स्मितहास्य... प्रसन्नतेचा पासवर्ड

एक साधेसे स्मितहास्य वातावरणातील ताण हलका करते, नात्यांमध्ये आपुलकी निर्माण करते आणि मनाला प्रसन्नतेची जाणीव करून देते. याच सकारात्मक भावनेचा जागर करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी 'जागतिक स्मितहास्य दिन' साजरा केला जातो. आनंद, दयाळूपणा आणि माणुसकीचा संदेश देणारा हा दिवस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची प्रेरणा देतो.
स्मितहास्य... प्रसन्नतेचा पासवर्ड
स्मितहास्य... प्रसन्नतेचा पासवर्ड'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on: 

विशेष

डॉ. शैलेश उमाटे

एक साधेसे स्मितहास्य वातावरणातील ताण हलका करते, नात्यांमध्ये आपुलकी निर्माण करते आणि मनाला प्रसन्नतेची जाणीव करून देते. याच सकारात्मक भावनेचा जागर करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी 'जागतिक स्मितहास्य दिन' साजरा केला जातो. आनंद, दयाळूपणा आणि माणुसकीचा संदेश देणारा हा दिवस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची प्रेरणा देतो.

स्मितहास्य म्हणजे नेमके काय, याची संकल्पना मनामध्ये साकारायची झाली, तर १९८७मधील रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोवील यांच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक हास्य आठवते. मनातील आंतरिक प्रसन्नता, निवांतपणा आणि समोरच्या व्यक्तीबद्दल असणारा गाढ आदर व्यक्त करणारे ते हास्य म्हणजे स्मितहास्याचे मूर्त स्वरूप. असे स्मितहास्य निश्चितच आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ओळखीच्या व्यक्ती परस्परांना भेटल्यावर असे हास्य देऊन संवादाची सुरुवात करतात. जगातील बहुतांश संस्कृतींमध्ये याला सामाजिक संमती आणि प्रतिष्ठा आहे. काही संस्कृतींमध्ये तर अगदी अनोळखी व्यक्तींनाही सहज स्मितहास्य दिले जाते, ज्यातून आनंद आणि आदराची सात्विक भावना प्रकट होते. उदाहरणार्थ, अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये अनोळखी माणसांना पाहून सहज हसणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट मानली जाते; मात्र आशियाई देशांमध्ये अशी प्रथा फारशी आढळत नाही, तर रशियन संस्कृतीत अनोळखी व्यक्तीला पाहून विनाकारण हसणे हे काहीसे विचित्र किंवा संशयास्पद मानले जाते. मानवी भावनांच्या या अभिव्यक्तीत लिओनार्डो दा विंचीच्या 'मोनालिसा'चे गूढ स्मितहास्य तर जगप्रसिद्धच आहे, ज्यावर आजही अनेक विद्वान आणि कलासमीक्षक आपापली वेगळी मते मांडत असतात.

दुसरीकडे, एखाद्या निष्पाप लहान बाळाचे स्मितहास्य कोणाचे बरे मन मोहून घेणार नाही? बाळाच्या चेहऱ्यावरील त्या एका साध्या भावाने अत्यंत क्रूरकर्मा असलेली व्यक्तीसुद्धा क्षणभरात शांत व द्रवित होऊ शकते. बाळाचे स्मितहास्य म्हणजे त्याने या जगाशी साधलेला पहिला आणि सर्वात निखळ संवाद असतो; म्हणूनच ते ओळखीच्या असोत वा अनोळखी, प्रत्येकाला अगदी सहज आपलेसे करून घेते. खरोखरच, एका छोट्याशा हास्याची महती किती अगाध आहे, नाही का ?

याच हास्याचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी हार्वी बॉल या कलाकाराने १९६३ मध्ये पिवळ्या रंगाचा प्रसिद्ध 'स्माइली बॉल' तयार केला. आजही तो जगभर तितकाच लोकप्रिय आहे. आज आपण आपल्या दैनंदिन डिजिटल संवादात, चॅटिंग किंवा टायपिंग करताना जे असंख्य 'स्माइली' वापरतो, त्याचा उगम याच कल्पनेत आहे. पुढे १९९९ मध्ये हार्वी बॉल यांनी आपल्या या स्माइलीला अधिक व्यापक आणि मानवीय अर्थ देण्याचे ठरवले आणि 'जागतिक स्मितहास्य दिन' (World Smile Day) साजरा करण्याची संकल्पना मांडली. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश जगभरात स्मितहास्याच्या माध्यमातून आनंद, दया, कृपा आणि सकारात्मकतेचा प्रसार करणे हाच आहे.

शरीरशास्त्र आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर स्मितहास्य म्हणजे गालांची थोडीशी मंद हालचाल, ओठांचे वरच्या बाजूला हलकेच उमलणे, दात न दाखवता डोळ्यांच्या बाहेरील बाजूच्या स्नायूंचे सूक्ष्म आकुंचन होणे अशा चेहऱ्यावरील सूक्ष्म भावांची एक सुरेख जुळवाजुळव असते. प्रत्येक व्यक्तीगणिक यात थोडाफार फरक असू शकतो. अशा या प्रसन्न हास्याचे नाटक, सिनेमा आणि साहित्यात वेगवेगळ्या रसांमध्ये अप्रतिम वर्णन केले गेले आहे. साहित्यात किंवा कथेतील नायिकेचे मंद स्मितहास्य आणि तिचे लाजणे ही प्रेमाची अत्यंत सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती मानली जाते. एका संस्कृत काव्यात सौंदर्याचे वर्णन करताना म्हटले आहे-

"स्मितं किंचिद् दृशौ लोले वचनं मधुराक्षरम्। गतिर्मन्दालसा यस्याः सा हि कामस्य बन्धनम्॥"

म्हणजेच, स्त्रीच्या सौंदर्याचा उल्लेख करताना तिच्या चंचल दृष्टी, मधुर वाणी आणि मंद आळसावलेल्या हालचालींसोबतच तिच्या मुखावरील मंद स्मितहास्याचे अनन्यसाधारण महत्त्व यात अधोरेखित केले आहे.

आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही स्मितहास्याला अत्यंत गढूळ आणि पवित्र स्थान आहे. भगवान बुद्धांच्या कोणत्याही मूर्तीकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक, विलक्षण आणि शांत स्मितहास्य सदैव दिसते. त्या हास्यात अथांग करुणा, दया आणि मानवी दुःखांवर मिळवलेल्या आत्मिक विजयाचा आशय सामावलेला असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काव्य किंवा अध्यात्म कदाचित थोडे बाजूला पडत असेल, परंतु स्मितहास्य हे आपल्या रोजच्या अस्तित्वाच्या अगदी जवळचे आणि नितांत गरजेचे आहे. कधी कधी काही जुन्या चांगल्या आठवणींनी आपण स्वतःशीच गप्पकन मंद हसतो, ज्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

मानसशास्त्र आणि मज्जासंस्थाशास्त्राच्या (Neuroscience) मते, आपण जेव्हा स्मितहास्य करतो, तेव्हा आपल्या मेंदूत तीन महत्त्वाची रसायने म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर्स स्रवतात. पहिले म्हणजे 'डोपामिन' (Dopamine), ज्यामुळे आपल्याला आनंद, आंतरिक समाधान आणि नवीन उत्साह मिळतो. दुसरे 'सेरोटोनिन', जे मानसिक ताणतणाव कमी करून मनात गाढ शांती, स्वास्थ्य आणि सुखाची भावना निर्माण करते आणि तिसरे म्हणजे 'एंडॉर्फिन्स', जे शरीरातील वेदना किंवा दुखणे कमी करते, आपली मनस्थिती सुधारते आणि चेहऱ्यावर सकारात्मकतेची चमक आणते. प्रत्येक वेळी होणाऱ्या स्मितहास्यामुळे ही रसायने प्रेरित होत असल्याने मन सतत प्रसन्न राहण्यास मदत होते; म्हणूनच मानवी जीवनात स्मितहास्य किती महत्त्वाचे आहे याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही.

अनेक वैद्यकीय संशोधनांनुसार, नियमित स्माईल केल्याने हृदयाची धडधड नियंत्रणात राहते, रक्तदाब (Blood Pressure) संतुलित राहतो, शरीरातील मानसिक व शारीरिक तणाव कमी होतो आणि परिणामी माणसाचे आयुष्य दीर्घायुषी होते. हे स्मितहास्य केवळ स्वतःच्या आरोग्यासाठीच नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश आणणारे एक माध्यम आहे. आपण जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाहून आत्मियतेने हसतो, तेव्हा त्या व्यक्तीलाही आदर आणि आनंदाची अनुभूती होते. जगात प्रेम आणि आपुलकी पसरवण्यासाठी स्मितहास्य हे सर्वात प्रभावी आणि उच्च माध्यम आहे. मदर टेरेसा यांनी म्हणूनच म्हटले होते-"Let us always meet each other with a smile, for the smile is the beginning of love." (आपण नेहमी एकमेकांना स्मितहास्याने भेटावे, कारण हास्य हीच प्रेमाची खरी सुरुवात आहे.)

म्हणूनच दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या शुक्रवारी येणारा 'जागतिक स्मितहास्य दिन' आपण सर्वांनी मनापासून साजरा करायला हवा. दैनंदिन जीवनात स्मितहास्याचा स्वीकार केल्याने स्वतःचा तर फायदा होतोच, पण सोबतच इतरांच्या आयुष्यातही सुखद बदल घडतात. इतरांप्रति दया आणि माया बाळगणे, तहानलेल्याला पाणी देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, मुक्या प्राण्यांना खाद्य देणे ही दयाळूपणाची खरी लक्षणे आहेत, ज्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरही आपोआप हास्य फुलते. वृद्धांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करणे मग ती त्यांची हरवलेली वस्तू शोधणे असो, त्यांना रस्ता पार करून देणे असो किंवा त्यांना आजचे नवीन तंत्रज्ञान प्रेमाने शिकवणे असो अशा साध्या साध्या कृतींमधूनही हास्याचे दीप उजळतात.

यासोबतच जागतिक स्मितहास्य दिन अधिक व्यापक पातळीवर साजरा करण्यासाठी अनेक सर्जनशील उपक्रम राबवता येतात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सकारात्मक विचार आणि दयाळूपणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या जनजागृती मोहिमा व विशेष कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. धर्मादाय संस्था, रुग्णालये आणि ज्येष्ठ नागरिक केंद्रांना भेटी देऊन तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्था विविध उपक्रम हाती घेऊ शकतात. सोशल मीडियावर #WorldSmile Day या हॅशटॅगसह ऑनलाइन उपक्रम, डिजिटल पोस्टर्स आणि व्हर्चुअल भेटीगाठींच्या माध्यमातून या दिवसाचा संदेश घराघरांत पोहोचवता येतो. रॅली, छोटी भाषणे, देणग्या गोळा करणे, स्मायली स्टिकर्सचे वाटप करणे, कला स्पर्धा किंवा सार्वजनिक ठिकाणी भित्तीचित्रे रेखाटणे यांसारख्या लोकसहभागातून या दिवसाचे औचित्य साधता येते. आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी या दिवसाचा आपल्या वैयक्तिक जीवनावर आणि समाजावर कसा सकारात्मक परिणाम होतो, यावर खुली चर्चा करता येऊ शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये हास्य आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी 'सद्भावना आव्हान' आयोजित करता येते.

खरे तर, ही स्मितहास्याची आणि दयाळूपणाची वृत्ती केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता जर आपण दैनंदिन आयुष्याचा भाग बनवली, तर स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर आणि सुंदर होईल. मानवी आत्म्याच्या उद्धाराचा किंवा मोक्ष प्राप्तीचा हा एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक मार्ग असू शकतो. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये (२.६५) महटले आहे-

"प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते॥"

अर्थात, ज्याचे चित्त प्रसन्न असते, त्याची बुद्धी तत्काळ परमात्म्यामध्ये किंवा ध्येयामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते. त्यामुळे, स्मितहास्याची ही सात्त्विक शक्ती ओळखून आपण रोजच्या जगण्यात प्रसन्नतेचा स्वीकार करूया आणि जगाला अधिक सुंदर बनवूया.

मानसोपचारतज्ज्ञ आणि सेक्सोलॉजिस्ट

logo
marathi.freepressjournal.in