
उत्सवरंग
रोहित गुरव
सगळ्यांचा लाडका गोपाळकाला उत्सव येतोय. १६ ऑगस्ट या तारखेकडे लक्ष ठेवून सगळ्या गोविंदा पथकांचा सराव सुरू आहे. अशा वेळी गोपिकांची पथकं कशी मागे राहणार? दहीहंडी रचून कृष्णजन्माचं स्वागत करायला गोपिकांची पथकंही सराव करत आहेत. त्यातीलच एक आहे अष्टविनायक महिला गोविंदा पथक. दहीहंडीच्या मनोऱ्यांमधून गोपिकांचा आत्मविश्वासच व्यक्त होत आहे.
घड्याळात रात्री दहाचे ठोके पडले की, खार पूर्व येथील 'अष्टविनायक महिला गोविंदा पथका'चे प्रशिक्षक अमित ब्रीद सरांच्या तोंडातील शिट्टी फुरफुरू लागते. शिट्टीचा आवाज परिसरात घुमतो. तो आवाज ऐकला की, मग घरातील कामं भराभर उरकून आसपासच्या परिसरातील महिला, मुली यांची पावले साईबाबा मंदिर परिसरातील मैदानात वळू लागतात आणि काही क्षणातच भगव्या, पांढऱ्या रंगातील बनियन अंगावर चढवलेल्या ३५ ते ४० मुली आणि महिलांनी हा परिसर भरून जातो. सरावाच्या दिवशी हा आकडा कमी-अधिक होत असला तरी प्रत्यक्ष गोविंदाच्या दिवशी मात्र ५० ते ६० मुली अष्टविनायक पथकात सहभागी असतात.
हा दरवर्षीचाच अनुभव आहे. याही वर्षी गेले दोन महिने अष्टविनायक पथकाच्या गोपिकांचा सराव जोरात सुरू आहे. शाळा-कॉलेज, त्याचा अभ्यास, घरकाम, ऑफिस, जाण्या-येण्याचा प्रवास.. असे सगळे अडथळे दरवर्षीप्रमाणे आहेतच. पण तरीही रोज रात्री त्यांची पावलं मैदानाच्या दिशेने वळत आहेत. थरावर थर रचले जात आहेत. थर रचता रचता मध्येच तो पडतो. पण हार न मानता पुन्हा साऱ्याजणी उभ्या राहतात. पुन्हा नव्याने थर रचू लागतो. कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला मार लागलेला असतो. पण म्हणून कोणीच थांबत नाही. लागलेल्या मारावर एखादी फुंकर घातली की काम होतं. सराव सुरू असताना मध्येच पावसालाही हजेरी लावण्याची हुक्की येते. तोह येऊन या गोपिकांबरोबर खेळतो. जणू कान्हाच पाऊस होऊन बरसतो. या गोपिकाही मनसोक्त भिजून घेतात. भिजता भिजता आपल्या कान्हाचं स्वागत करतात. त्याच्या सोबतीनेच आपला सराव सुरू ठेवतात. पायाखाली चिखल झाला तरी थर लावण्याचं, त्यावर चढण्याचं काम सुरूच असतं. अगदी रात्रीचे बारा वाजले तरी.
यंदा सहा थर रचण्याचा या पथकाचा मानस आहे. त्यामुळे सरावही जोरात सुरू आहे. बोल बजरंग बली की जय.. चा नाद सभोवतालात घुमत आहे.
'बोल बजरंग बली की जय' असं म्हटलं की अंगात वेगळंच बळ संचारतं, असं या पथकातील गोपिका सायली जाधव सांगते. सायली यंदा प्रथमच गोविंदा पथकात सहभागी झाली असून ती सगळ्यात खालच्या म्हणजे बेसच्या थरात आहे. ती नियमित जिमला जात असल्याने आणि सायकलिंग करत असल्याने तिचा स्टॅमिना चांगला आहे. त्याचा फायदा तिला थर रचताना होतोय. ती बेसला उभी राहते. बेसला उभं राहून वरच्या थरांचा सगळा भार खांद्यावर घेताना खांद्याची सालटी निघते. पण जणू एखादी छोटी अडचण असावी, अशा सुरात सायली सांगते, "खांद्यावर टॉवेल टाकून पुन्हा थरात उभी राहते." पथकात काही कबड्डी आणि खो-खो खेळाडू आहेत. तशाच काही खेळाशी कधीही संबंध न आलेल्या मुलीही आहेत. पण त्यांना प्रशिक्षण दिल्यावर त्या तयार होतात. सायलीही त्यातलीच एक आहे. खांदे सोलटले तरी हार न मानता पुन्हा बेसला उभी राहत आहे.
'थर रचताना बॅलन्स साधणं हा भाग सर्वात महत्त्वाचा असतो.' - कविता मंचेकर
दिवसभर नोकरी, मग घरातील कामं उरकून रात्री उशिरापर्यंत आम्ही सराव करतो. काही मोजके तास झोपायला मिळतात. पुन्हा सकाळी उठून दिवसाचं सत्र सुरू होतं. तब्बल दोन महिने हा दिनक्रम नियमित सुरू असतो. त्या निमित्ताने शरीराला शिस्त आणि सवय लागते. शरीरही तयार होतं आणि त्याचवेळी मनही. कारण काही करून आपल्या पथकाने न पडता थर रचावेत, हा प्रत्येकीचा निर्धार असेल तरच हंडीचा मनोरा उभा राहतो, अशी भावना गौरीने व्यक्त केली.
थर रचताना बॅलन्स साधणं हा भाग सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे सर्वात आधी जमिनीवर बॅलन्सचा सराव दिला जातो. मग त्या मुलीला हळूहळू दुसऱ्या, तिसऱ्या थरावर तोच सराव दिला जातो, असं गेल्या दहा वर्षांचा अनुभव असलेली कविता मंचेकर अगदी आत्मविश्वासाने सांगत होती. ती म्हणाली, "प्रत्येक थराची आव्हानं वेगवेगळी असतात. बेसच्या थरात पाय जमिनीवर असले तरी खांद्यावर प्रचंड वजन असतो. मी जेव्हा तिसऱ्या थरावर असते तेव्हा दुसऱ्या थरावरच्या मुलीला सांभाळून माझ्या खांद्यावर असलेल्या दोन मुलींना मला विश्वास द्यायचा असतो. वर चढताना शिडीवर दबाव येणार नाही ना याची काळजी घ्यायची असते, तिसऱ्या थरातील सहकाऱ्यांना सावरायचे असते. दुसऱ्या थरातील मुलींच्या खांद्यावर दिलेला पाय सरकणार नाही याची काळजी घ्यावी लागते. हे करत असताना दोन ते तीन मिनिटे सहनशीलतेची अगदी कसोटी लागते."
या दोन-तीन मिनिटांमधला थरार जसा कविताच्या शब्दातून व्यक्त होत होता, तसाच ब्रीद सरांच्या शब्दांमधून देखील तो व्यक्त होत होता. ते म्हणाले, "जोपर्यंत या मुली थर रचून खाली उतरत नाहीत तोवर मी श्वास रोखून असतो. थराला पर्यायी मुली असल्या तरी त्याला मर्यादा येतात. काहीवेळा मुलींची अदलाबदली केली जाते. त्यामुळे आमच्यासाठी पथकातील प्रत्येक मुलगी महत्त्वाची असते."
शिस्त आणि एकमेकांवर असलेला विश्वास हा यशस्वी थराचा मंत्र असतो, असंही अमित ब्रीद सांगतात. दहीहंडी उत्सवाशी सांगड घालून हे पथक अधिक नावारूपाला आणण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यासाठी विभागातील अधिकाधिक मुली-महिलांना पथकात सामील होण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
केवळ सण म्हणून या दहीकाला उत्सवाकडे न पाहता त्यातून महिला सक्षमीकरणाचा अनोखा संदेश हे मंडळ देत आहे. आज महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत. नारीशक्तीची ही ताकद आणि एकजुटीचे दर्शन या सणाच्या निमित्ताने घडत असल्याचा विश्वास अमित ब्रीद यांनी व्यक्त केला.
पाचव्या किंवा सहाव्या थरावर चढताना मला खूप मजा येते, असं छोटी परी अगदी प्रांजळपणे बोलून जाते. या छोटीचा आत्मविश्वास बरंच काही सांगतो. मनातील भीती दूर होणं हे सक्षमीकरणाचं पहिलं पाऊल आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोपिका पथकांकडून हे पाऊल टाकलं जात आहे.
guravrohit1987@gmail.com