

साधक-बाधक
क्रांती गोडबोले-पाटील
घराचा उंबरठा ओलांडून ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक 'दमलेल्या आई'ची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. आजच्या धावपळीच्या युगात नोकरी करणाऱ्या मातांना 'वर्किंग मॉम गिल्ट' आणि दुहेरी जबाबदाऱ्यांच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. मुलांच्या भविष्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक आईची ही दुखरी बाजू..
'दमलेल्या बाबाची कहाणी' या गाण्याने आपल्या सगळ्यांच्याच काळजाचा ठाव घेतला. ते गाणं ऐकताना डोळ्यांसमोर उभा राहतो तो लोकलच्या गर्दीत चिरडला जाणारा, घामाघूम झालेला आणि रात्री उशिरा घरी आल्यावर आपल्या झोपलेल्या लेकराचं चुंचन घेणारा बाप. पण आज काळ बदलला आहे. आज घराचा उंबरठा ओलांडून जेव्हा आई ऑफिसला निघते, तेव्हा तिच्या खांद्यावर केवळ लॅपटॉपची बॅग नसते, तर संपूर्ण घराची जबाबदारी आणि काळजाच्या तुकड्याला मागे सोडल्याची एक न संपणारी टोचणी असते. म्हणूनच, आजच्या धावपळीच्या युगात ही कहाणी आहे त्या प्रत्येक 'दमलेल्या आईची', जी करिअर आणि मायपण या दोन टोकांवर स्वतःला झोकून देऊन संसार सावरत आहे.
सकाळचा अलार्म वाजला की, आईच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. तिची सकाळ ही शांत नसते, तर ती एका युद्धासारखी असते. एका बाजूला गॅसवरची शिट्टी वाजते, तर दुसरीकडे मोबाईलवर ऑफिसच्या मेलचे नोटिफिकेशन्स धडकत असतात, ज्या आई रोज हातावर पोट चालवण्यासाठी रोज शारीरिक मेहनतीची कामं करतात त्यांच्या समस्या तर अजूनच वेगळ्या असतात. मुलाचा डबा, नवऱ्याचे मूड आणि त्याच्या तयारीत मदत, सासू-सासऱ्यांसाठी सगळे करून जाणं आणि स्वतःची ऑफिसची तयारी या सगळ्या धावपळीत ती स्वतःचा चहा कधी घेते हे तिलाही आठवत नाही. 'Work-life balance' हा शब्द ऐकायला खूप कॉर्परिट आणि स्टायलिश वाटतो, पण प्रत्यक्षात तो एखाद्या सर्कशीतल्या दोरीवरच्या कसरतीसारखा असतो. जेव्हा ती आई आपल्या सात महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात किंवा आयाकडे सोडून ऑफिसला निघते, तेव्हा तिचं मन घरीच अडकलेलं असतं. 'धार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी' या ओळीचा खरा अर्थ शहरातल्या नोकरी करणाऱ्या आईला व्यवस्थित माहीत आहे. मीटिंग सुरू असताना मध्येच 'बाळाने दूध प्यायलं असेल का?' शाळेत जाणारे मूल असेल तर वेळेत घरी आले असेल का? असुरक्षित आणि अत्याचारी समाजात मुलगी असलेली आई तर अधिकच धास्तावलेली असते. घरात मूल सतत मोवाईल बघत नसेल ना? असेही विचार तिला सतावत असतात.
आजची आई जेव्हा बाहेर पडून कामावर जाते, तेव्हा ती केवळ पैसे कमावण्यासाठी जात नाही, तर ती मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला कष्टवत असते. पण या प्रवासात तिला एक गोष्ट कायम छळत राहते, ती म्हणजे 'अपराधीपणाची भावना' (Working Mom Guilt). जेव्हा तिचं मूल फोनवर बोबड्या बोलात विचारतं, "आई, तू कधी येणार ?" तेव्हा तिच्याकडे कोणतंही ठोस उत्तर नसतं. "येते रे सोन्या, मीटिंग संपली की लगेच येते," असं खोटं आश्वासन देताना तिचा गळा दाटून येतो. अनेकदा असं होतं की, सकाळी मूल झोपलेलं असतानाच तिला घर सोडावं लागतं आणि रात्री ती जेव्हा थकून भागून घरी येते, तेव्हा तिचं सानुलं फूल पुन्हा झोपी गेलेलं असतं. अशा वेळी त्या शांत निजलेल्या चेहऱ्याकडे बघताना आईच्या मनात जे काहूर माजतं, ते शब्दांत मांडणं कठीण आहे. तिला वाटतं की, आपल्या मुलाला वेळ देऊ न शकणं, त्याच्या लहानसहान हट्टांकडे कामाच्या व्यापात दुर्लक्ष करणं, ही सल तिला रोज आतून पोखरत असते, मग या अपराधाचं ओझं कमी करण्यासाठी ती मुलांचे लाड करते, त्यांना नवनवीन खेळणी आणून देते; पण शेवटी तिलाही ठाऊक असतं की, जगातील महागडी खेळणी आईच्या स्पर्शाची जागा कधीच घेऊ शकत नाहीत.
पूर्वी कसं होतं, घरात आजी-आजोबा असायचे, मोठी कुटुंबं असायची. पण आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत आईवरचा ताण दुप्पट झाला आहे. जर नवरा मदत करणारा नसेल किंवा त्याची मानसिकता 'घरकाम ही बायकांचीच जबाबदारी' अशी असेल, तर त्या आईची अवस्था प्रेशर कुकरसारखी होते. ऑफिसमध्ये बॉसची डेडलाइन आणि घरात मुलाची अभ्यासाची डेडलाइन यामध्ये ती भरडली जाते. त्यात भर पडते ती सोशल मीडियाची. तिथे दिसणाऱ्या 'परफेक्ट मदर'चे फोटो पाहून तिला अधिकच नैराश्य येतं. तिला वाटतं, मी कुठे कमी पडतेय का? मी चांगली आई नाही का? प्रसूतीनंतर येणारा शारीरिक
थकवा आणि मानसिक ओढाताण यालाच
वैद्यकीय भाषेत 'पोस्टपार्टम डिप्रेशन' म्हणतात, पण आपल्या समाजात आजही याकडे दुर्लक्ष केलं जातं. तिला केवळ एक 'मल्टीटास्किंग मशीन' समजलं जातं, जी सगळं मॅनेज करेल. पण तिलाही विश्रांतीची गरज असते, तिलाही कधीतरी कोणासमोर तरी मोकळं होऊन रडावसं वाटतं. पण अशावेळी तिला असं वाटणारी तू काय पहिलीच आई नाही आहेस असं सांगून अजूनच तिला हतबल केलं जातं.
एक वेगळा विचार मांडायचा झाला, तर आजची आई जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा ती केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलीसाठी एक आदर्श (Role Model) निर्माण करत असते. ती आपल्या मुलाला हे शिकवत असते की, स्त्रीसुद्धा स्वावलंबी असू शकते. पण हे शिक्षण देताना तिची जी दमछाक होते, ती कोणालाच दिसत नाही. हे स्वावलंबन कधी ती स्वतःहून स्वीकारते, तर कधी परिस्थितीमुळे तिला नोकरी करणं भाग असतं. कधी कधी ऑफिसमध्ये महत्त्वाची प्रेझेंटेशन सुरू असताना मुलाच्या शाळेतून फोन येतो की "मुलाला ताप आला आहे", तेव्हा त्या आईच्या काळजात जे धस्स होतं, ती कळ कोणत्याही पुरस्काराने भरून निघणारी नसते. ती धावत घरी येते, पण मनात एक भीती असते की ऑफिसमध्ये आपल्याला 'अनप्रोफेशनल' समजलं जाईल. ही जी दुहेरी ओढाताण आहे, ती आजच्या वर्किंग मॉम्सच्या आरोग्यावर, विशेषतः मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि चिडचिड हे जणू तिचे सोबतीच बनले आहेत. आपण म्हणतो की, आई प्रेमळ असते, पण ती दमलेली असते हे आपण विसरतो. रात्री जेव्हा सगळं जग शांत झोपलेलं असतं, तेव्हा ती उद्याच्या डब्याची तयारी करत असते किंवा मुलाचा राहून गेलेला गृहपाठ पूर्ण करत असते. तिच्या डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं, वाढणारं वजन तिच्या कष्टाची साक्ष देत असतात. तिची स्वतःची स्वप्नं, स्वतःचे छंद तिने कुठेतरी कपाटाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवलेले असतात. तिलाही वाटतं की पावसाच्या पहिल्या थेंबात चिंब भिजावं किंवा मित्र-मैत्रिणींसोबत निवांत गप्पा मारत बसावं, फिरायला जावं, पण 'वेळ' हा तिच्या आयुष्यातील सर्वात महागडा शब्द झाला आहे. तिने मातृत्वाचा आनंद घ्यावा की कर्तव्याचा गाडा ओढावा, या द्वंद्वात तिचं आयुष्य व्यतीत होत असतं.
आजची आईसुद्धा त्या गाण्यातल्या बाबासारखीच गुपचूप रडते. फरक इतकाच की, बाबा रात्री उशिरा रडत असेल, पण आई कधी बाथरूमच्या नळाखाली पाणी सोडून रडते तर कधी लोकलच्या खिडकीतून बाहेर बघताना चोरून आसवं पुसते. तिला करिअरही करायचं आहे आणि मुलांवर संस्कारही करायचे आहेत. डिजिटल युगात मुलाला मोबाईलपासून लांब ठेवणं हे तर एक मोठं आव्हानच आहे. स्वतः थकून आल्यावर मुलाला गोष्ट सांगण्याऐवजी त्याच्या हातात मोबाईल देणं सोपं वाटतं, पण त्याचक्षणी 'आपण मुलावर चुकीचे संस्कार करतोय का?' हा अपराधी विचार तिला रात्री झोपू देत नाही. पण एवढं सगळं असूनही ती हरत नाही. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्मच्या आधी उठते, पुन्हा त्याच जिद्दीने डबा भरते आणि पुन्हा त्याच वेगाने लोकल पकडते.
उद्या जेव्हा ही मुलं मोठी होतील, तेव्हा त्यांना आपल्या आईची ही धडपड कळेल का? ही 'दमलेली आई' मुलांच्या यशात मुलांना आठवेल का ? आपली आई आपल्यासाठी किती राबली, तिने आपल्यासाठी आपल्या किती सुखांचा आणि आवडीनिवडींचा त्याग केला, हे जेव्हा त्या मुलांना कळेल, तेव्हाच या आईच्या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज होईल. या आईला केवळ एका दिवसाचा 'मदर्स डे' नकोय, तर तिला हवी आहे कुटुंबाची साथ, नवऱ्याचा पाठिंबा आणि मुलांचा थोडासा समंजसपणा. तिला हवंय की कधीतरी कोणीतरी तिला म्हणावं, "आज तू काही करू नकोस, आज आम्ही सगळं सांभाळतो, तू फक्त आराम कर."
आईच्या श्रमांना वयाचं बंधन नसतं; मग ती ४० वर्षांची असो वा ६० वर्षांची, मुलांच्या बदलत्या समस्या आणि वाढत्या जबाबदाऱ्या पेलताना तिची ओढाताण आजही तितकीच होत असते.
लहानपणी शारीरिक कष्ट उपसणारी आई उतारवयात मुलांच्या मानसिक आणि कौटुंबिक विवंचना काळजीतून सहन करत असते, तरीही तिच्यातील 'दमलेली आई' मात्र सदैव घरासाठी तत्पर राहते.
शेवटी, ही केवळ एका स्त्रीची, आईची व्यथा नाही, तर ही आधुनिक काळातील बदलत्या समाजव्यवस्थेची शोकांतिका आहे. आईने घर सांभाळावं आणि बापाने बाहेरचं, ही जुनी समीकरणं आता मोडीत निघाली आहेत. आज आईला दोन्ही आघाड्यांवर लढावं लागत आहे. तिचं दमणं हे केवळ शारीरिक नसतं, तर ते आत्मिक असतं. पण तरीही, आपल्या लेकराच्या एका हसऱ्या चेहऱ्यासाठी ती हे सगळं विसरून 'सुपरमॉम' च्या लेबलखाली सतत धडपडत राहते. 'मदर्स डे'च्या निमित्ताने या 'दमलेल्या आई'ला मानाचा मुजरा करताना आपण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की, तीसुद्धा एक माणूस आहे, तिलाही थकण्याचा अधिकार आहे. तिच्या या न थांबणाऱ्या प्रवासाला आपण थोडा आधार दिला, तर कदाचित तिची ही कहाणी थोडी सुसह्य होईल. कारण ती आई आहे, ती थकते, ती दमते, पण आपल्या लेकरासाठी ती कधीच हार मानत नाही. तिची ही धडपड, हे तिचं 'मायपण' जगातील कोणत्याही यशापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.
krantip183@gmail.com