

स्ट्रेट ड्राईव्ह
ऋषिकेश बामणे
महिलांची एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महाअंतिम सामन्याद्वारे विश्वाला एक नवा विजेता गवसणार आहे. गेले पाच आठवडे रंगलेल्या या स्पर्धेतून महिला क्रिकेटमधील नव्या तारका उदयास आल्या, तर काही जुन्या तारकांनीही अखेरच्या टप्प्यात छाप पाडली. अशाच काही पाच नायिकांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
खेळपट्टीवर या साऱ्याजणी लीलया वावरत असतात. प्रत्येकीचं वैशिष्ट्य वेगळं. प्रत्येकीचं स्थान आगळं. त्या आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असल्या तरी संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे असतं. क्रिकेट हा केवळ पुरुषांचा खेळ नाही, महिलाही हा खेळ तितक्याच दमदारपणे खेळू शकतात, प्रेक्षकांना श्वास रोखायला लावू शकतात, हे महिला क्रिकेटमधल्या अनेकींनी आतापर्यंत सिद्ध केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा विश्वास
यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक प्रभावी खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वर्डचे नाव नक्कीच पहिल्या क्रमांकावर घ्यावे लागेल. या २६ वर्षीय फलंदाजाने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १६९ धावांची संस्मरणीय खेळी साकारून संघाला प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले. मुख्य म्हणजे गेल्या दोन टी-२० विश्वचषकातही वोल्वर्डच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एकीकडे पुरुषांच्या संघाने जूनमध्येच कसोटीचे जागतिक अजिंक्यपद मिळवलेले असताना, आता वोल्वर्डच्या नेतृत्वात महिला संघसुद्धा आयसीसी जेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आणण्यास आतुर असेल.
ऑस्ट्रेलियाची नवी ओळख
ऑस्ट्रेलियाची २२ वर्षीय डावखुरी सलामीवीर फीबी लिचफील्ड ही शरीरयष्टीने सडपातळ वाटत असली, तरी रिव्हर्स स्वीपने ती चेंडू सीमापार टोलवू शकते, हे तिने विश्वचषकात दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने तब्बल सात वेळा एकदिवसीय विश्वचषक उंचावला आहे. २०२२मध्ये त्यांनी सलग नऊ सामने जिंकले, तर यंदाच्या विश्वचषकातही उपांत्य फेरीपर्यंत सातही सामन्यांत ते अपराजित होते. लिचफील्डने यामध्ये प्रत्येकी एक शतक-अर्धशतकासह ३०४ धावांचे योगदान दिले आहे. संघात अनेक तारांकित फलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू असूनही लिचफील्ड त्यांच्या प्रकाशाखाली झाकोळली गेली नाही. उलट तिने स्वत:ची नवी ओळख निर्माण केली. भारताविरुद्ध लिचफील्डने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे भविष्यात ही खेळाडू आणखी यशाचे शिखर सर करेल, यात शंका नाही.
नाबाद १२७...
मुंबईची २५ वर्षीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यंदाच्या विश्वचषकात भारताची भरवशाची फलंदाज म्हणून उदयास आली. विशेषत: जेमिमाने दोन दिवसांपूर्वीच बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी साकारून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ती खेळी व तो विजय अनेक कारणांनी संस्मरणीय होता. कारण त्यामुळे भारताने तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, शिवाय महिलांच्या क्रिकेटमध्ये प्रथमच एखाद्या संघाने इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग केला. हे कमी म्हणून की काय, ऑस्ट्रेलियाचा संघ २०१७ नंतर आठ वर्षांनी विश्वचषकात एखाद्या लढतीत पराभूत झाला. जेमिमाच्या खेळीचे मोल काय होते, हे सध्या समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. भारतीय महिलांना पहिले जगज्जेतेपद खुणावत आहे.
२०१७च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी जेमिमा १७ वर्षांची होती. मुंबईच्या संघाकडून ती फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायची. मात्र भारतीय संघाचे त्यावेळी पहाटे पाच वाजता विमानतळावर स्वागत करण्यासाठी ती आणि मुंबईच्या संघातील काही खेळाडू हजर होते. त्यावेळी जेमिमाने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आज आठ वर्षांनी ती ते स्वप्न जगत असून विश्वविजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
मुख्य म्हणजे २०२२च्या विश्वचषकाच्या वेळी जेमिमाला वगळण्यात आले होते. त्यावेळी तिची कामगिरी खास नव्हती. यंदाच्या विश्वचषकातही पहिल्या तीनपैकी दोन सामन्यांत तिला भोपळा फोडता आला नव्हता. तिला एका लढतीसाठी संघातून काढण्यातही आले. मात्र स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून तिने भारतातील सर्व युवा मुलींना प्रेरणा देणारी खेळी साकारली आणि क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे.
इंग्लंडची मॅजिशियन
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेली इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्केलस्टोन म्हणजे हमखास विकेट मिळवणारी खेळाडू. सात सामन्यांत तिने १६ फलंदाजांना माघारी पाठवले होते. इंग्लंडचा प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला असला, तरी एक्केलस्टोनने दिलेले योगदान अमूल्य होते. भारतात होणाऱ्या महिलांच्या प्रीमियर लीगमध्येही एक्केलस्टोन गेली तीन वर्षे छाप पाडत आहे. महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत एक्केलस्टोन अग्रस्थानी विराजमान आहे. तिच्या फलंदाजीतही आता सुधारणा झाली आहे. त्यामुळेच इंग्लंडची प्रसार माध्यमे तिला मॅजिशियन म्हणून संबोधतात. इंग्लंडचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही तिने मिळवला असून पुढील दहा वर्षे एक्केलस्टोन संघाची हुकमी एक्का म्हणूनच वर्चस्व गाजवेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
किवींचा आधारस्तंभ
न्यूझीलंडची कर्णधार व ३६ वर्षीय अष्टपैलू सोफी डिवाईन यंदाच्या विश्वचषकात खेळी खेळून निवृत्त झाली. २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या न्यूझीलंडला यावेळी उपांत्य फेरी गाठता आली नाही. मात्र डिवाईनने तिची कामगिरी चोख बजावली. सात सामन्यांत दोन अर्धशतके व एका शतकासह तिने २८९ धावा केल्या. तसेच कर्णधार म्हणूनही ती संघाला सातत्याने दिशा दाखवत होती. महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये डिवाईनची गणना केली जाते. २००६मध्ये पदार्पण केलेल्या डिवाईनला भारतीय चाहत्यांकडूनही प्रेम लाभते. डब्ल्यूपीएलमध्ये ती बंगळुरू संघाकडून खेळताना अनेकदा सामनावीर ठरली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली असली, तरी डिवाईन जगभरातील फ्रँचायझी टी-२० लीगमध्ये खेळत राहणार आहे.
मैदानावर चमकणाऱ्या या सगळ्या तारका म्हणजे त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि त्याचवेळी खेळातील कौशल्याचे प्रतीक आहेत. पुरुष खेळाडूंना अधिक प्रसिद्धी आणि मान मिळत असतानाही या महिला क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. क्रिकेटविश्वाला आपली दखल घ्यायला लावली आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.
bamnersurya17@gmail.com