

समाजचिंतन
जगदीश काबरे
स्त्रीच्या प्रजननक्षमतेचा विषय केवळ जैविक मयदिपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक, भावनिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या (IVF) स्तरावर मानवी मूल्यांची कसोटी पाहणारा एक अत्यंत संवेदनशील प्रवास आहे.
जागतिक मातृदिन दरवर्षी निश्चित तारखेला येत नाही, तर तो मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आधुनिक मातृदिनाची सुरुवात २० व्या शतकाच्या सुरुवातीला ॲना जार्विस यांनी केली होती. बहुतेक स्त्रियांना आई होण्याची इच्छा असते कारण लहानपणापासून त्यांना तसे बाळकडू मिळालेले असते. म्हणून स्त्रीच्या शरीरातील प्रजननक्षमतेबद्दलची चर्चा ही वैद्यकीय किंवा जैविक विषयापुरती मर्यादित नसून ती सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भावनिक स्तरांवरही खोलवर परिणाम करणारी आहे. जैविक दृष्टिकोनातून स्त्रीच्या अंडाशयांमध्ये जन्माच्या वेळी सुमारे 10 ते 20 लाख बीजांड (oocytes) असतात. किशोरावस्थेपपर्यंत हा आकडा घटून सुमारे 3 ते 4 लाखांपर्यंत येतो.
प्रजननक्षम आयुष्यात दर महिन्याला एक बीजांड परिपक्व होऊन बाहेर पडते, परंतु त्याच वेळी काही प्रमाणात इतर अनेक बीजांडही नष्ट होतात. वय वाढत जातं तशी केवळ बीजांडांची संख्या कमी होत नाही, तर त्यांची गुणवत्तादेखील कमी होत जाते. विशेषतः 35 वर्षांनंतर ही घट अधिक वेगाने होते आणि 40 वर्षांनंतर प्रजननक्षमतेत लक्षणीय घट दिसून येते. बीजांडांच्या गुणवत्तेत होणारी घट ही मुख्यतः गुणसूत्रीय त्रुटींशी संबंधित असते. वय वाढल्यावर अंड्यांमध्ये गुणसूत्रांचे विभाजन योग्य रीतीने न होण्याची शक्यता वाढते. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते किंवा गर्भपाताची शक्यता वाढते. तसेच डाउन सिंड्रोमसारख्या काही आनुवंशिक विकारांची शक्यता देखील वाढते.या पार्श्वभूमीवर आयव्हीएफ (In Vitro Fertilization) सारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानांची भूमिका महत्त्वाची ठरते. आयव्हीएफमध्ये स्त्रीच्या अंडाशयातून बीजांड काढून ते प्रयोगशाळेत शुक्राणूसोबत फलित केले जाते आणि तयार झालेला भ्रूण पुन्हा गर्भाशयात ठेवला जातो. विज्ञानाच्या या प्रगतीमुळे अनेक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवता आला आहे. परंतु आयव्हीएफ ही काही जादूची कांडी नाही. तिच्या यशस्वीतेचे प्रमाण हे स्त्रीच्या वयावर, बीजांडांच्या गुणवत्तेवर, हार्मोनल स्थितीवर आणि इतर वैद्यकीय घटकांवर अवलंबून असते. वय जास्त असल्यास आयव्हीएफ कमी प्रमाणात यशस्वी होते. दुसरे म्हणजे आयव्हीएफ प्रक्रियेचा आर्थिक, भावनिक आणि शारीरिक भार देखील मोठा असतो.
अनेक जोडप्यांना एकापेक्षा जास्त वेळा ही क्रिया करावी लागते; त्यामुळे खर्चही जास्त झाल्यामुळे आर्थिक ताण निर्माण होतो. त्याचबरोबर, प्रत्येक अपयशानंतर बसलेला भावनिक धक्का, आशा-निराशेचे चक्र, सामाजिक दबाव, हे सर्व मिळून मानसिक थकवा निर्माण करतात. त्यामुळे पालक होण्याची किंमत फक्त पैशांतच नाही, तर आशा, जिद्द, धैर्य आणि कौटुंबिक विश्वासातही आहे, हे विसरून चालणार नाही.सामाजात स्त्रीच्या प्रजननक्षमतेबाबत अनेक गैरसमज आणि दबाव अस्तित्वात आहेत. स्त्रीच्या आयुष्याचे मूल्यमापन तिच्या आई होण्याच्या क्षमतेवर केले जाते. विवाहानंतर लगेच मूल होण्याची अपेक्षा, मूल न झाल्यास दोष स्त्रीवर टाकणे, किंवा उशिरा मातृत्व स्वीकारल्यास टीका करणे, हे सर्व अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आजच्या काळात शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबन यांना महत्त्व दिले जात असल्यामुळे अनेक स्त्रिया उशिरा विवाह करतात किंवा मातृत्व पुढे ढकलतात. हा निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे, परंतु त्याच वेळी जैविक मर्यादा लक्षात घेणे देखील आवश्यक आहे. अनेक वेळा स्त्रियांना असे वाटते की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्या कोणत्याही वयात आई होऊ शकतात. परंतु वास्तवात विज्ञान मदत करू शकते, पण ते जैविक घड्याळ पूर्णपणे बदलवू शकत नाही. या संदर्भात प्रजनन जागरूकता अत्यंत महत्त्वाची ठरते.
स्त्रियांना त्यांच्या शरीरातील बदल, प्रजननक्षमतेची मर्यादा, आणि योग्य वेळ याबद्दल योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच, डॉक्टरांनीही रुग्णांना केवळ उपचार देण्यापेक्षा त्यांना शिक्षित करण्यावर भर द्यावा.एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे बीजांड गोठवणे. या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या तरुण वयात बीजांड गोठवून ठेवले जातात आणि नंतर योग्य वेळी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. हा पर्याय विशेषतः अशाच स्त्रियांसाठी उपयुक्त ठरू शकतो ज्या करिअर किंवा इतर कारणांमुळे मातृत्व पुढे ढकलू इच्छितात. तथापि, ही प्रक्रिया देखील महाग आहे आणि तिचे यश निश्चित नाही. समाजात पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रजननक्षमतेबाबतची असमानता देखील लक्षात घ्यायला हवी. पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती आणि त्यांची गुणवत्ता वयानुसार कमी झाली तरी आयुष्यभर चालू राहते. परंतु स्त्रियांच्या बाबतीत मर्यादित बीजांडांचा साठा असल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता अधिक संवेदनशील असते. भावनिक स्तरावर, अपत्यप्राप्ती ही केवळ जैविक प्रक्रिया नसून तो एक गहन अनुभव आहे. अनेक जोडप्यांसाठी पालक होणे हे आयुष्याचे ध्येय असते. जेव्हा हे ध्येय साध्य होत नाही, तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
नैराश्य, चिंता, आत्मग्लानी, या भावना सामान्य असल्या तरी अशा परिस्थितीत मनाची अवस्था हळवी झाल्यामुळे समुपदेशन आणि मानसिक आधाराची गरज लागू शकते.आयव्हीएफ, आयसीएसआय, प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग, डोनर एग्स, अशा अनेक तंत्रज्ञानांमुळे अपत्यप्राप्तीची शक्यता वाढली आहे. परंतु या सर्व तंत्रज्ञानांचा उपयोग करताना नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न देखील निर्माण होतात. उदाहरणार्थ, डोनर अंड्यांचा वापर केल्यास मुलाचे जैविक नाते कोणाशी असेल? सरोगसीमध्ये स्त्रीचे शोषण होण्याची कितपत शक्यता आहे? या प्रश्नांवर समाजाने विचार करणे आवश्यक आहे. यासोबतच, धोरणात्मक स्तरावरही काही बदल आवश्यक आहेत. कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी अनुकूल धोरणे राबवणे, मातृत्व रजा, लवचिक कामाचे तास असणे, आणि बालसंगोपन सुविधा, या गोष्टी स्त्रियांना करिअर आणि मातृत्व यांचा समतोल साधण्यास मदत करू शकतात.आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीला आई व्हायचे आहे की नाही, आणि केव्हा व्हायचेय, हा निर्णय तिचा स्वतःचा असावा. समाजाने तिच्यावर दबाव टाकण्याऐवजी तिच्या निर्णयाचा आदर करायला हवा. त्याच वेळी हा निर्णय समजून उमजून घेतलेला असावा. म्हणजेच, जैविक वास्तव, वैद्यकीय पर्याय, आणि संभाव्य परिणाम यांची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्यात काय तर, स्त्रीच्या प्रजननक्षमतेबाबतचे जैविक वास्तव हे नाकारता येणार नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकावे किंवा करिअरवर तडजोड करावी. उलट, विज्ञान, शिक्षण आणि सामाजिक बदल यांच्या साहाय्याने स्त्रियांना अधिक पर्याय आणि स्वातंत्र्य मिळू शकते. शेवटी, पालकत्व ही केवळ एक जैविक घटना नसून तो एक भावनिक, सामाजिक आणि नैतिक अनुभव आहे. आशा, जिद्द, धैर्य आणि विश्वास या मूल्यांशिवाय कोणतेही तंत्रज्ञान अपुरे आहे. विज्ञान आपल्याला मार्ग दाखवू शकते, परंतु त्या मार्गावर चालण्यासाठी मानवी भावनांची ताकद आवश्यक आहे. जागरूकता, संवेदनशीलता आणि विज्ञान यांचा समतोल साधला तरच आपण या गुंतागुंतीच्या विषयाला योग्य न्याय देऊ शकू.आपण या गुंतागुंतीच्या विषयाला योग्य न्याय देऊ शकू.
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com