

विशेष
गीतेश गजानन शिंदे
पुस्तकं म्हणजे केवळ कागदांची पानं नसून, ती आपल्या एकांतवासात सोबत करणारी जिवंत मनं आहेत. २३ एप्रिलला 'जागतिक पुस्तक दिन' होऊन गेला. पुस्तकांचा स्पर्श, त्यांचा सुगंध आणि त्यांच्याशी असणारं आपलं रक्ताच्या नात्यापलीकडचं नातं उलगडणारं हे ललित..
पुस्तकं म्हणजे केवळ कागदांची पिवळसर पानं नव्हेत, तर त्या खिडक्या आहेत एका नव्या जगाच्या दिशेनं उघडलेल्या; ज्या तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करून सदैव उभ्या असतात. २३ एप्रिल रोजी साजरा होणारा 'जागतिक पुस्तक दिन' आपल्याला याच मित्रत्वाच्या नात्याची आठवण करून देतो. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात जेव्हा आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून गेलो आहोत, तेव्हा पुस्तकाचा स्पर्श हा एखाद्या जुन्या मित्राच्या भेटीसारखा वाटतो. माझ्यासाठी जागतिक पुस्तक दिन हा केवळ तारखेचा उत्सव नाही, तर तो आहे मानवी विचारांच्या आणि कल्पनाशक्तीच्या गौरवाचा सोहळा.
पुस्तकाचं आणि माणसाचं नातं फार विलक्षण असतं. एखादं पुस्तक जेव्हा आपण हातात घेतो, तेव्हा त्यातून येणारा तो कागदाचा आणि शाईचा संमिश्र सुगंध आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. मला तो सुवास मृद्गंधासारखा वाटतो. मग ते पुस्तक कुठलंही असो. बाल साहित्यातील गोष्टींचं पुस्तक वा, पौगंडावस्थेत गुंगवून टाकणारी कादंबरी किंवा आयुष्याच्या संध्याकाळी शांतता देणारं एखादं तत्त्वज्ञान असो; पुस्तकं आपल्याला कधीच एकटं पाडत नाहीत. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर,
‘बे-ज़बान होती हैं मगर बहुत कुछ कहती हैं,
ये किताबें तन्हाई में भी साथ रहती हैं...’
म्हणूनच शहरातल्या गर्दीत किंवा प्रवासात जेव्हा आपल्या हातात पुस्तक असतं, तेव्हा आजूबाजूचा कोलाहल जणू शांत होतो. पुस्तकाची पानं उलटताना होणारा तो 'सळसळ' आवाज म्हणजे लेखकाशी चाललेला एक मूक संवाद असतो. कधी पुस्तकं आपल्याला इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवतात, तर कधी भविष्यातील स्वप्नांच्या सफरीवर नेतात. एखादं चांगलं पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर आपण ते मिटतो, तेव्हा आपण तीच व्यक्ती राहत नाही जी आपण वाचनाला सुरुवात करताना होतो. कारण आपल्या विचारांत कुठेतरी एक लहानसा का होईना बदल झालेला असतो.
कागदाच्या पांढऱ्या देहावर जेव्हा काळ्या शाईचं नक्षीकाम उमटतं, तेव्हा जन्म होतो एका पुस्तकाचा. पुस्तक म्हणजे केवळ माहितीचं संचयन नव्हे, तर तो लेखकाच्या काळजाचा एक तुकडा असतो, जो वाचकाच्या हातात येताच पुन्हा धडधडू लागतो. पुस्तकाचं पहिलं पान उघडणं म्हणजे एखाद्या अनोळखी पण सुंदर वाटेवर पहिलं पाऊल टाकण्यासारखं असतं. त्यातून येणारा तो नवाकोरा गंध मनाच्या गाभाऱ्यात धूपासारखा दरवळू लागतो. कधी त्यात पावसाच्या थेंबांची कोवळी आर्तता असते, तर कधी रखरखत्या उन्हात मिळालेल्या शीतल सावलीची ऊब. शब्दांच्या या जंगलात हरवून जाणं, हे जगातलं सर्वात सुखद 'हरवणं' असतं.
काही पुस्तकं आपल्याला आरसा दाखवतात, तर काही खिडकी बनून अथांग आभाळ. रात्रीच्या शांततेत जेव्हा आपण लॅम्पच्या उजेडात पुस्तक वाचतो, तेव्हा शब्दांच्या त्या चांदण्यात आपण स्वतःलाच पुन्हा एकदा नव्यानं शोधत असतो. पुस्तकातील पात्रांशी आपलं रक्ताच्या नात्यापलीकडचं एक नातं जमतं. त्यांच्या दुःखात आपले डोळे ओलावतात आणि त्यांच्या विजयात आपलं मन मोर होऊन नाचू लागतं.
आजच्या वेगवान जगात, जिथे संवाद हरवत चालला आहे, तिथे पुस्तकं आपल्याशी तासनतास गप्पा मारतात. ती आपल्याला अस्वस्थ करतात, विचार करायला लावतात आणि शेवटी एका शांत तृप्ततेच्या काठावर नेऊन सोडतात. एखादं अर्धवट राहिलेलं पुस्तक म्हणजे अपूर्ण राहिलेल्या प्रवासासारखं असतं, जे पुन्हा हातात घेईपर्यंत मनाला चैन पडत नाही. म्हणजे एखादं पुस्तक तुमच्या मनावर सखोल परिणाम करू शकतं. ते म्हणतात ना,
‘अलफ़ाजों के तो दांत नहीं होते,
मगर ये काट बहुत गहरा लेते हैं...’
मला तर पुस्तकातील ओळीबद्ध शब्दांची लांबच लांब काळ्या मुंग्यांची रांग वाटते. अगदी नीट निरखून पाहिलंत तर एका मागोमाग ड्रिल करत जाणारे शब्द खांद्यावर आशय वाहतात श्रावणबाळासारखे. परिच्छेदातून भेटणारी पात्रं, घडणारे संवाद, केलेली वर्णनं म्हणजे निव्वळ भाषेच्या तोंडातील साखरपेरणी असते; जिची चव वाचकांच्या जीभेवर स्वभावानुसार रेंगाळते. उंटाच्या चालीसारखं सुरुवातीचं संयमित मार्गक्रमण शेवटाच्या ओढीनं जणू काही पावसाच्या तोंडावर उडालेल्या किटकांच्या लगबगीप्रमाणे अधिक वेगवान होतं. प्रत्येक कथेचा, कादंबरीचा, कवितेचा किंवा जगण्याचाही शेवट हाती लागतोच असं नाही. पण तरीही आपण वाचत आणि वेचत राहतो. कारण शब्दांच्या मुंग्या शिगोशिगी दडलेल्या असतात पुस्तकांच्या वारुळात; अगदी प्रत्येकाच्याच मनात असतात तशा. फक्त ओठांतून बाहेर येण्यासाठी त्या ऋतूबदलाची वाट पाहत असतात.
पुस्तक वाचन म्हणजे पंच अनुभूती असते. तुम्ही पुस्तक उघडता तेव्हा सर्वप्रथम त्याचा गंध श्वासात भरला जातो. अक्षरांवरून बोट फिरवताना आपण स्पर्शज्ञान अनुभवत असतो आणि त्वचा तिचं आंधळेपण विसरते. डोळे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरील रंग स्वतःमध्ये शोषून घेतात, तेव्हा एक प्रतिमा आपल्या मनाच्या विहिरीतून अलगदपणे वर येते. आजूबाजूला सारं निःशब्द असतानाही वाऱ्यावर पानं फडफडतात तेव्हा बिटवीन द लाईन्स मधील आवाज ऐकू येतात. पान उलटताना नकळतपणे जिभेवर पानाची चव रंगाळते तेव्हा आपसूकच मुखशुद्धी होते. या सर्वात गुंतल्यावर वेळेचं भानच राहत नाही आणि मग समजतं की मनाची भूक भागवणारी पुस्तकंच पंचप्राण असतात. पुस्तकं ही अशी जहाजं आहेत, जी घराबाहेर न पडता आपल्याला अथांग विचारांच्या सागरात फिरवून आणतात.
मला वाटतं की, वाचन हा केवळ छंद नाही, तर ती एक साधना आहे. पुस्तकाच्या पानापानांत लपलेली ती ज्ञानफुलं वेचताना आपण समृद्ध होत जातो. म्हणूनच म्हणतात ना, ज्याच्या घरात पुस्तकांचं कपाट असतं, तिथे विचारांचं दार कधीच बंद होत नाही. पण माझ्यासाठी पुस्तकं म्हणजे केवळ कपाटातली एक वस्तू नाही, तर ते माझ्या एकांतवासातील सर्वात बोलके सोबती आहेत. जेव्हा बाहेरच्या जगाचा कोलाहल वाढतो आणि मन थकल्यासारखं वाटतं, तेव्हा मी माझ्या पुस्तकांच्या जगात शिरतो. तिथे गेलो की जाणवतं, ही केवळ कागदाची पानं नसून ती माझ्याशी संवाद साधणारी जिवंत मनं आहेत. कधी कधी रात्रीच्या शांततेत पुस्तकाचं एखादं पान उलटताना जो आवाज येतो, तो मला एखाद्या मंद लयीतल्या संगीतासारखा वाटतो. जणू या पानांतून अनेक शब्द श्वास घेत असतात. त्या शब्दांच्या गर्दीत मी स्वतःला शोधत असतो. लेखकानं लिहिलेला प्रत्येक शब्द जणू माझ्याच मनातल्या सुप्त भावनांना वाचा फोडत असतो. कधी एखादी ओळ वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, तर कधी एखाद्या विचारानं मनाला नवी उमेद मिळते. पुस्तकांमुळेच मला हे कळलं की, आपण जगात एकटे नाही आहोत; आपल्यासारख्याच वेदना, आनंद कुणीतरी आधीच अनुभवले आहेत आणि ते शब्दांत गुंफले आहेत.
माझ्या संग्रहातल्या प्रत्येक पुस्तकाची एक वेगळी गोष्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कुठून कुठून ती वेचून आणली आहेत. जशी परसदारातून आपण पूर्वी आजीच्या पूजेसाठी प्राजक्ताची, जास्वंदाची, गुलाबाची, सोनचाफ्याची फुलं वेचायचो अगदी तशीच. ही पुस्तकं घरी येतंच राहिली आणि कुटुंबातील सदस्य केव्हा झाली हे कळलंच नाही. कधीतरी कुठल्या पुस्तक प्रदर्शनातून, साहित्य संमेलनातून, पुस्तक दालनातून, प्रकाशन वेळी, तर कधी रद्दीच्या दुकानातून, फूटपाथवरील विक्रेत्याकडून गोळा केलेली ही पुस्तकं म्हणजे माझं विश्वच. कदाचित ते तुमचंही असेल. माझ्या काही पुस्तकांच्या पानांमध्ये सुकलेली फुलं आहेत, काहींमध्ये बुक मार्क्स आहेत, तर काहींवर पेन्सिलनं केलेल्या खुणा. त्या खुणा म्हणजे त्या त्या वेळी माझ्या मनात उमटलेली प्रतिक्रियेची पाऊलखूण आहे. किंवा विचार तरंगांची लहान वलयंच म्हणा ना. मी मुद्दाम अशा खुणा करतो, कारण काही काळानंतर मी तेच पुस्तक वाचतो तेव्हा मला पुन्हा त्याच ठिकाणी थांबावंसं वाटतंय का हे पडताळता येतं. किंवा ती खूण मी त्या वेळी का बरं केली होती? का मी तेव्हा त्या जागी इतका हळवा झालो होतो? या प्रश्नांच्या उत्तरांनी मी अंतर्मुख होतो. कधी कधी मला एक वेगळीच जागा सापडते आणि ती मी पेन्सिलीनं अधोरेखित करतो. हीच तर प्रगल्भ होण्याची खूण असते ना! जुन्या पुस्तकांचा तो विशिष्ट 'पिवळसर' वास मला आठवणींच्या प्रवासावर घेऊन जातो. ते पुस्तक ज्या काळात वाचलं होतं, तो काळ, त्यावेळची मनस्थिती आणि तो गारवा... सगळं काही पुन्हा जिवंत होतं. काही पुस्तकांमध्ये मी मुद्दाम पिंपळ पानं ठेवली आहेत. अनेक वर्षांनी जेव्हा पुन्हा पुस्तक चाळताना ते पान समोर येईल तेव्हा त्यास सुंदरशी जाळी पडलेली असेल या आशेनं. ती साधीसुधी जाळी नसेल तर त्यावर आठवणींचा सोनेरी वर्ख चढलेला असेल. पण पुस्तकाचं एखादं पान निखळतं तेव्हा मात्र जीव हळहळतो. मग त्या मित्रासाठी म्हणावंसं वाटतं,
‘मुझसे बिछड़ के तू भी तो रोया होगा ऐ दोस्त,
जैसे पुरानी किसी किताब से कोई पन्ना निकल गया...’
लोक म्हणतात मोबाईलवर आजकाल सगळं काही मिळतं, पण पुस्तकाचा तो स्पर्श, ते वजन आणि वाचताना हाताला लागणारा कागदाचा पोत याची सर कशालाच नाही. लोळत पडताना आपल्या छातीवरलं पुस्तक प्रेयसीसारखं वाटतं किंवा डुलकी काढताना तेच पुस्तक डोळ्यांत स्वप्नाचं अंजन भरतं. स्क्रीनवर शब्द फक्त दिसतात, पण पुस्तकात ते 'जाणवतात'. पुस्तक वाचताना आपण फक्त एक वाचकच नसतो, तर त्या कथेचा, त्या विचारांच्या धाग्याचा नकळतपणे एक भाग होतो. म्हणूनच पुस्तकांचं जग मला समृद्ध करतं. ही पुस्तकं मला केवळ ज्ञान देत नाहीत, तर ती मला माणूस म्हणून जगायला शिकवतात. संकटात आधार देतात आणि सुखात विचारांची जोड देतात. जोवर माझ्या हातात पुस्तक आहे आणि डोळ्यांत वाचण्याची तहान, तोवर मी कधीच एकटा पडू शकत नाही. यावर म्हणावंसं वाटतं की,
‘आयुष्याच्या वाटेवर जेव्हा केव्हा श्रमलो मी,
पुस्तकांच्या सावलीत पुन्हा नव्यानं जन्मलो मी!’
'वाचन संस्कृती' लोप पावत चालली आहे, अशी ओरड नेहमी होते. पण माझं मत थोडं वेगळं आहे. वाचन कधीच संपत नसतं, ते फक्त आपलं स्वरूप बदलत असतं. मात्र, 'स्क्रीन'वर शब्द वाचणं आणि हातामध्ये पुस्तक घेऊन त्याची पान उलटणं, यातला फरक स्पर्शाचा आणि एकाग्रतेचा आहे. पुस्तकाच्या पानात जी स्थिरता असते, ती धावत्या 'पिक्सेल'मध्ये नसते. पुस्तकं म्हणजे कपाटातली शोभा नसून ती आपल्या मेंदूची आणि मनाची मशागत करणारी साधनं आहेत. पुस्तकांमुळे आपण एकाच जन्मात हजारो आयुष्यं जगू शकतो. जो समाज वाचतो, तोच समाज विचार करतो आणि जो विचार करतो, तोच समाज प्रगत होतो. कारण पुस्तकाच्या पानांमध्ये लपलेला तो शब्दांचा प्रकाशच आपल्या आयुष्यातला अंधार दूर करू शकतो.
geeteshshinde@gmail.com
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत.