

विशेष
आनंद शिंदे
हत्तीचा रस्ता आपण अडवला, त्याचं जंगल आपण तोडलं आणि आता तो आपल्या शेतात आला म्हणून आपण त्याला दोष देतोय! जागतिक हत्ती दिनानिमित्त हत्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा हा विरोधाभास समजून घेणं अधिक गरजेचं आहे. कारण हत्ती-मानव संघर्षाची खरी सुरुवात हत्तीपासून होत नाही; ती माणसाच्या हव्यासापासून होते.
जागतिक हत्ती दिवस जवळ आला की, दरवर्षीप्रमाणे वर्तमानपत्रांचे अंक, विशेष पुरवण्या आणि विविध व्यासपीठं हत्तींच्या छायाचित्रांनी आणि त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांनी सजून निघतात, 'हत्ती वाचवा', 'वन्यजीव संरक्षण' अशा आकर्षक घोषणांचा सुकाळ होतो आणि या विषयावर काहीतरी मी लिहावं अशी सगळ्यांकडून मागणी होत असते. परंतु, स्पष्ट सांगायचं तर 'हत्ती दिवसा पुरता हा विषय अजिबात मर्यादित नसून, मानवाच्या बेसुमार, स्वार्थी आणि अदूरदर्शी वागणुकीमुळे तो ३६५ दिवस अखंड चिंतेचा आणि कामाचा विषय बनला आहे. पूर्वी कधीतरी क्वचित घडणारा हत्ती-मानव संघर्ष हा आता आपला रोजचा विषय झाला आहे. *आमच्या पिकांचं नुकसान होतं, आमची मालमत्ता उद्ध्वस्त होते; म्हणून ही व्याद इकडून दुसरीकडे घेऊन जा,' असं सर्रास आणि हक्काने सांगण्यात येतं. परंतु, मला नेहमीच हा प्रश्न सतावती की, हा विषय खरंच आपल्या समाजात गांभीयनि घेतला जातो का ? भारतात नक्कीच असे उत्तुंग अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत जे योग्य नियोजनाने आणि अभ्यासाने या विषयाची तीव्रता कमी करू शकतात. मग तरीही ही संघर्षाची गाडी नेमकी कुठे अडतेय ? याचा विचार सर्व स्तरांतून अतिशय प्रामाणिकपणे आणि सखोलपणे व्हायला हवा.
माझ्या मते तरी, 'आपलं घर' हा या संपूर्ण जटील विषयाचा मूळ गाभा आहे. उद्या अचानक आपल्या हक्काच्या घरात एखाद्या अनोळखी व्यक्तीने बिनधास्तपणे घुसखोरी केली आणि मनाला वाटेल तसं आक्रमक वागणं सुरू केलं तर ते आपल्याला क्षणभर तरी खपतं का? मुळीच नाही. मग हत्तींचं मूळ घर-त्यांचं जंगल-आपण स्वतःच्या हातांनी पूर्णपणे विस्कटल्यावर त्यांच्याकडून तरी आपली काय अपेक्षा आहे? त्यांनी काय त्यांचं ते घर उद्ध्वस्त करणाऱ्या मानवासाठी स्वागताच्या पायघड्या घालाव्यात का? माणसाची असलेली जमिनीची, संपत्तीची आणि नफ्याची भूक ही कधीच कोणापासून लपून राहिलेली नाही. मानवाच्या याच हव्यासापोटी बेसुमार जंगलतोडीपासून ते देशादेशांतील सीमांच्या लढायांपर्यंत आणि विनाशकारी महायुद्धांपर्यंत सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या आहेत. मुख्यतः या सर्व मानवनिर्मित तांडवात जर कुणाची सर्वाधिक हानी झाली असेल, तर ती मुक्या निसर्गाची! आणि तरीही माणसाची विध्वंसक वृत्ती आणि अण्वस्त्रांचे बॉम्ब फोडण्याची हौस काही कमी झालेली दिसत नाही.
यातूनच आज 'ग्लोबल वॉर्मिंग' सारखा अतिशय महाभयंकर आणि जटील प्रश्न निर्माण झाला आहे, ज्याच्या उग्र आणि दाहक रूपाने आता आपण सगळे रोजच्या रोज होरपळून निघत आहोत. उन्हाळ्यात राहू द्या, अगदी पावसाळ्यातही येणाऱ्या घामाच्या धारा, अचानक गोल फिरून कोसळणारे हिमनग, जिथे मुसळधार पाऊस पडायला हवा तिथे कोरडा दुष्काळ आणि जिथे बर्फवृष्टी व्हायला हवी तिथे कोसळणारा तुफान पाऊस, माणसाच्या तथाकथित प्रगतीने खिळखिळे होऊन कड्याकपारींसह कोसळणारे डोंगर- या निसर्गाच्या कोपाने जसा माणसाला एक अनाकलनीय चिडचिडेपणा आणला आहे, तसाच चिडचिडेपणा प्राण्यांना देखील आला आहे. जशी आपल्या मानवी समाजातील ताज्या दमाची नवी पिढी अन्यायाविरुद्ध आणि असंतोषाविरुद्ध आपला राग व्यक्त करते, तशीच प्राण्यांचीही ही ताज्या दमाची पिढी आपल्या उद्ध्वस्त अधिवासाबाबत व्यक्त होत आहे. माणसाच्या सततच्या आक्रमक हल्ल्यांमुळे आणि त्रासामुळे पूर्वी निसर्गतः कळपासोबत न राहणारा नर हत्ती आता संरक्षणाच्या दृष्टीने सोबत राहू लागला आहे. ज्या हत्तींचे फिरण्याचे मार्ग हे एकेकाळी अखंड भारतभर पसरलेले होते, ते आज केवळ तीन-चार राज्यांपुरतेच संकुचित आणि मर्यादित झाले आहेत. दुर्दैव म्हणजे, तिथेही त्यांना समजून घेणाऱ्यांपेक्षा हाकलून लावणारे आणि हुसकावणारेच लोक जास्त भेटतात.
त्यामुळे एक अभ्यासक म्हणून काम करताना, हत्तीच्या या बदलत्या वागण्यात नक्कीच खूप मोठा फरक जाणवू लागला आहे. मुळात हत्तींचे फिरण्याचे मार्ग हे भारतभरात पसरलेले असून त्यांच्याकडे अफाट स्मरणशक्ती असते. अभ्यासकांनी सखोल संशोधनानंतर मांडलेल्या अनुवांशिक स्मरणशक्तीमुळे (Genetic Memory) कित्येक पिढ्यांचे मार्ग त्यांच्या स्मरणात जसेच्या तसे कोरलेले असतात. त्याचे अतिशय उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील गडचिरोली क्षेत्रात अलीकडच्या काळात आलेल्या हत्तींचे! उपलब्ध ऐतिहासिक व वैज्ञानिक माहितीनुसार, गडचिरोलीत आलेले हे हत्ती तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर तिथे परतले असल्याचं मानलं जात आहे. जर हत्तीचं सरासरी आयुष्य ७० वर्ष मानलं, तर सुमारे पाच पिढ्यांनंतर हत्ती ओडिशा सोडून, छत्तीसगड पार करून आपल्या पूर्वजांच्या जुन्या अधिवासात महणजे गडचिरोलीत पुन्हा आले. त्यांच्या मेंदूत असलेले ते जुने नकाशे आता माणसाने स्वतःच्या सोयीनुसार केलेल्या प्रगतीनुसार पूर्णपणे बदलून गेले आहेत. पण जेव्हा हे हत्ती आले, तेव्हा हल्ला गंगने फटाके फोडून व आरडाओरड करून त्यांचं जे आक्रमक 'स्वागत' केलं, त्याने ते भयंकर चिडले आणि त्याचे अत्यंत भीषण परिणाम आज आपल्यासमोर दिसून आले. गोष्ट अत्यंत साधी आणि सरळ आहे, पण विचार फक्त आणि फक्त माणसाच्या बाजूने होत असल्याने हा पेच सोडवणं दिवसेंदिवस अधिक अवघड झालं आहे.
या समीकरणाचा जरा दुसऱ्या कोनातून विचार करून बघा. माणसाला त्याच्या मूळ गावात जेव्हा अपेक्षित उत्पन्न किंवा रोजगार मिळत नाही, तर तो तालुक्याच्या शहरात येतो. तिथेही उत्पन्न कमी वाटलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी स्थायिक होतो. तिथेही योग्य ते उत्पन्न नाही मिळालं तर मोठ्या मेट्रो शहरात जातो आणि तिथेही नाही जमलं तर थेट परदेशात निघून जातो. या स्थलांतराला आपण अत्यंत अभिमानाने मानवी 'प्रगती' किंवा 'विकास' म्हणतो. पण जंगलातील नैसर्गिक वणव्यामुळे किंवा मानवी अतिक्रमामुळे उद्ध्वस्त झालेलं जंगल पुन्हा नीट होईपर्यंत दुसऱ्या राज्यात गेलेल्या हत्तीला मात्र 'हा आमचा नाही, याला परत पाठवण्यासाठी काय करता येईल ?' हाच संकुचित विचार सर्वत्र सुरू होतो. केवढा हा मानवी दुटप्पीपणा ! हत्तीबरोबर प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना मुळात ते पूर्णपणे राज्य सरकारच्या आणि वनविभागाच्या कायदेशीर परवानगीनेच केलं जातं. अगदी गरज नसताना त्याच्याजवळ जाणं आम्ही अभ्यासक मंडळी आणि आमची टीम कटाक्षाने टाळतो. हत्तीच्या सूक्ष्म देहबोलीचा आमचा सखोल अभ्यास असल्याने, कुठल्या क्षणी काय कृती आमच्या टीमने करावी याविषयीचा एक निश्चित शास्त्रीय आराखडा तयार करून अत्यंत शिस्तीने वागलं जातं. म्हणूनच आज १५ वर्ष हत्तींबरोबर सतत काम करताना, तेही अतिशय चिडलेल्या आणि प्रसंगी अत्यंत हिंस्त्र झालेल्या जंगली हत्तींबरोबरी काम करताना, आमचा कुठलाही अपघात झालेला नाही. आमचं सर्व सामान्य माणसांना नेहमी एकच सांगणं असतं की, अभ्यासकांनी एखादी धोकादायक कृती केली म्हणून तुम्ही ती अजिबात करू नका ! आपण काय कृती करतोय आणि त्याचे परिणाम काय होतील हे अभ्यासकाला पूर्णपणे माहीत असतं; सामान्य माणसाला ते शास्त्र ज्ञात व्हायला खूप मोठा काळ लागतो.
मानवी अधिवासामध्ये किंवा शेतामध्ये आलेला हत्ती बाहेर काढताना ते अत्यंत नाजूक काम केवळ अभ्यासक किंवा वनखात्याच्या तज्ज्ञ लोकांनाच करू द्यावं. ज्यांना या विषयाची तांत्रिक माहिती नाही अशा सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणेच हिताचं असतं; जेणेकरून चुकून जर हत्ती बिथरला किंवा उधळला तर अपघात किंवा नाहक जीवितहानी होणार नाही. यासारख्या बऱ्याच गोष्टी काही वेळेला माहितीपूर्ण चित्रफिती दाखवून आणि प्रसंगी शेतात हत्ती आल्यास प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला. अर्थात, अशा सर्व प्रसंगी वनखात्याची माणसं नेहमी उपस्थित असत. आमच्या अभ्यासानंतर आणि मार्गदर्शनानंतर गावकऱ्यांनी स्वतः कबूल केलं की, त्याआधी हत्तीला न चिडवता शांतपणे जाण्यास मार्ग देण्याचा विषय लक्षात न आल्याने भूतकाळात भयंकर कठीण आणि जीवघेणे प्रसंग ओढवले होते.
काही वेळेला मनापासून वाटतं की, हा सकारात्मक विचार आपण एक समाज म्हणून का करू शकत नाही? हत्तींचा आपल्या भागात येण्याचा खरा अर्थ हा आहे की, आपलं जंगल अजूनही समृद्ध आणि चांगलं आहे. ते आपण सर्वांनी मिळून टिकवलं पाहिजे. आज हत्तीचा आवडता 'भेडले माड' हे झाड त्याने स्वतःच्या अन्नासाठी पाडलं, तर माणसाने लावलेल्या शेतीचं नुकसान होतं महणून आक्रोश केला जातो. पण तेच झाड माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पुष्पगुच्छासाठी छाटून विकलं, तर त्याने 'उत्पन्नाचं नवीन साधन शोधलं' म्हणून त्याला बुद्धिमान मानलं जातं । यात फक्त आणि फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. निसर्गातील जिवांची सहवेदना समजल्यावर मानवाचं प्राण्यांबरोबरचं सहजीवन अत्यंत सोपे आणि आनंददायी होतं.
अभ्यास करताना 'शेतकरी जगलाच पाहिजे ही महत्त्वपूर्ण बाब अधोरेखित करूनच आम्ही आमच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि हत्तीला हत्तीचं सुरक्षित घर परत मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न वनखात्याच्या देखरेखीखाली आणि परवानगीने सुरू झाले. मुळात हे संघर्ष का घडत आहेत? त्याचे अत्यंत दूरगामी भयानक परिणाम काय आहेत ? जे आज पडतंय त्याने आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण किती कठीण आणि भयावह काळ ठेवून जात आहोत हे प्रत्येक गावाला, प्रत्येक माणसाला आम्ही समजावून सांगितलं, हत्तीच्या दैनदिन सवयींचा नीट शास्त्रीय अभ्यास केला. माणसाने त्यांचं उद्ध्वस्त केलेलं घर त्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिलं आणि हत्तीचं घर पुन्हा पहिल्यासारखं समृद्ध करण्याचे आमचे प्रयत्न सुरू झाले. यातूनच अतिशय मोठ्या प्रमाणात स्थानिक वृक्षलागवड तसेच गवताळ प्रदेश उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं. या मोहिमेत काही ठिकाणी संपूर्ण गाव आमच्या सोबतीला खंबीरपणे उभं राहिलं आणि तिथे मोठं यश मिळालं, तर काही ठिकाणी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले.
पण कालांतराने या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश दिसू लागलं आहे, हे निसर्गाचं काम एका रात्रीचं नाही; त्याला अफाट संयम, चिकाटी आणि वेळ दोन्ही लागेल. पण एक गोष्ट मानवाने या टप्प्यावर पक्की लक्षात ठेवावी-मानव आज निसर्गापासून अनैसर्गिकरीत्या खूप लांब गेला आहे, पण त्याचे अंतिम अस्तित्व अजूनही पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे. माणसाला जर या पृथ्वीवर टिकून राहायचं आणि जगायचं असेल, तर सर्वप्रथम निसर्ग जगला पाहिजे आणि वन्यप्राणीच निसर्गाला खऱ्या अथनि जिवंत ठेवू शकतात. त्यातही हत्तीला तर 'निसर्गाचा वास्तुविशारद आणि अभियंता' मानलं जातं. त्यामुळे हत्तीला हाकलणं किंवा संपवणं म्हणजे निसर्गचक्र स्वतःच्या हाताने तोडून टाकण्यासारखं आहे आणि यात अंतिम आणि भरून न येणारं नुकसान हे फक्त आणि फक्त मानवाचंच आहे!
- हत्ती अभ्यासक, संस्थापक, ट्रॅक कॉल द वाइल्डलाइफ फाऊंडेशन