आनंदाचा उत्सव

हसू हे मानवी आयुष्याला लाभलेलं सर्वात सुंदर आणि सहजसोपं वरदान आहे. मनातील भावना व्यक्त करण्याचा हा एक निरागस, पण प्रभावी मार्ग आहे आणि याच आनंदाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे आजचा ‘जागतिक हास्य दिन’.
आनंदाचा उत्सव
Published on

विशेष

डॅा.प्रमोद बेजकर

हसू हे मानवी आयुष्याला लाभलेलं सर्वात सुंदर आणि सहजसोपं वरदान आहे. मनातील भावना व्यक्त करण्याचा हा एक निरागस, पण प्रभावी मार्ग आहे आणि याच आनंदाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे आजचा ‘जागतिक हास्य दिन’.

हसू’ हे मानवी जीवनाला मिळालेले निसर्गाचे एक अत्यंत सुंदर आणि अमूल्य वरदान आहे. मनाची अथांगता आणि भावनांची स्पंदने ज्या एका लहानशा कृतीने क्षणात व्यक्त होतात, ते म्हणजे हास्य! आज असाच आनंद आणि उत्साहाचा एक विशेष दिवस, म्हणजेच 'जागतिक हास्य दिन'! दर वर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी तो साजरा केला जातो.१९९८ साली डॅा. मदन कटारिया या भारतीय डॅाक्टरने याची सुरुवात केली,या गोष्टीचा एक भारतीय म्हणून आपल्याला आनंद आणि अभिमान वाटायला हवा.कारण इतक्या कमी वर्षांच्या कालावधीत हा दिवस देशविदेशात हास्य दिन म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

चेह-यावरील स्नायूंच्या हालचालीचा आपल्या शरीरातील मनोभावनेवर परिणाम होतो,असा एक सिद्धांत आहे.त्यापासून प्रेरणा घेऊन डॅा.कटारिया यांनी हास्ययोगाचा प्रसार करण्यासाठी १९९५ साली हास्यक्लबची सुरुवात केली.पहिल्या वेळी पार्कमध्ये फक्त पाच माणसं होती.पण हळूहळू उद्यानं,मैदानं हसण्याने दुमदुमू लागली.१०जानेवारी १९९८ ला जेव्हा जागतिक हास्यदिन प्रथमच साजरा केला गेला तेव्हा तिथे बारा हजार माणसं उपस्थित होती.

भारताबाहेर या चळवळीची सुरुवात डेन्मार्क मध्ये २००० साली झाली.आता जवळपास ११५ देशांमध्ये सहा हजारांहून अधिक हास्यक्लब आहेत. या सर्व देशात साजरा केला जात असल्यामुळे हास्य दिन खरोखरच जागतिक झाला आहे.जगाने दखल घ्यावी इतक्या उंचीवर एखाद्या माणसाचा ध्यास त्याला कसा घेऊन जाऊ शकतो याचं डॅा.कटारिया हे आपल्या मातीतलं उदाहरण आहे.

सद्ध्याचा काळ हा भयभीत करणारा आहे. सगळीकडे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे.या मनोधैर्य खच्ची करणाऱ्या अस्थिर युगात हास्यदिनाचं मोल अधिकच आहे.कारण हसू ही एक सकारात्मक आणि शक्तिशाली उर्जा आहे.शरीराला,मनाला आणि भोवतालच्या परिसराला आनंदी करणारी सर्व तत्वे त्यात आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती समूहात हसते, तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा संपूर्ण परिसरात पसरते आणि त्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते.

सकाळी फिरायला गेलं तर हाहाच्या बाराखडीत हसणारे ग्रूप आपल्याला दिसतात.यांचं नक्की काय चाललंय असंही एखाद्याला वाटू शकतं. शरीराची एक गंमत आहे.त्याला आपण खरोखर हसतोय की खोटं हसतोय ते कळत नाही.त्यामुळे हे नाटक चाललंय की माणूस खरोखर आनंदी आहे का ,हे त्याला समजत नाही.

हास्यक्लबचं सांगणं हेच आहे की,fake it until you make it.खोटंखोटं का होईना हसा. एकदा का तुम्हाला आणि तुमच्या शरीराला हसण्याची सवय लागली,त्यातली गोडी कळली की तुम्हाला आपोआप हसू येईल. हसण्याला कुठलीही भाषा नसते त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी हास्य हे एक उत्कृष्ट माध्यम आहे.हसण्याची ही आरोग्यदायी साथ जगभर अशीच पसरत जावो. आणि हास्याच्या माध्यमातून आरोग्य,आनंद आणि जागतिक शांतता मिळावी हा डॅा.कटारियांचा या चळवळीमागचा उद्देश सफल होवो ही प्रार्थना आपण करू या.

आपल्या शरीराला हसण्याचा किती फायदा होतो याची उजळणी करण्याचा हास्यदिन हा दिवस आहे.खूपदा माहिती असलेल्या किती तरी गोष्टी आपण मनाच्या खोल कप्प्यात ठेवलेल्या असतात.आपण तो कप्पा उघडून बघतच नाही.तो कप्पा जर बंद असेल तर आज तो उघडून बघायला हवा. हसण्याचे शरीराच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.हसल्यावर आपल्याला छान वाटतं. कारण हसतांना एंडॅार्फिन्स सारखी आनंददायी रसायनं आपल्या शरीरात स्त्रवतात.वेदना कमी करणे,मनःस्थिती सुधारणे,ताण कमी करणे यासारखी कामं ही रसायनं करतात ही फील गुड वाटायला लावणारी रसायनं कमी झाली की मग उगाचच स्वतःची चिडचिड आणि इतरांची डोकेदुखी वाढते.

हसतांना चेह-याचे बारा ते सतरा इतके स्नायू हलतात.खदखदून म्हणजे ज्याला आपण पोट धरून हसणं म्हणतो तेव्हा पोटाचे, फासळ्यांचे, मानेचे असे ऐंशी स्नायू हलतात.म्हणजे हसणं हा एकप्रकारे या स्नायूंना होणारा एरोबिक व्यायाम आहे.दहा ते पंधरा मिनिटे जोरात हसलं तर चाळीस कॅलरींचं ज्वलन होतं.हसण्यामुळे झोप देखील लवकर लागते. हसल्याने ताणतणाव कमी होतात.एखाद्या गंभीर परीस्थितीला देखिल थोडं हसत खेळत घेतलं तर टेन्शन कमी होतं.टेन्शन म्हंटलं की स्ट्रेस हार्मोन्स वाढतात.त्यातून डायबेटिस,ब्लड प्रेशर अशी उपद्रवी पिलावळ सुरू होते.

हसण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणा-या टी पेशींची संख्या वाढते.त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. हसतमुख राहणारी माणसं अधिक काळ जगतात असं काही अभ्यासकांना आढळलंय.हास्यामुळे आपलं दुखणं देखिल कमी होतं.सारखं कण्हत बसल्याने दुखणं कमी होत नाहीच,उलट जवळच्यांना पण ते त्रासदायक वाटू लागतं..त्यामुळे आपलं दुखणं आपल्याजवळ ठेऊन थोडंतरी हसतमुख रहायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे!

हसणारा माणूस आशावादी असतो.आणि अशा माणसाबरोबर राहिल्यास आपल्या स्वभावात चांगला फरक पडू शकतो. हसण्याने रक्तवाहिन्यांतून रक्तप्रवाह चांगला होतो,त्यामुळे ह्रदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि ह्रदयरोग व्हायची शक्यता कमी होते.

हसणं ही एकमेकांच्या जवळ जायला आणि आहेत ती नाती टिकवायला मदत करतात.हसणा-या, हसवणा-या माणसाभोवती माणसांचं कोंडाळं असलेलं आपण नेहमीच पाहतो,कारण हसणं ही आपली मानसिक गरज आहे.समोर आलेल्या ओळखीच्या वा अनोळखी माणसाशी हसून बोललं तर त्याला किती छान वाटतं. एखादा माणूस अगदी तावातावाने काहीतरी सांगायला आला असला तरी त्याचा चिडचिडेपणा वा राग बोथट करण्याचं सामर्थ्य एका निर्मळ हसण्यात आहे.म्हणजे आहेत ती नाती टिकवायला,आणि नवीन नाती जोडायला हा हास्यमंत्र नक्कीच गुणकारी आहे.

बरं,या हसण्यासाठी काही पैसे लागतात का,तर तसंही नाही.समोरचा माणूस हा आपल्याला फसवायलाच आला आहे असं समजूनच आपण खूपदा वागतो.हा पूर्वग्रह बाजूस सारून थोडं भाबडं वाटलं तरी समोरच्याचा आदर करणारं माफक का होईना हसू ओठावर यायला हवं.खूप माणसं,विशेषतः अधिकाराच्या खुर्चीत बसलेली,आपल्या खत्रूडपणाची इस्त्री केलेल्या चेह-यावर हसण्याची सुरकुती पडणार नाही याची विशेष काळजी घेतात. थोडा अहम कमी केला तर ओठावर सहजपणे हसू येऊ शकतं.

हसण्याचे हे फायदे आपल्या सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात माहीत आहेत. तरी पण आपण हसण्याचा बाबतीत कंजूषी का करतो? आजच्या धावपळीच्या जगण्यात आपण खूपच एकटे एकटे होत चाललोय.आभासी जगात आपण मुखवटे घालून लोकांशी वरवरची नाती निर्माण करतो.पण विनासंकोच कुठल्याही गोष्टीवर हसण्याइतकी ती जवळची होत नाहीत.म्हणायला वॅाटसअॅपवर विनोदांचा हल्ली रोज रतीब सुरू असतो.पण तो वाचायला,मनमोकळेपणाने हसायला आपल्याला वेळ नसतो.इमोजीमध्ये आपलं हसणं बंदिस्त झालंय. हसणं देखील औपचारिक झालंय. चार जवळचे मित्र भेटले की कुठल्याही छोट्या किंवा ति-हाईताला हसण्याजोग्या न वाटणाऱ्या गोष्टींवर सातमजली हशा पिकू शकतो.टीव्ही बघत एकट्याने जेवण्याऐवजी जर एकत्र जेवायला बसलं तर साध्याशा गप्पागोष्टीतून आनंद आणि हसू मिळू शकतं. पण हे जर या धकाधकीच्या जगण्यात शक्य नसेल तर आपणच लहान सहान गोष्टीत आनंद शोधला पाहिजे.”प्रौढत्वी निज शैशवास जपणे”हा बाणा कवीचाच नाही तर आपला देखील असायला हवा.आपल्यातलं हे मूल जागं राहिलं तर आनंद आपणहून दिसायला लागेल.मग हसू आपोआपच ओठावर येईल.

जागतिक हास्य दिना निमित्त याहून अधिक काय आणि कशाला मागायचं! तर या हास्यदिनी आपण एक संकल्प करूया. दिवसातून किमान एकदा तरी मनापासून खळखळून हसायचं.

लेखक आणि पेडिट्रिशियन

pramodbejkar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in