ते बल्लवाचारी

लग्नाच्या पंगतीत चवीची जादू पेरणारे, शेकडो पाहुण्यांसाठी सुग्रास भोजन बनवणारे आणि स्वतः मात्र कौतुकाच्या चार घासांपासून दूर राहणारे ते बल्लवाचार्य आज काळाच्या पडद्याआड गेले. ‘जागतिक शेफ दिना’निमित्त त्यांच्या हातच्या चवीच्या आणि जुन्या लग्नसराईच्या आठवणींना उजाळा...
ते बल्लवाचारी
ते बल्लवाचारी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

लग्नाच्या पंगतीत चवीची जादू पेरणारे, शेकडो पाहुण्यांसाठी सुग्रास भोजन बनवणारे आणि स्वतः मात्र कौतुकाच्या चार घासांपासून दूर राहणारे ते बल्लवाचार्य आज काळाच्या पडद्याआड गेले. ‘जागतिक शेफ दिना’निमित्त त्यांच्या हातच्या चवीच्या आणि जुन्या लग्नसराईच्या आठवणींना उजाळा...

तर पूर्वी, म्हणजे जेव्हा परंपरागत पदार्थांची... उदा. मसालेभात, भजी, पंचामृत, पुऱ्या, श्रीखंड, जिलबी, दोन भाज्या, लोणचं, चटणी, मठ्ठा, अळू अशा पदार्थांनी भरलेल्या स्टीलच्या ताटांची पंगत लग्नात, मंगलकार्यात सजायची, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जोरदार गजर होऊन जेवणाला सुरुवात झाली की, वाढप्यांची लगबग सुरू व्हायची. त्या काळातले बल्लव म्हणतोय मी. जेवणाचं कंत्राट घेतलेला कंत्राटदार, बहुधा लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आपल्या फौजेसह आणि भाज्या, वाणसामानासह कार्यालयात पोहोचायचा आणि सगळं मार्गी लावून द्यायचा आणि त्यानंतर ही आचारी मंडळी आपल्या कामाला भिडायची. मुख्य बल्लवांचं आदल्या दिवशी फारसं काम नसायचं. कातणं, चिरणं थोडक्यात जेवणाच्या तयारीला सुरुवात व्हायची. या मुख्य बल्लवांचा वेश म्हणजे वर उघडेबंब किंवा अंगात बिनहाताचं बनियन, तुंदिलतनू पोटाखाली कमरेला पंचा गुंडाळलेला आणि खांद्यावर मारलेला, मसाले, हळद यांनी रंगलेला, मूळ रंग ओळखू न येणारा लहानसा पंचा किंवा नॅपकिन. क्वचित गुळगुळीत दाढी केलेला बल्लव दृष्टीला पडायचा, बाकी बहुधा दाढीचे खुंट वाढलेले दिसायचे.

या प्रमुख बल्लवाच्या हाताखाली चिरणं, कातणं, खोबरं खवणं थोडक्यात जेवणाच्या पूर्वतयारीसाठी अप्रेंटिस किंवा शिकाऊ उमेदवार तैनात केले जायचे. पदार्थ शिजवणं, त्यात नेमक्या प्रमाणात सगळ्या गोष्टी टाकणं, श्रीखंड घोटणं ही प्रमुख कामं मुख्य बल्लवांकडे असत. रात्रभर सगळी तयारी झाली की, एक डुलकी घेऊन भल्या पहाटे सगळ्यांसाठी कडक चहा टाकला जायचा आणि तो पिऊन स्वयंपाक बनवायला सुरुवात व्हायची. येणारी पाहुणे मंडळी कार्यालयात शिरली की फुलांचा, अत्तराचा, गुलाबपाण्याचा, प्रत्येकाच्या अंगावर असलेल्या नव्या कोऱ्या कपड्यांचा आणि कार्यालयाच्या मागच्या बाजूला शिजणाऱ्या पदार्थांचा एकत्रित गंध दरवळत त्यांच्या नाकात शिरायचा.

या बल्लवांकडे दोन माणसं सहज बसतील असे भले थोरले पितळी टोप, तेव्हढ्याच मोठ्या आकाराच्या भल्या थोरल्या कढया आणि दोन माणसं मांडी घालून सहज बसतील एवढ्या आकाराच्या पराती असत. शेगड्या धगधगून पेटलेल्या असायच्या आणि त्यांनी आपल्या माथ्यावर टोपांना घेतलेलं असायचं. या भल्या थोरल्या टोपांच्या अर्ध्या भागापर्यंत भाजी, आमटीचं मिश्रण गरम वाफा सोडत नांदत असायचं आणि मुख्य बल्लव साधारण चार फुटी लांब कालथ्याने ते मिश्रण गरम वाफ अंगावर घेत ढवळत असायचे. मधून त्यात मसाले, भाज्या नेमक्या मापाने पडत असायच्या. उकळी आलेली वाफ साऱ्या आसमंतात आपला दरवळ सोडत; चवदार स्वयंपाक बनतोय याची वर्दी देऊन यायची. गरम वाफेने, शेगडीच्या धगीने घामाघूम झालेले आचारी, कालथा टोपात ठेवून अंमळ विश्रांती घ्यायचे, खांद्यावरच्या नॅपकिनने घामेजलेलं डोकं, मान, चेहरा आणि काखेतला घाम पुसून आणि चाललेल्या इतर तयारीकडे एक नजर टाकून पुन्हा एकदा स्वयंपाकाला भिडायचे.

स्वयंपाक करण्याचं त्याचंही एक तंत्र आणि क्रम असायचा. भाज्या, आमटी, मसालेभात, कोशिंबीर, चटणी, पंचामृत हे सगळे पदार्थ तयार झाले, भात वाळून तयार झाला आणि पंगती वाढण्याला पाऊण एक तास उरला की ही बल्लव मंडळी पुऱ्या आणि भजी तळायला लागायची. पहिली पंगत बसली की उन उन वरणभात, टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि गरमागरम भजी, इतर पदार्थांसोबत वाढली जायची.

श्रीखंडाचा बेत असेल तर आदल्या दिवशी फडक्यात टांगलेल्या दह्याचा चक्का सकाळी मस्त घोटून, त्यात केशर, वेलची, साखर मिसळून श्रीखंड तयार झालं आणि उन्हाळ्याचे दिवस असले तर बर्फाच्या लादीवर श्रीखंडाचा टोप ठेवला जायचा.

संपूर्ण स्वयंपाक आटोक्यात आला की, हे सकाळपासून उभे असलेले प्रमुख आचारी घाम पुसत एका बाजूला बुड टेकायचे आणि पाण्याने भरलेला गडवा घटघट करत वरून मुखात सोडायचे. इथे यांचं काम संपायचं आणि पापड तळणारे, वाढपी यांचं काम सुरू व्हायचं. लग्न लागलं, नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले, की कार्यालयाच्या एका बाजूला पंगतींची तयारी सुरू व्हायची. पूर्वी पाटपंगत बसायची पण पुढे रांगेत ठेवलेले टेबल आणि खुर्च्या आल्या. पांढराशुभ्र कपडा पसरून टेबलांचं विकलांग रूप झाकलं जायचं. स्टीलची ताटं, वाट्या, पाण्याची भांडी सणासण मांडली जायची आणि मीठ, लिंबू, लोणचं, चटणीपासून वाढप सुरू व्हायचं. या सगळ्यात प्रमुख बल्लवांचा सहभाग नसे. मांडामांड, वाढप करणारे वेगळे असायचे. हे सुरू झालं की प्रमुख बल्लव, मोठ्या टोपातून अन्न वाढण्याच्या पात्रात काढून देणं आणि सगळ्या वाढपींकडे लक्ष ठेवणं एवढीच जबाबदारी सांभाळत असत. पंगती उठत आल्या, शेवटची पंगत बसली की ही आचारी मंडळी कोपऱ्यात आपली पाठ टेकून घेत.

मी माझ्या लहानपणापासून अनेक कार्य, लग्न यांना उपस्थित राहिलोय, पण या बल्लवाचारींना मी कधीही लग्नातला स्वतः बनवलेला स्वयंपाक जेवताना पाहिलेलं आठवत नाही. पाहिलंय ते घटाघटा पाणी पिताना, चहा पिताना. या बल्लवाचारींच्या मुखावर एक त्रयस्थ, आपलं काम नेटकेपणाने करायचं इतकाच भाव दिसायचा. कार्याला उपस्थित तीन-चारशे आमंत्रित मंडळी, जेवणाचं कौतुक करत, एकमेकांना आग्रह करत; जेवणाचा पोटभर आस्वाद घेत असायची, तेव्हा हे मुख्य बल्लव आपलं काम आटोपून कार्यालयाच्या एका कोपऱ्यात निवांत गाढ झोपी गेलेले असायचे.

आज त्या पारंपरिक स्वादिष्ट पदार्थांनी सजणाऱ्या जेवणावळी गेल्या.. ‘घ्या हो, लाजू नका..’ असा मनापासून होणारा आग्रह संपला, ताटातला प्रत्येक पदार्थ नेटकेपणाने वाढणारे ते वाढपी हरवले आणि पानातले सगळे पदार्थ बनवणारे ते बल्लवही काळाच्या पडद्याआड गेले.

आज लग्नाच्या वातानुकूलित हॉलमध्ये शिरल्यावर तो आठवणीतला मोगऱ्याच्या गजऱ्याचा, गुलाबपाण्याचा, अत्तराचा सुगंध नसतो, दारात अगदी अगत्याने आपलं स्वागत करणारं यजमानापैकी कुणीच नसतं. सगळा फक्त उंची थाटमाट, सुटाबुटात, गणवेशात फिरणारे (स्त्री/पुरुष) भाड्याचे परिचर आणि त्यांच्या हातातल्या ट्रेमध्ये दिसणारे स्टार्टर्स, ज्यूस, शीतपेय. सगळीकडे व्यावसायिक वातावरण, व्यावसायिक अदब आणि व्यावसायिक हास्य. मैदानाच्या सभोवार लागलेले दाक्षिणात्य, चायनिज, उत्तर भारतीय असे शब्दशः अनेक प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल आणि इच्छा असेल तर खा, जेवा सांगणारी बुफे पद्धत, हाती प्लेट धरून रांगा लावणारी पाहुणे मंडळी या सगळ्यात, ‘अगत्याने येण्याचे करावे..’ यातलं अगत्यच हरवून गेलंय.

आज खूप हवाहवासा वाटणारा तो वरणभात, मसालेभात, जिलेबी, भजी, पंचामृताचा सुगंध दरवळत नकात शिरत नाही. क्वचित कुणी एखादा उत्साही, अगदी आवडीने पंगत आणि पारंपरिक जेवणाचा बेत ठेवतो आणि पुसलेल्या आठवणी जाग्या होतात. आजही मी लग्नात तो उघडबंब, टॉवेल गुंडाळलेला आणि खांद्यावरच्या पंचासहित संपूर्ण जेवणावळ पेलून नेणारा बल्लव शोधतोय.

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in