नोंद
विद्या कुलकर्णी
१९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन. २०२५ च्या या दिनाची थीम आहे, ‘माझा आवडता फोटो’. अर्थात आपला आवडता फोटो काढायचा तर तो कसा काढायचा, त्याआधी काय विचार करायचा हे कळलं पाहिजे. आज प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. कदाचित म्हणूनच फोटो काढणं अधिक कठीण झालं आहे.
एकेकाळी मोजक्यांची मिरासदारी असलेले महागडे कॅमेरे आज स्मार्टफोनच्या रूपाने बहुसंख्य लोकांच्या हातात आले आहेत. छायाचित्र घेणं अगदी सुलभ आणि सोपं झालं आहे. हा बदल स्वागतार्ह असला तरी फोटो घेणं ही केवळ एक यांत्रिक क्रिया नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. फोटो काढणं जसं आनंददायी आहे, तसंच ते जबाबदारीचं काम आहे, याचं भानही सुटता कामा नये. छायाचित्रणाशी निगडित याच महत्त्वाच्या गोष्टींचं हे आत्मचिंतन, आजच्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त.
जागतिक छायाचित्रण दिवस
माणसाच्या शोधवृत्तीतून आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून तयार झालेला कॅमरा हे एक साधन आहे, तर या साधनाच्या माध्यमातून केली जाणारी फोटोग्राफी ही कला आहे. फोटोग्राफी ही सर्वात आधुनिक कला मानली जाते. साधारण दोन शतकांपूर्वी १८२६-२७ च्या सुमारास पहिलं स्थिर छायाचित्र घेतलं गेलं. फोटोग्राफीचा अर्थ प्रकाशानं काढलेलं चित्र. तोच प्रयोग जोसेफ निसेफोर निएप्स यानं धातूची प्लेट वापरून केला आणि आपल्या खिडकीतून दिसणारं दृश्य टिपलं. आज आपण एका क्षणात फोटो टिपतो, पण त्याकाळी त्याला अनेक तासांचं एक्सपोजर द्यावं लागलं.
या पहिल्या छायाचित्रानंतर साधारण दहा-बारा वर्षांनी एक महत्त्वाची घटना घडली. पॅरिसमध्ये लुई दागेर या कलाकाराने ‘डॅग्यूरोटाइप’ ही अधिक जलद आणि व्यावहारिक छायाचित्रण पद्धती विकसित केली. ज्यामुळे अनेक तासांचे एक्सपोजर अवघ्या काही मिनिटांवर आले. या क्रांतिकारी बदलाने लोकांचं कुतूहल चाळवलं. आवश्यक साधनांची जुळवाजुळव करून फोटो काढणाऱ्यांची आणि ते काढून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. तो उत्साह थिओदोर मॉरिसे या कलाकाराने ‘डॅग्यूरोटाइपमॅनिया’ चित्रातून हलक्याफुलक्या पद्धतीने रंगवला आहे. ट्रापपॉडवर लावलेले मोठाले कॅमेरे, ‘पेपरवर छायाचित्र’ मिळेल याचे जाहिरात फलक आणि आपले पोट्रेट काढून घेण्यासाठी लागलेल्या लोकांच्या रांगा- हे चित्र काहीसं अतिशयोक्तीपूर्ण असलं तरी तत्कालीन वास्तवावर आधारित आहे.
१९ ऑगस्ट १८३९ ला फ्रेंच सरकारनं ‘डॅग्यूरोटाइप’ तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं केलं, त्यातून व्यावसायिक छायाचित्रणाला गती मिळाली. याच कारणामुळे १८३९ हे छायाचित्रणाचे अधिकृत जन्मवर्ष, तर १९ ऑगस्ट हा ‘छायाचित्रण दिन’ मानला जाऊ लागला. १९८८ मध्ये भारतीय छायाचित्रकार ओ. पी. शर्मा यांच्या पुढाकारातून १९ ऑगस्ट जागतिक पातळीवर साजरा होऊ लागला आणि कोणत्याही विशेष दिनाप्रमाणेच ‘जागतिक छायाचित्रण दिन’ हा फोटोग्राफीच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करण्याचा दिवस बनला.
तांबे-चांदीच्या प्लेटपासून स्मार्टफोनपर्यंतची अनोखी झेप
प्रकाशकिरणांना नियंत्रित व केंद्रित करण्याचं साधन म्हणजे भिंग आणि प्रकाशकिरणांना संवेदनशील असणारी धातूची प्लेट (आणि नंतर फिल्म) - या किमान मूलभूत घटकांच्या वापरातून सुरू झालेला फोटोग्राफीचा प्रवास उत्तरोत्तर विकसित होत गेला आहे. सुरुवातीला तांबे-चांदीच्या प्लेटवर प्रतिमा उमटवण्यासाठी लागणारी यंत्रणा बरीच मोठी होती. त्यासाठी जड ट्रायपॉड लागायचे. अशा अवजड यंत्रणेमुळे फोटोविषय सीमित होते. पुढे फिल्म कॅमेरे आले आणि छायाचित्रण अधिक पोर्टेबल व सर्वसामान्य झालं. कॅमेरा गळ्यात अडकवून कुठेही जाणं शक्य झालं, त्याचं प्रतिबिंब फोटोच्या विषयांमध्येही पडलं. त्या त्या काळाचं दस्तऐवजीकरण छायाचित्रकारांनी केलं. युद्धाची दाहकता, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी वाताहात यापासून ते विविध लोकांचं राहणीमान, त्यांचे सुखदु:खाचे प्रसंग- हे वास्तव छायाचित्रकारांनी जगासमोर आणलं.
सुरुवातीला छायाचित्रण प्रामुख्याने उपलब्ध प्रकाशावर अवलंबून होतं, पण कृत्रिम प्रकाशाचा वापर करता येऊ लागला तसा फोटोग्राफीला आणखी एक आयाम मिळाला. फ्लॅशलाइटमुळे इनडोअर अन् रात्रीचे फोटो काढणं शक्य झालं. कॅमेऱ्याने बाहेरच्या जगातून लोकांच्या घरात, अंतरंगात प्रवेश केला.
फिल्म प्रोसेसिंग तंत्रज्ञानही अधिक प्रगत, कमी खर्चिक आणि जलद होत गेलं. गेल्या साधारण तीन-चार दशकांत फिल्मची जागा मेमरी कार्डांनी घेतली. फिल्मच्या एका रिळात जेमतेम ३६ फोटो निघत, तर मेमरी कार्डात शेकडो-हजारो फोटो साठवता येतात. अशा डिजिटल कॅमेऱ्यांच्या आगमनानं फोटो काढणं, पाहणं, दाखवणं, संपादन करून शेअर करणं, हे सगळंच अधिक सोपं आणि कमी वेळखाऊ झालं. आज उपलब्ध अगदी साध्या स्मार्टफोनमधील कॅमेरेही हाय रिझोल्यूशन फोटो देतात, त्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह अनेक ॲपशी जोड देत लोक आपल्याला हवे तसे फोटो घेऊ शकतात आणि लगेच पाठवूही शकतात. एका परीने फोटोग्राफीच्या झाडाचं पिकलेलं रसरशीत फळ आज आपल्या हातात आहे! त्याचा स्वाद तर घेऊयाच, सोबतच हा वृक्ष कसा रुजला, वाढला हेही जाणून घेऊया.
प्रगत तंत्रज्ञानात हरवलेला आशय
डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग जबरदस्त आहे. उच्च रिझोल्यूशन सेन्सर्स, ड्रोन व ३६०-डिग्री कॅमेरे, एआय-आधारित मोड्स आणि एआय निर्मित छायाचित्रांपासून ते छायाचित्रातील हवे ते घटक सुधारण्याची वा पार बदलून टाकण्याची मुभा देणारी एडिटिंग सॉफ्टवेअर्सपर्यंत, हवं तसं करण्याची सुविधा आज आहे. एकाची सवय होत नाही तोवर नवीन काही आलेलं असतं. ते वापरून पाहायचा मोहही असतोच. फोटो सहजपणे काढण्याचं तंत्रज्ञान आज आपल्या हातात आहे. मात्र त्यामुळे फोटोग्राफी उठावदार होतेय की सपाट होत चाललीय हाही प्रश्न आहे.
माझा स्वत:चा अलीकडचा एक अनुभव. मी ऐंशीच्या दशकात फोटोग्राफीला सुरुवात केली. तेव्हा फिल्म कॅमेरे प्रचलित होते. त्यामुळे माझ्या पहिल्या १५-२० वर्षांच्या कामाच्या निगेटीव्ह माझ्यापाशी आहेत. त्या मी अलीकडे स्कॅन केल्या व त्याच्या सॉफ्ट कॉपीज करून घेतल्या. त्या निगेटीव्ह पाहताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ही की, काढलेले फोटो संख्येने खूप कमी आहेत. पण नेमके आहेत. त्या फ्रेम्स आजही माझ्या लक्षात आहेत. फिल्मच्या रिळातील फ्रेमची मर्यादित संख्या आणि काढलेले फोटो बघण्यासाठी फिल्म प्रोसेस करण्यापर्यंतचा प्रतीक्षा अवधी - या मर्यादा त्यावेळी होत्या. तरीही किंवा त्यामुळेच, नेमका क्षण टिपणं, त्यासाठी थांबणं, निरीक्षण करणं- याप्रकारे फोटो घेण्याआधीची मानसिक तयारी फोटोग्राफीचा भागच होती. आपण टिपलेला क्षण लगेच बघता येणार नव्हता - त्यामुळे प्रत्येक वेळी विचारपूर्वक आणि हवं तेव्हाच शटर क्लिक केलेलं असायचं. फिल्मच्या अवघ्या ३६ फ्रेमच्या एका रिळात बऱ्याच हव्या तशा चांगल्या फ्रेम मिळालेल्या असायच्या. २००५ नंतर मी डिजिटल कॅमेरा वापरू लागले. फिल्मच्या जागी मेमरी कार्ड आलं, काढलेला फोटो लगेच बघता येऊ लागला. त्यानंतर मी काढलेल्या फोटोंची संख्या झपाट्याने वाढली. आज कोणत्याही असाईनमेंटसाठी मी कॅमेऱ्यावर वा मोबाईलवर घेतलेली फोटोसंख्या हजारोंच्या घरात असते. इतके फोटो काढले की ते सेव्ह करणं, बॅकअप करणं, त्यातून हव्या त्या फ्रेम्स निवडणं हे कामही वाढतं. फिल्म फोटोग्राफीमधील फ्रेम टिपण्याची अंगी रुजलेली शिस्त मी पार विसरून गेले आहे, याचं स्मरण मला जुन्या निगेटीव्ह बघताना झालं. साधन तुमची शैली ठरवू लागतं, साधन वर्चस्व गाजवू लागतं, याचं भान देणारा हा क्षण ठरला. टिपलेला फोटो तत्काळ दिसणं यानं फोटोग्राफीचं फारसं मूल्यवर्धन झालेलं नाही, उलट ते फोटो काढण्यात बाधा आणणारं, विचलित करणारं ठरलं आहे, असं मला वाटू लागलंय.
उथळ फोटोग्राफी थांबवूया
हातात कॅमेरे आलेत म्हणून लोकांचं फोटोग्राफीचं वेड वाढलंय असंही दिसत नाही. सहजपणे हातात आलेल्या एका प्रभावी साधनाचा वापर फारसा विचार न करता केला जातोय, असंच दिसतं. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जा, लोकांचे मोबाईल त्यांच्याही नकळत शूटिंग मोडमध्ये असतात. एका डोळ्याने ते कार्यक्रम पाहतात, तर दुसऱ्या डोळ्याने फोटो/व्हिडीओ घेण्याचं काम करतात. ना धड कार्यक्रमाचा आनंद घेतात, ना पूर्ण लक्ष देऊन फोटो घेतात. समोर चाललंय त्याचे फोटो काढणं आणि ते शेअर करणं ही भावना एवढी प्रबळ झालेली आहे की समोरचं दृश्य मनापासून पाहायची गरजही लोकांना वाटत नाही.
फोटोचा आणि स्मरणशक्तीचा परस्परसंबंध सांगणारा एक अभ्यास अलीकडे वाचनात आला. ‘फेअरफिल्ड युनिव्हर्सिटी’च्या या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना एक संग्रहालय पाहण्यासाठी नेण्यात आलं. तिथे त्यांचे दोन गट केले. ‘फिरून संग्रहालय पहा, हवे तेव्हा फोटो काढा’ असं एका गटाला सांगितलं, तर दुसऱ्या गटाला ‘फक्त संग्रहालय पहा’ म्हणून सांगितलं गेलं. नंतर दोन्ही गटांना पाहिलेल्यातलं काय काय आठवतंय याची टेस्ट घेतली. फोटो घेतलेल्या गटाला बघितलेल्या गोष्टींचे खूप कमी तपशील आठवले. काहींनी झूम इन करून क्लोजअप फोटो घेतले, पण त्याचे फारसे तपशील लक्षात नव्हते. फोटो न घेता केवळ संग्रहालय पाहणाऱ्यांना मात्र अधिक व अचूक तपशील आठवले. याला “फोटो टेकिंग इंपेअरमेंट इफेक्ट” असं म्हणतात. जेव्हा व्यक्ती एखादी गोष्ट बघता बघता फोटो घेत असते तेव्हा तिचा मेंदू लक्षात ठेवायचे काम कॅमेऱ्यावर सोपवतो. अशा वेळी आपले अधिक लक्ष फोटो घेण्यात असते, खऱ्या अर्थाने समोरची गोष्ट पाहण्यात नसते. अशा द्विधा अवधानामुळे पाहिलेल्या गोष्टी मेंदूत रुजण्यासाठीची प्रक्रिया हवी तशी घडत नाही. स्मरणशक्ती धूसर होते. पाहिलेले विस्मरणात जाते. या अभ्यासाचा निष्कर्ष आहे - फोटो घेण्याच्या आधी नीट बघा, अनुभवा, मग फोटो घ्या. कमी आणि पाहिजे तेच फोटो घ्या. ज्या क्षणांचे आपण फोटो घेऊ पाहतोय, ते क्षण आधी अनुभवा, मग त्यांचे फोटो घ्या.
खरं तर चांगले फोटोग्राफर्स याच पद्धतीने फोटो घेतात. समोरचं दृश्य आधी मनाच्या कॅमेऱ्याने बघा आणि मगच मोबाईल वा कॅमेरा क्लिक करा.
vidyakulkarni.in@gmail.com