचा. अपरिहार्य परिस्थितीत पेटवाव्या लागणाऱ्या शेकोटीसाठी सगळा जामानिमा करणं शक्य नसतं. तिथे फक्त थंडीपासून संरक्षणाचं साधन असतं शेकोटी; शेवटी उब मिळणं आवश्यक असतं.

पाहिलंत, अवखळ तरुणाईच्या नाकाचा शेंडा लालबुंद करणाऱ्या थंडीबद्दल बोलताबोलता शेकोटीच्या उबेला येऊन बसलो आपण! तुम्हालाही आठवत असतीलच की अशा पेटलेल्या शेकोट्या आणि रंगलेल्या रात्री!!

पावसात छत्री घेऊन पागोळ्या तळहातावर झेलत ते पाणी उडवत भटकण्याचा, थंडीत स्वेटर, कानटोपी गळ्यात मफलर अडकवून ताज्या भाजलेल्या कणसाचा आस्वाद घेण्याचा, उन्हाळ्यात चटके सोसत, किंवा घामाच्या धारांची पर्वा न करत गारेगार आईसफ्रूट खाण्याचा दांडगा उत्साह जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत सारं आलबेल आहे असं समजा.

निसर्गाच्या ऋतूचक्राप्रमाणे फिरत रहायला हवं. कारण या सगळ्यात दडली आहे आशा. उन्हाळ्याची आग विझवण्यासाठी पावसाळा येईलच. पावसाचा ओलावा जमिनीत मुरवून पेरलेल्या शेतात उगवून आलेल्या धान्यात जीवनरस भरण्यासाठी हिवाळा येईलच आणि फिरून पुन्हा येईल उन्हाळा. सदा सर्वकाळ सर्वांशी आपलं जुळतं, जमतं नाही असं होत नाही. ऋतूंचही तसंच आहे. म्हणून मग, येतो पंखा, येते छत्री, येतो स्वेटर, शाल कधी पेटवावी लागते शेकोटीही… मात्र आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पेटवली जाते धुनी, ती पेटवली की संदर्भ पारच बदलतात. त्या पेटत्या धुनीच्या लालपिवळ्या ज्वाळात आसक्ती भस्म होते आणि वीरक्तीची राख अंगाला फासून सर्वप्रकारच्या थंडी, ऊन वाऱ्यापावसापासून तुमची कायमची सुटका होते. त्या सुटकेपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे पण दरम्यानचे सगळे ऋतू रसरसून अनुभवायचे आहेत…

लेखक, अभिवाचक

logo
marathi.freepressjournal.in